( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आ दे श
( पारित दिनांक : 10 जानेवारी 2012 )
यातील तक्रारदार श्री अंबरीश दिलीप चांद्रायण यांची गैरअर्जदार क्रं.3 विरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदार क्रं.3 चे पार्सल विभागात आपली मोटर सायकल पुणे येथील कार्यालयात दिनांक 30/6/2010 रोजी नागपुर येथे पाठविण्याकरिता दिली. याठिकाणी उपस्थित कर्मचारी जो गणवेश परिधान करुन होता व नावाची पट्टी त्याच्या सद-यावर लावलेली होती त्यांने रुपये 680/- तक्रारदाराजवळुन घेतले. त्याबाबतची पावती दिली आवश्यक कागदपत्र तक्रारदारास दिले आणि 8-10 दिवसात नागपूरला मोटर सायकल मिळेल असे तक्रारदारास सांगण्यात आले. पुढे तक्रारदाराने नागपूर येथे चौकशी केली असता तक्रारदाराची मोटरसायकल आली नाही असे समजले. तक्रारदाराने मोटर सायकल स्विकारणा-या कर्मचा-याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता 8-10 दिवसात मोटर सायकल मिळेल असे सांगण्यात आले. मात्र मोटर सायकल आली नाही म्हणुन त्यांना शंका आली म्हणुन त्यांनी याबाबत चौकशी केली आणि पुणे रेल्वे पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी रिपार्ट दाखल केला. विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली परंतु विमा कंपनीने टाळाटाळ केली म्हणुन तक्रारदाराने शेवटी ही तक्रार दाखल केली. जीद्वारे गैरअर्जदार विमा कंपनी कडुन विमा रक्कम मिळावी.मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 25,000/- मिळावे. तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली.
तक्रारदाराने हया प्रकरणात पुरसिस दाखल करुन गैरअर्जदार विमा कंपनी तडजोड करुन विमा रक्कम देण्यास तयार असल्याने, गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांची नावे प्रकरणातुन वगळण्यात यावी असा उल्लेख केला. त्यामुळे त्यांची नावे प्रकरणातुन वगळण्यात आली. मात्र तक्रारदाराने रेल्वे खात्याविरुध्द तक्रार चालु ठेवली.
यात गैरअर्जदार क्रं.3 ला नोटीस देण्यात आली मात्र नोटीस मिळुनही ते हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 24/10/2011 रोजी पारित करण्यात आला.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार एकुण 11 कागदपत्रे दाखल केलीत. त्यात विमा दाव्याची प्रत, पावतीची प्रत, विमा दावा अर्जाची प्रत, आरटीओ रिपोर्टची प्रत, फायनल रिपोर्टची प्रत, इत्यादी दस्तऐवज दाखल केले.
तक्रारदार हजर त्यांचा युक्तिवाद ऐकला. गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांना प्रकरणातुन वगळण्यात आले. गैरअर्जदार क्रं.3 गैरहजर.
#####- का र ण मि मां सा -#####
यातील तक्रारदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजामधील क्रं.2 हा दस्तऐवज वाहन जमा केल्याबाबतची पावती आहे. यामध्ये वाहनाबाबतचे सर्व वर्णन आहे आणि संबंधीत कर्मचा-याची सही आहे. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी वाहन गैरअर्जदार क्रं.3 कडे नेऊन दिले आणि त्याठिकाणी उपस्थित व्यक्तिने त्यांचेकडुन पैसे घेऊन पावती दिली. पुढे पोलीस तपासात आढळुन आले की, सदर व्यक्ति रेल्वे विभागाचा नव्हता. मात्र रेल्वे विभागाने अशा व्यक्तिला कार्यालयात उपस्थित होऊन काम करु देणे व हया अशा व्यक्तिवर योग्य ती कारवाई न करणे ही तक्रारदाराला दिलेल्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. परिणामतः ही तक्रार उद्रभवली. तक्रारदाराच्या मागणी पोटी विमा कंपनी तडजोड करुन विमा रक्कम देण्यास तयार असल्याने, तक्रारदारास वाहनासंबंधीची नुकसान भरपाई प्राप्त झालेली आहे. मात्र तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी गैरअर्जदार क्रं.3 चे सेवेतील त्रुटी कारणीभुत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्रं.3 ने तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 5,000/- (रूपये पाच हजार) व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये दोन हजार ) एवढी रक्कम द्यावी.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आत करावे.