निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 27/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 06/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 14 /11/2011 कालावधी 10 महिने 08 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. रामकिशन माधवराव लासे. अर्जदार वय 45 वर्ष.धंदा.किराणा दुकान. अड.एस.एन.वेलणकर. रा.ताडकळस ता.पुर्णा जि..परभणी. विरुध्द बजाज अलायंझ इन्शरन्स कं.लि. गैरअर्जदार परभणी शाखा तर्फे व्यवस्थापक. अड.अभय कौसडीकर. पहिला मजला,साईश्रध्दा कॉम्पलेक्स. गौरी स्टेशनरीच्या वर,पेडा-हनुमान मंदीरा जवळ, स्टेशन रोड,परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- उशिरा माफीच्या अर्जावरील निकालपत्र व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.) अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडून रु.3,90,000/- जोखमीची मेडीक्लेम पॉलिसी तारीख 12/02/2007 रोजी घेतली होती तीचा वार्षिक हप्ता रु.30,000/- होता. पॉलिसी घेतल्या नंतर 20/04/2007 रोजी त्याला छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने “ अश्वीनी हॉस्पीटल अँड रमाकांत हार्टकेअर सेंटर नांदेड ” येथे अडमिट झाला होता. दिनांक 25/04/2007 रोजी डिस्चार्ज घेतलेनंतर ह्यदय रोगाच्या उपचारा करीता हैद्राबाद येथील उषा मुल्लीपुडी कार्डीक सेंटर मध्ये उपचार घेतले वरील सर्व उपचारा करीता त्याला एकुण रु.2,00,000/- इतका खर्च आला होता.त्या रक्कमेचा परतावा पॉलिसी हमी प्रमाणे विमा कंपनीकडून मिळण्यासाठी त्याने गैरअर्जदाराकडे अर्ज केला, परंतु 17/10/2008 च्या पत्रातून त्यांनी अर्जदाराने घेतलेले उपचार पॉलिसी अटीत बसत नाही या कारणास्तव क्लेम नामंजूर केल्याचे कळविले.अर्जदाराने गैरअर्जदारा विरुध्द कायदेशिर दाद मिळणेसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळणी करण्यास त्याला 1 वर्ष लागले. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी 2010 मध्ये त्याला त्रास सुरु झाल्याने नांदेड येथील हॉस्पीटल मध्ये अडमिट व्हावे लागले त्यामुळे फेब्रुवारी 2010 पासून एप्रिल 2010 पर्यंत त्याला गैरअर्जदारा विरुध्द कायदेशिर दाद मागता आली नाही.प्रकृती सुधारल्यावर माहे डिसेंबर 2010 रोजी वकिलाची भेट घेवुन त्यांना कागदपत्रे दिली व दिनांक 27/12/2010 रोजी ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.कायद्यातील तरतुदी प्रमाणे तक्रार दाखल करण्यास वरील कारणास्तव 72 दिवसांचा उशिर झाला आहे.तो निष्काळजीपणे मुळीच झालेला नाही. तरी झालेला उशिर माफ व्हावा अशी अर्जाच्या शेवटी विनंती केली आहे. अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.5) दाखल केले आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 7 लगत एकुण 12 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. गैरअर्जदारातर्फे उशिरा माफीच्या अर्जावर तारीख 24/03/2011 रोजी आपले लेखी म्हणणे (नि.13) दाखल केले आहे.अर्जदाराने तक्रार अर्जामधील पॉलिसी घेतल्यासंबंधीचा मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने त्याने साफ नाकारले आहेत.तसेच तारीख 17/10/2008 च्या पत्रातून अर्जदाराचा वैद्यकीय परतावा मागणीचा अर्ज नियमा नुसार नामंजूर केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.अर्ज नाकारले तारखे पासून ग्राहक मंचात अर्जदाराने दाखल केलेली तक्रार कायदेशिर तरतुदी प्रमाणे 2 वर्षाच्या आत दाखल केलेली नाही उशिर झाल्यासंबंधीचे दिलेली कारण काल्पनीक व खोटी आहेत.त्यासंबंधीचा कसलाही ठोस पुरावा अर्जदाराने दिलेला नाही.उशिर माफीच्या अर्जात दिलेले कारण रचनात्मक आहे.सबब उशिर माफीचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. निवेदनाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.16) दाखल केलेले आहे. प्रकरणाच्या अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदार व गैरअर्जदार यांचे तर्फे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आले. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्ये उत्तर 1 अर्जदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 - A (2) मधील तरतुदी नुसार कायदेशिर मुदतीत आहे काय ? नाही. 2 अर्जदाराने तक्रार दाखल करण्यास झालेला उशिर सबळ कारणास्तव झालेला आहे.हे पुराव्यातून शाबीत केले आहे काय? नाही. 3 उशिर माफीचा अर्ज मंजूर होण्यास पात्र आहे काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 ते 3 अर्जदाराने तारीख 12/02/2007 रोजी रु.3,90,000/- जोखमीची मेडिक्लेम पॉलिसी घेतल्यासंबंधीचा तक्रार अर्जातील मजकूर गैरअर्जदाराने नाकारलेला नाही पॉलिसी घेतल्यानंतर माहे फेब्रुवारी 2007 मध्ये अर्जदारास छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने नांदेड व हैद्राबाद येथे अडमिट होवुन उपचार घेतला होता त्यासाठी त्याला एकुण रु.2,00,000/- इतका खर्च झाला होता ती रक्कम पॉलिसी हमी प्रमाणे गैरअर्जदाराकडून मिळण्यासाठी त्याने तारीख 17/10/2008 रोजी आजारातून बरा झाल्यानंतर गैरअर्जदाराकडे क्लेम केला होता ही अडमिटेड फॅक्ट आहे.गैरअर्जदाराकडे अर्जदाराने दाखल केलेले मेडीकल पेपर्स तपासून घेतलेले उपचार पॉलिसी अटी मध्ये बसत नाहीत. व अर्जदाराला मेडीकल खर्चाच्या परताव्याची रक्कम देता येत नाही या कारणास्तव तारीख 17/10/2008 च्या पत्रातून क्लेम नाकारला होता. ही देखील अडमिटेड फॅक्ट आहे.त्या पत्राची कॉपी अर्जदाराने पुराव्यात (नि.7/1) दाखल केलेली आहे. तीचे अवलोकन केले असता पॉलिसी कंडीशन 11 नुसार तो क्लेम नाकारलेला असल्याचे त्यामध्ये उल्लेख आहे.अर्जदाराने क्लेम नाकारल्या नंतर त्याची कायदेशिर दाद मिळणेसाठी वास्तविक क्लेम नाकारल्या तारखेपासून (कॉज ऑफ अक्शन पासून) लगेच ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 -A (2) मधील तरतुदी नुसार दोन वर्षाच्या आत तक्रार दाखल करणे गरजेचे होते. परंतु ग्राहक मंचात दाखल केलेली तक्रार तारीख 27/12/2010 रोजी दाखल केलेली आहे.म्हणजेच कॉज ऑफ अक्शन पासून तक्रार दाखल करण्यास अर्जदारास 2 वर्ष 2 महिने 10 दिवस इतका उशिर झाल्याचे स्पष्ट दिसते.उशिरा माफीच्या अर्जामध्ये त्याने केवळ 72 दिवसांचा उशिर झाला असल्याचे चुकीचे विधान करुन मंचाची दिशाभुल केलेली आहे.परंतु झालेल्या विलंबा संबंधी उशिरा माफीच्या अर्जात दिलेल्या कारणाबाबत एकही सबळ व ठोस पुरावा दिलेला नाही तक्रार अर्जासोबत नि. 7 लगत अश्वीनी हॉस्पीटल नांदेड यांच्याकडून वेळोवेळी औषधापचारासाठी दिलेल्या औषधांच्या यादीच्या प्रती (नि.7/2 ते नि.7/12) दाखल केलेल्या दिसतात परंतु केवळ प्रिस्क्रीप्शन यादी वरुन त्याला वकिलांना भेटता आले नाही हे मुळीच पटण्या सारखे नाही. तसेच माहे फेब्रुवारी 2010 डिसेंबर 2010 या काळात उपचारासाठी केव्हा तरी त्याला अडमिट व्हावे लागले होते अशा एकही ठोस पुरावा दिलेला नाही केवळ औषधाच्या यादी वरुन तक्रार अर्जाच्या मुदतीत दाखल करता आला नाही या संबंधीने दिलेली कारणे मुळीच ग्राह्य धरण्याजोगी नाहीत. कारण औषध चालू असतांना घरा बाहेर पडता येत नव्हते असा एकही सबळ पुरावा मंचासमोर आलेला नाही.त्यामुळे अर्जदाराच्याच निष्काळजीपणामुळे तक्रार उशिरा ग्राहक मंचात दाखल झाली आहे. असेच यातून अनुमान निघते.ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी प्रमाणे तक्रार अर्जात कायदेशिर मुदतीची निश्चितपणे बाधा येत असल्यामुळे आणि तक्रार अर्ज दाखल करण्यास 2 वर्षे 2 महिने 10 दिवसांचा उशीर झालेला असतांना तो माफ करण्यासंबंधी एकही सबळ कारण अर्जदाराने पुराव्यात दिलेला नसल्यामुळे रिपोर्टेड केस 2007 (1) सी.पी.जे.पान 232 ( राष्ट्रीय आयोग) 2) रिपोर्टेड केस 2007 (1) सी.पी.जे. पान 323 (राष्ट्रीय आयोग) 3) महाराष्ट्र आयोग औरंगाबाद सर्किट बेंच अपील क्रमांक 680/08 4) रिपोर्टेड केस 2010 (3) सी.पी.जे.पान 186 ( राष्ट्रीय आयोग) यांनी तारीख 09/02/2002 मध्ये दिलेले निर्णय व रिपोर्टेड केस मधील वरिष्ठ न्यायालयाने दिलेली मते विचारात घेता उशिर माफीचा अर्ज निश्चितपणे फेटाळण्यास पात्र आहे. अर्जदारतर्फे अड.वेलणकर यांनी खालील रिपोर्टेड केसेसचा आधार घेतलेला आहे त्यामध्ये 1) सी.पी.आर.2009 (1) 457 ( पंजाब) 2) सी.पी.आर.2010 (1) 392 (पंजाब) 3) सी.पी.आर.2010 (1) 65 (महाराष्ट्र) 4) सी.पी.आर.2004 (3) 122 (राष्ट्रीय आयोग ) आणि 5) 2008 (1) MLR 305 मुंबई हायकोर्ट.वरील सर्व रिपोर्टेड केस मधील वरिष्ठ न्यायालयाने व्यक्त केलेली मते आणि त्यातील घटना विचारात घेता अर्जदाराच्या प्रस्तुत तक्रारीस मुळीच लागु पडत नाहीत.कारण मुळातच अर्जदारास तक्रार दाखल करण्यास कोणतेही तांत्रिक कारण घडलेले नाही.आणि अर्जदाराला तक्रार दाखल करण्यास झालेला 2 वर्ष 2 महिने 10 दिवसांचा उशीर सबळ कारणामुळे झाला होता हे ठोस पुराव्यातून शाबीतही झालेले नाही.त्यामुळे वरील रिपोर्टेड केसेस मध्ये व्यक्त केलेली मते प्रस्तुत प्रकरणी विचारात घेता येणार नाहीत. सबब मुद्दा क्रमांक 1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 उशिरा माफीचा अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2 पक्षकारांनी आपला खर्च आपण स्वतः सोसावा. 3 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. 4 प्रकरण निकाली काढण्यात येत आहे. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |