श्री. प्रदीप पाटील, सदस्य यांचे कथनांन्वये. -आदेश- (पारित दिनांक :11/11/2013) 1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की, तक्रारकर्ती क्र. 1 ही मृतक विमाधारकाची पत्नी असून, तक्रारकर्ता क्र. 2 हा त्यांचा मुलगा आहे. मृतक शैलेश रमेशराव अहीरकर यांनी वि.प. यांचेकडून रु.6,00,000/- मुल्याची पॉलिसी क्र.42869386 काढली होती. दि.08.01.2010 रोजी शैलेश रमेशराव अहीरकर यांचा मृत्यु झाला. त्यांचे पश्चात त्याची आई सौ.छायाबाई, तक्रारकर्ती क्र. 1 व तक्रारकर्ता क्र. 2 हे कायदेशीर वारस आहेत. जिवन विमा पॉलिसीच्या मुल्यावर त्यांचा समसमान अधिकार असून प्रत्येकी रु.2,00,000/- मिळण्यास ते पात्र आहे. तक्रारकर्ती वि.प.कडे जिवन विमा पॉलिसीचा दावा रक्कम मागण्याकरीता गेली असता, तिला वि.प.ने रक्कम दिली नाही व न्यायालयातून वारसा प्रमाणपत्र आणण्याकरीता तोंडी सुचित केले. तक्रारकर्तीला सौ. छायाबाई रमेशराव अहीरकर यांनी जबरदस्तीने घरातून बाहेर काढून दिले. तक्रारकर्तीने वि.प.ला विमा रकमेची मागणी केली. तसेच पुढे वि.प.ला कायदेशीर नोटीसही पाठविला. परंतू वि.प.ने या बाबीला दाद न देता विमा रक्कम तक्रारकर्तीची सासू सौ. छायाबाई रमेशराव अहीरकर यांना दिली. तक्रारकर्तीचे मते वि.प.ची कृती अनुचित आहे व त्यांनी सेवा देण्यात त्रुटी केलेली आहे. म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, वि.प.कडून रु.2,00,000/- प्रत्येकी व्याजासह मिळावे, नोटीसचा खर्च आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारीसोबत तक्रारकर्तीने एकूण 11 दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 2. सदर तक्रारीची नोटीस वि.प.वर बजावण्यात आली असत्या, त्यांनी सदर तक्रारीस प्राथमिक आक्षेपासह लेखी उत्तर दाखल केले. वि.प.ने लेखी उत्तरात नमूद केले आहे की, मृतकाने काढलेल्या विमा पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्युपर्यंत सौ. छायाबाई रमेशराव अहीरकर (आई) यांचेच नाव नामनिर्देशित करण्यात आले होते. त्यामुळे नामनिर्देशित नियमानुसार त्यांना विमा कंपनीने संपूर्ण कागदांची शहानीशा करुन विमा रक्कम दिली. तक्रारकर्तीने सदर तक्रारीमध्ये सौ. छायाबाई रमेशराव अहीरकर यांना विरुध्द पक्ष केले नाही. सदर तक्रारीत त्या आवश्यक व योग्य पक्ष आहे. त्यांचे गैरहजेरीत सदर प्रकरण चालविणे योग्य नसल्याने सदर तक्रार खर्चासह खारिज करण्याची मागणी वि.प.ने प्राथमिक आक्षेपात केलेली आहे. तक्रारकर्तीने सदर मंचासमोर तक्रार दाखल करण्याआधी 2 रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नागपूर यांचेसमोर उत्तराधिकारी प्रमाणपत्र खटला क्र. 47/2010 दाखल केलेले असून न्यायप्रविष्ट आहे. सदर दाव्यामध्ये सौ. छायाबाई रमेशराव अहीरकर या गैरअर्जदार क्र. 1 व सदर तक्रारीतील वि.प. हे गैरअर्जदार क्र. 2 आहेत. सदर प्रकरणामध्ये जोपर्यंत तक्रारकर्ती वारसदार आहे हे सिध्द होत नाही, तोपर्यंत तिला तक्रार करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सदर तक्रार खारीज करावी अशी विनंती वि.प.ने केलेली आहे. पुढे वि.प.ने परिच्छेदनिहाय उत्तरामध्ये पॉलिसी व नामनिर्देशित व्यक्ती म्हणून सौ. छायाबाई रमेशराव अहीरकर यांचेच नाव असल्याचे व तिला रक्कम दिल्याची बाब मान्य करुन तक्रारकर्तीने त्यांना सुचित केल्याचे व तिने विमा रकमेची मागणी केल्याची बाब नाकारली. तक्रारकर्तीची तक्रार नाकारुन प्रस्तावित अर्जामध्ये नामनिर्देशित करण्यात आलेल्या व्यक्तीला त्यांनी विमा रक्कम दिलेली आहे. तसेच मृतकाने पॉलिसी काढल्यानंतर कधीही उत्तराधिकाचे नाव बदलविण्याकरीता सुचित न केल्याने वि.प.यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे वि.प.ने कथन केले आहे. 3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आले असता, उभय पक्षांनी लेखी व तोंडी युक्तीवाद सादर केला. मंचाने सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेली कागदपत्रे, शपथेवरील साक्षपुरावा व युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता मंचाचे निर्णयार्थ खालील मुद्दे व निष्कर्ष नोंदविण्यात आले. मुद्दे निष्कर्ष 1.. वि.प.ने तक्रारकर्तीला त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे काय ? नाही. 2.. आदेश ? तक्रार खारीज. -निष्कर्ष- 4. उभय पक्षांच्या युक्तीवादावरुन हे स्पष्ट होते की, सदर प्रकरणातील तक्रारकर्तीने दिवाणी न्यायालयासमोर वारसान प्रमाणपत्र मिळण्याकरीता प्रकरण क्र. 47/10 दाखल केले आहे व ते त्यांनी नाकारलेले नाही किंवा वि.प.ने दाखल केलेल्या उत्तरालाही तक्रारकर्तीने कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. वि.प.ने वारसान प्रमाणपत्र मिळण्याकरीता दाखल प्रकरणाची प्रत मंचासमोर दाखल केलेली आहे. त्यावरही तक्रारकर्तीने कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. वारसान प्रमाणपत्रासंबंधीचे प्रकरण अद्यापही दिवाणी न्यायालयासमोर प्रलंबित असून त्यांनी उत्तराधिकारी म्हणून तक्रारकर्तील प्रमाणित केलेले नाही. त्यामुळे सदर उत्तराधिकारी संबंधीचा वाद न्यायालयासमोर प्रलंबित आहे हे स्पष्ट होते आणि वि.प.ने सदर विम्याची रक्कम पॉलिसीमध्ये नामनिर्देशित व्यक्ती मृतक शैलेश अहीरकरची आई सौ. छायाबाई रमेशराव अहीरकर यांना संपूर्णपणे दिली आहे. त्यामुळे वि.प.ने कुठलीही सेवेत त्रुटी केल्याचे सदर प्रकरणी स्पष्ट होत नाही. करिता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश-
1) तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते. 2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा. |