(पारीत व्दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्या )
(पारीत दिनांक-17 सप्टेंबर, 2021)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 अनुक्रमे विमा कंपनी व बॅंक यांचे विरुध्द नॉमीनी म्हणून तिचे मृतक वडीलांची विम्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती ही तिचे मृतक वडील आणि विमाधारक श्री नामदेव सखाराम उके यांची मुलगी असून ती विमा पॉलिसी मध्ये नॉमीनी आहे. यातील विरुध्दपक्ष क्रं 1 ही एक विमा कंपनी असून विम्याचा हप्ता हा विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत असलेल्या विमाधारकाचे खात्यातून कपात झालेला आहे. वडीलांचे मृत्यू नंतर तक्रारकर्ती विमा पॉलिसीमध्ये नॉमीनी म्हणून लाभार्थी असल्याने ती विरुध्दपक्षांची ग्राहक आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ही विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची एजंट म्हणून कार्य करते.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे वडील नामे श्री नामदेव सखाराम उके आणि तिची आई श्रीमती तुळसाबाई यांचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत संयुक्त बचत खाते असून त्या खात्याचा क्रमांक-501910410000136 असा आहे. तक्रारकर्तीचे सुध्दा विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत संयुक्त खाते आहेत. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी, तिचे वडीलांचे नावे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून ग्रुप मास्टर पॉलिसी अंतर्गत सर्वे शक्ती सुरक्षा विमा पॉलिसी उतरविली असून त्या पॉलिसीचा क्रमांक-0282839600 व मेंबरशिप क्रं-0291802133 असा असून विमा रक्कम रुपये-25,000/- एवढी आहे. सदर विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता रुपये-1000/- एवढा होता.
तिने पुढे असे नमुद केले की, या पॉलिसी शिवाय तिचे वडीलांचे नावे अन्य एक पॉलिसी क्रं-0282839600, मेंबरशिप क्रं-0304627403 काढली असून विमा रक्कम रुपये-2,25,000/- आहे, सदर विमा पॉलिसी दिनांक-17 ऑगस्ट, 2013 पासून अमलात आली असून वार्षिक विम्याचा हप्ता रुपये-9000/- एवढा होता. दोन्ही विमा पॉलिसीज 05 वर्षा करीता काढण्यात आल्या असून दोन्ही विमा पॉलिसी मध्ये नॉमीनी म्हणून तक्रारकर्ती होती. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी उपरोक्त नमुद तक्रारकर्तीचे वडीलांचे बॅंक खात्यातून विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे विमा हप्त्याची रक्कम कपात करण्याची जबाबदारी स्विकारली होती.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे वडीलांचे नावे असलेल्या पॉलिसी क्रं-0282839600 चा वार्षिक विमा हप्ता रक्कम रुपये-9000/- त्यांचे वि.प.क्रं 2 बॅंकेच्या खात्यातून दिनांक-14.01.2015 रोजी कपात झाला होता. त्यानंतर दिनांक-23.12.2015 रोजी वार्षिक विमा हप्ता रक्कम रुपये-9000/- बचत खात्या मधून कपात करण्यात आला होता. त्याच बरोबर दुस-या विमा पॉलिसी संबधात प्रती वर्ष रुपये-1000/- या प्रमाणे विमा हप्त्यांची रक्कम तिचे वडीलांचे खात्या मधून कपात करण्यात आली होती. तिचे वडीलांनी दिनांक-28.03.2016 रोजी बॅंकेच्या खात्यात रुपये-9000/- नगदी जमा केले होते. दिनांक-28.03.2016 रोजी वार्षिक हप्ता रुपये-1000/- असलेल्या विमा पॉलिसीचा हप्ता तिचे वडीलांचे बचत खात्या मधून कपात करण्यात आला होता आणि त्यावेळेस तिचे वडीलांचे बचत खात्यामध्ये रुपये-14,085/- एवढी रक्कम शिल्लक होती परंतु पॉलिसी क्रं-0282839600 आणि मेंबरशिप क्रं-0304627403 असलेल्या विमा पॉलिसीचे वार्षिक विमा हप्ताची रक्कम रुपये-9000/- विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी त्यांचे खात्या मधून कपात केली नसल्याने सदर वार्षिक विमा हप्ता रक्कम रुपये-9000/- विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे जमा झाली नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी वार्षिक विमा हप्ता रकमेची कपात न करुन दोषपूर्ण सेवा दिली. तक्रारकर्तीचे वडीलांचे निधन दिनांक-01 जून, 2016 रोजी झाले. वडीलांचे मृत्यू नंतर तिने दोन्ही विमा पॉलिसीची रक्कम मिळण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेकडे दिनांक-15.06.2016, दिनांक-12.07.2016 आणि दिनांक-14.07.2016 रोजी लेखी अर्ज दिलेत. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी पॉलिसी क्रमांक-0282839600, मेंबरशिप क्रं-0291802132 ची पूर्ण विमा रक्कम रुपये-28,587/- दिनांक-14.07.2016 रोजी तक्रारकर्तीचे बॅंक खात्यात जमा केली. तसेच तिचे आईचे नावे असलेल्या विमा पॉलिसीची रक्कम रुपये-16,792/- सुध्दा तिचे बॅंक खात्यात जमा केली.
तिने पुढे असे नमुद केले की, तिचे वडीलांचे नावे असलेली अन्य एक पॉलिसी क्रं-0282839600, मेंबरशिप क्रं-0304627403 विमा रक्कम रुपये-2,25,000/- व त्यावरील बोनससह संपूर्ण रक्कम तिचे खात्यात जमा न करता फक्त रुपये-15,007/-एवढीच रक्कम तिचे खात्यात जमा केली. अशाप्रकारे विमा पॉलिसीपोटी देय संपूर्ण लाभाची रक्कम न देऊन तिला दोषपूर्ण सेवा मिळालेली असून त्यामुळे तिचे आर्थिक नुकसान झाले असून तिला शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तिने विचारणा केली असता सदर विमा पॉलिसीचा विमा हप्ता भरल्या गेला नसल्यामुळे पॉलिसीचा संपूर्ण लाभ देता येणार नाही असे तिला बॅंके तर्फे सांगण्यात आले. तिचे असे म्हणणे आहे की, तिचे वडीलांचे बॅंक खात्यात पैसे शिल्लक असताना वर नमुद विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी कपात करुन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे का जमा केला नाही, त्यामुळे तिचे आर्थिक नुकसान झालेले आहे. म्हणून शेवटी तिने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे विरुध्द दाखल केलेली असून त्याव्दारे पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या विमा पॉलिसी क्रं-0282839600, मेंबरशिप क्रं-0304627403 अन्वये संपूर्ण देय विमा रक्कम रुपये-2,25,000/- आणि त्यावरील बोनस यासह तक्रारकर्तीला अदा करण्याचे आदेशित व्हावे आणि सदर संपूर्ण विमा रकमेवर तिचे वडीलांचा मृत्यू दिनांक-01.06.2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-15 टक्के दराने व्याजाची रक्कम तक्रारकर्तीला अदा करावी असे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या सेवेतील त्रृटी बद्दल रुपये-50,000/- आणि शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपय-50,000/- अशा नुकसान भरपाईच्या रकमा तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- तक्रारकर्तीला अदा करण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 बजाज अलायंस लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष पान क्रं 50 ते 62 वर दाखल करण्यात आले. त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, विमाधारकाने विमा पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे वार्षिक विम्याचे हप्ते नियमित स्वरुपात पाच वर्षाचे कालावधी मध्ये भरणे जरुरीचे होते परंतु विमाधारकाने त्याकडे दुर्लक्ष्य केले. विमा कंपनीचे कार्यावर भारतीय विमा नियामक मंडळाचे (Insurance Regulatory Development Authority of India) नियंत्रण असते व त्यांनी घालून दिलेल्या नियम आणि पध्दतीचे ते अनुपालन करतात आणि त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी लागू होत नसल्याने सदर तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष चालू शकत नाही. सबब ती खारीज करण्यात यावी. ग्रुप विमा पॉलिसी मध्ये अॅडमिनीस्ट्रेटर म्हणून विरुध्दपक्ष क्रं 2 विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक होती. विमाधारक श्री नामदेव सखाराम उके याचा मेंबरशिप क्रं-0304627403 असा असून विमा राशी रुपये-2,25,000/- एवढी होती, सदर विमा पॉलिसी 05 वर्षा करीता होती आणि ती दिनांक-17.08.2013 पासून
अमलात आली. प्रत्येक वर्षाच्या 17 ऑगस्ट पर्यंत वाषिैक विमा हप्ता रक्कम रुपये-9000/- प्रमाणे भरणे जरुरीचे होते. दुसरी विमा पॉलिसी जिचा मेंबरशिप क्रं-0291802133 असा होता, तिचे वार्षिक हप्ते विमाधारकाचे मृत्यू पर्यंत नियमित मिळाल्याने संपूर्ण विमा रक्कम रुपये-28,587/- देण्यात आली होती. परंतु वादातील मेंबरशिप क्रं-0304627403 या विमा पॉलिसीचे दोनच वार्षिक विमा हप्त्यांची रक्कम त्यांना प्राप्त झाली आणि त्यापुढील कालावधीचे वार्षिक विमा हप्त्याची रक्कम त्यांना प्राप्त झाली नसल्याने विमा पॉलिसी विमाधारकाचे मृत्यू दिनांकास खंडीत झाली झालेली असल्याने संपूर्ण विमा रक्कम देय नसल्याने फंड व्हॅल्यू एवढी रक्कम अदा करण्यात आली. ग्रुप मास्टर पॉलिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा प्रत्यक्ष सभासदांशी करार नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक आणि ग्रुप विमा पॉलिसीचे सभासद यांचाच संबध असतो. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी ग्रुप विमा पॉलिसीचे सभासदांचे विम्याचे हप्त्याची रक्कम ड्रॉफ्टव्दारे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे जमा करावयाची असते.
परिच्छेद निहाय उत्तरे देताना विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने ही बाब नामंजूर केली की, विररुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ही विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची एजंट म्हणून कार्य करते. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक हे वेगवेगळे आहेत. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी ही विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या कोणत्याही कृत्यासाठी जबाबदार नाही. विम्याचे वार्षिक हप्ते नियमित भरण्याची जबाबदारी ही विमाधारकाची होती परंतु तक्रारकर्तीचे वडीलांनी वादातील विमा पॉलिसीचे वार्षिक हप्त्यांची रक्कम नियमित जमा केलेली नाही त्यामुळे वादातील विमा पॉलिसीचे संपूर्ण देय लाभ देण्यास विरुदपक्ष क्रं 1 विमा कंपनी जबाबदार नाही. वर नमुद केल्या प्रमाणे एका विमा पॉलिसीचे वार्षिक हप्त्यांची रक्कम नियमित मिळाल्याने संपूर्ण रक्कम अदा करण्यात आलेली आहे. त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्तीची संपूर्ण तक्रार खोटी व चुकीची असल्याने ती खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती विरुदपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 विदर्भ ग्रामीण बॅंके तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष पान क्रं 44 ते 49 वर सादर करण्यात आले. विमाधारक श्री नामदेव उके याचे विनंती वरुन विरुदपक्ष क्रं 2 बॅंकेनी बॅंकेचा एक ग्राहक म्हणून विमा पॉलिसीची सेवा त्याला दिली होती. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ही,
विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची एजंट असल्याची बाब नामंजूर केली. सदर वस्तुस्थितीचा विचार करता विमा दाव्याचे रकमे संबधात विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेची कोणतीही जबाबदारी येत नाही. मृतक विमाधारक श्री नामदेव उके याचे बचतखाते विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत असल्याची बाब मान्य केली. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी विमाधारक श्री नामदेव उके यास विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची विमा पॉलिसी काढण्यास जबरदस्तीने भाग पाडले होते ही बाब नामंजूर केली. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या ग्राहकाने विमा पॉलिसी काढली असल्यास तिचे विमा हप्ते नियमित स्वरुपात विमा कंपनी कडे भरण्याची जबाबदारी सर्वस्वी विमाधारकाची असते. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ही विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे हप्ते भरण्यास संबधित ग्राहकास सेवा देतात. नामदेव उके याचा दिनांक-01.06.2016 रोजी मृत्यू झाल्याची बाब मान्य केली. वादातील पॉलिसी रक्कम रुपये-2,25,000/- पैकी फक्त रुपये-15,007/- देण्यात आल्याची बाब मान्य केली. विमाधारक श्री नामदेव उके यांचे बॅंक खात्यात शिल्लक रक्कम असताना वादातील विमा पॉलिसीचे हप्त्याची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी जमा केली नाही ही बाब नामंजूर केली. वादातील विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता ऑक्टोंबर-2015 रोजी देय होता परंतु त्यावेळेस विमाधारक श्री नामदेव उके याचे खात्यात पुरेसी रक्कम शिल्लक नसल्याने श्री नामदेव उके याने दिनांक-28.03.2016 रोजी त्याचे खात्यात रुपये-9000/- जमा केले होते, त्यापूर्वी त्याचे बॅंक खात्यात रुपये-6085/- एवढी रक्कम शिल्लक होते. बॅंकेतील कार्यपध्दती प्रमाणे विमाधारकाने पे ऑर्डर फॉर्म मध्ये विमा हप्त्याची रक्कम भरुन बॅंके मध्ये देणे आवश्यक आहे. दिनांक-28.03.2016 रोजी विमाधारक श्री नामदेव याने पे ऑर्डर फॉर्म मध्ये रुपये-1000/- वार्षिक विमा हप्त्याची रक्कम भरुन विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मध्ये जमा केला होती आणि त्याप्रमाणे सदर हप्त्याची रक्कम विरुदपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे वळती करण्यात आली होती आणि त्यावेळेस श्री नामदेव उके याचे बॅंक खात्यात रक्कम रुपये-14,085/- शिल्लक होती, त्यावेळी जर विमाधारक श्री नामदेव उके याने वादातील विमा पॉलिसीचे वार्षिक हप्त्याची रक्कम रुपये-9000/- पे ऑर्डर फॉर्म मध्ये भरुन विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मध्ये सादर केली असती तर सदर रक्कम बॅंकेच्या मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी मध्ये वळती करता आली असती. यापूर्वी सुध्दा प्रत्येक वेळी पे ऑर्डर फॉर्म प्राप्त झाल्या नंतरच विम्याचे हप्त्याची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी मध्ये वळती करण्यात आलेली आहे. वादातील विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता ऑक्टोंबर-2015 रोजी देय होता परंतु मार्च-2016 पर्यंत पुरेसी रक्कम श्री नामदेव उके याचे बॅंक खात्यात शिल्लक नव्हती, त्यामुळे देय विमा हप्त्याची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला मिळालेली नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी कोणतीही दोषूपर्ण सेवा दिलेली नाही. या सर्व प्रकरणा मध्ये मृतक नामदेव हाच निष्काळजी असून त्याने आपल्या बॅंकेच्या खात्यामध्ये पुरेसी रक्कम शिल्लक ठेवली नाही आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मध्ये विमा हप्त्या संबधात पे ऑर्डर सादर केले नाही. तक्रारकर्ती ही मृतक श्री नामदेव उके यांची मुलगी असून ती त्याचे सोबत राहत असल्याने तिने सुध्दा तिचे वडीलांची विम्याची रक्कम नियमित कपात होत आहे किंवा नाही याकडे लक्ष देणे गरजेचे होते. वरील सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके विरुध्दची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती बॅंके तर्फे करण्यात आली.
05 तक्रारकर्तीने पान क्रं 14 वरील दस्तऐवज यादी नुसार एकूण 11 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये दोन्ही विमा पॉलिसीच्या प्रती, तिने केलेला अर्ज, दोन्ही विमा पॉलिसीचे दावे मिळण्या बाबत केलेले अर्ज, पोस्टाची पावती, तिचे वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र्, विमाधारकाच्या खात्याची प्रत, तक्रारकर्तीचे खात्यांच्या प्रती, विमाधारक व तक्रारकर्ती हिचे संयुक्त खात्याची प्रत अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्तीने पुराव्या दाखल स्वतःचा प्रतिज्ञालेख पान क्रं-64 ते 70 वर दाखल केला तसेच लेखी युक्तीवाद पान क्रं- 97 ते पान क्रं- 102 वर दाखल केला.
06. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर पान क्रं-50 ते पान क्रं-62 वर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे पुराव्या दाखल शपथपत्र पान क्रं-50 ते पान क्रं-61 वर दाखल करण्यात आले. तसेच श्री नामदेव सखाराम उके यांचे विमा प्रस्ताव फॉर्मची प्रत दाखल केली. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे तर्फे पुराव्याचे शपथपत्र पान क्रं-83 ते पान क्रं- 94 वर दाखल केले.
07 विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके तर्फे लेखी उत्तर पान क्रं-44 ते पान क्रं-49 वर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके तर्फे श्री संजय वसंतराव जोशी, व्यवस्थापक, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक शाखा भंडारा यांनी पुराव्या दाखल स्वतःचा प्रतिज्ञालेख पान क्रं 79 व 80 वर दाखल केला. तसेच सोबत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे पॉलिसी संबधीचे माहितीपत्रक दाखल केले. तसेच मृतक विमाधारक श्री नामदेव सखाराम उके यांचे बॅंकेतील खाते क्रं-501910410000136 चे दिनांक-01.01.2016 ते दिनांक-07.10.2016 या कालावधीतील खाते उता-याची प्रत दाखल केली. तसेच दिनांक-28.03.2016 रोजीचा विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेचा रुपये-1000/- चा ऑर्डर फॉर्म ज्यावर आंगठा आहे याची झेरॉक्स प्रत दाखल केली. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके तर्फे लेखी युक्तीवाद पान क्रं-104 व पान क्रं-105 वर दाखल केला. तसेच वादातील पॉलिसीची प्रत, विमाधारक श्री नामदेव उके यांचे पासबुकाची प्रत तसेच खाते उता-याची दिनांक-17.12.2012 ते दिनांक-28.02.2016 या कालावधीची दाखल केली. तसेच विमा प्रस्तावाच्या प्रती दाखल केल्यात.
08. प्रकरणातील दाखल दस्तऐवज, उभय पक्षां तर्फे दाखल साक्षी पुराव्यांचे अवलोकन जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे करण्यात आले, त्यावरुन सदर प्रकरणात न्यायनिवारणार्थ जिल्हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्तीला वादातील विमा पॉलिसी रक्कम रुपये-2.25 लक्ष देय लाभांसह न देता केवळ फंड व्हॅल्युची रक्कम दिल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय | -होय- |
02 | वि.प.क्रं 2 बॅंकेनी सुध्दा दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय | -होय- |
03 | काय आदेश | अंतिम आदेशा नुसार |
-कारणे व मिमांसा-
मुद्दा क्रं 1 ते क्रं 3-
09. यातील विमाधारक व तक्रारकर्तीचे मृतक वडील श्री नामदेव सखाराम उके यांनी ते हयातीत असताना विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून दोन ग्रुप विमा पॉलिसी काढल्या होत्या, त्या दोन्ही विमा पॉलिसीचे हप्ते वार्षिक होते आणि दोन्ही विमा पॉलिसींचा कालावधी हा 05 वर्षा करीता होता या बद्दल उभय पक्षां मध्ये कोणताही विवाद नाही. तसेच तक्रारीकर्ती दोन्ही विमा पॉलिसी मध्ये नॉमीनी असल्या बाबत कोणताही विवाद नाही. या दोन विमा पॉलिसी पैकी ग्रुप विमा पॉलिसी क्रं-0282839600, मेंबरशिप क्रं-0291802133, वार्षिक विमा हप्ता रक्कम रुपये-1000/- विमा रक्कम रुपये-25,000/- या विमा पॉलिसीची बोनससह संपूर्ण रक्कम नॉमीनी म्हणून तक्रारकर्तीला मिळालेली असल्याने या विमा पॉलिसी संबधात कोणताही विवाद उभय पक्षां मध्ये नाही.
10. वादातील ग्रुप विमा पॉलिसी क्रं-0282839600, मेंबरशिप क्रं-0304627403 असून सदर विमा पॉलिसीची विमा राशी रुपये-2,25,000/- आहे. सदर विमा पॉलिसी ही दिनांक-17 ऑगस्ट, 2013 रोजी अमलात (Date of Commencement) आली होती तसेच विमा पॉलिसीचा हप्ता हा वार्षिक रुपये-9000/- प्रमाणे होता आणि पॉलिसीचा कालावधी हा पाच वर्षाचा होता या बद्दल उभय पक्षां मध्ये कोणताही विवाद नाही. सदर विमा पॉलिसी दिनांक-17 ऑगस्ट, 2013 रोजी सुरु झालेली असल्याने पहिल्या विमा हप्त्याची रक्कम ही 17 ऑगस्ट, 2013 रोजी अदा झालेली आहे. त्यानंतर दुसरा वार्षिक विमा हप्ता हा दिनांक-17 ऑगस्ट, 2014 रोजी देय असताना दुस-या वार्षिक विम्याचे हप्त्याची रक्कम विमाधारक श्री नामदेव सखाराम उके यांचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या खात्यातून प्रत्यक्षात दिनांक-14 जानेवारी, 2015 रोजी कपात केल्या गेला असे विमाधारक श्री नामदेव सखाराम उके यांचे बॅंक खाते उता-या वरुन दिसून येते. वादातील विमा पॉलिसीचा तिसरा वार्षिक हप्ता रक्कम रुपये-9000/- हा दिनांक-17 ऑगस्ट, 2015 रोजी देय होता. परंतु ऑगस्ट, 2015 मध्ये नामदेव उके यांचे बॅंक खात्यात फक्त रुपये-5949/- एवढीच रक्कम शिल्लक होती असे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या खाते उता-या वरुन दिसून येते. त्यानंतर विमाधारक श्री नामदेव सखाराम उके यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या खातयात दिनांक-28 मार्च, 2016 रोजी नगदी रुपये-9000/- जमा केलेत. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी दिनांक-28.03.2016 रोजी विवादीत नसलेल्या विमा पॉलिसीची वार्षिक हप्त्याची रक्कम रुपये-1000/- कपात केली असता त्या दिवशी विमाधारक श्री नामदेव सखाराम उके याचे बॅंक खात्यात रुपये-14085/- जमा होते असे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी दाखल केलेल्या बॅंक खाते उता-यावरुन दिसून येते. वादातील विमा पॉलिसीचे तिस-या वार्षिक हप्त्याची रक्कम रुपये-9000/- दिनांक-17 ऑगस्ट,2015 रोजी देय होती असे जरी असले तरी दिनांक-28 मार्च, 2016 रोजी श्री नामदेव सखाराम उके याचे बॅंकच्या खात्यात रुपये-14,085/- एवढी रक्कम शिल्लक होती आणि या शिल्लक रकमे मधून तिस-या वार्षिक विमा हप्त्याची रक्कम रुपये-9000/- विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक करु शकत होती परंतु तसे या प्रकरणात झालेले नाही. दिनांक-28 मार्च, 2016 रोजी विवादीत नसलेल्या एका विमा पॉलिसीचे वार्षिक विमा हप्त्याची रक्कम रुपये-1000- कपात केली, त्याच वेळी वादातील विमा पॉलिसीचे वार्षिक विमा हप्त्याची रक्कम रुपये-9000/- ची कपात विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक करु शकली असती परंतु तसे केले नाही, दरम्यानचे काळात विमाधारक श्री नामदेव सखाराम उके याचा दिनांक-01 जून, 2016 रोजी मृत्यू झाला ही बाब सुध्दा विवादास्पद नाही. तक्रारकर्तीने श्री नामदेव उके याचा दिनांक-01 जून, 2016 रोजी मृत्यू झाल्या बद्दल पंचायत समिती, चिखली, तालुका जिल्हा भंडारा यांचे मृत्यू प्रमाणपत्राची प्रत सुध्दा अभिलेखावर दाखल केलेली आहे. ऑगस्ट, 2015 मध्ये विवादीत विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता रुपये-9000/- भरण्यास तेवढी रक्कम खात्यात जरी शिल्लक नसली तरी दिनांक-28 मार्च, 2016 रोजी विमाधारक श्री नामदेव उके याने रुपये-9000/- खात्यात रोख स्वरुपात जमा केले असल्याने विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक तिस-या वार्षिक विमा हप्त्याची प्रलंबित रक्कम कपात करु शकली असती परंतु तसे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी केलेले नाही.
11. ज्याअर्थी वादातील विमा पॉलिसीचे दुस-या वार्षिक हप्त्याची रक्कम दिनांक-17 ऑगस्ट, 2014 रोजी देय असताना विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर दुस-या वार्षिक हप्त्याची रक्कम दिनांक-14 जानेवारी, 2015 रोजी स्विकारली. असे असताना तिसरा वार्षिक हप्ता दिनांक-17 ऑगस्ट, 2015 रोजी देय असताना व दिनांक-28 मार्च, 2016 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 बॅकेमध्ये विमाधारक श्री उके याचे बॅंक खात्यात रक्कम रुपये-14,085/- शिल्लक असताना केवळ विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी वादातील तिस-या वार्षिक हप्त्याची रक्कम कपात केली नाही आणि त्यानंतर दिनांक-01.06.2016 रोजी विमाधारक श्री नामदेव उके याचा मृत्यू झाला. हा सर्व घटनाक्रम पाहता वादातील दुस-या वार्षिक विमा हप्त्याची रक्कम जवळपास पाच महिने उशिराने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने स्विकारली. अशा परिस्थितीत वादातील विमा पॉलिसीच्या तिस-या वार्षिक हप्त्याची रक्कम ऑगस्ट, 2015 मध्ये देय असताना आणि मार्च-2016 मध्ये पुरेसी शिल्लक खात्यामध्ये असल्यामुळे जवळपास सात महिने उशिराने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला विम्याचे वार्षिक हप्त्याची रक्कम कपात करता आली असती परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी कपात केलेली नाही यामध्ये विमाधारक श्री नामदेव उके याचा कोणताही दोष दिसून येत नाही.
12. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे विदवान वकील श्री सावजी यांनी खालील मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग, नवि दिल्ली यांचे निवाडयावर आपली भिस्त ठेवली-
2018(4) CPR 277 (NC)-Hon’ble National Commission, New Delhi-“R.R. Overseas Pvt. Ltd-Verus- Export Credit Guarantee Corporation of India Ltd.”
“It is held that the complainant was fully aware of his obligations to pay premiums, submit declarations etc required to be complied under the Policy. The rejection of the claim on account of non payment of premium not declaring the shipments/and not reporting the defaults by the Complainant is valid and there has been no deficiency in service on the part of the OP-Hence, the Complaint stands dismissed, no order as to costs.
परंतु हातातील प्रकरणात हा मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा निवाडा लागू होत नाही कारण आमचे समोरील हातातील प्रकरणातील वस्तुस्थिती भिन्न आहे.
13. या व्यतिरिक्त विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे विदवान वकील श्री सावजी यांनी आपले लेखी उत्तरा मध्ये खालील नमुद मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांवर भिस्त ठेवली-
- (1999) 6 SCC 451- “The Oriental Insurance Company Ltd.-Versus-Sonly Cheriyan “
“The Insurance policy between the insurer and the insured represents a contract between the parties. Sincethe insurer undertakes to compensate the loss suffered by the insured on account of risks covered by the insurance policy, the terms of the agreement have to be strictly construed to determine the extent of liability of the insurer. The insured cannot claim anything more than what is covered by the Insurance policy”
- (1966) 3 SCR 500 “General Assurance Society Ltd.-Verus-Chandumull Jain and Anr.
“In interpreting documents relating to a contract of insurance, the duty of the court is to interpret the words in which the contract is expressed by the parties, because it is not for the court to make a new contract, however reasonable, if the parties have not made it themselves”
उपरोक्त नमुद न्यायनिवाडयां मध्ये विमा करार हा उभय पक्षांवर बंधनकारक असून त्यातील नमुद अटी व शर्तीचे पालन होणे आवश्यक असल्याचे नमुद केलेले आहे व या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत परंतु आमचे समोरील हातातील प्रकरणातील वस्तुस्थिती ही भिन्न असल्यामुळे सदर न्यायनिवाडयांचा लाभ विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला मिळू शकणार नाही असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
14. तक्रारकर्तीचे विदवान वकीलांचे श्री महेंद्र गोस्वामी यांचे युक्तीवादा प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ही विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची एजंट म्हणून काम करते. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी ही बाब नाकारलेली आहे. या संदर्भात जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे खालील नमुद मा.वरिष्ठ न्यायालयाचे निकालपत्रावर भिस्त ठेवण्यात येते-
I) “DESU Vs.Basanti Devi”- III (1999) CPJ 15 SC.
Honble Supreme Court in similar kind of group insurance scheme under the name of Salary Saving Scheme, that DESU is certainly not an insurance agent within the meaning of insurance Act but DESU is certainly agent as defined under Sec.182 of the Contract Act as DESU had ostensible authority to collect premium and so far as employee was concerned, DESU was an agent of the LIC to collect premium on its behalf.
II) In I (2004) CPJ 247 “ LIC of India Vs. K. Narayan Murthy”
It is held that premium if falls short of, it is their duty to inform Drawing and Disbursement officer and collect balance, burden to collect correct premium lies on O.P. Deficiency in service proved, O.P. liable to pay due amount and collect difference of amount payable under policy.
III) “LIC of India Vs. Ram Sakhi”, LAWS (NCD) 2015-1-137,
wherein Salary Saving Scheme is elaborately explained and it is observed that on non receipt of the premium, the insurance company was duty bound to give a notice to the employer as well as to the employee regarding default in payment of premium and its failure to do so could not deprive the insured of the benefits under the policy.
उपरोक्त न्यायनिवाडयांवरुन स्पष्ट होते की, विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ही विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची एजंट म्हणून कार्य करते आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या चुकीच्या कृतीस विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची (Vicarious liability) म्हणून जबाबदारी येते असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
15. जिल्हा ग्राहक आयोगाचे मते ग्रुप विमा पॉलिसी मध्ये विमा कंपनी आणि संबधित बॅंक जिने विम्याचे हप्त्याची रक्कम खातेदाराच्या खात्यातून कपात करण्याची जबाबदारी स्विकारलेली आहे यांचे मध्ये परस्परां मध्ये योग्य तो समन्वय असणे आवश्यक आहे. जर संबधित खातेदाराच्या खात्यात देय विमा हप्त्याची रक्कम कपात करण्यास कमी शिल्लक उरली असेल तर विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी त्याची लेखी सुचना संबधित खातेदार आणि विमा कंपनीला देणे आवश्यक आहे परंतु तसे या प्रकरणात झालेले दिसून येत नाही. अशा परिस्थितीत केवळ विमाधारकाला दोषी ठरवून विम्याची देय रक्कम बोनससह नाकारण्याची विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची दोषपूर्ण सेवा आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेची सुध्दा या संपूर्ण प्रकरणात चुक आहे. विमाधारक श्री नामदेव उके याची तिस-या वार्षिक हप्त्याची रक्कम रुपये-9000/- खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक असताना भरल्या गेली नाही तसेच वादातील पॉलिसीपोटी तक्रारकर्तीला रुपये-15007/- फंड व्हॅल्युची रक्कम मिळालेली आहे हे लक्षात घेता या रकमेचे योग्य ते समायोजन होणे आवश्यक आहे. तक्रारकर्तीने दिनांक-14 जुलै, 2016 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मध्ये दिनांक-14 जुलै, 2016 रोजी विमा दाव्या संबधी अर्ज सादर केलेला असल्याने तेथून विमा दावा निश्चीतीसाठी तीन महिन्याचा कालावधी जर हिशोबात घेतला तर वादातील पॉलिसीचे विमा दाव्याची रक्कम दिनांक-15 ऑक्टोंबर, 2016 पर्यंत तिला मिळणे क्रमप्राप्त होते.
16. तक्रारकर्ती ही वादातील विमा पॉलिसीची रक्कम रुपये-2,25,000/- त्यातील बोनससह मिळण्यास पात्र आहे परंतु सदर रकमे मधून तिस-या वार्षिक हप्त्याची रक्कम रुपये-9000/- आणि तक्रारकर्तीला वादातील पॉलिसीपोटी फंड व्हॅल्यू म्हणून मिळालेली रक्कम रुपये-15,007/- अशा रकमांची वजावट होऊन उर्वरीत रक्कम तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा नुकसान भरपाईच्या रकमा विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी आल्याने आम्ही मुद्दा क्रं 2 अनुसार आदेश पारीत करीत आहोत.
17. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1 बजाज अलायंस इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत व्यवस्थापक, पुणे आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक, शाखा ठाणे, तालुका जिल्हा भंडारा मार्फत व्यवस्थापक यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, मृतक विमाधारक श्री नामदेव सखाराम उके याचे ग्रुप विमा पॉलिसी क्रं-0282839600 मेंबरशिप क्रं-0304627403 अनुसार देय विमा रक्कम रुपये-2,25,000/-(अक्षरी रुपये दोन लक्ष पंचविस हजार फक्त) व त्यावरील बोनससह देय लाभ तक्रारकर्तीला अदा करावेत आणि सदर रकमेवर दिनांक-15 ऑक्टोंबर, 2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याजाची रक्कम तक्रारकर्तीला अदा करावी. अशी रक्कम तक्रारकर्तीला अदा करताना तिस-या वार्षिक हप्त्याची प्रलंबित रक्कम रुपये-9000/-(अक्षरी रुपये नऊ हजार फक्त) आणि तक्रारकर्तीला वादातील पॉलिसीपोटी फंड व्हॅल्यू म्हणून दिलेली रक्कम रुपये-15007/- (अक्षरी रुपये पंधरा हजार सात फक्त) अशा रकमांची वजावट करुन उर्वरीत रक्कम विरुदपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला अदा करावी.
- विरुध्दपक्ष क्रं-2 बॅंकेला आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा पोटी रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) तक्रारकर्तीला अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांना-त्यांना परत करण्यात याव्यात.