::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये, अधि. वर्षा जामदार, मा. सदस्या.)
(पारीत दिनांक :31.10.2011)
अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
1. अर्जदारही मृतक परशुराम नानाजी पिंपळशेंडे यांची विधवा पत्नी आहे. अर्जदाराच्या मृत पतीने मौजा नांदगाव येथील त्याच्या मालकीची शेती विकून परिवाराच्या भविष्याकरीता रु. 1,00,000/- चा विमा दि.16/07/2010 ला गैरअर्जदाराकडून उतरविला होता. त्याचा पॉलिसी क्रं. 178563253 हा आहे. सदर विमा पॉलिसी मध्ये अर्जदार ही नॉमीनी आहे. अर्जदाराला तिच्या पतीच्या मृत्युनंतर विमा फायदयासह एकमुस्त रक्कम रु.4,99,500/- मिळायला हवी होती. अर्जदाराचे पती मृत्यु पर्यंत सुदृढ होते. ज्या वेळी विमा पॉलिसी उतरविली होती त्यावेळी अर्जदाराच्या पतीची संपूर्ण वैद्यकिय तपासणी गैरअर्जदाराचे अधिकृत चिकित्सक डॉ.सैनानी यांच्याकडून केली होती. डॉक्टरांनी प्रकृती तपासल्यानंतर अर्जदाराचे पतीला कसलाही आजार नसल्याचे मत व्यक्त केल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचे पतीचा विमा उतरविला होता. अर्जदाराचे पतीला दि. 21/12/2010 ला एकाएकी हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा राहत्या घरीच मृत्यु झाला. त्यानंतर अर्जदाराने दि.25/01/2011 ला मृतक पतीच्या विम्याची रक्कम रु.4,99,500/-मिळण्यासाठी गैरअर्जदाराकडे संपूर्ण कागदपञासह विमा क्लेम सादर केला. गैरअर्जदाराने दि.17/03/2011 ला पञ पाठवून Consultation/treatment for Ischaemic heart disease with myocardial infarction since 2009, misrepresentation of material fact या कारणाकरीता विमा दावा नाकारला. या पञामध्ये गैरअर्जदार विमा कंपनीच्या सदर निर्णयामुळे अर्जदार संतुष्ट नसेल तर विमा कंपनीच्या पुनर्विचार कमेटीकडे पुनर्विचाराचा अर्ज सादर करण्यास सांगीतले. त्याप्रमाणे अर्जदाराने कंपनीच्या पुनर्विचार कमेटीकडे दि. 10/04/2011 ला अर्ज सादर केला. त्या पञात अर्जदाराने मृतक पतीला कोणताही आजार नसल्याचे व सर्व मेडीकल परिक्षण गैरअर्जदार विमा कंपनीच्या अधिकृत चिकित्सकाकडून तपासणी केल्या नंतर विमा उतरविण्यात आला अशी माहीती दिली. परंतु अर्जदाराचे या माहिती कडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. विमा कंपनीने क्लेमची योग्य पध्दतीने शहानिशा न करता दि.04/01/2011 ला एकतर्फा निर्णय घेवून अर्जदाराचा विमा क्लेम नाकारला व तसे पञ अर्जदाराला देण्यात आले. या पञामध्ये अर्जदार जर संतुष्ट नसेल तर विमा कंपनीच्या विमा लोकपालाकडे जाण्याचे सुचविण्यात आले. परंतु अर्जदाराला विमा कंपनीच्या लोकपालावर विश्वास नसल्याने तिने विमा लोकपालाकडे अर्ज केला नाही. अर्जदाराने तिचे वकील प्रशांत रामगिरवार यांचे मार्फत दि. 18/06/2011 ला नोटीस पाठविला व विमा क्लेम बाबत पुनर्विचार करुन तो मंजुर करावा अशी मागणी केली. सदर नोटीस गैरअर्जदाराला मिळून देखील त्यानी नोटीसचे उत्तर दिले नाही.
2. अर्जदाराचे पति यांना मुळात कुठलाच आजार नव्हता म्हणून गैरअर्जदाराचे चिकित्सक डॉ.सैनानी यांनी तसे प्रमाणपञ दिले होते. परंतु गैरअर्जदार यांनी वस्तुस्थितीचा व सत्य परिस्थितीचा योग्य विचार केलेला नाही. गैरअर्जदार यांनी मृतकांना आजार असल्याचे कोणतेही सबळ कागदपञे, पुरावा व वैद्यकिय पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने खोटे व बनावटी कारण समोर करुन अर्जदाराचा क्लेम नाकारला आहे. अर्जदार ही विमा पॉलिसीची नॉमिनी असल्याकारणाने गैरअर्जदाराची ग्राहक होते त्यामुळे तिला योग्य सेवा पुरविण्याची नैतिक जबाबदारी गैरअर्जदाराची आहे. परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा चुकीच्या पध्दतीने नाकारला. व तिचे प्रति अनुचित व्यापार पध्दती अवलंबलेली आहे, व तिला न्युनता पूर्ण सेवा दिलेली आहे. म्हणून अर्जदाराला झालेल्या शारिरिक, मानसिक व आर्थिक ञासाला गैरअर्जदार जबाबदार आहे. त्यामुळे अर्जदाराने रु.4,99,500/- दि. 21/12/2010 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाने अर्जदाराला देण्याचा आदेश गैरअर्जदाराविरुध्द व्हावा. अर्जदाराला शारिरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई पोटी रु.10,000/- तक्रारीचा खर्च रु.10,000/- देण्याचा आदेश गैरअर्जदारा विरुध्द व्हावा अशी मागणी केलेली आहे. तसेच गैरअर्जदाराने दिलेली सेवा न्युनता पूर्ण व अनुचित व्यापार पध्दती ठरविण्यात यावी ही सुध्दा मागणी केलेली आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीसोबत नि. 4 नुसार 18 दस्तऐवज दाखल केलेले आहे.
3. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने हजर होवून नि. 10 प्रमाणे आपले लेखी उत्तरात दाखल केले. गैरअर्जदाराने मृतक अर्जदाराचे पतिने दि.16/07/2010 ला गैरअर्जदाराकडे रु. 1,00,000/- भरुन विमा उतरविला होता ही बाब मान्य केली आहे, व त्याचा पॉलिसी क्रं. 178563253 हा आहे. व अर्जदार नॉमिनी असल्याचेही मान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे प्रमाणे विमा पॉलिसी हा करार असून विश्वासावर अवलंबून आहे. अर्जदाराचे पति यांनी खरी व सत्य परिरस्थिती गैरअर्जदार विमा कंपनी किंवा डॉ.सैनानी यांना सांगीतलेली नाही. डॉ.सैनानी हे गैरअर्जदार विमा कंपनीचे अधिकृत डॉक्टर असल्याची बाब गैरअर्जदाराने नाकारली आहे. वास्तविक गैरअर्जदार कंपनीचे कोणतेही डॉक्टर नाही. गैरअर्जदार कंपनी विमा काढण्यास इच्छूक व्यक्तिला वैद्यकिय अहवाल आणण्यास सांगते. मय्यत परशुराम पिंपळशेंडे यांनी डॉ. सैनानी यांचे कडून वैद्यकिय अहवाल सादर केला, परंतु डॉक्टरांनी मृतकाला कोणतेही आजार नाही असे मत व्यक्त केलेले नाही. म्हणून गैरअर्जदारांनी मृतकाचा विमा काढला. वास्तविक डॉ. सैनानी यांनी दि. 07/07/2010 रोजी मृतकाची उंची, वजन, छाती इत्यादी मोजमाप घेवून 17 प्रश्न विचारले व मय्यतांने दिलेल्या उत्तरा नुसार डॉ. सैनानी यांनी वैद्यकिय अहवाल तयार केला. विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देतांना मय्यताने त्याच्यावर कोणतेही औषधोपचार चालु नाही असे स्पष्टपणे सांगीतल्याप्रमाणे अहवाल देण्यात आला. मय्यताने डॉक्टरला चुकीची माहिती पुरविली आहे हे अर्जदाराकडून विमा क्लेम आल्यानंतर चौकशी अंती स्पष्ट झाले. मय्यताने परिच्छेद क्रं.14 मधील प्रश्नाचे चुकीचे उत्तर देवून त्या आधारावर गैरअर्जदाराकडून विमा पॉलिसी प्राप्त करुन घेतलेली आहे. सदर विमा पॉलिसी दि. 16/07/2010 ची असून विमा प्रस्ताव हा दि. 30/06/2010 चा आहे. यानंतर 5 महीन्यात दि. 21/12/2010 रोजी मय्यताचा हृदय झटक्याने मृत्यु झाला. अर्जदाराने दि. 25/01/2011 रोजी गैरअर्जदाराकडे विमा क्लेम सादर केला व त्यानंतर लगेचच गैरअर्जदारानी यादी प्रमाणे दस्तऐवज सादर करण्याची सूचना दिली. त्याप्रमाणे दि. 18/2/2011 रोजी गैरअर्जदाराकडे अर्जदाराने दस्तऐवज सादर केले. सदर दस्तऐवज सादर झाल्यानंतर मय्यताचा मृत्यु हा विमा पॉलिसी काढल्यानंतर लगेच झाल्यामुळे तज्ञांकडून चौकशी करण्याचे ठरविले. त्या प्रमाणे गैरअर्जदाराने डॉ. योगेश भार्गव, ऐस सोलुशन, नागपूर यांना तपास अधिकारी म्हणून नियुक्त करुन चौकशी करण्याचे सांगीतले. डॉ.योगेश भार्गव यांनी अहवाल दाखल केला व त्यासोबत तपासा दरम्यान घेतलेले बयान तसेच डॉ. भरडकर यांचे प्रमाणपञ दिले. डॉ. भार्गव यांच्या तपासातून स्पष्ट झाले की, मय्यत परशुराम याला सन 2009 पासून हृदय विकार होता व डॉ.भरडकर यांच्याकडे 2009 पासून उपचार घेत होता. ही बाब मृतकाने लपविलेली आहे. या अहवालावरुन गैरअर्जदाराने दि. 17/03/2011 रोजी अर्जदाराचा विमा दावा रद्द करुन तसे पञ पाठविले. यानंतर पुनर्विचार कमेटीने सुध्दा अर्जदाराचा क्लेम फेटाळला. विमा लोकपाल ही स्वतंञ न्यायप्रणाली असून गैरअर्जदाराशी कोणताही संबंध नाही. परंतु अर्जदाराने लोकपालावर त्यांचा विश्वास नाही असे बेजबाबदारणे कथन करुन न्यायप्रणालीचा अपमान केला आहे, ही बाब फार गंभीर आहे. अर्जदाराने पाठविलेल्या दि. 18/06/2011 चा नोटीस गैरअर्जदाराला प्राप्त झाला परंतु विमा दाव्यावर पुनर्विचार करण्याचा गैरअर्जदाराला अधिकार नसल्यामुळे नोटीसचे उत्तर दिले नाही. वास्तविक डॉ. सैनानी यांनी अर्जदाराचे पतिची बाहय तपासणी केली व त्यांचे कडून त्यांची वैद्यकिय माहिती घेतली. डॉ.सैनानींनी अर्जदाराचे पतिला सध्या काही औषध घेता का ? तंबाखु किंवा दारु सारखे व्यसन आहे का ? याबाबत चौकशी केली असता मय्यतांनी ‘’नाही’’ असे उत्तर दिले. मय्यत त्यावेळी दुसरे औषधोपचार घेत होता हे बाहय तपासणी वरुन समजू शकत नाही. त्याकरिता मय्यताने स्वतःच खरी व सत्य परिस्थिती सांगावयास पाहिजे होती. मय्यताने खोटी माहिती देवून विमा पॉलिसी मिळविली असल्यामुळे विमा क्लेम नाकारुन, अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब गैरअर्जदाराने केलेला आहे, हे संपूर्णपणे खोटे आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही त्यामुळे अर्जदारास रु. 4,99,500/- व त्यावर व्याज, तसेच नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्यास गैरअर्जदार बाध्य नाही. सदर तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. गैरअर्जदाराने नि. 11 प्रमाणे 5 दस्तऐवज दाखल केले आहे.
4. अर्जदाराने नि. 12 प्रमाणे आपले शपथपञ दाखल केलेले आहे. तसेच गैरअर्जदारांनी नि.19 वर साक्षदाराचे शपथपञ दाखल केले आहे. अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेले दस्तऐवज, शपथपञ व त्यांचे वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष काढण्यात येत आहे.
// कारणे व निष्कर्ष //
5. गैरअर्जदाराने नि. 10 वरील लेखी बयानात परिच्छेद 2 मध्ये डॉ. सैनानी हे गैरअर्जदार कंपनीचे अधिकृत डॉक्टर असल्याची बाब नाकारली आहे. गैरअर्जदाराने नि.11 ब 1 वर दाखल दस्तऐवजावर पॉलिसी धारकाची वैद्यकीय तपासणी डॉ.सैनानी यांनी केल्याचा रिपोर्ट दाखल केला आहे. सदर रिपोर्ट हा गैरअर्जदाराच्या लेटरहेड वर आहे व त्यावर कंपनीच्या अधिका-याचा स्टॅम्प रिपोर्टच्या मागे-पुढे आहे. त्यामुळे गैरअर्जदाराचे म्हणणे की डॉ.सैनानी हे अधिकृत डॉक्टर नाहीत हे तथ्यहिन आहे. डॉ.सैनानी गैरअर्जदाराचे निर्देश नसतांना त्यांच्या लेटर पॅड वर रिपोर्ट देणार नाही व गैरअर्जदार ही विना परवानगी तसा रिपोर्ट ग्राहय धरणार नाही. तसेच गैरअर्जदाराचे म्हणणे कि डॉ. सैनानी यांनी विमाधारकाची फक्त बाहय (Physical) तपासणी केली त्यामुळे डॉ. सैनानी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या व आलेल्या उत्तराच्या आधारे रिपोर्ट तयार करण्यात आला. गैरअर्जदार कंपनीची ही (Routine) नियमीत पध्दत आहे व त्या पध्दती नुसारच तपासणी करुन रिपोर्ट दिला. व तो रिपोर्ट कुठेही प्रश्नार्थक नव्हता म्हणूनच गैरअर्जदाराने विमाधारकाला पॉलिसी देऊ केली. रिपोर्ट चुकीचा किंवा अयोग्य, अपुरा असल्याचा आक्षेप विमा दावा दाखल होई पर्यंत कधीही गैरअर्जदाराने घेतलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराचा हा मुद्दाही आधारहीन आहे.
6. गैरअर्जदाराने विमाधारकाच्या मृत्युनंतर डॉ. भार्गव यांनी नियुक्ती करुन चौकशी केली व त्याचा अहवाल नि. 11 ब 3 वर दाखल आहे. हा अहवाल डॉ.भार्गव यांनी इतरांचे बयान घेऊन तयार केला आहे. त्यामध्ये अर्जदार बाईच्या बयानामध्ये मृतक परशुराम यांना एक-दिड वर्षा आधी छातीत दुखणे व हृदय विकाराचा झटका आल्याचे म्हटले आहे व डॉ. भरडकर कडे औषधोपचार केल्याचे म्हटले आहे. परंतु ही सर्व माहीती डॉ.भार्गव यांच्या तर्फे भरण्यात आली असून ती इंग्रजी मध्ये आहे. अर्जदार बाई ही अशिक्षीत असुन तिला फक्त सही करता येते. सदर प्रकरणा मध्ये नि. 22 वर अर्जदारानी शपथपञ दाखल केले आहे व त्यामध्ये तिने गैरअर्जदार व डॉ.भार्गवांनी बयानात व रिपोर्ट मध्ये लिहीलेली माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदाराने डॉ. भार्गव यांच्या अहवाला सोबत डॉ. भरडकर यांचे प्रमाणपञ दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले आहे कि मय्यत परशुराम हे माझे फक्त OPD रुग्ण होते, आणि त्याच लेवलचा औषधोपचार ते माझ्या कडून घेत होते. तसेच मागील 10 वर्षापासून ते मृतकाला ओळखतात. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या हया दस्तऐवजा मध्ये खोडतोड करुन IHD Since 2009 CMI असे लिहीले आहे. प्राथमिक पाहणी वरुन सुध्दा हे नंतर लिहील्याचे स्पष्ट होते. त्यामुळे डॉ. भरडकर यांनी सदर सुधारणा केली नाही तर मुद्दाम गैरअर्जदाराने डॉ. भरडकरांनी दिलेल्या प्रमाणपञा मध्ये आपल्या फायदयाचा मजकुर लिहीला आहे. त्यावरुन स्पष्ट होते कि गैरअर्जदार हे स्वच्छ हाताने आला नाही. डॉ. भार्गव यांनी विमाधारकाच्या शेजा-याचे बयान घेतले. श्री.गोविंदा पांडूरंग पोडेंनी डॉ.भार्गवाच्या म्हणण्या प्रमाणे असे सांगितले कि छातीत दुखण्यासाठी मय्यत 2009 मध्ये डॉ. भरडकर यांच्या दवाखान्यात भरती होता. परंतु मय्यत हा डॉ.भरडकर यांचे कडे भरती असल्याची बाब डॉ. भरडकरांनी कधीही म्हटली नाही. उलटपक्षी मय्यत हा फक्त OPD रुग्ण असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे पोडेंच्या बयानातील सत्यता शंकायुक्त आहे. अर्जदाराचा मुलगा गुरुदास परशुराम शेंडे यांनी नि.13 वर शपथपूर्वक आपले म्हणणे दाखल केले असून मय्यताला कसलाही आजार नसल्याचे म्हटले आहे. डॉ.भार्गव यांनी मृतक हे Chronic alcoholic होते असे म्हटले आहे. एका आटोवाल्याच्या म्हणण्यानुसार मृतकाचा मृत्यु 2-3 महिन्यापूर्वी झाला व तो Chronic alcoholic असल्याचे म्हटले आहे. परंतु हया गोष्टीला सिध्द करण्यासाठी एकही पुरावा रेकॉर्डवर नाही. मुळात पठाणपुराला आटो चालविणारा व्यक्ती हडस्ती गावातील व्यक्तीला फक्त सवारी म्हणून नेत असतांना नावा सकट कसा ओळखणार ?
7. डॉ.भार्गवांनी दिलेल्या रिपोर्ट नुसार गैरअर्जदाराने मय्यताला 2009 पासुन हद़य विकार होता असे म्हटले आहे. डॉ.भार्गवांनी लोकांच्या घेतलेल्या बयानावरुन मृतकाला 2009 मध्ये छातीत दुखणे झाले होते असा रिपोर्ट दिला. फक्त छातीत दुखणे झाले म्हणून कुठल्याही व्यक्तीला ह़दय विकार आहे हे ठरविणे वैद्यक शास्ञात ग्राहय धरल्या जात नाही. जरी कोणाला छातीत दुखणे झाले तरी त्याचा संबंध हृदय विकाराशी आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी योग्य तपासण्या आवश्यक आहे. तपासण्याअंती हे सिध्द होवू शकते कि छातीतले दुखणे हे हृदय विकाराशी संबंधीत आहे किंवा नाही. सदर प्रकरणामध्ये एकही दस्तऐवजावरुन मय्यताला छातीत दुखणे झाले होते व ते हृदय विकाराशी संबंधीत होते असे दिसत नाही. हया सर्व पुराव्या अभावी गैरअर्जदाराचे म्हणणे कि मयताला 2009 पासुन हृदयविकाराचा ञास होता तथ्यहीन आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे कि मय्यताने विमा प्रस्ताव नि.11 ब - 2 देताना परिच्छेद 14 मध्ये माहिती चुकीची दिली व चुकीच्या माहितीच्या आधारावर विमा पॉलिसी प्राप्त केली ग्राहय धरण्यासारखे नाही.
8. गैरअर्जदाराने मा. राष्ट्रीय आयोगाने पारीत केलेल्या काही निर्णयांचा हवाला दिला आहे. हया केसेस मध्ये योग्य माहिती लपविल्या बाबत निर्णय देण्यात आला आहे. परंतु अर्जदाराच्या प्रकरणामध्ये माहिती लपविली हेच सिध्द न झाल्याने सदर न्यायनिवाडे हया प्रकरणाला लागु होत नाहीत. मय्यताने मृत्यु पूर्वी कधीही हृदय विकारासाठी औषधोपचार घेतला असल्याचा एकही दस्तऐवज रेकॉर्डवर नाही. त्यामुळे प्रस्ताव दाखल करतांना देखील असा कुठलाच आजार मृतकाला नव्हता, म्हणूनच प्रस्तावात तशी माहिती देण्यात आली नाही. मय्यताने कधीही खोटी माहिती देऊन विमा पॉलिसी प्राप्त केली हे दाखल दस्तऐवजा वरुन सिध्द होत नाही.
9. मय्यत परशुराम पिंपळशेंडे यांनी रु.100,000/- चा विमा गैरअर्जदाराकडून उतरविला होता त्याची देय रक्क्म रु.4,99,500/- होती. दि. 21/12/2010 ला मय्यताचा मृत्यु झाला व दि. 25/01/2011 रोजी विमा दावा सादर करण्यात आला. त्यानंतर गैरअर्जदाराच्या मागणीनुसार दि. 18/02/2011 रोजी गैरअर्जदाराकडे दस्तऐवज सादर केले. हया सर्व बाबी गैरअर्जदाराने मान्य केल्या आहे. परंतु गैरअर्जदाराने दि. 17/03/2011 च्या पञाव्दारे अर्जदाराचा विमा दावा चुकीचे कारणाने फेटाळला. अर्जदाराने वकीला मार्फत नोटीस पाठवून देखील गैरअर्जदाराने त्याची दखल घेतली नाही. एकंदर विमा दावा नाकारुन गैरअर्जदारानी न्युनतापूर्ण सेवा दिली आहे हे स्पष्ट होते. विमा दावा नाकारण्याचे कुठलेही ठोस कारण नसताना विमा दावा नाकारुन अनुचित व्यापार पध्दतीचा वापर हया प्रकरणात केल्याचे दिसते. त्यामुळे अर्जदाराला विमा दाव्याच्या रक्कमेला व त्यावरील व्याजाला बराच काळ मुकावे लागले. अर्जदाराला गैरअर्जदाराच्या न्युनतापूर्ण सेवे मुळे शारिरिक, मानसिक व आर्थिक ञास सोसावा लागला. त्यासाठी गैरअर्जदार जबाबदार आहे. हया निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असुन खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराला विमा प्रस्ताव सादर केल्याच्या दि. 25/01/2011 पासुन
पदरी पडे पर्यंत रु. 4,99,500/- 9 टक्के व्याजासह गैरअर्जदाराने
दयावे.
(2) शारिरिक, मानसिक व आर्थिक ञासापोटी नुकसान भरपाई म्हणून
रु. 5,000/- गैरअर्जदाराने अर्जदाराला दयावे.
(3) तक्रारीचा खर्च रु. 2,000/- गैरअर्जदाराने अर्जदाराला दयावे.
(4) आदेशाची प्रत सर्व पक्षांना देण्यात यावी.
चंद्रपूर,
दिनांक : 31/10/2011.