जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे. ग्राहक तक्रार क्रमांक – ८/२०११ तक्रार दाखल दिनांक – १८/०१/२०११ तक्रार निकाली दिनांक – २३/०८/२०१३ सौ.रुपल निलेश काबरा ----- तक्रारदार. उ.व.३७ वर्ष,धंदा-घरकाम रा.श्रीकेश,विठ्ठल मंदीरा जवळ, मालेगांव रोड,धुळे.ता.जि.धुळे. विरुध्द Bajaj Allianz life Insurance Co.Ltd ----- सामनेवाले. {Notice to be served on Branch Manager,Dhule} Bajaj Allianz Life Insurance Co.Ltd.Br.Dhule Office-1st floor, Five Star Mall,Lane No.4] Dhule,Tel & Dist.Dhule. न्यायासन (मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी ) (मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन) (मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी) उपस्थिती (तक्रारदारा तर्फे – वकील श्री.आर.एन.अग्रवाल) (सामनेवाले क्र.१ तर्फे – वकील श्री.एस.जी.शर्मा) निकालपत्र (द्वाराः मा.सदस्य : श्री.एस.एस.जोशी) (१) सामनेवाले यांच्याकडे गुंतविलेली रक्कम मुदत संपल्यावर कमी मिळाली, म्हणून तक्रारदारांनी सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे. (२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की,त्यांनी सामनेवाले यांच्याकडून दि.३१-१२-२००५ रोजी युनीट गेन सुपर पॉलीसी घेतली. त्याचा पहिला हप्ता रु.५,५०,०००/- भरला. ही रक्कम त्यांनी बॅलन्स प्लस फंडमध्ये ४० टक्के, इक्वीटी इन्डेक्स फडमध्ये ३० टक्के,इक्वीटी प्लस फंडमध्ये ३० टक्के गुंतवली. त्यानंतर अकाऊंट स्वीच करुन तीच रक्कम बॅलन्स फंडमध्ये ४० टक्के आणि इक्वीटी प्लस फंडमध्ये ६० टक्के गुंतविली. मे २००२ मध्ये दोन्ही फंडमध्ये आणखी रु.५५,०००/- ची गुंतवणूक केली. जून २००६ मध्ये रु.५,५०,०००/- वरील प्रमाणेच गुंतवणूक केली. एकूण रु.११,५५,०००/- ची गुंतवणूक केली. मुदत पूर्ण झाल्यानंतर रक्कम काढावयाची असल्याने दि.२२-०९-२०१० रोजी त्यांनी फंड व्हॅल्यू विचारली. त्यानंतर दि.२३-०९-२०१० रोजी रक्कम Debt plus fund मध्ये शिफ्ट (switch) केली. (३) दि.२९-१२-२०१० रोजी त्यांच्या पॉलिसीची मुदत पूर्ण झाली. त्यापूर्वी त्यांनी कंपनीकडे फंड व्हॅल्यू विचारली. तेव्हा NAV प्रमाणे त्यांची फंड व्हॅल्यू रु.१८,११,६२७/- असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दि.२९-१२-२०१० रोजी त्यांनी पॉलिसी सरेंडर केली. त्याची रक्कम दुस-या दिवशी मिळेल असे सांगण्यात आले. मात्र दुस-या दिवशी रक्कम मिळाली नाही. ती तब्बल ११ दिवसांनी म्हणजे दि.११-०१-२०११ रोजी मिळाली. तीही रु.१७,२७,४४०/- एवढी. म्हणजे रु.८४,१८७/- कमी मिळाले, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. (४) फंड व्हॅल्यूपेक्षा रु.८४,१८७/- कमी मिळाले, ते सामनेवालेकडून देववावे. आपली रक्कम ११ दिवस उशिराने मिळाली, त्यामुळे ११ दिवसांचे १२ टक्के दराने व्याज रु.६,५५१/-, मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी रु.१०,०००/- आणि तक्रारीचा खर्च रु.५,०००/- मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. (५) तक्रारीवर सामनेवाले यांनी खुलासा दाखल केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदाराचे कथन आणि मागणी खोटी आहे. मे.२००६ मध्ये रु.५५,०००/- ची गुंतवणूक केली हे म्हणणे मोघम,खोटे आणि लबाडीचे आहे. त्यांनी कधीही रु.५५,०००/- जमा केले नाही. फक्त रु.११,००,०००/- जमा केले. दि.२४-०५-२००६ रोजीची रु.५५,०००/- ची नोंद नजरचुकीने झाली आहे. त्याबाबत कंपनीचे कर्मचारी संदीप नायर व अमित मेहता यांनी तक्रारदाराला ई-मेल द्वारे कळविले होते. ही नोंद दुरुस्त करण्यात आली नव्हती. त्यामुळे सरेंडर व्हॅल्यू जास्त दिसत होती. रु.१७,२७,४४०/- हीच व्हॅल्यू बरोबर आहे. सरेंडर व्हॅल्यू बरोबर असेल तर ती खात्यात वर्ग करण्याविषयी त्यांची परवानगी देण्याविषयी त्यांना कळविण्यात आले होते. तक्रारदारांचे पती यांनी ई-मेल पाठवून रु.५५,०००/- भरण्या विषयी सांगितले होते. रु.५५,०००/- रोखीने जमा केले असे तक्रारदाराचे म्हणणेआहे. मात्र त्याचा पुरावा त्यांनी सादर केलेला नाही. सामनेवाले यांनी असेही म्हटले आहे की, रु.४९,९९९/- एवढया रुपयांपर्यंतच कंपनीत रोख भरणा करता येतो. त्यापुढील रक्कम संगणकाचे सॉफ्टवेअर स्विकारत नाही. त्यामुळे रु.५०,०००/- पासूनची रक्कम चेक किंवा डीडीनेच भरावी लागते. त्यापूर्वीच्या दोन्ही रकमा तक्रारदार यांनी चेकने भरल्या आहेत. म्हणून रक्कम कमी दिली हे कबूल नाही. ११ दिवस रक्कम उशिराने दिलीम्हणून व्याज मागणे चुकीचे आहे. (६) म्हणूनच तक्रारदाराची तक्रार रद्द करावी आणि खोटया,बेकायदेशीर तक्रारीमुळे झालेल्या त्रासापोटी रु.१५,०००/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट देववावी अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे. (७) तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ स्टेटमेंट ऑफ अकाऊंट आणि शपथपत्र दाखल केले आहे. तर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पाठविलेले ई-मेल (दि.०७-०१-२०११, दि.०८-०१-२०११, दि.०८-०१-२०११ ) बॅंकेचे कॅश आणि चेकबूक, इन्शूरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीचे परिपत्रक दाखल केले आहे. वरील कागदपत्रे आणि दोन्ही बाजूंच्या विद्वान वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावर मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत. मुद्देः | निष्कर्षः | (अ) तक्रारदार या सामनेवाले यांच्या ग्राहक आहेत काय ? | : होय. | (ब) सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | : नाही. | (क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन (८) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून पॉलिसी घेतली आहे. त्यापोटी गुंतवणूक केली आहे. या मुद्दयावर सामनेवाले यांचे काहीही म्हणणे नाही. त्यामुळे तक्रारदार हे त्यांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. (९) सामनेवाले यांनी फंड व्हॅल्यूपेक्षा कमी रक्कम दिली. ती रक्कमही ११ दिवस उशिराने दिली. आपण मागितलेला खाते उतारा दिला नाही. असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. मात्र त्याच्या पुष्टयर्थ तक्रारदारांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. उलट सामनेवाले यांनी बॅंकेचे कॅश आणि चेक बूक सादर केले आहे. त्यात तक्रारदार यांनी भरलेल्या रु.५५,०००/- ची कोणतीही नोंद दिसत नाही. हे पैसे जमाच केले नाही. त्यामुळे फंड व्हॅल्यू कमी आली,असे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. तक्रारदाराने मागितलेला खाते उतारा त्यांना देण्यात आला,असेही सामनेवाले यांनी नमूद केले आहे. यावरुन सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली हे स्पष्ट होत नाही. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत. (१०) सामनेवाले यांनी इन्शुरन्स रॅग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीचे २६ फेब्रुवारी २००९ चे परिपत्रक दाखल केले आहे. या परिपत्रकात विमा कंपन्यांनी रु.५०,०००/- एवढया रुपयांवरील रक्कम रोखीने स्विकारु नये. ती चेक किंवा डीडीद्वारेच स्विकारावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्या परिपत्रकाचा येथे विचार करणे अयोग्य होईल. कारण प्रस्तुतची तक्रार ही मे २००६ मधील व्यवहाराबाबत आहे. तथापि,वादग्रस्त रु.५५,०००/- सामनेवाले यांच्याकडे रोखीने भरलेत असे तक्रारदार ठोसपणे सिध्द करु शकल्या नाहीत. (११) वरील सर्व विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत. आदेश (अ) तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येत आहे. (ब) इतर कोणतेही आदेश नाहीत. धुळे. दिनांकः २३/०८/२०१३ (श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य) |