(घोषित दिनांक 17/01/2011 द्वारा – श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची महिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याची मोटार सायकल क्रमांक एम.एच.20 एपी 3497 रु 30,000/- किंमतीची घरासमोर दिनांक 14/01/2009 रोजी नेहमीप्रमाणे लॉक करुन ठेवली होती. दुस-या दिवशी सकाळी त्याची गाडी जागेवर नव्हती म्हणून त्याने आसपास चौकशी केली व त्यानंतर पोलीस स्टेशनला गाडीचोरी गेल्याचा अर्ज दिला. पोलिसांनी त्यांचेकडील रजिस्टरमध्ये नोंद करुन वायरलेसद्वारे सर्वत्र गाडी चोरी गेल्याची माहिती दिली. त्याने सगळीकडे गाडीचा शोध घेतला व पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार नोंदवून घेण्यास सांगितले . शोध घेऊनही गाडी सापडत नसल्यामुळे पोलिसांनी एफआयआर लिहीला. सदर एफआयआरची प्रत मिळाल्यावर गैरअर्जदार विमा कंपनीस घटनेची माहिती दिली . विमा कंपनीचे वकिलांनी गाडीचे चोरीबाबत चौकशी केली व गाडीचे मूळ कागदपत्र व चाव्या घेतल्या. त्यानंतर परत विमा कंपनीने गाडीचे पेपर व गाडी खरेदी केल्याचे बिल जमा करण्यास सांगितले असता सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. विमा कंपनीने कागदपत्रांची पूर्तता झालेली नसल्यामुळे आणि एफआयआर ची उशिरा नोंद केल्यामुळे अर्धी रक्कम रु 8,000/- मिळतील असे सांगितले. गाडीची मार्केटप्रमाणे किंमत रु 30,000/- असल्यामुळे त्याने विम्याची अर्धी रक्कम घेण्यास नकार दिला व गाडीची सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडून परत घेतली. तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडून गाडीची रक्कम मानसिक व आर्थिक त्रासासह मिळावी अशी मागणी केली आहे. गेरअर्जदार विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल करुन तक्रारदाराचे मोटार सायकलचा त्यांचेकडे दिनांक 18/12/2008 ते 17/12/2009 या कालावधीसाठी विमा उतरविलेला असल्याचे मान्य केले आहे. तक्रारदाराने त्याचे वाहन दिनांक 14/1/2009 रोजी अज्ञात व्यक्तिने चोरुन नेल्याबाबत ताबडतोब पोलिसांना आणि विमा कंपनीला कळविले नाही. तक्रारदाराने साडेतीन महिन्यानंतर म्हणजे दिनांक 25/4/2009 रोजी पोलिस स्टेशन एमआयडीसी वाळूज येथे एफआयआरची नोंद केली व दिनांक 8/5/2009 रोजी घटनेबाबत विमा कंपनीस कळविले. त्यानंतर विमा कंपनीने चौकशी अधिका-याची नेमणूक करुन चौकशी केली. तक्रारदाराने सन 2004 साली मोटारसायकल खरेदी केलेली असून सन 2009 साली त्याचे वाहन चोरीस गेलेले आहे. विमा पॉलीसीनुसार वाहनाची Insured Declared Value (IDV) 16,405/- होते अशा परिस्थितीत तक्रारदारास सदर रकमेपेक्षा जास्त रक्कम मागता येत नाही. तक्रारदाराने वाहनाची चोरी झाल्यानंतर ताबडतोब विमा कंपनीस न कळवून विमा करारातील अटी व शर्तीच्या अट क्रमांक 1 चे उल्लंघन केलेले आहे. तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणावरुन फेटाळला असून विमा कंपनीने तक्रारदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षांनी दाखल केलेली शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने सन 2004 साली खरेदी केलेली मोटार सायकल क्रमांक एमएच 20 एपी 3497 विमा कालावधीत दिनांक 14/1/2009 रोजी चोरीस गेली याबाबत वाद नाही. तक्रारदाराने त्याची मोटार सायकल दिनांक 14/1/2009 रोजी चोरीस गेल्यानंतर साडेतीन महिन्यांनी म्हणजे दिनांक 25/4/2009 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन वाळूज येथे फिर्याद दिल्याचे एफआयआर वरुन दिसून येते. आणि त्यानंतर त्याने सदर घटनेची माहिती दिनांक 8/5/2009 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीस दिल्याचे विमा कंपनीने तक्रारदारास दिनांक 25/11/2009 रोजी दिलेल्या पत्रावरुन दिसून येते. यावरुन तक्रारदाराने वाहन चोरीस गेल्यानंतर अत्यंत विलंबाने पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याचे आणि विमा कंपनीस कळविल्याचे स्पष्ट दिसून येते. तक्रारदाराचे म्हणण्यानुससार त्याचे वाहनाची दिनांक 14/1/2009 रोजी चोरी झाल्यानंतर ताबडतोब पोलीस स्व्टेशनला अर्ज दिला परंतू तक्रारदाराने पोलीस स्टेशनला अर्ज दिल्याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही म्हणून त्याचे या म्हणण्यावर विश्वास ठेवता येणार नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारास वाहन चोरी झाल्यानंतर एफआयआरची नोंद करण्यास उशीर झाल्याचे कारण देण्यासाठी दिनांक 19/6/2009 रोजी पत्र दिलेले असून तक्रारदाराने सदर पत्रास दिनांक 5/10/2009 रोजी दिलेल्या उत्तरात कागदोपत्री कोणतीही कार्यवाही नको असे कळविल्याचे कागदपत्रावरुन दिसून येते. तक्रारदाराने वाहनाची चोरी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यास आणि विमा कंपनीस कळविण्यास उशीर का झाला याचे कोणतेही संयुक्तिक कारण दिलेले नाही. तक्रारदाराने वाहनाची चोरी झाल्यानंतर अत्यंत विलंबाने पोलीस स्टेशनला व विमा कंपनीस कळविले आहे. तक्रारदाराने वाहनाची चोरी झाल्यानंतर ताबडतोब विमा कंपनीस न कळवून विमा करारातील अटी व शर्तीपैकी अट क्रमांक 1 चे उल्लंघन केले आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणावरुन फेटाळला असून विमा कंपनीच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही असे मंचाचे मत आहे. घटना घडल्यानंतर त्याबाबतची सूचना विमा कंपनीला ताबडतोब देण्याची जबाबदारी विमाधारकावर असून जर विमाधारकाने घटनेची माहिती विमा कंपनीला त्वरीत दिली नाही तर सदर पॉलिसीतील अटीचे उल्लंघन ठरते. म्हणून विमाधारक विम्याचा लाभ मिळण्यास पात्र ठरत नाही असे मा.राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांनी अपील क्रमांक 321/2005 न्यु इंडिया अश्युरन्स कंपनी विरुध्द त्रिलोचन जने या निकालात दिनांक 9/12/2009 मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे. मा.राष्ट्रीय आयोग यांच्या उपरोक्त निवाडयातील तत्वाचा विचार केला तर प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदाराने चोरीच्या घटनेची माहिती विमा कंपनीला अत्यंत विलंबाने दिलेली असल्यामुळे त्याच्याकडून पॉलिसीतील अटीचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिसते. म्हणून विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन कोणतीही चूक केल्याचे आम्हाला वाटत नाही. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च दोनही पक्षांनी आपापला सोसावा. .
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |