निकालपत्र (दि.05/12/2014) व्दाराः- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे
1 सामनेवाले विमा कंपनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 अन्वये सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदारांना प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत होऊन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले यांना नोटीस बजावणी होऊन देखील सदर कामी हजर झाले नाहीत. त्याकारणाने सामनेवाले यांचेविरुध्द दि.25.09.2014 रोजी नो से चा एकतर्फा आदेश करणेत आला. तथापि तक्रारदारांचे वकीलांनी दि.19.07.2014 रोजी वकीलपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांचे वकीलांचे तोंडी युक्तीवाद व सामनेवाले यांचे लेखी युक्तीवादाचा विचार करता, सदर काम हे गुणदोषावरती खालीलप्रमाणे निकाल पारीत करीत आहे.
तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की
3 तक्रारदारांनी स्वत:चे चरितार्थासाठी म्हैस खरेदी-विक्री बाजारातून विलास निवृत्ती पाटील यांचेकडून रक्कम रु.38,000/- इतक्या रक्कमेस दि.29.09.2012 रोजी खरेदी केली व तिचे वर्णन –रंग-काळा, शिंगे-पाठीमागे गोल, शेपूट-गोंडा काळापांढरा. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे रक्कम रु.30,000/- रक्कमेचा विमा क्र.OG-13-2005-5002-00001590 असून प्रिमीयम रक्कम रु.1,685/- सामनेवाले यांचेकडे जमा केले. सामनेवाले यांचे अधिका-यांनी म्हैशीच्या डाव्या कानास बिल्ला नंबर, टॅग नंबर 06159 नोंद करुन विम्याची मुदत दि.03.11.2012 ते दि.02.11.2013 पर्यंत होती. सदरचे जनावर रत्नाकर बँक, शाखा-हळदी, ता.करवीर यांचेकडून कर्ज घेऊन खरेदी केले. म्हैशीच्या पोटास दुखापत झाल्याने त्रास होऊन दि.07.09.2013 रोजी मयत झाली. सदर म्हैशीचे पंचाच्या समोर पंचनामा करुन शवविच्छेदन करुन विल्हेवाट लावण्यात आली. त्याचा दाखला दि.12.09.2013 रोजी दिला आहे. म्हैशीचा दूध पुरवठा संस्थेस नियमीत होत होता असा दाखला दिलेला आहे. सर्व अस्सल दाखले व टॅग क्लेम फॉर्मसोबत सामनेवाले कंपनीस पाठविलेले आहे. दि.11.12.2013 रोजी तक्रारदारांचे अर्जाचा विचार न करता, अतिशय मोघम व विसंगत स्वरुपाची कारणे देऊन सामनेवाले यांनी तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केला आहे. त्याकारणाने तक्रारदारांना सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.30,000/- दि.08.09.2013 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याज वसुल होऊन मिळावे. मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.2,000/- मिळावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे.
4 तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत सामनेवाले यांचेकडे दिलेला क्लेम फॉर्म, म्हैशीचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट, व्हॅल्युएशन सर्टिफिकेट, सामनेवाले कंपनीची पॉलीसी, म्हैस खरेदी केलेची ग्रामपंचायतीची पावती, सामनेवाले विमा कंपनीचे सर्टिफिकेट, ट्रीटमेंट सर्टिफिकेट, पंचनामा गांवकामगार पोलीसपाटील यांचा दाखला, ग्रामपंचायत हसूरला दाखला, गणेश सह.दुध संघ दाखला, क्लेम नाकारलेचे पत्र, म्हैशीचे फोटो, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेले आहेत.
5 सामनेवाले यांनी सदर कामी मुदतीत म्हणणे दिले नसलेमुळे त्यांचेविरुध्द नो से चा आदेश दि.25.09.2014 रोजी पारीत केलेला आहे.
6 दि.19.11.2014 रोजी सामनेवाले यांनी लेखी युक्तीवाद दाखल केलेला असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. जनावराचे वर्णन-म्हैस वय वर्षे – 5 ते 6 वर्षे, लिंग-स्त्री, रंग-काळा, शिंगे-पाठीमागे गोल, शेपूट-गोंडा काळापांढरा, टॅग नं.Basic 06159 attached in Right Ear, sum insured -Rs.3,000/- असे असून सदर वर्णनाचे जनावर व त्याबद्दल कोणतीही तक्रार सामनेवाले यांचेकडून तक्रारदारांनी केलेली नाही. तसेच सदर जनावराचा टॅग हा हरवला किंवा तुटला अशीही तक्रार दाखल नाही. सामनेवाले यांनी विमाधारक जनावराचे कानात ओळखण्यासाठी (for Identify) टॅग लावलेला असतो व सदरचे टॅग लावलेले जनावर तपासले जाते. घटना घडल्यानंतर 12 तासाचे आत सामनेवाले यांना कळविले जाते. पॉलीसीच्या अटी, विशेषत: टॅग संदर्भातल्या अटीचे तक्रारदारांनी पालन केले नाही. ज्या जनावराबद्दल सदरचा क्लेम दाखल होता, त्याचे वर्णन व मयत जनावराचे वर्णन भिन्न आहे. जनावराच्या डाव्या कानात असलेला टॅग तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होते की, जनावर मयत झालेनंतर सामनेवाले यांना त्याची पुर्व माहिती न देता सदरचे जनावर पुरणेत येऊन पुरावा नष्ट करणेत आलेला आहे. सदर जनावराच्या मृत्युचे कारण तक्रारदार हे सिध्द करु शकलेले नाहीत. तसेच सदर जनावरास कोणते औषधोपचार केले हे स्पष्ट केले नाही. तक्रारदारांनी सदरच्या जनावराची योग्य ती काळजी घेतलेली नाही. सामनेवाले यांनी सदर कामी Investigator नेमलेले होते. सदर Investigator अहवालामध्ये तक्रारदारांचा क्लेम टॅग नसलेकारणाने नामंजूर केला. Investigator डॉक्टरांनी तक्रारदारांचेकडे जाऊन कागदोपत्री पुरावे जमा केले. तसेच टॅगची मागणी केली असता, सदरचा टॅग तक्रारदारांनी दिलेला नाही. त्या कारणाने Investigator यांनी त्यांचे अहवालामध्ये नमुद केलेला निष्कर्ष योग्य असलेने तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केलेला आहे.
7 तक्रारदारांचा तक्रार अर्ज व सोबत दाखल केलेली अनुषांगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र व तक्रारदारांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला व सामनेवाले यांच्या लेखी युक्तीवादाचा विचार करता, निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
4 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा:-
मुद्दा क्र.1:- तक्रारदारांनी स्वत:चे चरितार्थासाठी म्हैस खरेदी-विक्री बाजारातून विलास निवृत्ती पाटील यांचेकडून रक्कम रु.38,000/- इतक्या रक्कमेस दि.29.09.2012 रोजी खरेदी केली व तिचे वर्णन –रंग-काळा, शिंगे-पाठीमागे गोल, शेपूट-गोंडा काळापांढरा. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे रक्कम रु.30,000/- रक्कमेचा विमा क्र.OG-13-2005-5002-00001590 असून प्रिमीयम रक्कम रु.1,685/- सामनेवाले यांचेकडे जमा केले. विमा पॉलीसी व तिचा कालावधीबाबत वाद नाही. सदरची म्हैस ही रत्नाकर बँक, शाखा-हळदी, ता.करवीर यांचेकडून कर्ज घेऊन खरेदी केली. म्हैशीच्या पोटास दुखापत झाल्याने त्रास होऊन दि.07.09.2013 रोजी मयत झाली. तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन सामनेवाले यांचे म्हैशीचा क्लेम मागितला असता, सामनेवाले यांनी मयत जनावराचे वर्णन व विमा उतरवितेवेळी जनावराचे वर्णनात विसंगती असलेने व सदर मयत जनावराच्या कानातील टॅग तुटलेल्या अवस्थेत असून Intact नसलेने तक्रारदाराचा क्लेम नाकारलेला आहे. सबब, सदर कारणाने सामनेवाले यांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारुन तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयाच्या अनुषंगाने या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, क्लेम फॉर्म, पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये, Colour-Black, Age-6yrs, Horns-Rounded, Tag No.12C Bajaj /06159, Market Value of the Animal at the time of Death is Rs.30,000/-, Date of Death 07.09.2013 असे नमुद असून त्यावर डॉ.सुभाष गोरे, पशुवैदयकीय अधिकारी, कोल्हापूर, सह.दूध उत्पादक संघ, भोगावती यांची सही व शिक्का आहे तसेच अ.क्र.8 कडील पंचनामा, अ.क्र.9 कडील पोलीस पाटील हसूर यांचा दाखला, सरपंच ग्रामपंचायत हसूर यांच्या दाखल्यामध्ये सदरची म्हैस दि.07.09.2013 रोजी मयत झालेली असून तिचे पोस्ट मार्टेम केलेनंतर गायरानात दफन केली असे दाखल्यांमध्ये नमुद असून त्यावर त्यांच्या सहयां आहेत. अ.क्र.13 ला मयत जनावराचे फोटो दाखल असून सदरच्या जनावराच्या कानामध्ये टॅग असलेचा दिसून येत आहे. तथापि सामनेवाले यांनी त्यांचे लेखी युक्तीवादामध्ये जनावराचे विमा उतरवितेवेळचे फोटो व तक्रारदारांनी दाखल केलेल्या मयत जनावराचे फोटोमध्ये विसंगती होती असे नमुद केले आहे. परंतु त्या अनुषंगाने सामनेवाले यांनी या मंचात विमा उतरवितेवेळचे जनावराचे फोटो दाखल केलेले नाहीत. तसेच सामनेवाले यांनी त्यांचे लेखी युक्तीवादामध्ये सदर कामी Investigator ची नेमणूक करण्यात आली होती. सदरचे Investigator डॉक्टरांनी जागेवर जाऊन पाहणी करुन कागदपत्रे उपलब्ध केली व तक्रारदारांनी सदर कामी टॅग दाखल न केलेने Investigator अहवालाचे निष्कर्षानुसार तक्रारदारांचा क्लेम योग्य त्या कारणाने नाकारण्यात आलेला आहे असे सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी युक्तीवादामध्ये नमुद केलेला आहे. तथापि सामनेवाले यांनी सदरचा Investigator अहवाल अथवा सदर जनावराच्या वर्णनामध्ये विसंगती असलेबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा, फोटो दाखल केलेले नाहीत. त्या कारणाने पुराव्याअभावी सामनेवाले यांच्या लेखी युक्तीवादातील कथने हे मंच विचारात घेत नाही.
सबब, वरील सर्व कागदपत्रांचा या मंचाने सखोलतेने अवलोकन केले असता, सामनेवाले यांनी तक्रारदारांचेकडून विमा हप्ता (Premium) स्विकारुन देखील सदर पॉलीसीचा मुळ हेतु विचारात न घेता, तक्रारदारांचा क्लेम चुकीच्या कारणाने नाकारुन तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3:– उपरोक्त मुद्दा क्र.1 चे विवेचनाचे अवलोकन करता, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला विमा कंपनीकडून विमा रक्कम रु.30,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर दि.08.09.2013 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9% व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारलेमुळे तकारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4:- सबब, हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा रक्कम रु.30,000/-(रु.तीस हजार फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.08.09.2013 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9% व्याज अदा करावे.
3 सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.2,000/- (रु.दोन हजार फक्त) तसेच या तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळालेपासुन 30 दिवसांचे आत अदा करावेत.
4 आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.