निकालपत्र :- (दि.09/03/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) यातील तक्रारदार यांचे पती महादेव श्रीपती पाटील यांचे नांवे भारत संचार निगमचा फोन असून त्याचा नंबर 225141 असा आहे. भारत संचार निगम यांनी बी.एस.एन.एल.ग्राहकांसाठी रु.50,000/- चे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण दि.14/01/2008 पासून प्रदान केले होते. त्याप्रमाणे त्यांचेमार्फत महादेव पाटील यांचे नांवे सामनेवालांकडे ग्रुप पर्सनल अॅक्सिडंट इन्शुरन्स उतरवला असून त्याचा पॉलीसी क्र.0जी-08-11 13-9902-00000157 असा आहे. श्री महादेव श्रीपती पाटील हे दि.19/02/2008 रोजी सायंकाळी 5 वाजणेचे सुमारास आपले शेतात निगगिरीचे झाड बेनणेकरिता चढले असता त्यांचा तोल जाऊन खाली पडले. त्यामुळे त्यांचे कपाळात व नाकास जबर मार लागून ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. महादेव श्रीपती पाटील यांचा मृत्यू त्यांना दि.19/02/2008 रोजी झालेल्या अपघातातील जखमांमुळेच झालेला आहे. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवालांकडे नुकसान भरपार्इची रक्कम रु.50,000/- मिळणेकरिता क्लेम केला व कागदपत्रे सादर केली. परंतु सामनेवाला यांनी दि.05/12/2008 रोजी महादेव श्रीपती पाटील यांचा मृत्यू अपघाती नसल्याने तक्रारदारांना क्लेम देण्याचे नाकारले आहे. ब) वस्तुत: तक्रारदार यांचे पती हे दि.19/02/2008 रोजी झाडावरुन पडून मयत झाले आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा अपघाती आहे. तरीही सामनेवाला यांनी चुकीचे कारण नमुद करुन तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम नाकारला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेमुळे प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल करणे भाग पडले. क) सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करावी व तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.50,000/-दि.19/05/2008 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याज, मानसिक त्रासापोटी रु.15,000/-, तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ विमा संदर्भातील बी.एस.एन.एल. चे बील, सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे पत्र इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार- अ) तक्रारदाराची तक्रार परिच्छेद निहाय नाकारली आहे. सामनेवाला आपल्या म्हणणेत पुढे असे प्रतिपादन करतात की, सामनेवाला कंपनीने व्यक्तीगत अपघात विमा पॉलीसी क्र.04-08-1113-99-02-00000157 दिलेली होती. सामनेवाला सदर पॉलीसीच्या अटी व शर्तीस बांधील असून त्याप्रमाणे त्यांचे उत्तरदायित्व येते. सदर पॉलीसीनुसार विमा संरक्षणासाठी अपघाती मृत्यू समाविष्ट आहे. नैसर्गिक मृत्यू सदर पॉलीसीखाली समाविष्ट होत नाही. सामनेवालांनी योग्य कारणास्तव क्लेम नाकारलेला आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने क्लेमसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांची छाननी केली असता महादेव श्रीपती पाटील हा अपघाताने मृत्यू पावला नसलेचे निदर्शनास आले. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण हे“Acute Myocardial Infarction.”असे नमुद असून महादेव पाटील हे हार्ट अॅटॅकने मयत झाले आहेत. सबब त्याचा मृत्यू हा अपघाती नसून नैसर्गिक आहे. तसेच सदर अहवालातील नोंदीनुसार मयताच्या शरीरावर अब्रेशन जखमा व्यतिरिक्त अन्य जखमाची नोंद दिसून येत नाही. सबब सदरचा मृत्यू हा हार्ट अॅटॅकने झाला असलेने नैसर्गिक आहे. सबब योग्य कारणास्तव क्लेम नाकारलेने सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर व्हावी. तक्रारदाराकडून सामनेवालांना कॉम्पेंसेंटरी कॉस्ट मिळणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेाच्या पुष्टयर्थ इन्शुरन्स पॉलीसी, मृत्यूचा दाखला, पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षाच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2) तक्रारदार क्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? --- होय. 3) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे पती महादेव श्रीपती पाटील यांचा व्यक्तीगत अपघात विमा पॉलीसी क्र.0जी-08-1113-99-02-00000157 अंतर्गत विमा उतरविला होता. पॉलीसीबाबत वाद नाही. वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो सदरचा मृत्यू अपघाती आहे की नैसर्गिक? तक्रारदाराचे कथनानुसार सदर मृत्यू अपघाती आहे तर सामनेवालांचे कथनानुसार सदर मृत्यू नैसर्गिक आहे. दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता पॉलीसी कालावधीत तक्रारदाराचे पतीचा मृत्यू दि.19/05/2008 रोजी निलगिरीचे झाड बेनने करता चढला असता त्यांचा तोल जाऊन खाली पडले. त्याचे कपाळास व नाकास जबर मार लागून जखमी झाले त्यानंतर त्यांना उपचाराकरिता कागल ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे हे दाखल जबाब तसेच मरणोत्तर पंचनामावरुन निदर्शनास येते. सामनेवालांनी शवविच्छेदन अहवालाचा आधार घेऊन सदर अहवालामध्ये मृत्यूचे कारण “ Acute Myocardial Infarction.” असे नमुद केले आहे. सदर तक्रारदाराचे पती महादेव पाटील हे हार्ट अॅटॅकने मरणे पावलेले आहेत. तसेच मयताचे शरीरावर अबेशन खेरीज अन्य जखमांची नोंद नाही. त्यामुळे सदर मृत्यू नैसर्गिक आहे असे प्रतिपादन केले आहे. शवविच्छेदन अहवालामधील कलम 17 चे अवलोकन केले असता जखमाबाबत abrasion L Forehead above L Eyebrow scratch abrasion 3 x 0.5 x 0.5 cm. तसेच abrasion Over Ala of Nose 1 x 0.5 x 0.5 cm अशा नोंदी दिसून येतात. यावरुन नमुद महादेव पाटील झाडावरुन पडून जखमी झालेचे कथनास पुष्टी मिळते. मृत्यूचे कारणामध्ये “ Acute Myocardial Infarction.”नमुद आहे. तसेच मृत्यूचे कारणाचा दाखल्यामध्येही नमुद आहे. यावरुन सदरचा मृत्यू हा हार्ट अॅटॅकने झाला आहे. सदर हार्ट अॅटॅक हा नमुद विमाधारकास निलगीरीचे झाड बेनाणी करताना झाडावरुन पडल्याने त्याला हार्ट अॅटॅक येऊ शकतो. तक्रारदाराचे पतीस पूर्वी पासून हृदयविकार होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे त्याचा हार्टअॅटॅकने मृत्यू झाला आहे असे दाखविणेस कोणताही वैद्यकीय पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल नाही. अथवा तसेच इन्व्हेस्टीगेशन करुन त्याचा रिपोर्ट इन्व्हेस्टीगेटरच्या शपथपत्रासह दाखल केलेला नाही. त्यामुळे जरी विमाधारकाचा मृत्यू “ Acute Myocardial Infarction.” या कारणाने झाला असला तरी सदर कारण हे तो झाडावरुन पडलेने जखमी झालेशी निगडीत आहे. झाडावरुन पडल्याने तो जास्त आक्रोश करु लागलेने त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय कागल येथे नेत असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. दि.19/02/2008रोजी सायंकाळी 5 चे सुमारास झाडावरुन पडलेची घटना घडलेली आहे.सदर घटना व्हनाळी ता.कागल येथे घडलेली आहे. त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कागल येथे नेत असता वाटेतच त्याचा मृत्यू झालेला आहे. सदर कालावधीचा विचार करता प्रथमत: नमुद महादेव पाटील हा झाडावरुन पडून जखमी झालेची वस्तुस्थिती नाकारता येत नाही. सदर झाडावरुन पडल्याने जखमी अवस्थेत असताना तो मयत झाला आहे. सबब तो केवळ हार्ट अॅटॅकने मृत्यू पावला नसून सदर अपघात हा हार्ट अॅटॅक येणेस कारणीभूत ठरला आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब सदरचा मृत्यू हा अपघाती असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. पॉलीसीचा मूळ हेतू, वस्तुस्थितीजन्य पुरावा तसेच वैद्यकीय पुराव्यावरुन हे निर्विवाद आहे की त्याचा मृत्यू अपघाती झाला आहे. अशी वस्तुस्थिती असतानाही कोणतेही सबळ पुराव्याशिवाय सदरचा मृत्यू नैसर्गिक ठरवून सामनेवालांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- तक्रारदार विमा पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.50,000/- क्लेम नाकारले तारीख दि.05/12/2008 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3 :- सामनेवालांनी क्लेम नाकारुन केलेल्या सेवात्रुटी मुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.50,000/-(रु.पन्नस हजार फक्त) मिळणेस पात्र आहेत. सदर रक्कमेवर दि.05/12/2008 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |