निकालपत्र :- (दि.01.01.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, टोयोटा कंपनीची इनोव्हा 2.5 वाहन क्र.एम्.एच्.12 सी.वाय. 4516 (एलएमव्ही) हे वाहन तक्रारदारांचे मालकीचे आहे. सदर वाहनावरती सामनेवाला विमा कंपनीची पॉलीसी घेतली आहे. सदर पॉलीसीचा क्र. ओजी-09-2005-1801-00000826 असा असून पॉलीसी कालावधी 04.11.2008 ते 03.11.2009 असा कालावधी आहे. सदर वाहनाचा उपयोग तक्रारदार हे प्रायव्हेट कार म्हणून करीत होते. दि. 27.09.2009 रोजी तक्रारदारांच्या गांवातील क्रिडा मंडळाचे खेळाडू भुईंज, ता.सातारा येथे जाणार असल्याने सदर स्पर्धेच्या ठिकाणी सदरचे वाहन घेवून जाणेबाबत सदर खेळाडूंनी विनंती केली असता त्यांची विनंती तक्रारदारांनी मान्य केली. तक्रारदार व त्यांचे गांवातील इतर 6 खेळाडू असे सर्वजण शिरोली पुलाची येथून दुपारी 3 वाजता कबड्डी स्पर्धेला जात असताना राष्ट्रीय महामार्गावर सदर इनोव्हा गाडीस अज्ञात वाहनाने जोराचा धक्का दिला व त्यामुळे अपघात झाला व वाहनाचे नुकसान झाले. तशी नोंद कराड पोलीस स्टेशन येथे झालेली आहे. (3) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, अपघाती वाहनाचे एस्टीमेटसह एकूण रुपये 7,06,952/- इतक्या क्लेम रक्कमेची मागणी केली असता सामनेवाला विमा कंपनीने दि.20.02.2010 रोजी सबळ व कायदेशीर कारणाशिवाय तक्रारदारांचा क्लेम नाकारला. सबब, दुरुस्तीसाठी अंदाजे एस्टीमेट नुसार येणार खर्च रुपये 7,06,952/-, मानसिक-आर्थिक त्रासापोटी रुपये 25,000/- व्याजासह देणेचा आदेश व्हावा तसेच तक्रारीचा खर्च देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत पॉलीसी, सर्टिफिकेट-कम-पॉलीसी शेडयुल, खबरी जबाब, पंचनामा जबाब, दावा फॉर्म, दुरुस्ती खर्चाचे एस्टीमेट, सामनेवाला क्र.2 यांनी दि.30.12.2009 रोजी पाठविलेले पत्र, तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.07.01.2010 रोजी पाठविलेले पत्र, तक्रारदारांनी दि.21.01.2010 रोजीच्या पत्रान्वये दिलेला खुलासा, सामनेवाला क्र.2 यांना दि.16.02.2010 रोजी पाठविलेले पत्र, सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केलेबाबतचे पत्र दि.20.02.2010, सामनेवाला यांनी रुपये 100/- स्टँपपेपवर नोटराईज्ड करुन घेणेसाठी दिलेला कोरा छापील फॉर्म, गाडीची छायाचित्रे व निगेटिव्हज् तसेच शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने चुकीची असून सामनेवाला कंपनीने दि.20.02.2010 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांचा योग्य कारणाने तक्रारदारांचा क्लेम नाकारलेला आहे; त्यामुळे सामनेवाला यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ वाहनाचे आर.सी.बुक, तक्रारदारांनी पॉलीसी घेणेकरिता दिलेला फॉर्म, पॉलीसी शेडयुल, तक्रारदारांचे दि.09.10.2009 रोजीचे पत्र, क्लेम फॉर्म, खबरी जबाब व पंचनामा, इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट व जबाब व सर्व्हे रिपोर्ट, अपघाती वाहनाचे छायाचित्र, तक्रारदारांची सामनेवाला यांना आलेली पत्रे इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (7) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद, उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेल्या तक्रारदारांच्या मालकीच्या वाहनावरती सामनेवाला विमा कंपनीची कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलीसी होती व सदर वाहनास दि.27.09.2009 रोजी अपघात होवून वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले आहे व त्याचे अपघाताची नोंद पोलीस स्टेशनला झाला आहे. ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. सामनेवाला विमा कंपनीने दि.20.02.2010 च्या पत्रान्वये सदर वाहनास 6 + 1 इतक्या आसन क्षमतेचा परवाना असताना अपघाताचेवेळेस 8 व्यक्ती प्रवास करीत होत्या. त्यामुळे पॉलीसीतील अटी व शर्तींचा भंग झाल्याने तक्रारदारांचा क्लेम नाकारलेला आहे. सामनेवाला यांच्या वकिलांनी सामनेवाला कंपनीच्या अटी व शर्ती यांचे प्रतिपादन केले आहे. परंतु, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवादाचेवेळेस वाहनास झालेला अपघात हा ड्रायव्हरच्या चुकीने झालेला नाही. सदरचा अपघात हा मागून येणा-या वाहनाने धडक दिल्याने नुकसान झालेचे प्रतिपादन केले आहे. त्या अनुषंगाने विचार केला असता सदर वाहन चालविणा-या वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झालेचे दिसून येत नाही किंवा अपघातास वाहन चालक जबाबदार आहे अशी वस्तुस्थिती समोर येत नाही. केवळ एखाद-दुसरा प्रवासी जादा असेल तर विमा कंपनीच्या मुलभूत अटीचा भंग झाला असे होत नाही. सामनेवाला विमा कंपनीने याबाबत व्यापक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. प्रस्तुत प्रकरणाचा विचार करता सामनेवाला कंपनीच्या असलेल्या मुलभूत अटी व शर्तींचा भंग झालेचे दिसून येत नाही; सबब, सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा नाकारलेला क्लेम यामध्ये सेवा त्रुटी झालेचा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सदर विवेचनास हे मंच खालील पूर्वाधाराचा आधार घेत आहे :- 2009 (1) CPR 313 (NC) - National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi - P.B.Venkata Reddy Vs. The New India Assurance Co.Ltd. Consumer Protection Act, 1986 - Sec.21(b) - Insured vehicle met with accident - Repudiation of claim on ground of overloading - Car had got a seating capacity of 5 passengers but there were seven persons at the time of accident - Three children were travelling in car as per post-mortem report - If from number of passengers were excluded children, there was no overloading - No merit in analysis of State Commission that Insurance Company can award compensation on non-standard basis - Relying upon decision in case of B.V.Nagaruju V. Oriental Insurance Co.Ltd., held that even if there was an extra passesngers or two, it could not be construed as a violation of terms of policy - Revision Petition disposed of. (8) प्रस्तुत प्रकरणी सामेवाला विमा कंपनीने अपघातील वाहनाचा सर्व्हे केलेला आहे. सदर सर्व्हे अहवालाची प्रत प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. परमार अँड कंपनी यांनी दाखल केलेल्या सर्व्हे अहवालाचे अवलोकन केले असता एकूण नुकसान रुपये 4,83,318/- इतकी असल्याचे दिसून येते. सदर सर्व्हे अहवाला विचार करता सर्व्हेअरनी निश्चित केलेली सदरची नुकसान भरपाई व्याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार हे व्याज मिळणेस पात्र असलेने मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र नाहीत. उपरोक्त विवेचनाचा विचार करता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना रुपये 4,83,318/- (रुपये चार लाख त्र्याऐंशी हजार तीनशे अठरा फक्त) इतकी रक्कम द्यावी व सदर रक्कमेवर दि.20.02.2010 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे. 3. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |