तक्रारदार : वकील श्री. संतोष ठाकुर हजर.
सामनेवाले : वकील श्रीमती.शिल्पा विरकर हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.एस.एस.व्यवहारे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही विमा विषयक कामे करणारी कंपनी असून तिचा कारभार तक्रारीत नमुद केलेल्या ठिकाणी बजाज अलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी या नांवाने चालतो.
2. तक्रारदार हे बोरीवली, मुंबई येथील रहीवासी असून स्कॉर्पीओ हे चारचाकी वाहन त्यांच्या मालकचे होते. सदर वाहनाचा उपयोग ते स्वतःसाठी व कुटुंबीयांसाठी करीत असत. तक्रारदार यांनी सदर वाहनाचा रु.4,60,000/- येवढया संरक्षण कवचाचा विमा सा.वाले यांचे कडून घेतला होता व त्या संबंधी विम्याचा हप्ता देखील भरला होता. दिनांक 16.10.2012 रोजी रात्री 8 ते 10 चे दरम्यान सदर चारचाकी वाहन MCGM PAY AND PARK गोरेगाव येथून चोरीस गेले. वरील चारचाकी वाहनाच्या चोरी बद्दल तक्रारदार यांनी दुस-याच दिवशी बणगूर नगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली व दिनांक 31.10.2012 रेाजी सा.वाले यांना सदर चोरी बद्दल कळवून सदर चारचाकी वाहनाचा विमा असल्यामुळे विमा मागणी दाखल केली. सा.वाले यांनी नेमलेल्या सर्व्हेक्षकाच्या आदेशा प्रमाणे तक्रारदारांनी आवश्यक ती कागदपत्र सर्व्हेक्षकास देखील पाठविली. त्यानंतर वेळोवेळी सा.वाले यांनी मागणी केल्याप्रमाणे आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन देखील सा.वाले यांनी तक्रारदार यांना विमा रक्कमेची पुर्तता केली नाही व दिनांक 7.3.2013 रोजी तक्रारदारांच्या विमा रक्कमेची मागणी रद्द केली. सा.वाले यांची सदर कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर असल्यामुळे तक्रारदार यांनी दिनांक 11.8.2014 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून पैशाची मागणी केली. सदर नोटीस सा.वाले यांना मिळुन देखील नोटीसची पुर्तता न केल्यामुळे तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल करुन सा.वाले यांचे कडून विमा रक्कम रु.4,60,000/-, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.1 लाख व तक्रारीच्या खर्चाची मागणी केलेली आहे.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल करुन तक्रारदारांचे म्हणणे, मागणे व तक्रारीतील कथने फेटाळून लावली आहेत. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांच्या तक्रारीतील कथने, म्हणणे व मागणे खोटे व लबाडपणाचे असून मंचासमोर सत्य परिस्थिती लपवून ठेवून विमा रक्कमेची मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी सा.वाले यांचे कडून त्यांचे स्कॉर्पीओ या चारचाकी वाहनाचा काढलेला विमा, सदर विमा पॉलीसीची सुरक्षा कवचाची रक्कम, तक्रारदारांनी दिलेल्या विमा हप्त्याची रक्कम, या गोष्टी सा.वाले नाकारत नाहीत. वरील वर्णनाच्या वाहनाची चोरी दिनांक 16.10.2012 रेाजी रात्री 8 ते 10 चे दरम्यान गोरेगांव येथून झाली ही बाब देखील सा.वाले नाकारत नाहीत. तसेच तक्रारदार यांनी सदर वाहनाच्या चोरी बाबत बणगूर पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार, सा.वाले यांचेकडे केलेली विमा रक्कमेची मागणी व सा.वाले यांनी फेटाळून लावलेली सदर मागणी सा.वाले नाकारत नाहीत. तक्रारदार यांच्या विमा रक्कमेची मागणी फेटाळून लावण्याचे समर्थन करताना सा.वाले यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांच्या वरील वाहनाच्या चोरी बाबत आवश्यक असणा-या कागदपत्रांची वारंवार मागणी करुन देखील तक्रारदार यांनी काही कागदपत्रांच्या मुळ प्रती सा.वाले यांचे समोर दाखल केल्या नाहीत. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेल्या वाहन चोरीच्या तक्रारी बद्दल बणगुर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्हया बाबत दाखल केलेला अहवाल मुळ प्रतीसह तसेच वादातीत वाहनाचे प्रादशिक परिवहन अधिकारी यांचा ना हरकत दाखला दाखल केला नाही. तक्रारदार यांच्या चारचाकी वाहनाच्या चारी बाबत विमा रक्कम ठरविताना वरील कागदपत्रांची नितांत आवश्यकता असल्यामुळे व त्याची पुर्तता तक्रारदार यांनी न केल्यामुळे सा.वाले यांचे समोर तक्रारदारांचा विमा मागणीचा अर्ज रद्द करण्यावाचून पर्याय नव्हता. परंतु तो रद्द करताना सा.वाले यांची कृती कोणत्याही परिस्थितीत सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ठरु शकत नाही. सबब तक्रार रद्द करण्यात यावी.
4. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारी सेाबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, चारचाकी वाहन पे अॅन्ड पार्क येथे उभी केल्याची पावती, सदर वाहनाच्या चोरी बाबत बणगुर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीची प्रत, तक्रारदार यांचा वाहन चालविण्याचा परवान्याची प्रत, पॅनकार्डची प्रत, व सा.वाले यांच्या सोबत झालेल्या पत्र व्यवहाराच्या प्रती, तसेच वकीलामार्फत दिलेल्या नोटीसची प्रत, तक्रारदारांनी घेतेलेल्या विमा पॉलीसीच पत्र, सर्व्हेक्षण अधिका-यास दिलेल्या कागदपत्रांची यादी व सर्व्हेक्षकाची पोच दाखल केलेली आहे.
5. या उलट सा.वाले यांनी आपल्या कैफीयती सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, दाखल केला असून तक्रारदारांसोबत झालेल्या पत्र व्यवहाराच्या प्रती दाखल केल्या ओहत.
6. प्रस्तुत मंचाने तक्रार , कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. उभय पक्षकारांचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला. त्यानुसार तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदार यांच्या मालकीच्या स्कॉर्पीओ गाडीच्या विमा रक्कमेची मागणी नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिंध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | होय. अंशतः |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मान्य मुद्देः तक्रारदार यांच्या मालकीचे स्कॉर्पीओ चारचाकी वाहन दिनांक 16.10.2012 रोजी रात्री 8.15 ते 10.45 च्या दरम्यान MCGM PAY AND PARK गोरेगांव येथून चोरीस गेले व त्या संबंधी चोरीची तक्रार तक्रारदार यांनी दिनांक 17.10.2012 रेाजी बणगुर पोलीस स्टेशन येथे दिली होती ही बाब उभय पक्षकार नाकारत नाही. तक्रारदार यांनी त्यांचे मालकीचे स्कॉर्पीओ या चारचाकी वाहनाचा विमा दिनांक 27.11.2011 ते 26.11.2012 या कालावधीसाठी उतरविला होता व सदर विमा पॉलीसी पोटी विमा पॉलीसीचा हप्ता सा.वाले यांना दिला होता ही बाब सा.वाले नाकारत नाही. तक्रारदार यांचा वरील वर्णनाच्या चारचाकी वाहनाचा विमा रक्कमेची मागणी सा.वाले यांनी फेटाळून लावली ही बाब सा.वाले नाकारत नाही.
7. तक्रारदार यांच्या वरील चारचाकी वाहनाच्या विमा रक्कमेची मागणी नाकारण्याची सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी आपले पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व अभिलेखात दाखल केलेली कागदपत्र तसेच सा.वाले यांचे सोबत झालेला पत्र यावर भर देऊन असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारदार यांच्या मालकीचे चारचाकी वाहनाच्या चोरी बाबत बणगुर पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार ही लागलीच देण्यात आली होती. सदर तक्रारीची प्रत सा.वाले यांना देण्यात आली होती. तसेच चारचाकी वाहनाच्या विमा रक्कमेची मागणी देखील लगेच करण्यात आली होती. विमा रक्कमेच्या मागणी संबंधी तक्रारदार यांनी सव्हेक्षकांच्या मागणी नुसार त्यांना आवश्यक ती कागदपत्र देखील देऊन त्या बाबत त्याची पोच घेतली होती. सा.वाले म्हणतात त्या प्रमाणे वाहन चोरीच्या तपासा बद्दल अ समरी अहवाल दाखल करणे तक्रारदारांना शक्य नव्हते. कारण बणगुर पोलीस ठाण्यातील पोलीसांकडे या बाबत विचारले असता सदर वाहनाचा तपास सुरु असल्यामुळे पोलीसांनी अ समरी अहवाल दाखल केला नाही. या बाबत बणगुर पोलीस ठाण्यात माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या कागदपत्राची प्रत दाखल करण्यात आली आहे. तसेच वाहन चोरीची तक्रार ही बणगुर पोलीस ठाण्यात असल्यामुळे त्याची मुळ प्रत तक्रारदार यांना सा.वाले यांचेकडे जमा करणे शक्य नव्हते. उर्वरित कागदपत्रांच्या प्रती सा.वाले यांना देऊन व त्यांची पोच घेऊन व ही बाब सा.वाले यांना वेळोवेळी पत्राने कळवून देखील केवळ तक्रारदार यांना त्रास देण्याचे हेतुने सा.वाले यांनी तक्रारदार यांची विमा रक्कमेची मागणी फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे सा.वाले यांची सदर कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येते.
8. उलटपक्षी सा.वाले यांनी युक्तीवाद करताना आपले पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद याचा आधार घेऊन असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे कडून विमा रक्कमेची मागणी करण्यात आल्यानंतर त्यांचेकडून मागणी करण्यात आलेली मुळ कागदपत्र त्यांनी न देता त्यापैकी काही कागदपत्रांच्या प्रती दाखल केल्या. या संबंधी सा.वाले यांनी तक्रारदार यांना दिनांक 25.1.2013, 22.2.2013, 1.3.2013, 7.3.2013 व 7.5.2013 रोजी वारंवार स्मरणपत्र पाठवून ज्या कागदपत्रांची मुळ कागदपत्रे पाठविलेली नाहीत त्या बाबत स्मरणपत्र पाठवून देऊन मुळ कागदपत्रांची मागणी केली. परंतु तक्रारदार यांचेकडे वारंवार मुळ कागदपत्रांची मागणी करुन देखील तक्रारदारांनी ती न दिल्याने सा.वाले यांना तक्रारदार यांची विमा रक्कमेची मागणी रद्द करण्या विषयी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. सा.वाले यांचे वतीने असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारदार यांनी आपले पुरावा शपथपत्र देताना पुरावा शपथपत्रा सोबत काही कागदपत्र मंचा समोर हजर केली व सदरची कागदपत्र सा.वाले यांना हजर केल्याबाबत युक्तीवाद केला. परंतु तक्रारदार यांनी सर्व्हेक्षकाकडे जमा केलेल्या कागदपत्रांच्या पोच पावती वरुन तक्रारदार यांनी त्यांच्याकडे मागीतलेली सर्व आवश्यक ती कागदपत्र जमा केल्याचे दिसून येत नाही. तसेच तक्रारदार यांनी जरी मुळ कागदपत्र चोरीला गेल्या बद्दल पत्राची प्रत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे हजर केली असली तरी सदरची कागदपत्र चोरीला गेल्याबाबत कोणताही पुरावा मंचासमोर अथवा सा.वाले यांचे समोर हजर केला नाही. तसेच तक्रारदारांनी वादातीत वाहन चोरीस गेल्या बद्दल दाखल केलेल्या बणगुर पोलीस ठाण्यातील गुन्हया संबंधी तपास चालु असल्यामुळे अ समरी अहवाल अजुन दाखल झालेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत तक्रारदारांची विमा रक्कमेची मागणी निश्चित करता येत नाही. सा.वाले यांचेतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारदार यांना विमा मागणीच्या रक्कमेपोटी सा.वाले रु.4,60,000/- देण्यास तंयार होते व तंयार आहेत. परंतु तक्रारदार यांना त्यापेक्षा जास्त रक्कम हवी असल्यामुळे त्यांनी सा.वाले यांचे बरोबर आपसात तडजोड करण्याचे नाकारले. अशा परिस्थितीत सा.वाले यांचे कडून कोणत्याही प्रकारे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झालेली नाही. उपरोक्त परिस्थिती नुसार सा.वाले हे तक्रारदारांची विमा रक्कमेची मागणी पूर्ण करु शकत नाही.
9. उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्र, व तोंडी युक्तीवाद याचे अवलोकन केल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती म्हणजे, तक्रारदार यांचे वादातीत वाहन सा.वाले यांचेकडे, सदर वाहनाची चोरी झाल्यामुळे विमा मागणीसाठी प्रलंबीत होते ही बाब सा.वाले नाकारत नाहीत. अभिलेखातील कागदपत्रावरुन असे देखील दिसते की, तक्रारदारांनी दाखल केलेली वाहन चोरी बाबतची तक्रार, विमा रक्कमेची मागणी करणारा अर्ज हे सुध्दा मुदतीत केलेले आहेत. तसेच सा.वाले यांनी नेमणूक केलेल्या सर्व्हेक्षकाच्या विनंती वरुन सर्व्हेक्षकाकडे कागदपत्रांच्या प्रती देखील जमा केल्या आहेत. सा.वाले यांचेतर्फे जरी तक्रारदारांनी दाखल केलेल्या वाहन चोरीच्या तक्रारी बाबतची मुळे प्रत व सदर वाहनाच्या चोरी संबंधी पोलीसांनी केलेल्या तपासा बाबतच्या अहवालाची मुळ प्रत याची मागणी केली असली तरी तक्रारदार ती देऊ शकणार नाही. कारण तक्रारदारांनी दाखल केलेलील मुळ तक्रार ही बणगुर पोलीस ठाण्यात असून सदर तक्रारीचा उपयोग वाहन चोरीचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या प्रती वरुन तक्रारदार ही बाब स्पष्ट करु शकतात. सदर वाहनाच्या चोरी बाबत पोलीस तपास सुरु असल्यामुळे अ समरी अहवाल प्राप्त होणे शक्य नाही. वादातीतज वाहनहाची झालेली चोरी ही दिनांक 16.10.2012 रोजी झालेली होती. परंतु सदर चोरीच्या तपासा बाबत काय प्रगती झाली या बाबत बणगुर पोलीस स्टेशन कडून कोणतीच माहिती प्राप्त झालेली नाही. तक्रारदार यांनी सदर तपासा बाबत दिनांक 02.1.2014 रोजी माहितीच्या अधिकाराखाली सदर बाबत माहिती मागवूनसुध्दा दिनांक 22.2.2014 पर्यत बणगुर पोलीस सदर चोरीचा तपास करु शकले नाहीत. सदर तपासा बाबत माहितीच्या अधिकाराखाली पोलीसांना विचारलेल्या तक्रारदारांच्या कृती त्यांनी सदर माळविण्यासाठी केलेले प्रयत्न स्पष्ट होतात. त्यामुळे वादातीत वाहनाच्चा चोरीच्या तपासा बाबतचा अहवाल तक्रारदार यांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवला असे म्हणता येणार नाही. त्यामुळे वरील दोन का्रदपत्रांची मुळ प्रतींची अपेक्षा तक्रारदार यांचेकडे करणे चुकीचे आहे. तक्रारदार यांचेकडे मागण्यात आलेली प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कागदपत्र तसेच वादातीत वाहनाचे तारण हटविल्या बद्दल वित्त पुरवठा करणारी संस्था यांचे पत्र तक्रारदार यांनी दाखल केले नाही असे सा.वाले यांचे म्हणणे तक्रारदार यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून दिनांक 28.12.2012 त्यांना देण्यात आलेल्या पत्रावरुन सदर कागदपत्र सा.वाले यांना दिल्याचा युक्तीवाद केलेला आहे. परंतु सा.वाले म्हणतात त्या प्रमाणे पंजाब नॅशनल बँकेकडून दिनांक 28.12.2012 रोजी देण्यात आलेले पत्र तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे दिल्या बाबत कोणतेही कागदपत्र तक्रारदारांनी अभिलेखात दाखल केलेले नाही. तसेच तक्रारदारांच्या वरील वाहना संबंधी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडील कागदपत्र चोरीस गेल्या बद्दल कोणतेही कागदपत्र तक्रारदारांनी दाखल केलेले नाही. वादातीत वाहनाचा चारीचा तपास लागू शकत नाही या बाबत अ समरी अहवाल अजुन दाखल झालेला नाही या पार्श्वभुमिवर वादातीत वाहनाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडील कागदपत्रांची सही शिक्याची प्रत तक्रारदार यांनी दाखल करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार यांनी सदर बाबींची परीपुर्तता केलेली नाही. वरील बाबींची परिपुर्तता न केल्यामुळे सा.वाले यांची कृती बेकायदेशीर वाटत नाही असा युक्तीवाद सा.वाले यांचे कडून करताना, सा.वाले यांनी तक्रारदारांची विमा रक्कमेची मागणी आपसात करत त्यांना रु.4,60,000/- देण्याची तंयारी दाखविण्याची कृती ही त्यांच्या वरील युक्तीवादास छेद देते. वर नमुद कागदपत्र अथवा सा.वाले यांनी स्मरणपत्रात मागीतलेले कागदपत्र तक्रारदारांनी न देऊन त्यांचा विमा रक्कमेचा अर्ज रद्द करण्याचे समर्थन करताना सा.वाले हे तक्रारदारांची तडजोड करीत त्यांना रु.4,60,000/- देण्यास का तंयार झाले याच कुठलेली समर्थन सा.वाले करु शकत नाही. त्यामुळे सा.वाले यांनी तक्रारदार यांचा विमा रक्कमेची मागणी रद्द करण्याचे दिलेले कारण समर्थनीय वाटत नाही. त्यामुळे सा.वाले यांची सदर कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर असा निष्कर्ष काढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून तक्रारदार हे वादातीत वाहनाच्या विम्याची रक्कम, नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 व 2 होकारार्थी ठरवून मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 117/2014 अशतः मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले यांनी तक्रारदार यांच्या मालकीच्या स्कॉर्पीओ गाडीच्या विमा रक्कमेची मागणी नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सा.वाले यांनी तक्रारदार यांना सदर आदेशाची प्रत मिळाल्यापासून दोन महिन्याचे आत वादातीत वाहनाच्या विमा सुरक्षा कवचाची रक्कम रु.4,60,000/- अदा करावी तसे न केल्यास सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून सदर रक्कम वसुल होईपावेतो 10 टक्के दराने व्याज अदा करावे असे आदेश मंच पारीत करीत आहे.
4. सा.वाले यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रु.20,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावेत असाही आदेश मंच पारीत करीत आहे.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 19/12/2015