श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 10 मे 2012
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे
1. तक्रारदारांनी टोयोटा इनोव्हा कार दिनांक 25/04/2008 रोजी खरेदी केलेली होती. तक्रारदारांनी कार साठी आय सी आय सी आय लोम्बार्ड मोटर इन्श्युरन्स पॉलिसी दिनांक 25/04/2008 ते 24/04/2009 या कालावधीसाठी घेतली होती. जाबदेणार क्र.2 हे जाबदेणार क्र.1 यांचे एजंट आहेत. दिनांक 23/04/2009 रोजी जाबदेणार क्र.2 यांनी जाबदेणार क्र.1 चे ते एजंट आहेत, अधिकृत प्रतिनिधी आहेत असे सांगून तक्रारदारांना दिनांक 24/04/2009 ते 23/04/2010 कालावधीसाठी कार संदर्भात इन्श्युरन्स पॉलिसी देण्यासंदर्भात त्यांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील असे सांगितले. तसेच अस्तित्वात असलेला कार इन्श्युरन्स आय सी आय सी आय लोम्बार्ड यांच्याकडून घेतलेल्या पॉलिसीची प्रत व प्रिमीअमची रक्कम रुपये 17,044/- चेक द्वारे देऊन जाबदेणार क्र. 1 यांच्याकडे पॉलिसी स्वीच ओव्हर करता येईल असेही सांगितले. जाबदेणार क्र.2 यांच्या आश्वासनानुसार तक्रारदारांनी दिनांक 23/04/2009 रोजीच रुपये 17,044/- रकमेचा अॅक्सीस बँक लि., बाणेर, पुणे यांचा चेक जाबदेणार क्र.1 यांच्या नावे काढलेला जाबदेणार क्र.2 यांना पॉलिसी प्रिमीअम पोटी दिला. तसेच आवश्यक कागदपत्रे देखील दिली. दिनांक 25/4/2009 रोजी तक्रारदारांनी दुरध्वनी वरुन जाबदेणार क्र.2 यांच्याकडे पॉलिसी रिन्युअल संदर्भात विचारणा केली असता पॉलिसी रिन्यु करण्यात आलेली असून अल्पावधीतच तक्रारदारांना पॉलिसीची कागदपत्रे पाठविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. दिनांक 30/04/2009 रोजी तक्रारदारांचे नातेवाईक व ड्रायव्हर यांचा तक्रारदारांचा कार मधून जातांना अपघात झाला, तक्रारदारांचे नातेवाईक जागीच मृत्यू पावले व कारचे पुर्णपणे अपघातात नुकसान झाले. तक्रारदारांचे रुपये 11,00,000/- चे नुकसान झाले. जाबदेणार क्र.2 यांनी दिनांक 07/05/2009 रोजी तक्रारदारांनी पॉलिसी रिन्युअल संदर्भात दिलेला चेक तक्रारदारांना न भेटताच तक्रारदारांच्या ऑफिसच्या सिक्युरिटी गेटवर दिला. जाबदेणार यांनी तक्रारदारांची कार पॉलिसी रिन्यु केलेली नसल्याचे तक्रारदारांना कळले, त्यामुळे कारच्या झालेल्या नुकसानी संदर्भात तक्रारदार जाबदेणार यांच्याकडे क्लेम लॉज करु शकले नाहीत. तक्रारदारांचे रुपये 11,00,000/- चे नुकसान झाले. जाबदेणार यांना नोटीस पाठवूनही उपयोग झाला नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रुपये 11,00,000/- मागतात, तक्रारीचा खर्च रुपये 15,000/-, नुकसान भरपाई पोटी, मानसिक त्रासापोटी रुपये 2,00,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 यांना लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.2 यांच्याविरुध्द प्रिमिअम पोटी दिलेल्या रुपये 17,044/- चेक संदर्भात आरोप केलेले आहेत. जाबदेणार क्र.1 यांचा त्यात संबंध नाही. जाबदेणार क्र.2 यांच्याद्वारा प्रिमिअम पोटी रुपये 17,044/- चा चेक जाबदेणार क्र.1 यांना प्राप्त झालेला नाही, त्यामुळे पॉलिसी, कव्हर नोट देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारदारांनी आय सी आय सी आय लोम्बार्ड यांच्याकडून दिनांक 25/04/2008 ते 24/04/2009 कालावधीकरिता त्यांचे वाहन विमाकृत केलेले होते. त्याचा जाबदेणार क्र.1 यांच्याशी संबंध नाही. जाबदेणार क्र.2 हे जाबदेणार क्र.1 यांचे एजंट आहेत. जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना पॉलिसी देण्यासंदर्भात आश्वासन दिलेले नव्हते. जाबदेणार क्र.1 यांच्या सेवेत त्रुटी नाही. त्यांच्या विरुध्द तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही. तक्रारदार हे जाबदेणार क्र. 1 यांचे ग्राहक नाहीत, म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार क्र.1 करतात. जाबदेणार क्र.1 यांनी शपथपत्र दाखल केले.
3. जाबदेणार क्र.2 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार क्र.2 यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पहाणी केली. जाबदेणार क्र.1 यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये जाबदेणार क्र.2 हे त्यांचे एजंट असल्याचे मान्य केलेले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या आय सी आय सी आय लोम्बार्ड मोटर इन्श्युरन्स पॉलिसी वरुन दिनांक 25/04/2008 ते 24/04/2009 या कालावधी करिता तक्रारदारांचे टोयोटा वाहन त्यांच्याकडे विमाकृत असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या व्हिजीटर्स बुक चे अवलोकन केले असता त्यावर दिनांक 23/4/2009 रोजी अ.क्र. 6 वर श्री. राहूल येण्याची वेळ सकाळ 11.02 मि. व जाण्याची वेळ 11.20 मि. नमूद करण्यात आलेली आहे. यावरुन जाबदेणार क्र.2 हे तक्रारदारांच्या वाहनाच्या विमा रिन्युअल संदर्भात जाबदेणार क्र.1 यांचे एजंट म्हणून तक्रारदारांकडे गेले होते ही बाब स्पष्ट होते. तक्रारदारांनी दिनांक 23/04/2009 रोजीच अॅक्सीस बँक लि., बाणेर पुणे यांचा चेक जाबदेणार क्र.1 यांच्या नावे काढलेला होता त्याची रक्कम रुपये 17,044/- होती त्याची प्रत मंचासमोर दाखल केलेली आहे. यावरुन तक्रारदारांनी सदरहू धनादेश जाबदेणार क्र.2 यांना वाहनाच्या प्रिमिअम पोटी दिलेला होता ही बाब स्पष्ट होते. तसेच तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 यांचे पॉलिसी रिन्युअल संदर्भातील पॅम्प्लेट, इन्श्युरन्स रिन्युअल कोटेशन ज्यावर तक्रारदारांचे नाव, टोयोटा वाहन, इन्श्युरन्स डयु डेट 25/4/2010 नमूद करण्यात आलेले आहे, ही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. जाबदेणार क्र.2 हे जाबदेणार क्र.1 यांचे एजंट असल्यामुळेच त्यांनी वर नमूद केलेली कागदपत्रे तक्रारदारांना वाहनाच्या पॉलिसी रिन्युअल संदर्भात दिलेली होती ही बाब स्पष्ट होते. यावरुन जाबदेणार क्र.2 हे जाबदेणार क्र.1 यांचे एजंट होते, तक्रारदारांनी वाहनाच्या विम्याच्या प्रिमिअम पोटी दिलेला रुपये 17,044/- दिनांक 23/4/2009 चा चेक जाबदेणार क्र.2 यांना दिनांक 23/4/2009 रोजीच प्राप्त होऊन देखील त्यांनी पॉलिसी व पॉलिसी संदर्भातील कागदपत्रे तक्रारदारांना तात्काळ दिली नाहीत. ही जाबदेणार क्र.2 यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. परंतु तक्रारदारांनी तक्रारीतच नमूद केल्याप्रमाणे जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांनी प्रिमिअमपोटी दिलेला चेक भरलेला नव्हता, तो तक्रारदारांना परत करण्यात आलेला होता. त्यामुळे जाबदेणार क्र.1 यांना प्रिमिअमची रक्कमच प्राप्त झालेली नव्हती ही बाब स्पष्ट होते. तथापि जाबदेणार क्र.2 हे जाबदेणार क्र.। यांचे एजंट असल्यामुळे Principal is liable for the acts of agent असे कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट 1872 मध्ये कलम 226 नुसार जाबदेणार क्र.2 यांच्या कृतीस जाबदेणार क्र.1 हे जबाबदार ठरतात असे मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदेणार यांच्या सेवतील त्रुटी मुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारदार नुकसान भरपाई पोटी रुपये रुपये 50,000/- तक्रार दाखल दिनांक 14/05/2010 पासून 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारांना व्याज देण्यात आल्यामुळे तक्रारदारांच्या इतर मागण्या मंच अमान्य करीत आहे.
वर नमूद विवेचना वरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या
तक्रारदारांना रुपये 50,000/- तक्रार दाखल दिनांक 14/05/2010 पासून 9 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[3] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत दोन्ही पक्षांस विनामूल्य पाठविण्यात यावी.