निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 20/11/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 02/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 10/08/2011 कालावधी 08 महिने 08 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. विश्वनाथ सुर्यभान सारुक. अर्जदार वय 50 वर्ष.धंदा.शेती. अड.डि.यु.दराडे. रा.केमापूर ता.सेलू.जि.परभणी. विरुध्द बजाज अलायंस जनरल इन्शुरन्स कं.लि. गैरअर्जदार. व्दारा शाखा व्यवस्थापक,LIC बिल्डींग जवळ. अड.बी.ए.मोदानी. अदालत रोड.औरंगाबाद. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे ट्रॅक्टर क्रमांक एम.एच-22 एच-6751 चे मालक आहेत सदर ट्रॅक्टर विमा कंपनीकडे विमाकृत केलेले होते.पॉलिसीचा कालावधी 04 जाने 2010 ते 3 जाने 2011 पर्यंत होता.दिनांक 22/02/2010 रोजी तक्रारदाराचा ड्रायव्हर नामदेव दगडोबा काळे हा शेतातून घरी रात्री 8 वा.च्या दरम्यान चारठाणाच्या वाटेत रोडवर समोरुन येणा-या व्यक्तीला अपघाता पासून वाचवण्यासाठी ट्रॅक्टरला अचानक ब्रेक लावला त्यामुळे सदर ट्रॅक्टर बराशी मध्ये पडल्यामुळे ट्रॅक्टरचे रक्कम रु.1,30,000/- चे नुकसान झाले.सदर अपघात होत असताना केवळ ट्रॅक्टर हेड एकटेच होते त्याला ट्रॉली जोडली नव्हती सदर घटनेची माहिती बोरी पोलीस स्टेशन येथे दिली व घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी गुन्हा क्रमांक 26/10 नोंदविला सदर घटनेची माहिती गैरअर्जदार विमा कंपनीस ही दिली.गैरअर्जदाराने नेमलेल्या सर्व्हेअरने क्षतीग्रस्त ट्रॅक्टरच्या नुकसानीचा अहवाल तयार केला तदनंतर अर्जदाराने अहिंसा ट्रॅक्टर वसमत रोड येथे क्षतीग्रस्त ट्रॅक्टर दुरुस्त करुन घेतले त्यासाठी त्याला एकुण खर्च रक्कम रु.1,20,129/- इतका आला क्षतीग्रस्त ट्रॅक्टरची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केला.दिनांक 26/05/2010 रोजी गैरअर्जदाराने पत्राव्दारे ड्रायव्हरचे ट्रॅक्टर – ट्रॉलीचे वैध लायसेन्सची मागणी केली अर्जदाराने वारंवार अपघाताच्या वेळी ट्रॅक्टर हेड एकटेच होते त्यामुळे ट्रॉली सहीत लायसेन्स मागणे योग्य नाही व ट्रॅक्टर व ट्रॉली असे संयुक्त लायसेन्स आर.टी.ओ.ऑफीस कडूल दिले जात नसल्याचे गैरअर्जदारास सांगीतले परंतु गैरअर्जदाराने विनाकारण व्यर्थ मागणी करुन अर्जदाराचा दावा प्रलंबित ठेवला म्हणून अर्जदाराने ही तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदाराने ट्रॅक्टर अपघाताची रक्कम रु. 1,20,129/- अपघात तारखे पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजा सह अर्जदारास द्यावे अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/5 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदार विमा कंपनीस तामील झाल्यानंतर त्याने लेखी निवेदन नि.14 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केलेआहे. गैरअर्जदार चे म्हणणे असे की, अर्जदाराने अपघाताची सुचना दिल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने I.R.D.A. तर्फे मान्यता प्राप्त सर्व्हेअर मो.राजेख शेख यांचे मार्फत घटना स्थळाचा अहवाल मागविला सर्व्हेअरने घटनास्थळावर जाऊन वाहनाची पाहणी केली अहवाल व वाहनाचे फोटो काढून सामनेवाला विमा कंपनीकडे दाखल केले.त्या अहवाला नुसार, अहिंसा ट्रॅक्टरच्या बिलावरुन व पहिल्या खबरी वरुन असे शाबीत होते की, अपघातासमयी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडण्यात आली होती.तदनंतर अर्जदाराने सदर ट्रॅक्टर अंहिंसा ट्रॅक्टर्स येथे दुरुस्तीस आणले तेथे दुसरा सर्व्हे I.R.D.A. तर्फे मान्यता प्राप्त सर्व्हेअर डि.एस.नळबलवार यांच्यातर्फे करुन त्याचा अहवाल मागविण्यात आला.त्याने तयार केलेल्या अहवाला नुसार क्षतीग्रस्त ट्रॅक्टरच्या नुकसानीचे मुल्यांकन रक्कम रु.36971/- एवढे केलेले आहे. व बिलचेक अहवाला नुसार सुध्दा रक्कम रु.36,221/- चे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते.पुढे गैरअर्जदारांचे म्हणणे असे की, अर्जदाराने मागणी केल्या प्रमाणे कागदपत्राची पुर्तता केलेली नाही.ड्रायव्हरकडे असलेले लायसेन्स हे फक्त LMV (Tractor) साठीचे आहे.परंतु घेटनेच्या वेळी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडलेली असल्यामुळे त्याच्याकडे ट्रॅक्टर – ट्रेलर चालविण्याचा ट्रान्सपोर्ट परवाना असावयास हवा होता.तो नसल्यामुळे अर्जदाराने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे त्यामुळे सामनेवाला नुकसान भरपाई देण्यास बांधील नाही.अर्जदाराने विनाकारण गैरअर्जदाराच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे.त्यामुळे अर्जदाराची तक्रार दंडात्मक रक्कम रु. 10,000/- सह खारीज करावी अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपत्र नि. 15 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.20/1 ते नि.20/5 व नि.23/1 ते नि.23/7 वर मंचा समोर दाखल केली दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 – अर्जदाराचा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.-22 एच.- 6751 दिनांक 22/02/2010 रोजी अपघातामुळे क्षतीग्रस्त झाले क्षतीग्रस्त ट्रॅक्टरची पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केला,परंतु गैरअर्जदाराने अपघता समयी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडलेली होती व अर्जदाराच्या ड्रायव्हरकडे ते चालविण्यासाठीचे वैध लायसेन्स नव्हते या कारणास्तव अर्जदाराचा विमा दावा प्रलंबित ठेवला अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की,अपघाता वेळी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडलेली होती व ट्रॅक्टर ट्रॉलीसह चालविण्यासाठी ड्रायव्हरकडे ट्रान्सपोर्ट वाहन परवाना असावयास हवा होता,परंतु अर्जदाराच्या ड्रायव्हरकडे फक्त LMV (Tractor) चालविण्याचा परवाना असल्याचे आढळून आले त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झाल्यामुळे क्षतीग्रस्त ट्रॅक्टरची नुकसान भरपाई देण्यासाठी गैरअर्जदार विमा कंपनी बांधील नाही.निर्णयासाठी महत्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो की,गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल.अर्जदाराने अपघाता समयी ट्रॅक्टरला ट्रेलर किंवा ट्रॉली जोडली असल्याचा इनकार केला आहे.पण गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या फोटाग्राफ्स, अंहिंसा ट्रॅक्टरचे कोटेशन (नि.23/5) व पोलिस पेपर्स नि.4/1 व 4/2 त्याची पाहणी केली असता अपघाता समयी ट्रॅक्टरला ट्रेलर किंवा ट्रॉली जोडल्याचे स्पष्ट होते.ड्रायवहरकडे फक्त LMV (Tractor) चालविण्याचे लायसेन्स असल्यामुळे त्याला ट्रॅक्टर + (ट्रॉली ) ट्रेलर चालविता येणार नाही.मोटर वाहन कायदा 1988 कलम 2 क्लॉज क्रमांक (10), (14), (21), (47) च्या व्याख्या करण्यात आलेल्या आहे. कलम 2 (21) नुसार LMV -- means a transport vehicle or omnibus the gross vehicle weight of either of which or a motor car or tractor or road roller the unlade weight of any of which, does not exceed 7500 kg. कलम 2 (14) goods carriage means any motor vehicle constructed or adapted for use solely for the carriage of goods, or any motor vehicle not so constructed or adapted when used for the carriage of goods. कलम 2 (47) transport vehicle means a public service vehicle a goods carriage an educational institution bus or a private service vehicle. कलम 2 ( 44) tractor means a motor vehicle which is not itself constructed to carry any load ( other than equipment used for the purpose of propulsion) नि.20/2 वर ड्रायव्हर नामदेव काळेच्या ड्रायव्हींग लायसेन्सची झेरॉक्स प्रत लावली आहे त्याचे अवलोकन केले असता ड्रायव्हरचे लायसेन्स हे फक्त LMV ( Tractors) चे आहे यात स्पष्टपणे The license to drive a motor vehicle other than transport vehicle is valid. From 20 Jun 02 to 13 Jun 2019 पर्यंत valid असल्याचे दिसते यावरुन ड्रायव्हरला देण्यात आलेले license फक्त ट्रॅक्टर चालविण्यासाठीचे होते व ट्रॅक्टरला जेव्हा ट्रॉली किंवा ट्रेलर जोडण्यात येते तेंव्हा त्याचे स्वरुप Goods carriage असे होते व त्यासाठी Transport vehicle चालविण्याचे लायसेन्स असावे लागते.त्यामुळे अपघाता समयी ड्रायव्हरकडे valid driving license नव्हते हेच यावरुन स्पष्ट होते. रिपोर्टेड केस. नॅशनल इन्शुरन्स कं.लि. वि.सुशील निवृत्ती बांडे 2009 (5) ALL MR 876 मध्ये In The High Court OI JUDICATURE AT BOMBAY AURANGABAD BENCH यांनी असे मत व्यक्त केले आहे की, MLV Act. ( 1988) S2 (21), 2(14) – Goods Carriage— tractor -- trolley – Though tractor alone would be a LMV the tractor – trolley would be goods carriage vehicle within the meaning of s.2 (14) of MV Act. व हे मत सदर प्रकरणाला तंतोतंत लागु होते.गैरअर्जदाराने मंचासमोर Citation दाखल केले आहे. 1 (2008) ACC 54 (SC), II (2009) ACC 313 (SC) 2009 (5) All MR 878 Bomttc, 2011 (2) AIR Kar R 141 या सर्व Citation चा अभ्यास केला असता मंचाने व्यक्त केलेल्या उपरोक्त विवेचनास पुष्टी मिळते.तसेच अर्जदारास याची कल्पना असल्यामुळेच अपघाता समयी फक्त ट्रॅक्टर हेड एकटेच असल्याचे कथन तक्रार अर्जातून केलेले आहे.पोलिस पेपर्सची पाहणी केली असता सदर वाहनास अपघात ड्रायव्हरने भरधाव व निष्काळजीपणाने वाहन चालविण्यामुळे झाल्याचे निदर्शनास येते.म्हणून वरील सर्व बाबींचा सारासार विचार करुन मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |