जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 400/2008. प्रकरण दाखल तारीख - 30/12/2008 प्रकरण निकाल तारीख – 24/03/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य उदय उत्तमराव पवार, रा.वय वर्षे 36, व्यवसाय व्यापार, अर्जदार. रा.आनंदनगर,नांदेड. विरुध्द. बजाज अलायांझा जनरल इन्शुरन्स कंपनी, गैरअर्जदार. कोठारी कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.शिरीष नागापुरकर. गैरअर्जदार - अड.निरज भोसीकर. निकालपञ (द्वारा-मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार बजाज अलायांझा जनरल इनशुरन्स कंपनी यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदारांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार यांनी दि.07/04/2008 रोजी बाफना मोटर्स यांचेकडुन रु.8,38,278/- ला टाटा सफारी कार विकत घेतली त्या वाहनाचा गैरअर्जदार विमा कंपनीकडुन विमा उतरविला. अर्जदार हे दि.31/05/2008 रोजी नांदेडहुन पानेरला कार्यक्रमासाठी नीघाले असतांना रात्री केडगांवला खुप उशिर झाल्यामुळे नगर- पुणे रोडवर अंबिका लॉजवर मुक्काम केला सदर वाहन हे लॉजच्या पार्कींगमध्ये उभी केली असता, त्याच रात्री सदरचे वाहन अज्ञात चोरटयानी चोरुन नेले, याबाबत अर्जदारांनी ताबडतोब कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर येथे वाहन चोरीला गेल्याची फिर्याद दिली. याप्रमाणे गुन्हा क्र.162/08 नोंदविण्यात आला, पोलिसांनी तपास करुनही वाहनाचा तपास लागला नाही. कार चोरीची सुचना गैरअर्जदारांना दिली तसेच सदरचे वाहन हे सुंदरम फायनान्स यांचेकडुन वित्तीय कर्ज घेऊन घेतले असल्या कारणाने सर्व कागदपत्र गैरअर्जदारांना दिली. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या विम्याचा दावा अंशतः मंजुर करुन रु.5,93,225/- दिले व सदर रक्कमेचा चेक सुंदरम फायनान्सकडे दि.18/11/2008 रोजी पाठविले. वाहनावर कर्ज रु.6,25,000/- एवढेच होते ही बाब फायनान्स कंपनीला कळवीली. गैरअर्जदारांनी विमा पॉलिसीतील वाहनाचे निर्धारीत मुल्य रु.7,92,300/- एवढे दर्शविण्यात आले व वाहन हे नवीन असतांना कमी रक्कम का दिली ? गैरअर्जदारांनी पुर्ण रक्कम देणे बंधनकारक आहे, या गोष्टीचा विचार करुन गैरअर्जदार विमा कंपनीने फरकाची रक्कम रु.2,00,000/- व्याजासह अर्जदारास देण्याचे आदेश व्हावेत, शिवाय मानसिक त्रास रु.50,000/- व दावा खर्च रु.2,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार यांनी आपले लेखी म्हणणे वकीला मार्फत दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार योग्य नाही. अर्जदार यांनी वाहन व्यवस्थीत व योग्य ठिकाणी ठेवले नाही म्हणुन चोरीच्या घटनेस अर्जदार हे स्वतः जबाबदार आहेत. अर्जदार यांनी आवश्यक ती कागदपत्रांची पुर्तता केली नाही. अर्जदाराच्या वाहनाचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन न करता वाहन रोडवर आणता येत नाही ते कायदयाने बंधनकारक आहे, असे असतांना अर्जदाराने वाहन बाहेर गांवी नेले. अर्जदाराने पॉलिसीतील शर्ती व अटींचा भंग केलला आहे. गैरअर्जदार कंपनीने कुठलीही नुकसान भरपाई देणे लागत नाही. सहानुभूतीपुर्वक अर्जदाराचा विचार करुन नॉन स्टॅण्डर्ड बेसेसवर 25 टक्के रक्कम कपात करुन मंजुर करण्याचा प्रस्ताव ठेवला, अर्जदार तो मान्य करुन गैरअर्जदाराच्या हक्कात लेखी संमतीपत्र करुन दिले. अर्जदाराने ठरलेल्या प्रस्तावाप्रमाणे गैरअर्जदाराच्या हक्कात डिस्चार्ज व्हाऊचरवर सही करुन दिली असे करतांना अर्जदाराने कुठलीही नाराजी दर्शविली नाही, स्वच्छेने 25 टक्के रक्कम कपातीचा प्रस्ताव मान्य केला आहे व व्हाऊचर कंपनीच्या हक्कात सही करुन दिले. अर्जदाराचे वाहन हे सुंदरम फायनान्स यांचेकडुन कर्ज घेऊन विकत घेतलेले त्यामुळे रु.5,93,225/- वजा पॉलिसी एक्सेस रक्कम कमी करुन फायनान्स कंपनी सुंदरम फायनान्स यांचेकडे दि.18/11/2008 रोजी जमा केली त्यावेळी अर्जदाराने कुठलीही नाराजी दाखविली नाही किंवा आक्षेप घेतला नाही. गैरअर्जदाराने वाहनाचे मुल्य रु.7,92,300/- आय.डी.बी. ने निर्धारीत केले हे त्यांना मान्य आहे. गैरअर्जदाराने जी कार्यवाही केलेली आहे ती अर्जदाराकडे सहानुभूतीपुर्वक पाहुनच क्लेम नॉन स्टॅण्डर्ड बेसेसवर अर्जदाराच्या संमतीने दिलेला आहे म्हणजेच गैरअर्जदाराने सेवेत कुठेही त्रुटी केलेली नाही. त्यामुळे फरकाची रक्कम व मानसिक त्रास मागण्यासाठी अर्जदार हे पात्र नाही. सदरील प्रकरण हे गैरअर्जदाराचे औरंगाबाद कार्यालयात झाले आहे. वाहनाची चोरी ही अहमदनगर येथे झालेली आहे. म्हणुन या न्यायामंचास कार्यक्षेत्र येत नाही. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी देखील पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले कागदपत्र व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी किंवा अनुचित प्रकार अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी गैरअर्जदार बजाज अलायंझ या कंपनीची पॉलीसी दाखल केलेली आहे. यातील वाहनाची दर्शनी मुल्य रु.7,92,300/- असे दर्शविले आहे व सुंदरम फायनान्स यांचे मार्फत वित्त सहाय घेऊन हे वाहन दि.07/04/2008 रोजी विकत घेतलेले आहे. विमा कंपनीचे कार्यालय हे नांदेड येथे आहे व रजिस्ट्रेशन हे आर.टी.ओ.नांदेड येथेच होणार होते त्यामुळे कार्यक्षेत्रचा मुद्या येऊ शकत नाही. अर्जदाराने नविन टाटा सफारी वाहन विकत घेतले व गैरअर्जदार यांचेकडुन विमा काढले व वाहन चोरीला गेले याबद्यल कुठलाच वाद नाही. वाहनाच्या चोरीबद्यल कोतवाली पोलिस स्टेशन, अहमदनगर येथील एफ.आय.आर. व घटनास्थळ पंचनामा या प्रकरणांत दाखल केलेले आहे. अर्जदाराचे वाहन रु.8,38,278/- चे होते याबद्यल बाफना मोटर्स याचे अकाऊंट स्टेटमेंट अर्जदाराने दाखल केलेले आहे. अर्जदार व गैरअर्जदारामध्ये वाद एवढाच आहे की, गैरअर्जदार कंपनीने अर्जदार यांना रु.2,00,000/- विम्याची रक्कम कमी दिली. गैरअर्जदाराचा आक्षेप आहे की, अर्जदाराचे वाहन नवीन होते व ते आर.टी.ओ.कडे नोंदविलेले नव्हते, असे असतांना नवीन वाहन घेऊन ते बाहेर गांवी गेले व जेथे थांबले होते त्या लॉजवर बाहेर वाहन पार्क करण्यात आले तेथे वाहनाची सुरक्षीततेची योग्य ती व्यवस्था नव्हती व वाहन चोरीस गेले या कथनास अर्जदार हे स्वतः जबाबदार आहेत. गैरअर्जदार हे विम्याची रक्कम अशा स्थितीत देणे लागत नाही तरीही अर्जदाराचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन नॉन स्टॅण्डर्ड बेसेसवर 25 टक्के रक्क्म कपात करुन उर्वरित रक्कम अर्जदारास देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला व अर्जदारांनी त्यास लेखी संमती दिली. याबाबत गैरअर्जदाराने दि.15/07/2008 रोजी लेटर ऑफ सबरगेशन या प्रकरणांत दाखल केलेले आहे. यावर अर्जदारांनी देखील सही केलेली आहे, याचा अर्थ अर्जदाराने रु.5,93,225/- ही रक्कम घेतली त्यास संमती दिलेली आहे व यावर साक्षीदार शेषराव रामचंद्र जाधव यांनी सही केलेली आहे. दुसरे अर्जदारांनी विमा कंपनीस इंडीमीटी बॉण्ड लिहुन दिला आहे त्याप्रमाणे त्यांनी रु.5,93,225/- रक्कम घेण्याचे मान्य केले आहे व इंडेमिटी बॉण्ड ही गैरअर्जदारांनी या प्रकरणांत दाखल केलेले आहे. या शिवाय अर्जदाराने जो शपथपत्र करुन दिलेला आहे व त्या शपथपत्रात गैरअर्जदार व त्यांच्यात चार्चा होऊन स्वतंत्रपणे स्वतःहुन रु.5,93,225/- घेण्यास संमती दिलेली आहे, हे स्पष्टपणे दिसुन येते. या शिवाय गैरअर्जदारांनी Claim Discharge cum Satisfaction Voucher फार्म दाखल केलेले आहे. यात रु.5,93,225/- चेकद्वारे Full & Final Settlement of Claim under policy number oGo9-2007-1801 54 in respect of damage to/loss of vehicle on 1/06/2008 यासाठी स्विकारले आहेत, असे व्हॉऊचरवर सही करुन दिलेली आहे ते गैरअर्जदारांनी या प्रकरणांत दाखल केलेले आहे. एवढे सर्व कागदपत्र असे दर्शवितात की, नॉन स्टॅण्डर्ड बेसेसवर 25 टक्के रक्कम कपातीची मान्यता देऊन विम्याची रक्कम स्विकारली आहे. MOTOR VEHICLE Act 1988 CHAPTER IV 39. Necessity for registration – No person shall drive any motor vehicle and no owner of a motor vehicle shall cause or permit the vehicle to be driven in any public place or in any other place unless the vehicle is registered in accordance with this Chapter and the certificate of registration of the vehicle displayed in the prescribed manner. Provided that nothing in this section shall apply to a motor vehicle in possession of a dealer subject to such conditions as may be prescribed by the Central Government. या नियमाला पाहीले असता,विमा कंपनीवर जबाबदारी येत नाही परंतु त्यांनी नॉन स्टॅण्डर्ड बेसेसवर हा क्लेम सेटल केलेला आहे. यासाठी गैरअर्जदारा मा.सर्वोच्च न्यायालय यातील सी.ए. क्र.535/94 व सी.ए.क्र.535/94, (सी.ए.नं.723/1994) युनाटेड इंडिया इंन्शुरन्स विरुध्द अजमेरासिंघ कॉटन आणि जनरल मिल्स आणि इतर. हा केस लॉ दाखल केलेला आहे. यात पुरावा उपलब्ध नाही, गैरअर्जदाराचे दोन विमा पॉलिसी होत्या, यात नुकसान भरपाई Full & Final Settlement असे सांगुन डिस्चार्ज कार्डवर सही करुन रक्कम स्विकारली आहे. यात मा.राज्य आयोगाने वॉलंट्री रक्कम स्विकारली, असा निकाल दिला असतांना व कुठेही आक्षेप न घेता रक्कम स्विकारली आहे. प्रस्तुत प्रकरणांत अर्जदाराने विमा कंपनीकडुन अंडर प्रोटेस्ट रक्कम स्विकारली असा कुठलाही पुरावा मंचा समोर आलेला नाही म्हणुन हा केस लॉ या प्रकरणांस लागु होणार नाही. अर्जदाराने एकदा रक्कम Full & Final Settlement म्हणुन स्विकारल्यास आता फरकाची रक्कम त्यांना मागता येणार नाही. गैरअर्जदार यांच्या सेवेत कुठेही अनुचित प्रकार दिसुन येत नाही. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज फेटाळण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |