(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक–30 जानेवारी, 2020)
01 तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आणि वि.प.क्रं 2 तथाकथीत एजंट यांचे विरुध्द विम्याचे पॉलिसीपोटी भरलेली रक्कम व्याजासह मिळावी व ईतर अनुषंगीक मागण्यांसाठी प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती ही जिल्हा ग्राहक न्यायमंच, भंडारा यांचे कार्यक्षेत्रात उपरोक्त नमुद पत्त्यावर राहते. यातील विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी असून, वि.प.क्रं 2 हा तिचा अधिकृत एजंट आहे. तिचे म्हणण्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 विमा एजंटचे सांगण्या वरुन तिने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची पॉलिसी दिनांक-28.07.2008 रोजी काढली असून तिचा क्रं-0104361812 असा आहे. तिने असेही नमुद केले की, तिला वि.प.क्रं 2 एजंटने पॉलिसी काढते वेळी तीन वर्ष पर्यंत विम्याचे हप्ते भरावे लागल्या नंतर विमा पॉलिसीचे फायदे मिळतील असे सांगितले होते, त्यानुसार तिने दिनांक-28.07.2008, दिनांक-31.08.2009 आणि दिनांक-16.12.2012 रोजी प्रत्येकी रुपये-10,000/- प्रमाणे एकूण तीन विमा हप्त्यांची रक्कम रुपये-30,000/-विमा कंपनीकडे भरली व त्याप्रमाणे एकूण तीन पावत्या प्राप्त केल्यात. एकूण तीन विम्याच्या किस्तीची रक्कम भरल्या नंतर तिला विरुध्दपक्ष क्रं 2 विमा एजंटने आता कोणतीही किस्त जमा करावयाची नाही असे सांगितले.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-05.07.2014 रोजी तिचे नावाने रुपये-10,000/- चा धनादेश पाठविला व त्यानंतर दिनांक-25.08.2014 रोजी रुपये-1000/- चा धनादेश पाठविल्याने तिला आश्चर्याचा धक्का बसला, तिने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे नागपूर स्थित कार्यालयास भेट दिली असता तिला ैतिने काढलेली विमा पॉलिसी ही तीन वर्षा नंतरही सुरु ठेवावयास हवी होती कारण सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा पंधरा वर्षासाठीचा असून विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-28.07.2008 पासून ते दिनांक-28.07.2023 असा आहे असे सांगण्यात आले.
तक्रारकर्तीचे या संदर्भात विशेषत्वाने असे म्हणणे आहे की, जर तिने काढलेल्या विमा पॉलिसीचा अवधी पंधरा वर्षासाठीचा होता तर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने पुढील विमा हप्ते भरण्या बाबत तिचेशी पत्रव्यवहार करावयास हवा होता परंतु तसा कोणताही पत्रव्यवहार तिचे सोबत केलेला नाही अथवा विरुध्दपक्ष क्रं 2 विमा एजंटने सुध्दा तशी कोणतीही सुचना तिला दिलेली नाही. उलट विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी एजंटने तिला तीन विम्याचे हप्त्यांची रक्कम जमा केल्या नंतर पुढील विमा हप्ते भरण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. शेवटी तिने अधिवक्ता यांचे मार्फतीने नोंदणीकृत डाकेने विरुध्दपक्षाला दिनांक-21.12.2017 रोजीची नोटीस पाठवून त्याव्दारे विमा पॉलिसीचे हप्त्यापोटी तिने जमा केलेली रक्कम रुपये-30,000/- जमा दिनांका पासून ते प्रत्यक्ष अदायगी पावेतो व्याजासह मिळावेत अशी मागणी केली, सदर नोटीस विरुध्दपक्षाला मिळूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून तिने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील मागण्या केल्यात-
तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा पॉलिसी क्रं-0104361812 पोटी जमा केलेली 3 विमा हप्त्यांची एकूण रक्कम रुपये-30,000/- जमा केल्याचे दिनांका पासून वार्षिक-18 टक्के दराने व्याजासह तिला परत करण्याचे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी व वि.प.क्रं 2 विमा एजंट यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तिला परत करण्याचे आदेशित व्हावे. या शिवाय तिला झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- नुकसान भरपाई विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे कडून मिळावी तसेच तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- मिळावा. या शिवाय योग्य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 बजाज अलायंझ लाईफ इन्शुरन्स कं.लि. तर्फे ग्राहक न्यायमंचा समक्ष लेखी उत्तर पान क्रं-59 ते 67 वर दाखल करण्यात आले. त्यांनी लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्तीने काढलेली विमा पॉलिसी ही एकूण पंधरा वर्षाचे कालावधीची होती व तसे विमा पॉलिसी मध्ये नमुद केलेले असून विमा पॉलिसीतील अटी व शर्ती तिचेवर बंधनकारक आहेत परंतु तिने तीन वार्षिक विमा हप्त्यांची रक्कम भरल्या नंतर स्वतःच्या चुकीमुळे पुढील कालावधीचे देय वार्षिक विम्याचे हप्ते भरलेले नाहीत आणि त्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी जबाबदार नसल्याने तक्रार खारीज करण्यात यावी असा प्राथमिक आक्षेप घेतला. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी विमा नियामक मंडळाचे नियमा नुसार (Insurance Regulatory Development Authority of India (IRDA) कार्य करीत असल्याने ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी त्यांना लागू होत नाहीत. विमाधारकास विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचे दस्तऐवज मिळाल्या नंतर पंधरा दिवसांचा Free look period देण्यात येतो, सदर कालावधी मध्ये विम्याच्या अटी व शर्ती मान्य नसल्यास विमापॉलिसीपोटी भरलेली रक्कम परत करण्यात येते. विमा पॉलिसीचा हप्ता प्रत्येक वर्षी रुपये-10,000/- प्रमाणे भरावयाचा होता. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला तक्रारकर्ती कडून प्रत्येकी रुपये-10,000/- प्रमाणे एकूण तीन वार्षिक विमा हप्त्यांची रक्कम दिनांक-16.12.2010 पर्यंत मिळाली, त्यानंतर तीने एकही पैसा विमा कंपनी मध्ये पॉलिसीचे हप्त्यापोटी भरलेला नाही. तक्रारकर्तीला विमा हप्ते भरण्याचे सुचनापत्र विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून दिनांक-06.06.2009, दिनांक-24.06.2009 आणि दिनांक-19.06.2011 रोजीची प्राप्त झालेली आहेत आणि त्यानंतरही वेळोवेळी दुरध्वनी करुन तिला विमा हप्ते भरण्यास सुचित केलेले आहे. तक्रारकर्तीने स्वतःहून केलेल्या चुकीमुळे तिला फायदा मिळू शकत नाही. तक्रारकर्तीने विम्याचे पुढील हप्ते न भरल्यामुळे तिला विमा कंपनीचे अटी व शर्ती नुसार विमा पॉलिसीचे फायदे मिळू शकत नाहीत. तक्रारकर्तीची विमा पॉलिसी ही लॅप्स झालेली आहे. विमा कायदा 1938 चे कलम 50 प्रमाणे विमा पॉलिसीचे कालावधीत देय विमा हप्त्यांची रक्कम नियमित भरणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी मध्ये स्पष्ट नमुद आहे की, विमा हप्त्यांची देय रक्कम विमाधारकाने नियमित भरणे आवश्यक आहे, त्यास त्या बाबत कोणतीही नोटीस विमाधारकास देणे आवश्यक राहणार नाही. आपले म्हणण्याचे समर्थनार्थ विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने (1) (1999)6 SCC 451-“The Oriental Insurance Co. Ltd.-Versus-Sony Cheriyan” तसेच (2) (1996) 3 SCR 500 “General Assurance Society Ltd.-Verus-Chandumull Jain and Anr.” या मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांवर भिस्त ठेऊन असे नमुद केले की, विमाधारक आणि विमा कंपनी यांचेमध्ये विमा हा एक करार असून त्यातील अटी व शर्ती उभय पक्षांवर बंधनकारक आहेत.
विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने परिच्छेद निहाय उत्तरात असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 2 हा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा अधिकृत एजंट असल्याची बाब त्यांना नामंजूर असून त्या संबधात तक्रारकर्तीने योग्य तो पुरावा सादर करावा. तक्रारकर्तीचे विमा दावा प्रस्ताव फॉर्मवर स्पष्टपणे नमुद आहे की, विमा पॉलिसीपोटीचे हप्ते पंधरा वर्षा करीता भरावयाचे असून सदर फॉर्मवर एजंटचे नाव शशांक मोहरील असे स्पष्ट नमुद केलेले आहे. तक्रारकर्तीचे सांगण्या वरुन ती शिक्षीका असून तिला लिहिता वाचता येते. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा, विरुध्दपक्ष क्रं 2 शी कोणताही संबध येत नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 2 चे कोणत्याही कृत्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी जबाबदार नाही. तक्रारकर्तीचे विमा पॉलिसीची परिपक्व तारीख 28.07.2023 अशी आहे. तक्रारकर्तीने विमा पॉलिसीपोटी वार्षिक विमा हप्ते दिनांक-28.07.2008, दिनांक-31.08.2009 आणि दिनांक-16.12.2010 रोजी भरलेले आहेत व त्यानंतर कोणतीही रक्कम भरलेली नसल्याने तिची विमा पॉलिसी लॅप्स झालेली आहे, संपलेली आहे म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला दिनांक-05.07.2014 रोजीचा रुपये-10,000/- आणि दिनांक-25.08.2014 रोजीचा रुपये-1000/- चा धनादेश दिला. तक्रारकर्तीची विमा पॉलिसी संपलेली असल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कोणत्याही प्रकारे रक्कम देण्यास जबाबदार नाही. त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. सबब तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने केली.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 निलेश दुधराम भांडारकर याने आपले लेखी निवेदन दिनांक-11.01.2019 रोजी ग्राहक न्यायमंचा समक्ष पान क्रं 52 वर दाखल केले, त्याने लेखी निवेदनात तो विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा एजंट नसल्याने त्याचा या तक्रारीशी काहीही संबध नाही, करीता त्याचे नाव प्रस्तुत तक्रारीतून वगळण्याची विनंती केली.
05. तक्रारकर्तीने पान क्रं 16 वरील दस्तऐवज यादी नुसार एकूण-04 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये प्रामुख्याने विमा पॉलिसीची प्रत, विमा प्रस्ताव प्रत, विमा पॉलिसीचे हप्ते भरल्याच्या पावत्यांच्या प्रती, आधारकॉर्ड अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्तीने पान क्रं 11 ते 13 वर स्वतःचे पुराव्या दाखल शपथपत्र तसेच पान क्रं 68 ते 70 वर स्वतःचे शपथपत्र दाखल केले. पान क्रं 71 ते 74 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
06. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने पान क्रं 59 ते 67 वर लेखी उत्तर दाखल केले. अन्य दस्तऐवज दाखल केले नाहीत.
07. तक्रारकर्ती तर्फे तिचे पती श्री रामभाऊ डेकाटे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे वकील श्री श्रीकांत सावजी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
08. तक्रारकर्तीची तक्रार, तिने दाखल केलेली शपथपत्रे तसेच तिने प्रकरणात दाखल केलेले दस्तऐवज तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्तर इत्यादीचे ग्राहक मंचाव्दारे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्ती आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे वकील यांचा मौखीक युक्तीवाद लक्षात घेता ग्राहक न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
09. तक्रारकर्तीने स्वतः तक्रारी सोबत पान क्रं 17 ते 33 वर विमा पॉलिसीची प्रत आणि विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा दस्तऐवज दाखल केलेला आहे, त्याचे अवलोकन केले असता तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून विमा पॉलिसी काढलेली असून सदर विमा पॉलिसीचा क्रं-0104361812 असा असून ती दिनांक-28.07.2008 पासून सुरु झालेली असून त्या दिनांका पासून विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा जोखीम स्विकारलेली आहे. सदर विमा पॉलिसीचे प्रतीप्रमाणे विमा हप्ते प्रतीवार्षीक रुपये-10,000/- प्रमाणे भरावयाचे असून पॉलिसीही एकूण 15 वर्षाचे कालावधीसाठीची असून परिपक्वता दिनांक-28.07.2023 असा नमुद आहे. विमा रक्कम रुपये-2,00,000/- आहे. तक्रारकर्तीने दिनांक-28.07.2008 रोजी प्रथम विमा हप्ता रुपये-10,000/- भरल्याचे नमुद आहे. पान क्रं 27 वरील अक्रं 15 मध्ये विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा दस्तऐवज मिळाल्या नंतर पंधरा दिवसाचा कालावधी हा फ्री लुक पिरियेडचा दिलेला आहे. पान क्रं 34 ते 38 वर विमा प्रस्ताव फॉर्म दाखल असून त्यावर साक्षीदार तसेच विमा प्रस्ताव लिहिणारा म्हणून शशांक मोहरील याची सही आहे. पान क्रं 43 वर दाखल विमा कंपनीचे विमा पावती वरुन तक्रारकर्तीने पावती क्रं –ए-2081832 अनुसार दिनांक-31.08.2009 रोजी दुस-या वार्षिक हप्त्याची रक्कम रुपये-10,000/- भरल्याची बाब सिध्द होते. पान क्रं 44 वरील विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दाखल पावती वरुन पावती क्रं-355407744 अनुसार तक्रारकर्तीने दिनांक-16.12.2010 रोजी पॉलिसीपोटी तिस-या वार्षिक हप्त्याची रक्कम रुपये-10,000/- भरल्याची बाब सिध्द होते. अशाप्रकारे तक्रारकर्तीने दिनांक-28.07.2008 पासून ते दिनांक-16.12.2010 पर्यंत वार्षिक रुपये-10,000/- प्रमाणे एकूण तीन वार्षिक विमा हप्त्यांची रक्कम रुपये-30,000/- भरल्याची बाब दाखल पुराव्यां वरुन सिध्द होते आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला सुध्दा ही बाब मान्य आहे.
10. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 श्री निलेश दुधाराम भांडारकर हा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा अधिकृत एजंट असून त्याचे मार्फतीने तिने वि.प.क्रं 1 विमा कंपनीची पॉलिसी काढली होती व त्याने केवळ वार्षिक रुपये-10,000/- प्रमाणे एकूण तीन वार्षिक विमा हप्त्यांची रक्कम भरल्या नंतर पुढील वार्षिक विमा हप्त्यांच्या रकमा तिला भराव्या लागणार नाहीत व विमा फायदा मिळेल असे सांगितले असल्याने तीने एकूण 03 वार्षिक विमा हप्त्यांच्या रकमा भरल्यात. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्तरात, विरुध्दपक्ष क्रं 2 श्री निलेश दुधाराम भांडारकर हा अधिकृत एजंट असल्याची बाब नाकारलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 श्री निलेश दुधाराम भांडारकर याने तो विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा अधिकृत एजंट असल्याची बाब आपले लेखी निवेदनातून नाकारलेली आहे. विमा प्रस्ताव फॉर्म मध्ये विमा प्रस्ताव भरुन देणा-या व्यक्तीचे नाव शशांक मोहरील,राहणार लाखनी असे नमुद केलेले आहे.
11. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे उत्तरा प्रमाणे तक्रारकर्तीला विमा पॉलिसीची प्रत, अटी व शर्तीचा दस्तऐवज पुरविलेला असून पॉलिसीमध्ये विम्याचा कालावधी हा एकूण पंधरा वर्षा करीताचा आहे तसेच वार्षिक विमा हप्ता रुपये-10,000/- नमुद आहे. तसेच विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा दसतऐवज विमाधारकास मिळाल्या नंतर पंधरा दिवसाचा फ्री लुक पिरियेड सुध्दा दिलेला आहे, त्या कालावधीत विमाधारकास जर विमा पॉलिसीतील अटी व शर्ती नामंजूर असतील तर विमा पॉलिसी परत करण्याची आणि विमा हप्त्याची रक्कम परत देण्याची सोय आहे. तक्रारकर्तीला जर विमा पॉलिसीतील अटी व शर्ती नामंजूर होत्या तर तिने फ्री लुक पिरिएड मध्ये विमा पॉलिसी नामंजूर असल्या बाबत कळविणे गरजेचे होते.
12. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिला विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-05.07.2014 रोजी तिचे नावाने रुपये-10,000/-चा धनादेश पाठविला व त्यानंतर दिनांक-25.08.2014 रोजी रुपये-1000/-चा धनादेश पाठविल्याने तिने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे नागपूर येथील कार्यालयात चौकशी केली असता तिने काढलेली विमा पॉलिसी ही तीन वर्षा नंतरही सुरु ठेवावयास हवी होती कारण सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा पंधरा वर्षासाठीचा असून सदर विमा कालावधी हा दिनांक-28.07.2008 पासून ते दिनांक-28.07.2023 असा आहे असे तिला कळविण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्तरात सदरची बाब मान्य केलेली असून तिने पुढील वार्षिक विमा हप्ते भरले नसल्याने पॉलिसी लॅप्स/बंद पडलेली असून या व्यतिरिक्त कोणतीही रक्कम तक्रारकर्तीला देय नसल्याचे नमुद केले. तक्रारकर्तीचे तक्रारीतील मागणी प्रमाणे तीने विमा पॉलिसी पोटी एकूण भरलेली 03 वार्षिक हप्त्यांची रक्कम रुपये-30,000/- सदर विमा हप्ते जमा केल्याचे दिनांका पासून ते प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के व्याज दराने मागितलेली आहे. परंतु तक्रारकर्तीने स्वतःच तक्रारीतून तिला एकूण रुपये-11,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून धनादेशाव्दारे मिळाली असल्याचे नमुद केले परंतु सदर धनादेशाची रक्कम वटविल्या गेली किंवा कसे या बद्दल कुठेही प्रकाश तक्रारीतून वा शपथपत्रातून टाकलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्तरातील परिच्छेद क्रं 4 मध्ये तक्रारकर्तीला दिनांक-05.07.2014 रोजी धनादेशाव्दारे रुपये-10,000/- आणि दिनांक-25.08.2014 रोजी रुपये-1000/- अशा रकमा दिल्याचे नमुद केले, तर परिच्छेद क्रं 5 चे उत्तरात रुपये-11,567/- दिल्याचे नमुद केले. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला पॉलिसीपोटी देऊ केलेले धनादेश वटले किंवा कसे या बाबत उभय पक्षांनी कोणताही पुरावा ग्राहक मंचा समोर दाखल केलेला नाही.
13. तक्रारकर्तीने दिनांक-16.12.2010 रोजी पॉलिसीपोटी तिस-या वार्षिक हप्त्याची रक्कम रुपये-10,000/- विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे भरली, त्यानंतर तिने पुढील वार्षिक हप्त्याच्या रकमा भरल्या नाहीत या बाबी उभय पक्षांना मान्य आहेत. विरुध्दपक्ष विमा कंपनीने लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्तीने पुढील वार्षिक विमा हप्त्याच्या रकमा भरलेल्या नसल्याने तिची पॉलिसी लॅप्स झाल्याने त्यांनी तक्रारकर्तीला विमा पॉलिसीपोटी दिनांक-05.07.2014 रोजी धनादेशाव्दारे रुपये-10,000/- आणि दिनांक-25.08.2014 रोजी रुपये-1000/- अशा रकमा दिल्यात, परंतु सदर धनादेश वटले किंवा कसे या बाबत कोणतेही भाष्य उत्तरातून केलेले नाही. तसेच तक्रारकर्तीची विमा पॉलिसी लॅप्स होण्यापूर्वी विरुध्दपक्ष विमा कंपनीने विम्याचा हप्ता भरण्या बद्दल सुचना देणारे कोणतेही पत्र तक्रारकर्तीला पाठविले नाही वा तिने पुढील विम्याचे वार्षिक हप्ते भरण्याचे का थांबविले या बाबत कोणतीही शहानिशा केली नाही तसेच पॉलिसीपोटी पुढील वार्षिक हप्ते भरण्या बाबत सुचना देणारे पत्र तक्रारकर्तीला पाठविल्या बाबत पुराव्या दाखल कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला पुढील वार्षिक विमा हप्ते भरण्या बाबत लेखी सुचनापत्र न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते, तिला जर अशी लेखी सुचना मिळाली असती तर तिने विम्याचे हप्ते भरले असते. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, तक्रारकर्तीने मौखीक युक्तीवादाचे वेळेस तिला विमा पॉलिसीपोटी वि.प.विमा कंपनीने परत केलेले कथीत दोन्ही धनादेश एकूण रक्कम रुपये-11000/- तिने आज पर्यंत वटविले नसल्याचे ग्राहक मंचा समक्ष सांगितले, त्यामुळे तक्रारकर्ती ही तिने विम्यापोटी विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे भरलेली एकूण रक्कम रुपये-30,000/- शेवटचा हप्ता भरल्याचा दिनांक-16.12.2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्के दराने व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे. तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तिला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला आणि प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर करावी लागली, त्यामुळे ती नुकसान भरपाईच्या रकमा विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 हा वि.प.क्रं 1 विमा कंपनीचा अधिकृत एजंट असल्या बाबत कोणताही पुरावा समोर न आल्याने त्याचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे.
14. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंच प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
:: अंतिम आदेश ::
(01) तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) बजाज अलायंझ लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नागपूर यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं 1) विमा कंपनीला आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तिने कथीत विमापॉलिसीपोटी भरलेली एकूण रक्कम रुपये-30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्त) अदा करावी आणि सदर रकमेवर दिनांक-16.12.2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.12 टक्के दराने व्याजाची रक्कम दयावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशा रकमा तक्रारकर्तीला दयाव्यात.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1) विमा कंपनीने निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत करावे. विहित मुदतीत वि.प.क्रं-1) विमा कंपनीने आदेशाचे अनुपालन न केल्यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं 2 प्रमाणे तक्रारकर्तीला परत करावयाची रक्कम रुपये-30,000/- दिनांक-16.12.2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15टक्के दराने दंडनीय व्याजासह येणारी रक्कम तक्रारकर्तीला परत करण्याची जबाबदारी वि.प.क्रं 1 विमा कंपनीची राहिल.
(05) विरुध्दपक्ष क्रं 2) विरुध्दची तक्रार योग्य त्या पुराव्या अभावी खारीज करण्यात येते.
(06) सर्व पक्षांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
(07) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्तीला परत करावी.