जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 557/2010.
तक्रार दाखल दिनांक : 06/10/2010.
तक्रार आदेश दिनांक : 20/06/2013. निकाल कालावधी: 02 वर्षे 08 महिने 14 दिवस
(1) श्रीमती संगिता दत्तात्रय कोष्टी, वय 37 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. मु.पो. लक्ष्मी दहीवडी,
ता. मंगळवेढा, जि. सोलापूर.
(2) चि. बसवेश्वर दत्तात्रय कोष्टी, वय 10 वर्षे,
व्यवसाय : शिक्षण, रा. सदर.
(3) कु. अपर्णा दत्तात्रय कोष्टी, वय 12 वर्षे,
व्यवसाय : शिक्षण, रा. सदर. अर्जदार क्र.2 व 3
चे अ.पा.क. जनक आई अर्जदार क्र.1. तक्रारदार/अर्जदार
विरुध्द
बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्स कं.लि., विभागीय कार्यालय,
सिटी प्राईड, ‘ए’ विंग, दुसरा मजला, व्ही.आय.पी. रोड,
जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. (सदरची नोटीस विभागीय
व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एल.एन. मारडकर
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : आर.एस. नसलीकर
आदेश
श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. अर्जदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अन्वये, अर्जदार नं. 1 हिचे पती व अर्जदार नं.2 व 3 यांचे वडील दत्तात्रय नारायण कोष्टी यांच्या विम्याची रक्कम रु.1,25,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने मिळण्यासाठी, तसेच अर्जदार यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व इतर खर्चाचे रु.5,000/- मिळावेत, यासाठी दाखल केली आहे.
2. अर्जदारांचे थोडक्यात कथन असे आहे की, दत्तात्रय कोष्टी यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून विमा पॉलिसी क्र.0088463112, (दि.17/10/2012 च्या दुरुस्ती अर्जाप्रमाणे) दि.19/3/2008 रोजी घेतली होती. त्यावेळी दत्तात्रय कोष्टी यांस कोणताही गंभीर आजार नव्हता व दि.27/6/2009 रोजी ते सर्दी, डोकेदुखी व तापाने आजारी पडले व डॉक्टरांकडे उपचार घेत असताना त्यांचे दि.3/7/2009 रोजी निधन झाले.
3. अर्जदार क्र.1 यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे विमा पॉलिसीच्या रकमेची मागणी केली असता विरुध्द पक्ष यांनी दि.3/12/2009 च्या पत्रान्वये ‘मयत दत्तात्रय कोष्टी यांस 15 वर्षापासून अस्थमा हा आजार होता व ही बाब त्यांनी लपवून ठेवली होती’, या कारणास्तव अर्जदाराची मागणी नाकारली.
4. विरुध्द पक्ष यांनी हजर होऊन लेखी म्हणणे दाखल केले व मयत दत्तात्रय कोष्टी यांच्या नांवाने विमा पॉलिसीबाबतची वस्तुस्थिती नाकारली नाही. परंतु अर्जदारांच्या पतीने त्यांच्या 15 वर्षे जुन्या आजाराविषयी वस्तुस्थिती लपवून ठेवल्यामुळे अर्जदारांस विम्याची रक्कम मिळू शकत नाही. तसेच मयत दत्तात्रय कोष्टी यांनी विरुध्द पक्ष यांचा विश्वासघात केलेला आहे, असा आरोप केला आहे.
5. विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्याप्रमाणे आय.आर.डी.ए. (इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथोरिटी) च्या नियमावलीनुसार रक्कम रु.1,00,000/- पर्यंतच्या विमा पॉलिसीला वैद्यकीय तपासणी होत नाही व मेडीक्लेम इन्शुरन्स पॉलिसी घेतली असल्यास विमेदाराची संपूर्ण वैद्यकीय तपासणी होते. सबब, अर्जदार नं.1 यांच्या पतीची कोणत्याही प्रकारे वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती. कारण त्यांनी कॅपीटल युनिट गेन पॉलिसी खरेदी केली होती. विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्याप्रमाणे दत्तात्रय कोष्टी यांनी परिमल हॉस्प्टिल, मिरज येथे त्यांच्या आजारासाठी उपचार घेतला होता व त्यांचा मृत्यू हा त्यांना असलेल्या जुन्या आजारामुळे झालेला आहे. त्यामुळे विमा कंपनी कोणतीही रक्कम देण्यास जबाबदार नाही. म्हणून विरुध्द पक्ष यांनी अर्ज रद्द करण्यासाठी विनंती केली आहे.
6. अर्जदारांच्या वकिलांनी दि.30/8/2012 रोजी पुरसील दाखल करुन तक्रार-अर्जामधील मजकूर व सोबत दाखल केलेली कागदपत्रे हाच पुरावा समजून तोच युक्तिवाद म्हणून वाचण्यात यावा, अशी विनंती केली. संधी देऊनही विरुध्द पक्षातर्फे लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला नाही व ब-याच तारखांना विरुध्द पक्ष व त्यांचे वकील गैरहजर राहिले.
7. अर्जदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले शपथपत्र, इतर कागदपत्रे, तसेच विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेले म्हणणे व कागदपत्रे यांचे सुक्ष्मरित्या अवलोकन केले. त्यावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. मयत दत्तात्रय कोष्टी यांनी जुना आजार असल्याचे लपवून
ठेवले होते, असे विरुध्द पक्ष यांनी सिध्द केले आहे काय ? नाही.
2. विमा कंपनीने अर्जदारांना देण्यात येणा-या सेवेत त्रुटी
केली आहे काय ? होय.
3. अर्जदार विम्याची रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
निष्कर्ष
8. मुद्दा क्र. 1 :- अर्जदार क्र.1 यांचे पती व अर्जदार क्र.2 व 3 यांचे वडील मयत दत्तात्रय कोष्टी यांनी विरुध्द पक्ष विमा कंपनी यांच्याकडून दोन पॉलिसी घेतल्या होत्या. त्यापैकी प्रथम विमा पॉलिसी क्र.0057016318 हिचा कालावधी दि.13/8/2007 ते 13/8/2027, रक्कम रु.1,00,000/- व दुसरी पॉलिसी क्र. 0088463112, दि.19/3/2008, रक्कम रु.1,25,000/-, याबाबत विरुध्द पक्ष यांची कोणतीही तक्रार नाही. विरुध्द पक्ष यांच्या लेखी बयानाप्रमाणे आय.आर.डी.ए. नियमावलीनुसार रक्कम रु.1,00,000/- पर्यंतच्या विमा पॉलिसीला वैद्यकीय तपासणी होत नाही. याचा अर्थ त्यापुढील विमा पॉलिसीला वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. या ठिकाणी प्रमुख बाब नमूद कराविशी वाटते की, मूळ विमा पॉलिसी अर्जदारांनी किंवा त्यांची प्रत विरुध्द पक्ष यांनी न्यायालयात दाखल केलेली नाही. त्यामुळे वैद्यकीय तपासणी आवश्यक होती किंवा नाही, हे समजण्यास मार्ग नाही. दत्तात्रय कोष्टी यांनी घेतलेली वादीत पॉलिसी क्र.0088463112, रक्कम रु.1,25,000/- म्हणजे रु.1,00,000/- पेक्षा जास्त रकमेची असूनसुध्दा वैद्यकीय तपासणी आवश्यक नव्हती तर त्याप्रमाणे पॉलिसीमध्ये उल्लेख असावयास पाहिजे व ही बाब विरुध्द पक्ष यांच्या माहितीत व अखत्यारीत असल्याने त्यांनी शाबित करणे आवश्यक होते. ते आय.आर.डी.ए. च्या नियमावलीनुसार रक्कम रु.1,00,000/- च्या वरील विमा पॉलिसीसाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे, हे विरुध्द पक्षाचे म्हणणे गृहीत धरल्यास दत्तात्रय कोष्टी यांची सदरची पॉलिसी दि.19/3/2008 रोजी दिली त्यापूर्वी वैद्यकीय अधिका-यांकडून विरुध्द पक्ष यांनी तपासणी करुन घेतलीच असेल व त्यावेळी दत्तात्रय कोष्टी यांना कोणत्याही प्रकारचा आजार नाही, असा दाखला वैद्यकीय अधिका-यांनी दिला असावा व सदरची बाब विरुध्द पक्ष यांच्या हिताची नसल्याने त्यांनी संबंधीत पुरावा न्यायालयात दाखल करणे टाळले असावे, असा निष्कर्ष काढणे उचित होईल.
9. विरुध्द पक्ष यांनी डॉ. करमरकर यांनी दि.21/3/2008 रोजी दिलेल्या वैद्यकीय अहवालाची झेरॉक्स प्रत रेकॉर्डवर दाखल केली आहे. दत्तात्रय कोष्टी यांस 18 वर्षापासून अस्थमा आजार आहे, असा उल्लेख त्यामध्ये आहे. परंतु दत्तात्रय कोष्टी यांची वैद्यकीय तपासणी करुन वैद्यकीय अधिकारी त्या निष्कर्षास पोहोचलेले दिसत नाहीत. मिळालेल्या तोंडी माहितीवरुन त्यांनी तसा उल्लेख अहवालात केलेला दिसतो.
10. तसेच विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या दि.23/10/2008 या परिमल हॉस्पिटलच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतीत सुध्दा ‘दत्तात्रय कोष्टी यांस श्वसनाचा त्रास होता. त्यामुळे प्राणवायुचा पुरवठा आवश्यक होता’, एवढाच उल्लेख आहे. या दाखल्यावरुन त्यांना जुना अस्थमाचा आजार होता, असे म्हणता येत नाही. महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही वैद्यकीय अधिका-यांपैकी एकाचेही प्रतिज्ञापत्र विरुध्द पक्ष यांनी न्यायालयात हजर केलेले नाही. न्यायालयात दाखल केलेली कागदपत्रे दि.19/3/2008 नंतरची म्हणजेच विमा पॉलिसीच्या घेतल्या नंतरची आहेत. या कागदपत्रांवरुन दत्तात्रय कोष्टी यांना 15 वर्षापासून अस्थमाचा आजार होता, असे सिध्द होत नाही. त्यामुळे त्यांनी जुना आजार विरुध्द पक्ष यांच्यापासून लपवून ठेवला, असे म्हणता येणार नाही. विमा पॉलिसी देताना दत्तात्रय कोष्टी यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करुन पॉलिसी द्यावयाची किंवा नाही ? हे ठरविणे विरुध्द पक्ष यांच्या अखत्यारीत होते. त्यामुळे दत्तात्रय कोष्टी यांच्या तोंडी सांगण्याप्रमाणे पॉलिसी दिली, या विरुध्द पक्षांच्या म्हणण्यास काहीच अर्थ नाही.
11. मा. मध्यप्रदेश राज्य आयोगाने दि.25/2/2003 रोजी निकाल दिलेल्या ‘रामदेही बाई /विरुध्द/ शाखाधिकारी, भारतीय जीवन बिमा निगम’, 2004 सी.टी.जे. 302 (सीपी) (एससीडीआरसी) या प्रकरणातील वस्तुस्थिती प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थितीप्रमाणेच आहे. विमा पॉलिसी काढल्यानंतर विमाधारक टॉयफाईड या आजाराने मरण पावला. परंतु विमा कंपनीने पॉलिसीच्या रकमेची मागणी, मयतास क्षयाचा आजार होता व तो त्यांनी पॉलिसी घेताना लपवून ठेवला होता, या कारणावरुन नाकारली होती. या प्रकरणात मयताच्या वारसांनी विम्याच्या रकमेची मागणी केल्यानंतर विमा कंपनीने वैद्यकीय अधिका-यांकडून मयतास क्षयाचा आजार होता, असा दाखला घेतला होता. ही बाब मा. राज्य आयोगाने संबंधीत वैद्यकीय अधिका-यांनी शपथपत्र देऊन सुध्दा स्वीकारली नाही व विमा कंपनी अर्जदारास विमा रक्कम देण्यास जबाबदार आहे, असा निकाल अर्जदाराच्या बाजुने दिला. आपल्या प्रकरणात वर उल्लेख केल्याप्रमाणे वैद्यकीय अधिका-यांचे शपथपत्र विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेले नाही. मा. राज्य आयोगाच्या निरीक्षणाप्रमाणे विमा कंपनी मयताने आजाराची बाब लपवून ठेवली, हे सिध्द करण्यास जबाबदार होती. त्यामुळे या निकालाचा फायदा अर्जदार यांना होऊ शकतो. या विवेचनावरुन विरुध्द पक्ष हे जुन्या आजाराची बाब दत्तात्रय कोष्टी यांनी लपवून ठेवले होती, हे सिध्द करु शकले नाहीत. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देतो.
12. मुद्दा क्र. 2 व 3 :- दि.3/12/2009 रोजीच्या विरुध्द पक्ष यांच्या पत्रावरुन असे दिसते की, अर्जदार हे मयत दत्तात्रय कोष्टी यांच्या विमा पॉलिसीप्रमाणे पॉलिसीची रक्कम रु.1,25,000/- मिळण्यास पात्र असूनही दत्तात्रय कोष्टी यांना 15 वर्षापासून अस्थमाचा जुना आजार होता, हे अयोग्य कारण दाखवून विरुध्द पक्ष यांनी त्यांची सेवा देण्याची जबाबदारी टाळली आहे. विरुध्द पक्ष यांना विमा पॉलिसीची रक्कम नाकारण्याचा कायद्याप्रमाणे कोणताही अधिकार नाही. त्यांनी अर्जदार यांना विम्याची रक्कम न देता त्यापासून वंचित ठेवले, ही सेवेतील गंभीर त्रुटी आहे, हे सिध्द होते. त्यामुळे अर्जदार विम्याची रक्कम, तसेच त्यावरील व्याज व त्यांना झालेला मानसिक व शारीरिक त्रास यासाठी नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास पात्र आहेत. त्यामुळे मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी दिले.
13. बँकेचा प्रचलित व्याज दर पाहता, अर्जदार यांनी मागणी केलेली 18 टक्के व्याजाची मागणी अवाजवी वाटते. त्यामुळे द.सा.द.श. 9 टक्के व्याज देणे इष्ट होईल.
14. वरील सर्व विवेचनावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की, अर्जदार हे विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत. म्हणून खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष यांनी अर्जदार यांना मयत दत्तात्रय नारायण कोष्टी यांच्या विमा पॉलिसी क्र.0088463112 ची रक्कम रु. 1,25,000/- (रक्कम रु. एक लक्ष पंचेवीस हजार फक्त) मागणी नाकारल्यापासून म्हणजे दि.3/12/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह आदेश प्राप्तीपासून 30 दिवसाचे आत द्यावी.
3. विरुध्द पक्ष यांनी अर्जदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रु. पाच हजार फक्त) व तक्रार खर्चापोटी रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसाचे आत द्यावेत.
4. सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क देण्यात यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. दिनेश रा. महाजन÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/श्रु/19613)