जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 132/2012.
तक्रार दाखल दिनांक : 28/05/2012.
तक्रार आदेश दिनांक : 04/07/2013. निकाल कालावधी: 01 वर्षे 01 महिने 07 दिवस
सौ. चंद्रभागा महादेव गायकवाड, वय 60 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. सयाजी नगर,
गिरझणी, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1) व्यवस्थापक, बजाज अलियांज लाईफ इन्शुरन्स कंपनी लि.,
शाखा पंढरपूर, गोलवलकर कॉम्प्लेक्स, पंढरपूर, जि. सोलापूर.
2) व्यवस्थापक, बजाज अलियांज लाईफ इन्शुरन्स कंपनी लि.,
जीई प्लाझा, एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे – 411 006.
3) श्री. सुनिल रामचंद्र मुंडफणे, रा. बजाज अलियांज लाईफ
इन्शुरन्स कंपनी लि., सिटी प्राईड, ‘ए’ विंग, दुसरा मजला,
जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : सौ. बबिता एम. महंत-गाजरे
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. नेसरीकर
आदेश
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, दि.10/11/2005 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे पॉलिसी क्र.0012298072 घेतली आहे. प्रतिवर्ष रु.25,000/- प्रमाणे पॉलिसीचे 3 वर्षे हप्ते भरल्यानंतर पॉलिसी घेतल्यापासून तिस-या वर्षी रु.1,25,000/- मिळणार असल्याचे विरुध्द पक्ष यांनी सांगितले. तक्रारदार यांनी तिन्ही हप्ते भरले आणि तीन वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर रकमेची मागणी केली असता दि.21/5/2008 रोजी रु.27,000/- व दि.21/1/2010 रोजी रु.20,000/- रक्कम दिली. परंतु उर्वरीत रु.78,000/- रक्कम देण्याचे आश्वासन देऊनही ती रक्कम दिलेली नाही. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविली असता दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांच्याकडून पॉलिसीची रक्कम रु.78,000/- दि.10/11/2005 पासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी दि.24/9/2012 रोजी अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे युनिट गेन प्लस ही आयुर्विमा पॉलिसी उतरवली होती. पॉलिसी व आय.आर.डी.ए. च्या नियमाप्रमाणे तक्रारदार यांनी सलग तीन वर्षे रु.25,000/- भरणा करणे आवश्यक आहेत. युनीट गेन पॉलिसी ही बाजारभावावर अवलंबून आहे आणि तीन वर्षाच्या मुदतीत मृत्यू झाल्यास वारसास रु.1,25,000/- प्राप्त होतात. विमेदाराचा मृत्यू मुदतीत न झाल्यास बाजार स्थितीवरुन फंड व्हॅल्युनुसार रक्कम काढण्यात येते. अर्जदार यांना फंडच्या परफॉर्मन्सनुसार व फंड व्हॅल्युनुसार रक्कम काढता येते. परंतु तक्रारदार यांनी दि.21/5/2008 रोजी रु.27,000/- व दि.21/1/2010 रोजी रु.20,000/- रक्कम परत घेतली. शेवटी त्यांनी तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी दि.24/9/2012 रोजी अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारदार यांनी खरेदी केलेली पॉलिसी मार्केट स्थितीवर अवलंबून आहे आणि कंपनी नियमानुसार पॉलिसी घेतल्यापासून 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व प्रतिवर्ष 3 हप्ते भरल्यानंतर मार्केट कंडीशननुसार जी काही फंड व्हॅल्यू असेल ती रक्कम सरेंडर व्हॅल्यू वगळून मिळते. त्यांना प्रस्तुत तक्रारीमध्ये अनावश्यक पक्षकार म्हणून समाविष्ठ केल्यामुळे तक्रारीतून मुक्त करण्याची त्यांनी विनंती केली आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. तक्रारदार उर्वरीत विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
5. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी दि.22/11/2005 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे पॉलिसी क्र.0012298072 अन्वये ‘अलायन्झ बजाज युनीट गेन प्लस’ या प्लाननुसार पॉलिसी घेतल्याविषयी उभय पक्षकारांमध्ये विवाद नाही. तक्रारदार यांनी पॉलिसीचे तीन हप्ते भरणा केल्याविषयी विवाद नाही. त्यानंतर तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी दि.21/5/2008 रोजी रु.27,000/- व दि.21/1/2010 रोजी रु.20,000/- रक्कम परत केल्याविषयी विवाद नाही.
6. प्रामुख्याने पॉलिसीची तीन वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांना रु.1,25,000/- मिळणे क्रमप्राप्त असताना विरुध्द पक्ष यांनी केवळ रु.47,000/- अदा केले असून उर्वरीत रु.78,000/- अप्राप्त असल्याची तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या कथनानुसार युनीट गेन पॉलिसी ही बाजारभावावर अवलंबून असून तीन वर्षाच्या मुदतीत मृत्यू झाल्यास वारसास रु.1,25,000/- प्राप्त होतात. विमेदाराचा मृत्यू मुदतीत न झाल्यास बाजार स्थितीवरुन फंड व्हॅल्युनुसार रक्कम काढण्यात येते आणि तक्रारदार यांनी दि.21/5/2008 रोजी रु.27,000/- व दि.21/1/2010 रोजी रु.20,000/- रक्कम परत घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
7. प्रस्तुत तक्रारीमध्ये उभय पक्षकारांनी पॉलिसीचे अटी व शर्ती किंवा फायदे-तोटे दर्शविणारे कोणतेही कागदपत्रे अभिलेखावर दाखल केलेले नाहीत. अभिलेखावर दाखल प्रथम हप्ता पावतीचे अवलोकन केले असता, विमा संरक्षीत रक्कम रु.1,25,000/- नमूद असल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी पॉलिसीचे तीन व सर्व हप्ते भरणा केल्यानंतर व मुदत पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांना किती रक्कम मिळणे आवश्यक होते ? याचा ऊहापोह विरुध्द पक्ष यांनी योग्य व सबळ कागदपत्राद्वारे केलेला नाही. केवळ तक्रारदार यांना निर्गमित केलेली विमा पॉलिसी बाजारभावावर अवलंबून आहे आणि मार्केट कंडीशनच्या फंड व्हॅल्यूनुसार रक्कम काढण्यात येते, हे त्यांचे कथन काही क्षण मान्य केले तरी त्याप्रमाणे तक्रारदार यांना रक्कम अदा केल्याचे सिध्द करण्याचा त्यांनी कोणताही प्रयत्न केलेला नाही. ज्यावेळी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे रु.75,000/- रक्कम जमा केलेली आहे आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना रु.47,000/- देण्यात येतात, त्यावेळी त्याचे विश्लेषण विमेदारास देणे आवश्यक होते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दिलेली रक्कम योग्य असल्याबाबत किंवा पॉलिसीच्या अटी व शर्ती स्पष्ट करण्याबाबत कोणतीही कागदपत्रे अभिलेखावर दाखल केलेली नाहीत. यावरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दिलेली रक्कम योग्य असल्याच्या अनुमानास आम्ही येऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत, तक्रारदार हे त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम रु.75,000/- मधून त्यांना अदा केलेली रक्कम रु.47,000/- वजा जाता उर्वरीत रु.28,000/- व्याजासह मिळविण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना रु.28,000/- दि.23/11/2008 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. उभय पक्षकारांना आदेशाची सही-शिक्क्याची प्रत नि:शुल्क द्यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. दिनेश रा. महाजन÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/4713)