निकालपत्र
(दिनांक 14 -07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार शांता भ्र. खोब्राजी सुर्यवंशी वय 67 वर्षे ही विनायकनगर नांदेड येथील रहिवाशी आहे. अर्जदाराने बजाज कंपनीकडून ‘युनीट गेन प्लस गोल्ड’ ही विमा पॉलिसी घेतलेली हाती. जिचा पॉलिसी क्र. 0085332122 असा आहे व विम्याचा कालावधी 10 वर्षाचा असून पालिसी सुरुवात दिनांक 27.02.2008 आहे. सदर पॉलिसचा वार्षिक हप्ता रु.99,000/- असा होता. अर्जदाराने दिनांक 27.2.2008 पासून 3 हप्ते गैरअर्जदार यांच्याकडे भरलेले आहेत. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 16.5.2015 रोजी रु. 20,000/- टॉपऑप भरणा केलेले आहे ज्याचा पावती क्र. 2418416 आहे. दिनांक 27.2.2018 रोजी अर्जदारास सदर पॉलिसी परिपक्व होवून रु.14,85,000/- मिळणार होते. परतू गैरअर्जदाराने विमा पॉलिसीचा हप्ता वेळेवर भरलेला नाही म्हणून सदर पॉलिसी टर्मिनेट करुन दिनांक 25.9.2014 रोजी पावती क्र. 994624 प्रमाणे रक्कम रु. 1,29,054/- अर्जदारास कसलीही सुचना न देता फोरक्लॉज केला त्यामुळे अर्जदारास मानसिक धक्का बसला. दिनांक 29.10.2014 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारास कळविले की, फोरक्लॉजचा निर्णय मान्य नाही व दिलेली धनादेश रक्कम रु. 1,29,054/- स्विकारुन पॉलिसी चालू ठेवण्याची विनंती केली परंतू गैरअर्जदाराने अर्जदार दोषी आहे म्हणून दिलेला धनादेश मान्य करावा लागेल. धनादेश परत घेण्यात येत नाही, असे सांगून धनादेश अर्जदारास परत केला. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वारंवार जावून तक्रारी नोंदविल्या परंतू त्यांचा विचार गैरअर्जदाराने केला नाही. शेवटी दिनांक 25.11.2014 रोजी गैरअर्जदाराकडे धनादेश पोस्टाने परत केला. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जावून विमा रक्कमेची मागणी केली असता गैरअर्जदाराने तुम्ही भरलेले 3,20,000/- देखील मिळत नाहीत असे सांगून अर्जदाराचा क्लेम देण्याचे नाकारले. जे की, अन्यायकारक, निष्काळजीपणाचे व चुकीचे आहे. असे करुन गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदार 1 व 2 यांना आदेश देण्यात यावा की, त्यांनी अर्जदार यांना विमा पॉलिसी प्रमाणे रक्कम रु. 14,85,000/- 18 टक्के व्याजासह देण्यात यावेत. तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,00,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- देण्याबाबत आदेशीत करावे, अशी मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदाराची तक्रार ही मुदतीत नाही व खोटी आहे म्हणून खारीज करण्यात यावी. अर्जदारास पॉलिसी क्र. 85322122 ही दिली होती हे खरे आहे. सदर पॉलिसी ही पॉलिसीत दिलेल्या अटी व शर्तीप्रमाणे दिलेली आहे. सदर पॉलिसीचा कालावधी हा 10 वर्षाचा असून त्याचा वार्षिक विमा हप्ता रु.99,000/- चा होता. हे अर्जदाराने मान्य केलेले आहे. पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे विमाधारकास फक्त 3 हप्ते भरल्यास व पुढील हप्ते न भरल्यास पुढील दोन वर्षापर्यंत सदर पॉलिसी पुर्नजिवित करता येते. त्यानंतर मात्र पॉलिसी रद्द करण्यात येते व विमाधारकास सरेंडर व्हॅल्यु देण्यात येते. प्रस्तुत प्रकरणात विमा कंपनीने फंड व्हॅल्युच्या आधारीत एनआरई रक्कम काटेकोरपणे कॅलक्युलेट करुन अर्जदारास रु. 1,29,054/- दिले. अर्जदाराने पूर्ण विमा हप्तेच भरलेले नव्हते त्यामुळे वरील प्रमाणे रक्कम अर्जदारास अदा करण्यात आली. जर अर्जदारास पॉलिसीचे पूर्ण फायदे मिळावयाचे असल्यास अर्जदाराने पॉलिसीचे हप्ते पूर्णपणे भरणे आवश्यक होते. गैरअर्जदाराने IRDA च्या मार्गदर्शक तत्वानुसारच अर्जदारास पॉलिसी दिलेली होती. IRDA च्या मार्गदर्शक तत्वानुसार अर्जदारास 12 दिवसांचा फ्रि लूक पिरेड दिलेला असता व त्यानंतर अर्जदारास पॉलिसी नियमानुसारच बंद करता येते. अर्जदाराने विमा हप्ते नियमितपणे भरणे आवश्यक आहे. विमा पॉलिसीच्या कलम नं. 3 बाबत अर्जदारास हप्ते भरण्यासाठी सुचना करण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांची नाही. गैरअर्जदाराने नियमाप्रमाणेच अर्जदारास रक्कम परत केलेली आहे व अर्जदारास कोणत्याच प्रकारच्या सेवेत त्रुटी दिलेली नाही त्यामुळे मंचास विनंती केलेली आहे की, अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
3. अर्जदार ही गैरअर्जदार यांची ग्राहक आहे. हे अर्जदाराने दाखल केलेल्या पॉलिसी शेडयुल वरुन स्पष्ट आहे. सदर पॉलिसीच्या सुरुवातीची तारीख 27.2.2008 आहे. व पॉलिसी कालावधी 10 वर्ष आहे.
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे सदर पॉलिसी हप्त्यापोटी खालील हप्ते भरलेले आहेत.
दिनांक 31.1.2008 रोजी रु. 99,358/-
दिनांक 23.2.2009 रोजी रु. 99,000/-
दिनांक 26.2.2010 रोजी रु. 1,00,000/- भरलेले आहेत.
तसेच Top up policy या सदराखाली रक्कम रु. 20,000/- भरलेले आहेत. सदर रक्कम रु. 20,000/- हे गैरअर्जदार यांनी दिनांक 16.5.2012 रोजी भरुन घेतलेले आहेत व त्याबद्दल अर्जदारास पावती देखील दिलेली आहे. ज्याचा Sr. No. C2418416 असा आहे. अर्जदाराचे म्हणणे आहे की, पॉलिसी घेते वेळेस त्यास रक्कम रु. 99,000/-चे फक्त 3 वार्षीक हप्ते भरावे लागतील असे सांगितलेले होते. आणि त्यानंतर अर्जदाराने 10 वर्षे रक्कम रु. 99,000/- प्रमाणे हप्ते भरावयाचे आहेत आणि पुढील हप्ते भरलेले नाहीत असे कारण देवून पॉलिसी Terminate केली जे की, अर्जदारास मान्य नाही. सदर अर्जदाराचे म्हणणे योग्य वाटत नाही कारण पॉलिसीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, पॉलिसीची मुदत ही 10 वर्षाची असून वार्षिक हप्ता रु.99,000/- चा आहे. अर्जदाराने पहिला हप्ता दिनांक 31.1.2008 रोजी भरलेला आहे व 3 रा हप्ता दिनांक 26.2.2010 रोजी भरलेला आहे आणि तो 1,00,000/- रुपयाचा आहे व 2 रा हप्ता दिनांक 23.2.2009 रोजी भरलेला असून त्या पावतीवर Renewal Premium असेच लिहिलेले आहे. असे असतांना देखील सदर हप्त्याची रक्कम मात्र रु.1,00,000/- एवढीच आहे. फरका बद्दल खुलासा गैरअर्जदार यांनी केलेला नाही. गैरअर्जदार यांनी दिनांक 25.9.2014 रोजी अर्जदारास पत्र पाठवून त्यांची पॉलिसी Terminate केल्याचे व त्यांना पॉलिसीची सरेन्डर व्हॅल्यु रक्कम रु.129,054/- चेकद्वारे परत केल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या सदर पत्राच्या प्रतीवरुन स्पष्ट आहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, पॉलिसी Terminate करण्याचे करण पुढील प्रमाणे आहे.
This is to inform you that your policy No. 0085322122 has been terminated due to non payment of regular premium during the revival period of two/three years from the due date of the last unpaid premium.
यावरुन हे स्पष्ट आहे की, अर्जदाराने रिव्हॉयव्हल पिरीअेडनंतर दोन/तीन वर्षापर्यंत हप्ता भरलेला नसल्यामुळे त्याची पॉलिसी रद्द करण्यात आलेली आहे. अर्जदाराने भरलेल्या हप्त्याच्या पावत्यांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, अर्जदाराने 2008, 2009 व दिनांक 26.2.2010 रोजी असे एकूण 3 हप्ते भरलेले आहेत. त्यानंतर अर्जदाराने दोन वर्षाचे पुढील हप्ते भरलेले नाहीत म्हणजे रिव्हाईव्हल पिरीअडच्या मर्यादेत हप्ते भरलेले नाहीत म्हणून गैरअर्जदारास पॉलिसीतील टर्म्स अँड कंन्डीशनच्या क्लॉज 5 सी प्रमाणे अर्जदाराची पॉलिसी Terminate करण्याचा अधिकार आहे परंतू तर पॉलिसी Revive करण्याची असल्यास त्यासाठी अर्जदाराने (विमाधारकाने) सर्व थकीत हप्ते भरणे गरजेचे आहे. अर्जदाराने थकीत हप्ते भरलेले नाहीत. असे असतांना देखील गैरअर्जदाराने अर्जदाराकडून Top up policy या सदराखाली दिनांक 16.5.2012 रोजी रक्कम रु. 20,000/- भरुन घेतलेले आहेत. जर अर्जदाराने थकीत हप्तेच भरलेले नाहीत तर गैरअर्जदाराने रु.20,000/- कशासाठी अर्जदाराकडून स्विकारले ? हयाचा समाधानकारक खुलासा गैरअर्जदाराने केलेला नाही. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या पॉलिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे क्लॉज 1 Definitions मध्ये कोठेही Top up policy चा उल्लेख नाही. यावरुन असे दिसून येते की, गैरअर्जदारांनी पॉलिसी रिन्यु करण्यासाठी पॉलिसीचे थकीत हप्ते भरुन घेण्याऐवजी अर्जदाराकडून रक्कम रु. 20,000/- Top up policy या सदराखाली घेतलेले आहेत. यावरुन असे दिसून येते की, गैरअर्जदार यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये बदल केलेला आहे. त्यामुळे Contract Act च्या कलम-62 प्रमाणे कराराचे अलटरेशन झालेले आहे व अशा परिस्थितीत जर गैरअर्जदारास अर्जदाराची पॉलिसी Terminate करावयाची असल्यास जुन्या अटी व शर्तीप्रमाणे रक्कम डिडक्ट करता येणार नाही व करार संपुष्टात आल्यामुळे गैरअर्जदारास अर्जदाराने भरलेली रक्कम restitution Contract Act च्या कलम- 64 प्रमाणे अर्जदारास परत करण्याची जबाबदारी नाकारता येणार नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास रु. 1,29,054/- चे दिलेले आहेत व उर्वरीत रु.1,87,946/- रुपये देण्यास जबाबदार आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास त्याने भरलेली रक्कम परत केलेली नाही व असे करुन गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रास दिलेला आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्याची भरलेली रक्कम रु. 1,87,946/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत परत करावी.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व दावा खर्चापोटी रु.1,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.