जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 79/2010. तक्रार दाखल दिनांक : 18/02/2010. तक्रार आदेश दिनांक : 10/02/2011. साईनाथ भागवत गायकवाड, वय सज्ञान, व्यवसाय : शेती, रा. यशवंत नगर, माढा रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कं.लि., वर्धमान, चवथा मजला, 7, लव्हज् चौक, शंकर शेठ रोड, पुणे - 411 042. (समन्स मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावे.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. ए.एम. देवधर विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. जी.एच. कुलकर्णी आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी माहे जुलै 2009 मध्ये महिंद्रा फायनान्स लि. यांच्याकडून कर्ज घेऊन रु.5,80,830/- किंमतीचे महिंद्रा बोलेरो वाहन खरेदी केले आहे आणि वाहनाचा रजि. नं. एम.एच.45/ए.7678 असा आहे. सदर वाहनाची विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे दि.11/7/2009 ते 10/7/2010 कालावधीसाठी विमा पॉलिसी उतरविली आहे. दि.3/10/2009 रोजी विमा संरक्षीत वाहनाचा अपघात होऊन मोठे नुकसान झाले. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे सर्व आवश्यक कागदपत्रे दाखल केली. परंतु विमा कंपनीने खोटे आरोप करुन त्यांचा विमा क्लेम नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार मंचासमोर दाखल करुन विमा रक्कम रु.5,80,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. तक्रारदार यांच्या वाहनास दिलेली पॉलिसी अटी, शर्ती, अपवर्जन, मर्यादा इ. बाबीस अधीन राहून जारी केलेली आहे. वाहनास महिंद्रा अन्ड महिंद्रा फायनान्शीयल सर्व्हीसेस यांनी कर्ज दिलेले असल्यामुळे त्यांना तक्रारीमध्ये समाविष्ठ करण्यात आलेले नाही. अपघाताची सूचना मिळताच त्यांनी श्री. जितेंद्र आर. उजळंबे, सर्व्हेअर व लॉस असेसर यांची स्पॉट सर्व्हे करण्यासाठी नियुक्ती केली. त्यांनी सविस्तर अहवाल सादर केलेला आहे. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी कागदपत्रे मागविण्यात आली. विमा कंपनीने श्री. आर.संगम यांची अंतीम नुकसानीचे निर्धारण करण्यासाठी नियुक्ती केली आणि त्यांचा अहवाल दि.23/10/2009 रोजी प्राप्त होऊन रु.3,28,297/- च्या नुकसानीचे निर्धारण करण्यात आले. तसेच त्यांनी श्री. दिलीप टी. होलीहोसूर यांची इन्व्हेस्टीगेटर म्हणून नियुक्ती केली आणि त्यांनी प्रवाशांचे जबाब घेतले असता अपघाताचे वेळी सदर प्रवाशी मोबदला देऊन प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. अपघातग्रस्त वाहन कुर्डुवाडी ते शेटफळ रस्त्यावर भाडे तत्वावर चालविण्यात येत होते आणि वाहनाचा वैयक्तिक वापर होत नव्हता. त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. तक्रारदार यांनी सदर बाब लपवून ठेवली आहे. त्यांनी तक्रारदार यांचा क्लेम दि.11/1/2010 रोजीच्या पत्राद्वारे नाकारला असून त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या वाहन क्र.एम.एच.45/ए.7678 चा विमा कंपनीकडे पॉलिसी क्र. ओजी-10-2004-1801-00000369 अन्वये दि.11/7/2009 ते 10/7/2010 या कालावधीकरिता विमा उतरविण्यात आल्याविषयी विवाद नाही. तसेच विमा कालावधीमध्ये म्हणजेच दि.3/10/2009 रोजी विमा संरक्षीत वाहनाचा अपघात झाल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, विमा कंपनीने दि.11/1/2010 च्या पत्राद्वारे विमा संरक्षीत वाहनाचा वापर भाडे तत्वावर केल्यामुळे व पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झाल्यामुळे विमा क्लेम नाकारला असल्याचे निदर्शनास येते आणि त्याविषयी विवाद नाही. 5. निर्विवादपणे, अपघातग्रस्त व विमा संरक्षीत वाहन अपघाताचे वेळी श्री.बाबासाहेब द-याबा लोकरे चालवत आणि त्या वाहनातून त्यांच्यासह इतर श्री.अजय मारुती चव्हाण, श्री. कृष्णा केशव भवर, रमेश उत्तरेश्वर वाघ हे तिघेजण प्रवास करीत होते. विमा नाकारण्याचे कारण पाहता, सदर तीन प्रवाशी हे भाडे तत्वावर मोबदला देऊन प्रवास करीत होते काय ? किंवा कसे ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतो. 6. विमा कंपनीने अपघातग्रस्त वाहनातून प्रवास करणारे श्री.अजय मारुती चव्हाण, श्री. कृष्णा केशव भवर, रमेश उत्तरेश्वर वाघ हे तिघेजण भाडे देऊन प्रवास करीत असल्याचे सिध्द करण्यासाठी इन्व्हेस्टीगेटरने केलेल्या जबाबाची प्रत मंचासमोर दाखल केलेली आहे. उलटपक्षी, तक्रारदार यांनी वाहन चालविणारे श्री.बाबासाहेब द-याबा लोकरे यांचे शपथपत्र रेकॉर्डवर दाखल केले असून त्यामध्ये श्री.अजय मारुती चव्हाण, श्री. कृष्णा केशव भवर, रमेश उत्तरेश्वर वाघ हे तिघेजण त्यांचे मित्र असल्याचे व त्यांच्याकडे प्रवास भाडे किंवा मोबदला घेतला नसल्याचे शपथपत्राद्वारे निवेदन केलेले आहे. 7. रेकॉर्डवर दाखल पोलीस पेपर्सचे अवलोकन करता, अपघाताचे वेळी प्रवास करणारे श्री.अजय मारुती चव्हाण, श्री. कृष्णा केशव भवर, रमेश उत्तरेश्वर वाघ यांनी प्रवासाकरिता मोबदला किंवा भाडे दिल्याचे निदर्शनास येत नाही. पोलीस जबाबामध्ये ते भाडे देऊन प्रवास करीत होते, असा कोणताही उल्लेख नाही. विमा कंपनीने श्री.अजय मारुती चव्हाण, श्री. कृष्णा केशव भवर, रमेश उत्तरेश्वर वाघ यांचा एकत्रित जबाब दाखल केलेला असला तरी त्यांनी भाडे तत्वावर प्रवास केल्यासंबंधी शपथपत्रे सादर केलेली नाहीत. आमच्या मते, ज्यावेळी विमा कंपनी एका निश्चित कारणाचा आधार घेऊन क्लेम नाकारते, त्यावेळी ते कारण पुराव्याद्वारे सिध्द करण्याची त्यांच्यावर जबाबदारी येते. प्रस्तुत तक्रारीमध्ये अपघाताच्या वेळी विमा संरक्षीत जीपद्वारे भाडे तत्वावर प्रवाशी वाहतूक होते असल्याचे सिध्द होण्यासाठी उचित पुरावा मंचासमोर दाखल नाही. 8. अशाच एका प्रकरणामध्ये मा.महाराष्ट्र राज्य आयोगाचे औरंगाबाद परिक्रमा पिठाने 'दी ब्रँच मॅनेजर, नॅशनल इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ श्री.सरदार लक्ष्मणसिंग', 2007 (3) 163 सी.पी.आर. या निवाडयामध्ये असे म्हटले आहे की, Para. 9 : When Insurance Company repudiates the claim stating that, there is breach of condition of policy by carrying fare paying passengers, the burden was on Insurance to prove this fact. 9. तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाने 'अमलेंदु साहू /विरुध्द/ ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.', 2 (2010) सी.पी.जे. 9 (एस.सी.) निवाडयामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, Para. 16 : In the instant case the entire stand of the insurance company is that claimant has used the vehicle for hire and in the course of that there has been an accident. Following the aforesaid guidelines, this Court is of the opinion that the insurance company cannot repudiate the claim in toto. 10. वरील न्यायिक तत्व विचारात घेता, भाडे तत्वावर वाहन चालविण्यात येत असले तरी विमा कंपनीस संपूर्णत: क्लेम नाकारता येऊ शकत नाही. भाडे तत्वावर वाहन चालविण्यात येत असल्याचे सिध्द झाल्यास नॉन-स्टॅन्डर्ड तत्वावर क्लेम सेटल करण्यात यावे, असे प्रस्थापित तत्व आहे. परंतु प्रस्तुत तक्रारीमध्ये भाडे तत्वावर वाहन चालविण्यात येत होते, असे सिध्द झालेले नाही आणि त्यामुळे तक्रारदार यांचा क्लेम नॉन-स्टॅन्डर्ड तत्वावर सेटल करणे उचित ठरत नाही. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन निश्चितच सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र ठरतात, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 11. रेकॉर्डवर तक्रारदार यांच्या अपघातग्रस्त वाहनाचे दुरुस्तीविषयी मुल्यनिर्धारण करणारे सर्व्हेअर आर.संगम यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखल आहे. त्यामध्ये वाहनाच्या दुरुस्तीकरिता रु.3,28,297/- च्या नुकसानीचे निर्धारण करण्यात आले आहे आणि सदर बाब विमा कंपनीस मान्य आहे. सर्व्हे रिपोर्टद्वारे निर्धारण केलेली रकमेस तक्रारदार यांचा आक्षेप असला तरी सर्व्हे रिपोर्टला योग्य पुराव्याद्वारे आव्हान देण्यात आलेले नाही. त्यामुळे तक्रारदार हे विमा रक्कम रु.3,28,297/- क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र आहेत, या मतास आम्ही आलो आहोत. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना रु.3,28,297/- दि.11/1/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/4211)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |