जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 45/2012 तक्रार दाखल तारीख – 13/03/2012
तक्रार निकाल तारीख– 09/05/2013
प्रकाश पि.पंढरीनाथ बोटुळे
वय 45 वर्षे, धंदा नौकरी/शेती,
रा.आसोला, ता.धारुर जि.बीड. ..अर्जदार
विरुध्द
1. बाफना मोटार्स प्रा.लि.
बार्शी नाका रोड,बीड. ...गैरअर्जदार
2. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि.
शाखा बीड, पहिला मजला, राजयोग कॉम्प्लेक्स,
हिना हॉटेल समोर,जालना रोड,बीड..
-----------------------------------------------------------------------------------
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
-----------------------------------------------------------------------------------
तक्रारदारातर्फे - अँड.एस.व्ही.चोले
गैरअर्जदार क्र.1 तर्फे – अँड.सुभाष पिसुरे
गैरअर्जदार क्र.2 तर्फे - अँड.एस.ए.चव्हाण.
------------------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,तक्रारदार गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून टाटा कंपनीची व्हेंचर 7 + 1 सीटची गाडी खरेदी करण्यासाठी गेला. त्यासाठी त्यांने रु.5,000/- जमा करुन बुकींग केले. नंतर अर्जदार सर्व आवश्यक कागदपत्राचा खर्च व डाऊन पेंमेट मिळून लागणारी रक्कम रु.2,00,000/- घेऊन दि.27.05.2011 रोजी गैरअर्जदार यांचेकडे गेला त्यांने ती रक्कम जमा केली व इतर आवश्यक कागदपत्रांवर सहया केल्या. त्यात डिलीव्हरी नोट वर पण सही केली. त्यानंतर गैरअर्जदाराने तक्रारदाराला गाडी दाखवली तेव्हा तक्रारदाराला 7 + 1 सिटची गाडी शोरुमला उपलब्ध नाही, परंतु 6 + 1 सीटची गाडी उपलब्ध आहे असे समजले ती गाडी घेण्यास तक्रारदाराने नकार दिला. तेव्हा गैरअर्जदार क्र.1 यांनी सांगितले की, तुम्हाला हवी तशी गाडी चार दिवसांनी नांदेड येथून मागवून देतो. त्यावर तक्रारदाराने विश्वास ठेवला. परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी गाडी दिली नाही. दि.22.12.2011 रोजी अर्जदाराने जमा केलेली रक्कम परत मागितली, परंतु सदरची रक्कम परत मिळणार नाही असे गैरअर्जदारांनी सांगितले. तक्रारदार यांनी गैरअर्जदारांना नोटीस पाठवली. त्या नोटीसीचे खोटे उत्तर गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिले. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराला गाडी दिलेली नाही. उलट तक्रारदार यांचे नांवे रु.4,00,000/-कर्ज (फायनान्स) टाकून करारनाम्याच्या खोटया तारखा टाकून नोटीसा पाठवल्या आहेत. बाफना मोटार्स,बीड यांची तक्रारदारास गाडी देण्याची जबाबदारी असताना सुध्दा ते गाडी न देता बाफना मोटार्स,नांदेड यांचेकडून दुरुस्त केलेली गाडी घेऊन जाण्यास सांगत आहेत. म्हणून तक्रारदाराची तक्रार आहे. ते तक्रारी अंतर्गत गैरअर्जदार यांचेकडे जमा केलेली रक्कम रु.2,00,000/- व अर्जदारास झालेलया मानसिक त्रासाबददल रक्कम रु.1,00,000/- अशी मागणी करत आहेत.
गैरअर्जदार क्र.1 व 2 मंचासमोर हजर झाले. गैरअर्जदार क्र.1 बाफना मोटर्स यांचे लेखी म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी दि.7.5.2011 रोजी वाहन बुक केले. त्यानंतर दि.27.5.2011 रोजी गैरअर्जदाराने तक्रारदारास गाडीची डिलीव्हरी दिली.त्यानंतर तक्रारदाराने डिलीव्हरी नोटवर सही केली. गैरअर्जदाराने अर्जदाराला गाडीचे बिल दिले. त्यानंतर अर्जदाराने गाडीचे तात्पुरते रजिस्ट्रेशन केले. तसेच गाडीचा विमा देखील काढला नंतर अर्जदाराने गैरअर्जदाराला पत्र लिहून कळवले की, सदरच्या गाडीचा अपघात झाला आहे. म्हणून गाडी गैरअर्जदारांच्या वर्कशॉप मध्ये दि.18.6.2011 रोजी आली. त्यांचा जॉब कार्ड क्र.2461 असा आहे. अर्जदाराने अपघाताची सुचना ओरिएटल इन्शुरन्स कंपनीला दिली आहे. गैरअर्जदारांच्या सर्व्हेअरने नुकसानी बघीतली व गाडी दुरुस्त केली. त्यांच्या पोटी रु.1,05,149/- तक्रारदाराकडे येणे बाकी आहे. गैरअर्जदारांने अर्जदाराकडे वारंवार पत्र पाठवून गाडी नेण्यास सांगितले. परंतु तक्रारदाराने गाडी नेली नाही. गाडी गैरअर्जदारांच्या शोरुमला उभी आहे. म्हणून दि.21.12.2011 पासून प्रतिदिवस 100 रुपयांप्रमाणे रु.17,000/- तक्रारदाराकडे बाकी आहेत. सबब तक्रारदाराची तक्रार खारित करण्यात यावी व वरील रक्कम भरुन गाडी घेऊन जाण्याचे आदेश तक्रारदारास करावेत.
गैरअर्जदार क्र.2 यांच्या लेखी म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदाराने दि.11.06.2011 रोजी वाहन टाटा व्हेंचर खरेदीसाठी कर्ज सुविधा रक्कम रु.4,00,000/- (रुपये चार लाख फक्त) मंजूर केले. तक्रारदाराने त्याबाबतचा करार गैरअर्जदार क्र.2 यांना करुन दिला. तक्रारदाराने परिवहन कार्यालयात रितसार नोंदणी करुन सदर कर्जाची नोंद घेणे बंधनकारक होते. उपरोक्त रक्कमेचा चेक गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना दिला व त्यांचेकडून तक्रारदाराने वाहन ताब्यात घेतले परंतु आर.सी.बुकवर बोजा चढवला नाही. म्हणून गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदारा विरुध्द प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बीड यांचे कोर्टात एस.सी.सी. नंबर 196/2012 दाखल केलेली आहे. प्रस्तुत तक्रारीतील वादाशी गैरअर्जदार क्र.2 यांचा संबंध नाही. परंतु केवळ गैरअर्जदार क्र.2 यांचे कर्ज बुडवण्याच्या हेतूने गैरअर्जदार क्र.2 यांना प्रस्तुत तक्रारीत समाविष्ट केलेले आहे. म्हणून त्यांच्याविरुध्द तक्रार खारिज करण्यात यावी.
तक्रारदारातर्फे विद्वानवकील श्री. चौले व गैरअर्जदार क्र.2 यांचे विद्वान वकील श्री.महाजन यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारी सोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केला त्यात बाफना मोटार्सची डिलीवरी नोट, गैरअर्जदार क्र.2 यांनी पाठवलेली नोटीस व तक्रारदारांचे त्यांला उत्तर, बाफना मोटर्स नांदेड यांनी दि.21.2.2012 रोजी पाठवलेली नोटीस, अर्जदाराने गैरअर्जदार यांना पाठवलेल्या नोटीसीची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदाराने प्रत्यक्षात डिलीव्हरी नोट वर सही केली असली तरी प्रत्यक्षात त्यांला गाडी मिळालेली नाही. सबब त्यांची तक्रार मंजूर करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली.
गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांचा या तक्रारीशी काहीही संबंध नाही. केवळ घेतलेल्या कर्जाचे हप्ते चुकवण्यासाठी तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द तक्रार दाखल केली आहे.सबब त्यांचे विरुध्दची तक्रार नांमजूर करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली.
तक्रारदाराने दि.27.5.2011 रोजी बाफना मोटर्सच्या डिलीव्हरी नोटवर सही केलेली दिसते आहे. त्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडून विमा उतरवलेला आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचे सोबत तक्रारदाराने केलेला करार दाखल केलेला आहे. तक्रारदाराने 7 + 1 सीट असलेली गाडी बुक केली होती. परंतु त्यांला 6 + 1 सीट असलेली गाडी देऊ केली. यांचा कोणताही पुरावा कोर्टासमोर नाही. अशा परिस्थितीत तक्रारदाराने सही केलेल्या डिलीव्हरी नोटवर विश्वास ठेऊन तक्रारदाराने गाडीची डिलीव्हरी घेतली आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांच्या म्हणण्याप्रमाणे सदर गाडीला अपघात झाला, त्यांची नोटीस तक्रारदाराने इन्शुरन्स कंपनीला दिली, सर्व्हेअरने गाडीच्या नुकसानीचा अंदाज दिला व त्याप्रमाणे गाडीची रु.1,05,149/- ची दुरुस्ती केली परंतु यापैकी कोणतीही गोष्ट सिध्द करणारा कोणताही पुरावा त्यांनी मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे गाडी दुरुस्त स्थितीत बाफना मोटर्स, नांदेड यांचेकडे पडून आहे व तक्रारदाराने दुरुस्तीचे पैसे रु.1,05,149/- व पार्कीग चार्जेस देऊन गाडी घेऊन जावी हे त्यांचे म्हणणे ग्राहय धरता येत नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदारा विरुध्द दाखल केलेल्या फिर्यादीची सही शिक्याची नक्कल दाखल केली आहे.
वरील विवेचनावरुन तक्रारदाराने गाडीची डिलीव्हरी न घेताच डिलीव्हरी नोटवर सही केली म्हणून डाऊन पेमेंट म्हणून त्यांने दिलेले रु.2,00,000/- परत मिळण्यास तो पात्र आहे हे तक्रारदार सिध्द करु शकलेला नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे.
सबब, मंच खालील आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड