::: आ दे श :::
( पारित दिनांक : 23/04/2018 )
माननिय अध्यक्षा, सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात विरुध्द पक्षांविरुध्द दाखल केली आहे.
2) तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचा लेखी युक्तिवाद व विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ची युक्तिवाद पुरसिस, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निर्णय पारित केला.
तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त Delivery Note व Retail Sales Order Booking Form यावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांनी त्यांचे जुने वाहन विक्री करुन, नवीन तवेरा चारचाकी वाहन, विरुध्द पक्ष क्र. 2 निर्मीत, विरुध्द पक्ष क्र. 1 कडून खरेदी केली आहे. म्हणून तक्रारकर्ते हे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक आहे, या निष्कर्षावर मंच आले आहे.
3) विरुध्द पक्ष क्र. 1 यांचा आक्षेप असा आहे की, तक्रारकर्ते यांनी सदर नवीन गाडी नांदेड येथे खरेदी करुन, नांदेड येथून ताब्यात घेतली, सदर गाडी विकत घेण्याबाबतचा सर्व सौदा नांदेड येथे झाल्यामुळे व तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर वाहनावर रुपये 40,000/- सुट नगदी देण्याचे कबूल करुनही दिली नाही, अशी असल्यामुळे, मा. वाशिम मंचाच्या कार्यक्षेत्रात कोणतेही कारण उद्भवलेले नाही, त्यामुळे या मंचास सदर तक्रार तपासता येणार नाही.
यावर तक्रारकर्ते यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी या आधीचे विरुध्द पक्ष क्र. 2 कंपनीचे वाहन खरेदी केले होते व फेब्रुवारी 2015 मध्ये विरुध्द पक्षाने त्यांच्या वाहनाची विक्री - एक्सचेंज चा प्रचार- प्रसार करण्याच्या उद्देशाने फिरते विस्तार ऑफीस वाशिम येथे पुसद नाक्याजवळ लावले होते, विरुध्द पक्षाने त्यांच्या पुर्वीच्या ग्राहकांशी संपर्क करुन त्यांच्या वाहन विक्रीला चालना देण्यासाठी प्रत्यक्ष भेट घेवून योजना असलेले माहितीपत्रक दाखविले ज्यानुसार नवीन तवेरा वाहन जर मुदतीत खरेदी केले तर, त्यावर रॉयल्टी बोनस मिळणार होता व हँण्डलींग चार्जेस लागणार नव्हते. तसेच तवेरा वाहनावर रुपये 40,000/- अतिरीक्त सुट नगदी स्वरुपात विरुध्द पक्षाकडून मिळणार होती व वाहनावर इन्शुरन्स, आरटीओ पासींग, रोड टॅक्स इ. कर विरुध्द पक्ष स्वतः भरुन, वाहन कागदपत्रांसह घरपोच पोहचून देणार होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तक्रारकर्ते यांनी त्याच्याकडील विरुध्द पक्षाचे जुने वाहन विक्री करुन नवीन वाहन खरेदी केले व दिनांक 27/02/2015 रोजी सदर वाहन तक्रारकर्ते यांना घरपोच देण्यात आले.
यावर मंचाने, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त, बुकींग फॉर्म व वाहन डिलेव्हरी नोट हे तपासले असता, वाहन वाशिम ग्राहक मंचाच्या अधिकार क्षेत्रात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याकडून पहिले बुकिंग रक्कम स्विकारुन त्यानंतर त्याचा ताबा, तक्रारकर्ते यांना दिला, असे दिसते. त्यामुळे तक्रारकर्ते यांच्या युक्तिवादात मंचाला तथ्य आढळते. म्हणून वाशिम ग्राहक मंचास सदर तक्रार तपासण्याचे कार्यक्षेत्र आहे, या निष्कर्षावर मंच आले आहे.
4) तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, विरुध्द पक्षाने या गाडीवर रुपये 40,000/- अतिरीक्त सुट देण्याचे व ती रक्कम नगदी दिल्या जाईल, असे आश्वासन व हमी दिली होती. परंतु आजतागायतसुध्दा ही रक्कम तक्रारकर्त्यास दिली नाही, तक्रारकर्ते यांनी कायदेशीर नोटीस पाठवून या रकमेची मागणी केली होती, मात्र विरुध्द पक्षाने दिशाभुल करणारे खोटे ऊत्तर पाठविले, त्यामुळे सदर तक्रार दाखल करावी लागली.
5) यावर विरुध्द पक्ष क्र. 1 यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी असे कोणतेही आश्वासन दिले नव्हते. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्ते यांना एक वर्षाचा पूर्ण विमा व रुपये 10,000/- पर्यंतच्या गाडीला लागणा-या अॅक्सेसरी याची सुट तक्रारदारास दिलेली आहे व त्याचे मुल्य एकूण रुपये 42,526/- होते, त्यामुळे यात त्यांची सेवा न्युनता सिध्द होत नाही.
विरुध्द पक्ष क्र. 2 चे असे म्हणणे आहे की, विरुध्द पक्ष क्र. 1 आता त्यांचे विक्रेते राहिले नाही, परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 ग्राहकांना कोणत्या सोई, सुविधा, सवलती, प्रलोभने देतात याच्याशी त्यांचा संबंध नसतो, त्यामुळे यात विरुध्द पक्ष क्र. 2 चा संबंध येत नाही.
6) तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या दस्तात, विरुध्द पक्ष क्र. 1 हे या गाडीवर रुपये 40,000/- अतिरीक्त सुट देणार होते, असे नमूद नाही. याऊलट विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी विमा + 10 R Acc. Free असा उल्लेख Special Remarks म्हणून नमूद बुकिंग फॉर्ममध्ये केलेला दिसतो व तो त्यांनी सुट म्हणून तक्रारकर्ते यांना दिला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर वाहन विक्री करतांना तक्रारकर्ते यांना रुपये 40,000/- ची अतिरीक्त रक्कम सुट म्हणून देण्याचे प्रलोभन दाखवून वाहनाची विक्री केली, ही बाब, तक्रारकर्ते यांनी कागदोपत्री पुरावा देवुन सिध्द न केल्यामुळे, तक्रारकर्ते यांची प्रार्थना मंजूर करता येणार नाही, असे मंचाचे मत आहे. सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार पुराव्याअभावी खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri