न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. जाब्बाज मुकेरी हा तक्रारदारांचा अविवाहित मुलगा होता व तो तक्रारदारांसमवेत वर नमूद पत्त्यावर रहात होता. तो यड्राव येथील अरिहंत टेक्सटाईल येथे मशीन ऑपरेटर म्हणून काम करुन मासिक रक्कम रु.15,000/- मिळवित होता व तक्रारदारांना आर्थिक मदत करत होता. अरविंद गुरव व घनताडे तसेच खरात हे त्याचे मित्र होते. घनताडे व खरात हे दोघे मुंबईला गेले होते व मयतासही गुरवसोबत तेथे जायचे होते. दि. 27/12/2020 रोजी मयत जाब्बाज व मित्र अरविंद गुरव पवन ट्रॅव्हल्सच्या बसमधून मुंबई, सायन येथे जाणेस निघाले. सायन येथे बस थांबवावी अशी सूचना बसच्या ड्रायव्हरला व मदतनीसला त्यांनी दिली होती. असे असतानाही वि.प.क्र.1 च्या बसच्या ड्रायव्हरने व मदतनीसाने ती बस सायनला न उतरविता विरार पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुजरातकडे जाणा-या दिशेने नेली व पहाटे मयत मुकेरी व गुरव यांचे लक्षात येताच त्यांनी बस थांबविली व ड्रायव्हर व त्यांचे मदतनीसने आपली चूकही कबूल केली व पुन्हा परत त्यांनी सायनपर्यंत दुस-या बसमूधन बसवून परत पाठवितो असेही सांगितले व बस थांबवून बसमूधन मदतनीसही खाली उतरला. सायनकडे जणा-या एकेरी रस्त्याकडे तिघेही निघाले. मात्र मदतनीस यांनी मुकेरी व गुरव याना रस्त्यातच सोडून दुस-या बसमध्ये न बसविता मागच्या मागे बसमध्ये बसून पळ काढला व त्यातच मयत जाब्बाज यांना आयशरची धडक बसून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सदरचे कृत्य हे मयत मुकेरी हा वि.प. यांचा प्रवासी असतानाही त्याच्या सुरक्षिततेची काळजी न घेता रस्त्यातच सोडून देणे व स्टॉप नसलेल्या ठिकाणी उतरविणे ही फार मोठी चूक वि.प.क्र.1 व 2 यांनी केली आहे. सबब, तक्रारदार यांचेकडून रु.22,77,000/- इतकी नुकसान भरपाई तक्रारदाराने मागितलेली आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार क्र.1 व 2 हे मयत जाब्बाज रफीक मुकेरी यांचे आई वडील आहेत व ते एकत्रात रहात होते. अरिहंत टेक्स्टाईल, यड्राव येथे मशीन ऑपरेटर म्हणून लूम्सवर मयत जाब्बाज काम करीत होते व त्यांना मासिक रक्कम रु.15,000/- इतका पगार मिळत होता व त्याचे उत्पन्नावरती ते जगत होते. अपघातसमयी जाब्बाज यांचे वय अवघे 27 इतके होते. तक्रारदार यांचेशिवाय मयतास इतर कोणीही वारसदार नाही. मयत जाब्बाज तसेच विनीत घनताडे व खरात हे सर्वजण मित्र होते व ते पॉवर लूम्सवरती काम करीत होते. मयत मुकेरी व त्यांचे मित्र मुंबई सायन येथे कामानिमित्त जाणार होते. घनताडे व खरात हे सायन येथे गेलेलेच होते व गुरव व मयत मुकेरी यांना सायन येथे जावयाचे होते. म्हणून वि.प.क्र.1 या ट्रॅव्हल्स बसचे वि.प.क्र.2 यांचे कार्यालयातून सायनला जाण्यासाठी गुरव व मुकेरी यांनी तिकीट बुक केले. दि. 27/12/2020 रोजी सायंकाळी 5.15 वाजता वि.प.क्र.2 यांचे कार्यालयातून सुटणा-या व सुरतला जाणा-या बसमध्ये हे दोघे बसले. गाडीत बसत असताना ड्रायव्हर व मदतनीसला सायनला उतरविणेबाबत सूचना दिलेली होती. मात्र असे असूनही बसच्या ड्रायव्हरने बस सायनला थांबविलेली नाही. तदनंतर मयत मुकेरी व गुरव यांना जाग आलेनंतर लोकेशन पाहिले असता बस, सायन सोडून विरार पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोहोचली. तदनंतर विचारणा केली असता, आपलेकडून चूक झालेचे ड्रायव्हर व मदतनीस यांनी कबूल केले व त्यांनी सायन पर्यंत दुस-या गाडीतून पाठवितो असे सांगितले व मदतनीसह गुरव व मुकेरी यांना एकेरी रस्ता ओलांडून सायनकडे जाणा-या रोडकडे जाण्यास सांगितले. तदनंतर दोघांना रस्त्यातच सोडून मदतनीसने पळ काढला व तितक्यात बसच्या मागील बाजूने येणा-या आयशरने जाब्बाज यास जोराची धडक दिली, त्यात सदर मयत मुकेरी जबर जखमी झाला व जखमी अवस्थेत त्यांना तेथेच सोडून बस घेवून ड्रायव्हर व मदतनीस निघून गेले. सदर बसचालकाने धडक दिलेल्या वाहनाचा नंबर व त्याची माहिती पोलिस स्टेशनला देणे आवश्यक होते. परंतु त्याबाबत त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले व जखमीचा विचार न करता त्यांनी पळ काढला ही सेवात्रुटी आहे. तदनंतर मुकेरी अपघातातीत जखमांमुळे मयत झाला. या सर्व गोष्टीला वि.प.क्र.1 व 2 हेच जबाबदार आहेत. याकरिता सदरचा तक्रारअर्ज तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे. सदर धडक दिलेल्या अज्ञात आयशर टेम्पो चालकाविरुध्द विरार पोलिस स्टेशनला गुन्हाही नोंद झालेला आहे. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांचेकडे रक्कम रु.21,42,000/- मिळणेकरिता तसेच रु.15,000/- अंत्यसंस्कारासाठी, रु.15,000/- लॉस ऑफ इस्टेट या सदराखाली, रु. 80,000/- तक्रारदार क्र.1 व 2 हे मुलाच्या प्रेमास मुकले याकरिता, व रु.25,000/- वकील फी म्हणून असे एकूण 22,77,000/- वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून मिळावे याकरिता सदरचा तक्रारअर्ज तक्रारदाराने दाखल केलेला आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत एफआयआर, अॅडव्हान्स डेथ सर्टिफिकेट, प्रेत नेणेचा परवाना, अरविंद गुरव यांचा जबाब, डीएसपी पालघर यांना नोटीस पोचलेची पावती, तक्रारदार यांची पोचपावती, विरार पोलिस स्टेशन यांची पोचपावती, ना हरकत दाखला, उदयसिंह पाटील नगरसेवक यांचे पत्र, सना ट्रॅव्हल्स कडून आलेला मोबाईल मॅसेज, सना ट्रॅव्हल्सची पावती, माहिती अधिकाराखालील पत्र, विरार पोलिस स्टेशनचे उत्तर, मयताचा पगाराचा दाखला, मयताचा शाळा सोडलेचा दाखला, तक्रारदारांचे आधारकार्ड व रेशनकार्ड इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. क्र.1 व 2 यांना आयोगाची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
6. तक्रारदार क्र.1 व 2 हे मयत जाब्बाज रफीक मुकेरी यांचे आईवडील आहेत. तक्रारदार यांनी दि. 27/12/2020 रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता वि.प. क्र.2 यांचे कार्यालयातून सुटणा-या व सुरतला जाणा-या बस नं. जीजे-14-एक्स-1900 या बसचे तिकीट बुक केले होते व सदरचा बुकींग केलेचा पुरावा तक्रारदार यांनी कागदयादीसोबत पान नं.52 व 53 वर दाखल केला आहे व या संदर्भातील पुरावेही तक्रारदार यांनी दाखल केलेले आहेत. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
7. वि.प.क्र.1 व 2 यांना आयोगाचे नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर न झालेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. तक्रारदार यांचा मयत मुलगा जाब्बाज रफीक मुकेरी याने वर नमूद वि.प.क्र.1 व 2 यांचेकडे सायन येथे जाणेकरिता तिकीटाचे बुकींग केले होते हे दाखल कागदपत्रांवरुन शाबीत होते व यासंदर्भातील तक्रारदार यांचे वडीलांचे पुराव्याचे शपथपत्र तसेच साक्षीदार अरविंद कृष्णा गुरव यांचेही पुराव्याचे शपथपत्र तक्रारदार यांनी दाखल केलेले आहे. तसेच तक्रारदार यांनी अपघात झाला या ठिकाणचे विरार पोलिस स्टेशनचा एफ.आय.आर. दाखल केलेला आहे. तसेच डेथ सर्टिफिकेट, प्रेत नेणेचा परवाना ही कागदपत्रे दाखल केलेली आहेत व तक्रारदार यांचा मयत मुलगा जाब्बाज रफीक मुकेरी याचे समवेत असणारे श्री अरविंद गुरव यांचाही जबाब दाखल केलेला आहे. तसेच ज्या वि.प.क्र.1 व 2 ट्रॅव्हल्सकडून तक्रारदार यांचा मयत मुलगा व अरविंद गुरव हे प्रवास करीत होते, त्या ट्रॅव्हल्सची पावतीही तक्रारदार यांनी कागदयादीसोबत दाखल केली आहे. तसेच मयत जाब्बाज रफीक मुकेरी यांचा “अरिहंत टेक्स्ट” यांचा पगाराचा दाखलाही दाखल केला आहे. वरील सर्व बाबी तक्रारदार यांनी आपल्या कागदयादीसोबत दाखल करुन शाबीत केलेल्या आहेत व वि.प.क्र.1 व 2 यांनी सदरच्या बाबी या आयोगासमोर हजर होवून खोडून काढलेल्या नाहीत. याचाही विचार हे आयोग करीत आहे. तक्रारदार यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली आहे व सदरचे दाखल पोलिस जबाबावरुन तक्रारदार यांचे मयत मुलाव व गुरव यांना सायनचे बसस्टॉपवरती न उतरविता बसचालकाने गाडी पुढच्या स्टॉपवर नेऊन थांबविली व वि.प.क्र.1 व 2 यांचे तर्फे काम पाहणारा कर्मचारी हा तक्रारदार यांचे मयत मुलास तसेच त्यांचे बरोबर असणा-या अरविंद गुरव यांना मुंबईकडे जाणा-या एकेरी हायवेकडे रस्ता ओलांडून जाणेसाठी बरोबर होता. मात्र अचानक तो कर्मचारी त्या दोघांनाही सोडून निघून गेला व या कालावधीमध्येच मयत जाब्बाज रफीक मुकेरी हे सदर कर्मचा-याकडे पहात असतानाच एका आयशर टेम्पोने मागील बाजूने त्यांना भरधाव वेगात येवून धडक दिलेली आहे व मयत मुकेरी यांचा जबर मार लागलेने मृत्यू ओढवलेला आहे. ही बाब दाखल कागदपत्रांवरुन यापूर्वीच शाबीत झालेली आहे. यासंदर्भातील एफ.आय.आर. तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे व तक्रारदार यांचे मयत मुलगा जाब्बाज रफीक मुकेरी यांचे समवेत असणारे श्री अरविंद कृष्णात गुरव यांचा पुरवणी जबाब देखील तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे. यावरुनही सदरची बाब शाबीत होते. अपघात झालेची बाब तसेच अपघातास वि.प.क्र.1 व 2 हेच जबाबदार आहेत ही बाब सुध्दा दाखल कागदपत्रांवरुन शाबीत होते. सबब, मयत जाब्बाज रफीक मुकेरी यांचे मृत्यूस वि.प. क्र.1 व 2 यांचे कर्मचारी म्हणजेच वि.प.क्र.1 व 2 हेच जबाबदार आहेत या निर्णयाप्रत हे आयोग येत आहे. जर वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांचे मयत मुलगा व त्यांचा सहकारी यांस सांगितलेल्या म्हणजेच योग्य त्या ठिकाणी स्टॉपवर उतरविले असते अथवा रस्ता क्रॉस करुन देत असताना योग्य त्या वाहनामध्ये बसविणेची जबाबदारी स्वीकारली असती तर हा प्रसंग मयत जाब्बाज रफीक मुकेरी यांचेवर ओढवला नसता असे या आयोगाचे ठाम मत आहे. सबब, तक्रारदार यांचे मुलास व त्याचे सहका-यास योग्य त्या म्हणजेच सांगितलेल्या बस स्टॉपवर न उतरवून तसेच त्यांना येाग्य त्या वाहनामध्ये न बसवून वि.प. क्र.1 व 2 यांनी सेवात्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, याकरिता तक्रारदार यांनी मागितलेल्या मागण्या अंशतः मंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. तक्रारदार यांनी मयत जाब्बाज रफीक मुकेरी हा 27 वर्षे वयाचा होता व तो मासिक रक्कम रु.15,000/- मिळवित होता. याचा विचार करता 40 टक्के वाढ धरुन रु. 21,000/- तो मिळवू शकला असता व मासिक रक्कम रु.10,500/- इतकी रक्कम तक्रारदारांना देवू शकला असता व त्याच्या वयाचा विचार करता 17 वर्षांची रक्कम मिळाली असती, म्हणून रु.10500 X 12 X वर्षे 17 अशी एकूण रक्कम रु.21,42,000/- ची मागणी वि.प. यांचेकडून वसुल करुन मिळावी असे तक्रारदारयांचे कथन आहे. तक्रारदार यांनी यासंदर्भातील मयत जाब्बाज रफीक मुकेरी हे मासिक रक्कम रु.15,000/- मिळवित होते याबद्दलचा दाखला कागदयादीसोबत दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी यासंदर्भात काही मा. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिर्णय दाखल केलेले आहेत.
1) 2009 ACJ 1298 Supreme Court
Sarla Verma and Others Vs. Delhi Transport Corporation and Anr.
M-18 for age group of persons between 15 and 20 and between 21 and 25: reduced by one unit for every five years, that is, M-17 for 26 to 30 years, M-16 for 31 to 35 years, M-15 for 36 to 40 years, M-14 for 41 to 45 years, and M-13 for 46 to 50 years, then reduced by two units for every five years, that is, M-11 for 51 to 55 years, M-9 for 56 to 60 years, M-7 for 61 to 65 years and M-5 for 66 to 70 years.
2) 2017 ACJ 2700 Supreme Court
National Insurance Co.Ltd Vs. Pranay Sethi and others
In case, the deceased was self-employed or on a fixed salary, an addition of 40 per cent of the established income should be the warrant where the deceased was below the age of 40 years. An addition of 25 per cent where the deceased was between the age of 40 and 50 years and 10 per cent where the deceased was between the age of 50 and 60 years should be regarded as the necessary method of computation. The established income means the income minus the tax component.
यांचा विचार करता Rs.10,500 x 12 x 17 वर्षे = Rs.21,42,000/- इतकी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदरचे रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात. तसेच अंत्यसंस्कारासाठी रक्कम रु.10,000/- व तक्रारदार क्र.1 व 2 हे मुलाचे प्रेमास मुकले याकरिता रक्कम रु.10,000/- व कोर्ट फी रक्कम रु.3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सदरची रक्कम वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या देणेची आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रक्कम रु.21,42,000/- देणेचे आदेश करणेत येतात. तसेच सदरचे रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात.
3. वि.प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना अंत्यसंस्काराच्या खर्चापोटी रु.10,000/-, मुलाचे प्रेमास मुकले याकरिता रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.