सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 123/2012.
तक्रार दाखल दि.14-08-2012.
तक्रार निकाली दि.08-07-2015.
डॉ.सतीश मारुती खंदारे
रा. सुभाषनगर,कोरेगांव, ता.कोरेगांव,जि.सांगली .... तक्रारदार
विरुध्द
1. श्री. बाचल,
बाचल इलेक्ट्रॉनिक्स वर्ल्ड, साईदत्त कॉप्लेक्स,
भारत पेट्रोल पंपाजवळ, मेनरोड, कोरेगांव,
ता. कोरेगांव, जि.सातारा.
2. श्री. किशोर लालजीभाई मेहता,
जयदिप घरघंटी मॅप्यूफॅक्चरर, प्लॉट नं. 151,
श्री. गणेश हौसिंग सोसायटी, शेरी नं.3,
बाप्पा सिताराम चौकडीजवळ, राजकोट -360 001
गुजरात राज्य. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.व्ही.पी.जगदाळे.
जाबदार क्र.1 तर्फे– अँड.एस.जी.मुलाणी
जाबदार क्र.2 तर्फे-वगळले.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केली आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे कोरेगांव,जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत. तक्रारदाराने जाबदार यांचेकडून घरचेघरी दळण दळणेसाठी उपयुक्त असलेली जयदीप कंपनीची एक एच.पी.ची घरघंटी दि.23/3/2012 रोजी खरेदी केली. घरघंटी खरेदी करताना जाबदाराने घरघंटीची एक वर्षाची तोंडी वॉरंटी दिली. तक्रारदार व जाबदार दोघे एकाच गावचे असलेने तक्रारदाराने जाबदारावर विश्वास दाखवला. घरघंटीचा वापर कसा करायचा ? गहू व ज्वारीचे दळणाबाबत कांही त्रुटी आढळल्यास त्याबाबत घरपोच सेवा दिली जाईल. प्रसंगी घरघंटी बदलून देण्याची माझी जबाबदारी राहील असा विश्वास जाबदाराने तक्रारदारास दिला. त्यामुळे तक्रारदाराने जाबदाराकडून घरघंटी खरेदी केली. त्याची किंमत रक्कम रु.11,750/- (रुपये अकरा हजार सातशे पन्नास फक्त) होती. तक्रारदाराने त्यावेळी रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) जाबदाराला रोख अदा केले व उर्वरीत रक्कम नंतर देतो असे तक्रारदाराने जाबदारास सांगितले. जाबदाराने सदर घरघंटी तक्रारदाराचे घरी पोहोच करुन तक्रारदाराचे पत्नीस गव्हाचे दळण दळून दाखवले मात्र ज्वारीचे दळण दळून दाखवले नाही. त्यावेळी ज्वारीचे पीटपण गव्हाचे पीठाप्रमाणेच येईल अशी खात्री जाबदाराने दिली त्यानंतर गव्हाची भरड व दळण याबाबत तक्रारदाराला कोणतीही तक्रार नव्हती. परंतु त्यावेळी घरघंटीतून पीठ जास्त उडणे, मशीनचा आवाज जास्त मोठा येणे, मशीन लवकर गरम होणे, आणि वारंवार पॉवर पॉईंट खराब होणे यासारख्या त्रुटी निर्माण झालेने तक्रारदाराने जाबदाराचे निदर्शनास या बाबी आणून दिल्या असता, जाबदारांनी फोनवरुन एक-दोन वेळा माहीती दिली व घरघंटी नवीन असलेने सदर त्रुटी असतील म्हणून वेळ मारुन नेली. नंतर ज्वारीचे दळण दळताना ज्वारीचे पीट हिरवट असून त्याची भाकरी काळपट हिरवी झाली व तिची चवही बदलली ही गोष्ट तक्रारदाराने जाबदाराच्या लक्षात आणून दिली व प्रस्तुत दोष काढून देणेबाबत जाबदाराला विनंती केली. याबाबत जाबदाराने कोणतीही हालचाल न केलेने पुन्हा तक्रारदाराने फोनवरुन व प्रत्यक्ष जाबदाराला भेटून घरघंटी दुरुस्त करणेबाबत पुन्हापुन्हा सांगीतलेवर जाबदाराचे दुकानातील मुलगा व एक कामगार या दोघांनी घरघंटीचे ग्राइंडरची सफाई केली व इतर गिरणीप्रमाणे ज्वारीचे पीठ येईल असे सांगून निघून गेले. परंतु तदनंतरही पीठामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे पुन्हा तक्रारदारने जाबदाराचे दुकानात गेले व हकीकत कथन करुन भाकरी दुकानदारास दाखवली त्यावेळी चाळण बदलून बघा म्हणून जाबदाराने दुसरी चाळण दिली, मात्र चाळण बदलूनही कोणताच फरक पडला नाही ही बाब जाबदाराचे लक्षात आणून दिलेवर जाबदार यांनी सर्व त्रुटी दूर करुन देवू तसे न झालेस घरघंटी बदलून देतो असे सांगून दोन दिवसांत माणसे पाठवून देणेचे कथन केले. याचदरम्यान तक्रारदाराने जाबदाराचे उर्वरीत रक्कम रुपये 1,750/- (रुपये एक हजार सातशे पन्नास मात्र) अदा केले व खरेदीची मूळ पावती हरवलेने जाबदाराकडून डुप्लीकेट पावती घेतली. त्यानंतर आठ दिवसांनी जाबदाराचे दुकानातून दोन माणसे/कामगार येवून घरघंटीचा ग्राईंडर घरीच काढून ठोकाठोकी करुन पुन्हा जोडला. त्यावेळी तक्रारदाराचे पत्नीने दुरुस्त होत नसेल तर दुकानात घेवून जावून दुरुस्त करा असे सांगितलेवर दोन्ही कामगारांनी तीन-चार दिवसात घरघंटी दुरुस्त करुन ताबडतोब आणून देतो म्हणून सांगितले त्यावेळी तक्रारदाराने घरघंटी दुकानात नेत असल्याबद्दल लेखी लिहून देणेस सांगूनही त्याबाबत लेखी लिहून दिले नाही. त्यानंतर दुकानात दुरुस्तीस नेलेले घरघंटी आठवडाभर वाट पाहून देखील व फोन करुनही जाबदाराने तक्रारदाराला आणून दिली नाही. त्याविषयी विचारणा केली असता दोन-तीन दिवसांत देतो म्हणूनही ती दुरुस्त करुन दिली नाही. तेव्हा पुन्हा तक्रारदार दुकानात गेले त्यावेळी सदर घरघंटी दुरुस्त होत नाही. तुम्ही दीड एच.पी.ची घरघंटी घेवून जा त्यासाठी आणखी आगाऊ रक्कम रु.2,200/- (रुपये दोन हजार दोनशे मात्र) द्यावे लागतील से सांगितले. त्यावर मला तक्रारदारास जादा रक्कम देणे मान्य नसलेने, सदर घरघंटी बदलून देणेस जाबदाराला सांगितले असता त्यांनी जादा रक्कम भरुन नवीन घरघंटी घ्या अन्यथा तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही काहीही करा असे सांगितले व घरघंटी दुरुस्त करुन अथवा बदलून दिली नाही. अशाप्रकारे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा दिलेने जाबदारविरुध्द सदरचा तक्रार अर्ज तक्रारदाराने दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी सदर जाबदार यांचेकडून घरघंटीची रक्कम रुपये 11,750/- (रुपये अकरा हजार पाचशे मात्र) व्याजासह मिळावेत तसेच मानसिक त्रासासाठी व शारिरीकत्रासासाठी रक्कम रु.10,000/- जाबदारांकडून वसूल होवून मिळावेत, अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- जाबदाराकडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने प्रस्तुत कामी केलेली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 3 चे कागदयादीसोबत नि. 3/1 ते कन.3/3 कडे अनुक्रमे जयदीप कंपनीची घरघंटी खरेदीची पावती, तक्रारदाराने जाबदाराला घरघंटी बदलून मिळणेसाठी किंवा घरघंटीची खरेदी रक्कम व्याजासह मिळावी म्हणून दिलेले पत्र, तक्रारदाराने जाबदाराला पाठविले पत्राची पोष्टाची पावती व पोचपावती, नि.18 अ कडे जाबदार क्र. 2 ला वगळणेबाबतचा अर्ज, नि. 19 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि.20 कडे पुराव्याचे शपथपत्र हाच लेखी युक्तीवाद समजणेत यावा म्हणून पुरसीस वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने प्रस्तुत कामी मे मंचात दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 यांनी नि. 6 कडे म्हणणे/कैफीयत दाखल केली आहे. प्रस्तुत म्हणण्यामध्ये जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथन फेटाळले आहे. फक्त जाबदार यांचेकडून तक्रारदाराने आटाचक्की खरेदी केली होती ही बाब मान्य केली आहे. तसेच प्रस्तुत म्हणण्यामध्ये जाबदाराने पुढील आक्षेप घेतले आहेत. तक्रारदाराला जयदीप कंपनीची आटाचक्की जाबदाराने विक्री केली होती. सदरचे व्यवहारावेळी जाबदाराने सदर आटाचक्कीचे सर्व गुणवैशिष्टे समजावून देवून, तसेच त्याबाबतचे प्रात्यक्षीक दाखवले होते व नंतरच तक्रारदाराने सदर आटा चक्की खरेदी केली होती. प्रस्तुत खरेदीचे दि.23/3/2012 चे बील तक्रारदारास दिले असून त्या बीलामध्ये या आटाचक्कीची संपूर्णपणे व अंशतः Replacement देणेबाबत ठरलेले नव्हते व नाही. तसेच सदर विक्री व्यवहारावेळी वर नमूद बिलामध्ये फक्त आटाचक्कीच्या मोटरबाबत वॉरंटी सर्व्हीस देणेचे स्पष्ट नमूद आहे. तसेच फक्त मोटरमध्ये बिघाड झालेस त्याबाबत वॉरंटी दिली गेली आहे. या बिलाखाली तक्रारदाराने व जाबदाराने वर नमूद तारखेस त्यांच्या सहया केलेल्या आहेत. त्यामुळे जाबदार हे मोटारव्यतिरिक्त आटाचक्कीचे कोणत्याही बिघाडास अन्यथा दोषास व संचालनास जबाबदार नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांना नुकसानभरपाई देणेचा व घरघंटी बदलून देणेचा प्रश्नच येत नाही. सदर जाबदार व यांना कंपनीने सदर दोष दूर करणेचे अधिकार दिलेले नाहीत. तसेच तक्रारदाराने सदर घरघंटीचा वापर व्यापारी कारणासाठी वापरुन त्यात बिघाड निर्माण केला आहे. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक या सदरात येत नाहीत. सबब प्रस्तुत तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे आक्षेप जाबदाराने घेतली आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक असलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे. मंचाने पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व
सेवापुरवठादार असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदारांस सदोष सेवा
पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थ देत आहोत कारण- तक्रारदाराने प्रस्तुत जाबदार क्र. 1 यांचेकडून जयदीप कंपनीची 1 एच.पी. ची घरघंटी दि.23/3/2012 रोजी रक्कम रु.11,750/- (रुपये अकरा हजार सातशे पन्नास फक्त( ला खरेदी केली होती. ही बाब जाबदाराने मान्य केली आहे. यावरुन तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असलेचे स्पष्ट होत आहे. तसेच प्रस्तुत घरघंटीवर ज्वारीचे दळण दळालेनंतर येणारे पीठ हे काळपट हिरवे येत होते तर त्याची भाकरीसुध्दा काळपट हिरवी होवून चवसुध्दा पूर्णपणे बदलत होती. त्यामुळे तक्रारदाराने सदर सदोष घरघंटीबाबत दुरुस्ती करुन देणेबाबत जाबदारास सांगीतलेवर जाबदाराने दोन वेळा कामगाराला घरी पाठवून घरघंटी दुरुस्त करणेचा प्रयत्न केला परंतु सदर घरघंटी दुरुस्त झाली नाही. त्यामुळे दुरुस्तीसाठी घरघंटी दुकानात जाबदाराने नेली परंतु ती दुरुस्त करुन तक्रारदाराला परत दिली नाही. तक्रारदाराने विचारणी केलेवर सदरची घरघंटी दुरुस्त होत नाही त्यामुळे जादा रक्कम रु.2,200/- भरुन नवीन दुसरी घरघंटी घ्या असे जाबदाराने तक्रारदाराला सांगितले परंतु तक्रारदाराला जादा रक्कम भरणे शक्य नसलेने तक्रारदाराने पहिल्या घरघंटीचे खरेदीची रक्कम रु.11,750/- परत मिळावे अशी जाबदाराला विनंती केली अथवा घरघंटी बदलून देणेबाबत विनंती केली. परंतु जाबदाराने त्यास नकार दिला. म्हणजेच तक्रारदार यांना जाबदाराने सदोष सेवा पुरविलेचे स्पष्ट होत आहे. सबब आम्ही वर नमूद मुद्दा क्र. व 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
प्रस्तुत कामी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविलेचे सिध्द होत आहे. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 2 तक्रारदाराने नि. 18 अ कडे दाखल अर्जावरील आदेशाने वगळलेले आहे. त्यामुळे जाबदार क्र. 1 हे प्रस्तुत नुकसानभरपाईस जबाबदार आहे हे स्पष्ट होते. सबब जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराने खरेदी केले घरघंटीचे खरेदी किंमत रक्कम रु.11,750/- (रुपये अकरा हजार सातशे पन्नास मात्र) तक्रारदाराला अदा करणे न्यायोचित होणार आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करता आहेत.
-ः आदेश ः-
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदार यांना घरघंटी खरेदीची रक्कम रु.11,750/-
(रुपये अकरा हजार सातशे पन्नास मात्र) तक्रारदाराला अदा करावेत. प्रस्तुत
रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के
व्याज अदा करावे.
3. जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-
(रुपये पाच हजार फक्त) व व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.3,000/-
रुपये तीन हजार फक्त) अदा करावेत.
4. वरील नमूद आदेशांचे पालन जाबदारांनी आदेश पारीत तारखेपासून 45
दिवसांचे आत करावे.
5. वरील आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदाराना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा राहील.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 08-7-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.