द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत
// नि का ल प त्र //
(1) प्रस्तूतचे प्रकरण सन 2006 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/160/2006 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/283/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
(2) प्रस्तुत प्रकरणातील बिल्डरने दिलेल्या सदोष सेवे बाबत योग्य ते आदेश होऊन मिळणेसाठी तक्रारदारांनी सदरहु तक्रारअर्ज दाखल केला आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार श्री अविनाश शितोळे यांनी जाबदार बाबा प्रमोटर्स अण्ड बिल्डर्स ( ज्याचा उल्लेख यापुढे “बिल्डर” असा केला जाईल ) यांच्या कॅसल वर्ल्ड या प्रकल्पामध्ये एक सदनिका विकत घेतली होती. या सदनिकेची किंमत रक्कम रु 14,75,000/- मात्र तक्रारदारांनी बिल्डरला अदा केलेली आहे. दिनांक 01/02/2005 रोजी तक्रारदारांनी नाईलाजाने अपुर्ण स्वरुपातील सदनिकेचा ताबा घेतला. बिल्डरने कबुल केलेल्या दर्जांप्रमाणे काम केले नाही व त्यामुळे आपल्याला दुरुस्तीसाठी खर्च करावा लागला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. बिल्डरकडून तक्रारदारांना एकुण नऊ बाबीं बाबत पुर्तता करुन हवी आहे. तसेच ईमारतीमध्ये कव्हर्र पार्कींग देण्याचे आश्वासन देऊन सुध्दा त्यांनी आपल्याला पार्कींग दिलेले नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. काही सामाईक सुविधां बाबत सुध्दा बिल्डरने आश्वासनांची पुर्तता केलेली नाही असे तक्रारदारांनी नमुद केले आहे. बँकेला दिलेल्या पत्रामध्ये सर्व परवानग्या मिळाल्या आहेत असा बिल्डरने उल्लेख केलेला आहे याचा विचार करिता त्यांनी आपल्या सर्व आश्वासनांची पुर्तता करावी तसेच आपल्याला नुकसानभरपाईची रक्कम अदा करावी या मागण्यांसह तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 4 ते 11 अन्वये विविध कागदपत्र मंचापुढे दाखल केली आहेत.
(3) प्रस्तुत प्रकरणातील बिल्डर वरती मंचाच्या नोटिसीची बजावणी झाल्यानंतर विधिज्ञां मार्फत त्यांनी आपले म्हणणे मंचापुढे दाखल केले. आपल्या म्हणण्यामध्ये बिल्डरने तक्रारदारांच्या सर्व तक्रारी नाकारलेल्या असून तक्रारदारांनी ताबा मिळाल्याचा दिनांक चुकीचा लिहीला आहे असे नमुद केले आहे. वादग्रस्त सदनिकेतील ज्या दुरुस्त्यां बाबत तक्रारदारांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या सर्व खोटया आहेत असे बिल्डरचे म्हणणे असून या सर्व तक्रारी त्यांनी स्पष्ट शब्दात नाकारलेल्या आहे. सदनिका सर्व प्रकारे परीपुर्ण आहे याची खात्री करुनच तक्रारदारांनी ताबा घेतलेला आहे तसेच पार्कींगची सुवीधा सुध्दा त्यांच्या नावांने राखीव ठेवण्यात आलेली असून ते त्याचा उपभोग घेत आहेत याचा विचार करिता तक्रारदारांच्या या संदर्भांतील सर्व तक्रारी नाकारण्यात याव्यात अशी बिल्डरने विनंती केली आहे. तक्रारदारांनी सदनिकेचा ताबा घेतल्यानंतर त्यांच्या सुताराचे काम तेथे सुरु होते. सुतारां कडून झालेल्या नुकसानीसाठी आपण जबाबदार राहणार नाही असे तेव्हाच आपण तक्रारदारांना कळविले होते असे बिल्डरचे म्हणणे आहे. ताबा घेतल्या नंतर साधारण चार महिने सुतार त्याठीकाणी काम करित होते असे बिल्डरने नमुद केलेले असून तक्रारदारांनी हा तक्रारअर्ज दाखल करण्यापूर्वी एकदाही आपल्याकडे लेखी स्वरुपातील तक्रार केलेली नाही असे नमुद केलेले आहे. तक्रारदारांच्या बँकेने शेवटचा हप्ता म्हणून मंजुर केलेली रक्कम तक्रारदारांनी सुस्थितीतल्या ताब्याची खात्री केल्या नंतरच आपल्याला दिलेली आहे याचा विचार करिता तसेच अन्य बाबींचा विचार करिता तक्रारदारांनी दाखल केलेला हा खोटा व खोडसाळ अर्ज नामंजूर होण्यास पात्र ठरतो असे बिल्डरचे म्हणणे आहे. बिल्डरने आपल्या म्हणणच्या पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
(4) प्रस्तुत प्रकरणातील बिल्डरचे म्हणणे दाखल झाले नंतर तक्रारदारांनी आपले पुराव्याचे प्रतिज्ञापत्र अथवा अन्य पुरावा मंचापुढे दाखल केलेला नाही. किंबहुना जाबदारांना नोटिस काढलेल्या तारखे पासून तक्रारदार सातत्याने मंचापुढे गैरहजर आहेत. तक्रारदारांचा पुरावा दाखल न झाल्याने व जाबदार अथवा त्यांचे विधिज्ञ सर्व तारखांना हजर असल्याने जाबदारांच्या तोंडी विनंती नुसार त्यांच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले.
(5) तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगे बिल्डरचे म्हणणे पाहीले असता त्यांनी तक्रारदारांच्या सर्व तक्रारी नाकारलेल्या आढळतात. बिल्डरचे म्हणणे दाखल झाले नंतर आपल्या तक्रारी सिध्द होऊ शकतील असा ठोस व सबळ पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला आढळून येत नाही. बिल्डरनी सदनिके मधील जी कामे अपूर्ण ठेवली होती किंवा करारात कबुल केलेल्या ज्या सुविधा पुरविलेल्या नव्हत्या त्या संदर्भांत पुरावा दाखल करण्याची जबाबदारी तक्रारदारांची होती. मात्र या प्रकरणामध्ये तक्रारदारांनी असा पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांच्या तक्रारी बिल्डरने हजर होऊन नाकारलेल्या आहेत याचा विचार करिता तसेच तक्रारदारांची तक्रार सिध्द होऊ शकेल असा पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही याचा विचार करिता बिल्डर विरुध्द कोणताही आदेश करणे शक्य नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब तक्रारदारांची तक्रार योग्य पुराव्याअभावी नामंजूर करण्यात येत आहे.
वर नमूद सर्व निष्कर्ष व विवेचनाच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
सबब आदेश की,
// आदेश //
(1) तक्रारअर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(2) खर्चा बाबत कोणतेही आदेश नाहीत
(3) निकालपत्राची प्रत उभयपक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.