जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 365/2010. तक्रार दाखल दिनांक : 16/06/2010. तक्रार आदेश दिनांक :25/03/2011. श्री. मोहनराव गोपाळराव पाटील, वय 52 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. 608/7-8, उत्कर्ष नगर, विजापूर रोड, सोलापूर. तक्रारदार विरुध्द बाबा कन्स्ट्रक्शन करिता प्रो. विजयकुमार सिद्राम कांबळे, कार्या. : 287, भवानी पेठ, मड्डी वस्ती, सोलापूर – 2. विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एस.बी. गायकवाड विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एल.ए. गवई आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांच्या उत्कर्ष नगर, सोलापूर येथील प्लॉट नं.608/6 वरील 300 चौ. फुट जागेमध्ये बांधकाम करण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याशी करारनामा करण्यात आला. कराराप्रमाणे बांधकामाकरिता रु.1,95,000/- ठरविण्यात आली आणि बांधकाम दि.10/12/2009 पर्यंत पूर्ण करण्याचे होते. तक्रारदार यांनी दि.10/2/2009 ते 19/2/2010 कालावधीमध्ये वेळोवेळी एकूण रु.1,95,404/- चेक व रोखीने अदा केले आहेत. असे असताना, विरुध्द पक्ष यांनी मंजूर प्लॅनप्रमाणे मुदतीमध्ये बांधकाम पूर्ण न करता केवळ 50 टक्के बांधकाम केले आहे. माहे मार्च 2010 पासून त्यांचे बांधकाम बंद आहे. तसेच केलेले बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. त्याबाबत विचारणा केली असता उध्दट उत्तरे देऊन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे तक्रारदार यांनी पोलीस निरीक्षक, विजापूर रोड पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार केली. विरुध्द पक्ष यांनी केवळ रु.40,000/- ते रु.50,000/- किंमतीचे बांधकाम केले आहे. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे बांधकामाचा करारभंग केल्यामुळे रु.1,50,000/- नुकसान भरपाईसह मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार खर्च मिळावा, अशी विंनती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रारदार यांची तक्रार त्यांनी अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार व त्यांच्यातील बांधकाम करारानुसार 330 चौ.फूट बिल्ट-अप एरिया व 350 चौ.फूट स्लॅब एरिया बांधकाम करण्याचे ठरले होते. त्याकरिता रु.2,06,000/- चे अंदाजपत्रक तक्रारदार यांना दिले आणि काही कामे करावयाची नसल्यास रु.1,66,000/- चे अंदाजपत्रक देण्यात आले. त्यांच्यामध्ये दि.10/12/2009 रोजी अंदापत्रक होऊन बांधकामाची किंमत रु.1,95,000/- ठरवून रक्कम 3 ते 4 हप्त्यामध्ये देणे व बांधकाम 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे ठरले. त्यांनी बांधकामास सुरुवात केली असता, तक्रारदार हे कामामध्ये हस्तक्षेप करीत आणि त्यांच्या कामगारांना अरेरावी करुन त्रास देत असत. तसेच तक्रारदार यांनी जे काम ठरले नव्हते, ते काम करुन देण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी त्यांच्याकडून रु.20,172/- चे जास्त काम करुन घेतले आहे. तक्रारदार यांनी त्यांना रु.1,70,000/- दिले असून उर्वरीत रु.45,962/- दिलेले नाहीत. सदर रक्कम न दिल्यामुळे केवळ 5 टक्के काम राहिले आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये दि.10/12/2009 रोजी तक्रारदार यांचे घराचे बांधकाम करण्याचा करारनामा झाल्याविषयी विवाद नाही. तसेच बांधकामाची किंमत रु.1,95,000/- व बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी तीन महिन्याचा ठरल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, रु.1,95,404/- स्वीकारुनही विरुध्द पक्ष यांनी मंजूर प्लॅनप्रमाणे मुदतीमध्ये बांधकाम पूर्ण न करता केवळ 50 टक्के बांधकाम केल्याची तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी जे काम ठरले नव्हते, ते रु.20,172/- चे जास्त काम करुन घेतले असून त्यांना केवळ रु.1,70,000/- दिले आहेत आणि उर्वरीत रु.45,962/- दिलेले नसल्यामुळे केवळ 5 टक्के काम राहिले आहे. 5. तक्रारदार यांचे काही बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याविषयी विवाद नाही. बांधकाम अपूर्ण राहण्याबद्दल दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर श्री. दिलीप एम. शाह, इंजिनिअर्स आर्किटेक्टस् अन्ड रजि. व्हॅल्युअर्स यांचा व्हॅल्युएशन रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामध्ये विरुध्द पक्ष यांनी केलेल्या अपूर्ण बिल्ट-अप एरिया 323 चौ.फूट बांधकामाकरिता रु.48,500/- इतके मुल्य दर्शविण्यात आले आहे. विरुध्द पक्ष यांनी सदर अहवालास आक्षेप घेतलेला नाही किंवा प्रत्युत्तरादाखल उचित कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तसेच विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे बांधकामामध्ये हस्तक्षेप करीत असल्यास त्यांना समज दिल्याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी त्यांच्याकडून रु.20,172/- चे नमूद कामापेक्षा जास्त काम करुन घेतल्याविषयी उचित पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. वरील विवेचनावरुन तक्रारदार यांचे बांधकाम विहीत मुदतीमध्ये विरुध्द पक्ष यांनी पूर्ण केलेले नाही आणि केलेले बांधकाम हे त्यांनी स्वीकारलेल्या किंमतीप्रमाणे नसल्याचे सिध्द होते. त्यामुळे तक्रारदार हे उर्वरीत व अपूर्ण बांधकामापोटी विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.1,46,500/- परत मिळविण्यास हक्कदार ठरतात, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.1,46,500/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी नमूद मुदतीच्या आत उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तेथून पुढे देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने द्यावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/17311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |