द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1. ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदारांनी सामनेवाला 1 यांचेकडून त्यांचे फॅक्टरीसाठी विद्युत पुरवठा घेतला असून त्यांचा विद्युत मीटर क्र.Q980407(ग्राहक खाते क्र.635-166-021) असा आहे. ते सामनेवाला यांचे ग्राहक सरंक्षण कायदा 1986 तील तरतुदीप्रमाणे ग्राहक आहेत. सामनेवाला 2 हे सामनेवाला 1 च्या दक्षता विभागाचे विभागीय अभियंता आहेत. तक्रारदारांचे म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी विद्युत मीटर बसविल्यापासून आजपर्यंत ते होणा-या विद्युत बिलांची रक्कम नियमितपणे व वेळेवर भरत आले आहेत. सामनेवाला यांचे संबंधीत अधिकारी वेळोवेळी मीटरची तपासणी करीत असतात. सामनेवाला यांच्या अधिका-यांनी, तक्रारदार मीटरमध्ये बिघाड करुन विजेचा वापर करतात किंवा विजेची चोरी करतात अशी तक्रार कधीही केली नव्हती. प्रथमतः दि.15/05/2006 रोजी सामनेवाला यांच्या दक्षता विभागातील 12 ते 15 अधिकारी सामनेवाला 2 यांचेबरोबर तक्रारदारांचे फॅक्टरीमध्ये आले व तक्रारदारांना घेवून मीटर रुमकडे गेले. त्यावेळी सामनेवाला यांचे काही अधिकारी तेथे हजर होते. सामनेवाला 2 यांनी तक्रारदारांना त्यांचा मीटर दाखविला व त्याच्यावरील कव्हर फाडून काढले. सामनेवाला 2 यांनी तक्रारदारांकडून रु.2 लाख मागितले किंवा त्याच दिवशी त्यांचा क्लेम सेटल करावा व तसे न केल्यास तक्रारदारांनी विजेची चोरी केली आहे अशी धमकी दिली. सामनेवाला 2 यांनी तक्रारदारांना रक्कम रु.10,56,110/-भरावे अशी नोटीस दिली. सामनेवाला यांच्या धमकीमुळे तक्रारदारांनी प्रयत्न करुन रु.70 हजार जमा केले व ते सामनेवाला यांना दिले. तसेच पुढील तारखेचे 4 धनादेश रक्कम रु.2 लाख, रु.3 लाख, रु.82,510/- व रु.4,03,600/- सामनेवाला यांना दिले. सामनेवाला 2 व त्यांचे अधिका-यांनी तक्रारदारांच्या फॅक्टरीत आरडाओरड करुन तक्रारदारांना दमदाटी केली त्यामुळे तक्रारदारांना वर नमूद रोख रक्कम रु.70 हजार व 4 धनादेश सामनेवाला यांना द्यावे लागले. या घटनेबद्दल त्यांनी सामनेवाला यांचेविरुध्द माहीम पोलीस स्टेशनला फीर्याद दाखल केली तसेच, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांना दि.16/05/2006 रोजी पत्र पाठवून वर नमूद केलेले 4 धनादेश वटवू नयेत अशी सुचना दिली.
2) तक्रारदारांचे म्हणण्याप्रमाणे सामनेवाला 2 यांनी त्यांचे मीटर तपासणीच्या दि.15/05/2006 च्या अहवालाध्ये खालीलप्रमाणे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत -
i) Meter T.B. Cover found missing
ii) Meter body orange plastic seals found tampered
iii) Meter found 70.5 % slow in testing
iv) After opening the meter phase I & II potentials coils wire found cut inside the meter.
3) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे वरील अहवालात सामनेवाला यांनी नमूद केलेले दोष चुकीचे असून विद्युत मीटरमध्ये त्यांनी कधीही बिघाड केला नव्हता तसेच त्यांनी कधीही विजेची चोरी केलेली नाही. याबाबत तक्रारदारांनी सामनेवाला 1 यांचे वरीष्ठ अधिका-यांकडे दाद मागितली असता त्यांनी तक्रारदारांना दाद दिली नाही. तक्रारदारांनी नंतर माहितीच्या अधिकाराखाली सामनेवाला यांचेकडून माहिती मिळवली. मिळालेल्या माहितीचा तपशिल तक्रारअर्जाच्या पान क्र.7 वर दिलेला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी विजेचा वापर अतिशय जादा दाखविला असून मागितलेली रक्कम अवास्तव जादा आहे. दि.10/07/2006 रोजी त्यांनी इलेक्ट्रीकल इन्स्पेक्टर, इन्स्पेक्शन डिव्हीजन, 709, 7वा मजला ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई - 34 यांना पत्र पाठवून मीटरची तपासणी करावी अशी विनंती केली. तथापि, इलेक्ट्रीकल इन्स्पेक्टर यांनी दि.15/07/06 रोजीचे पत्राने सदरची बाब त्यांचे अधिकार कक्षेत बसत नाही असे कळविले. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे इलेक्ट्रीसीटी अमेंडेड ऍक्ट, 2003 चे कलम 56(2) च्या तरतुदीनुसार सामनेवाला त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करु शकत नाहीत. अशा परिस्थितीत तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला असून सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे असे जाहीर करावे अशी विनंती केली आहे. सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर प्रलंबित असताना सामनेवाला यांनी तक्रारदारांचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश सामनेवाला यांना द्यावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.3 लाख व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.20 हजाराची मागणी केली आहे. तक्रारदाराने तक्रारर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केले असून सामनेवाला यांनी विद्युत पुरवठा खंडीत करु नये याबाबत त्यांना अंतरिम आदेश द्यावा यासाठी वेगळा अर्ज दाखल केला.
4) सामनेवाला 1 व 2 यांनी सदर अर्जास म्हणणे दाखल करुन तक्रारदारांचा अर्ज नामंजूर करावा असे म्हटले आहे. सामनेवाला यांचे म्हणण्याप्रमाणे सदरचा तक्रारअर्ज कायदयाप्रमाणे या ग्राहक मंचास चालविणेचा अधिकार नसल्यामुळे तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांचा विद्युत पुरवठा व्यापारी उद्देशाने घेतलेला असल्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीप्रमाणे ग्राहक होत नाहीत.
5) सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी वरील तक्रारअर्जात नमूद केलेल्या विद्युत मीटरमध्ये बिघाड निर्माण केल्याचा संशय सामनेवाला यांना आल्यावरून त्यांच्या दक्षता पथकाने दि.15/05/2006 रोजी तक्रारदारांच्या मीटरची तक्रारदारांसमक्ष पाहणी केली त्यावेळी त्यामध्ये मीटरवरील टर्मिनल ब्लॉक कव्हर आढळून आला नाही तसेच, मीटरचा प्लॅस्टीक सील तुटलेला आढळला व मीटर नेहमीपेक्षा 70.5 टक्के कमी रिडींग दाखवित होता. तक्रारदार श्री.विनोद शर्मा यांनी सामनेवाला यांचे दक्षता पथकासमोर त्यांनी त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे विद्युत मीटरमध्ये बिघाड केला होता ही बाब मान्य केली होती. तक्रारदारांच्या मीटरचा दोन पंचासमक्ष पंचनामा करणेत आला. तक्रारदारांनी वरील बाब मान्य करुन सामनेवाला यांना तक्रारअर्जात नमूद केल्याप्रमाणे काही पैसे दिले व पुढील तारखेचे धनादेशही दिले. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तक्रारदारांना कसलीही धमकी दिली नव्हती.
6) तक्रारदारांनी इलेक्ट्रीसीटी अक्टच्या कलम 135 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विजेची चोरी केली असून वरील कायदयाच्या 154 अन्वये अशा त-हेचे गुन्हे फक्त स्पेशल कोर्टांना चालविणेचा अधिकार आहे. सामनेवाला यांनी त्याप्रमाणे तक्रारदारांचे विरुध्द माननिय सत्र न्यायालयात विजेची चोरी केली म्हणून फौजदारी तक्रार दाखल केली आहे, अशा परिस्थितीत सदरची तक्रार चालविणेचा अधिकार तसेच तक्रारदारांचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये असा आदेश देण्याचा अधिकार प्रस्तुत मंचाला नाही.
7) सामनेवाला यांचेवतीने श्री.सुभाष एस्.चव्हाण, उपअभियंता, दक्षिण विभाग यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून दि.15/05/2006 रोजी तक्रारदारांच्या विद्युत मीटरची तपासणी दक्षता पथकाने केली त्यावेळी तक्रारदार तेथे हजर होते असे म्हणून सदरचा मीटर ज्या परिस्थितीत आढळला त्याचे वर्णन त्यांनी केलेले आहे. सदर मीटरची तपासणी तक्रारदार श्री.विनोद शर्मा यांचे समक्ष करणेत आली. त्या मीटरमधील वायर तोडण्यात आल्याचे आढळून आले असे म्हटले आहे. सामनेवाला यांनी उप-अभियंता, श्री.सुभाष चव्हाण यांचे प्रतिज्ञापत्रासोबत दक्षता विभागाच्या तक्रारदारांच्या मीटर तपासणीच्या अहवालाची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
8) याकामी सामनेवाला यांनी तक्रारदारांनी विजेची चोरी केली असल्यामुळे इलेक्ट्रीसीटी अक्टच्या तरतुदीनुसार सदर तक्रारअर्ज या मंचासमोर चालू शकत नाही असा मुद्दा उपस्थित केलेला आहे. तक्रारदारांतपर्फे वकील कु.रश्मी मन्ने व सामनेवालातर्फे वकील श्री.केतकर यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात येवून सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
9) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - सदरचा तक्रारअर्ज या ग्राहक मंचास चालविणेचा अधिकार आहेकाय ?
उत्तर -नाही.
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून तक्रारअर्जात नमूद केल्याप्रमाणे दाद मागता येईल काय ?
उत्तर - नाही.
कारणमिमांसा
स्पष्टीकरण मुद्दा क्र.1 - तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सामनेवाला यांचेकडून फॅक्टरीसाठी विद्युत पुरवठा मीटर क्र.Q980407 ने घेतला असून मीटर बसविल्यापासून आजपर्यंत ते होणा-या विद्युत बिलांची रक्कम नियमितपणे व वेळेवर सामनेवालाकडे भरत आले आहेत. सामनेवाला यांचे संबंधीत अधिकारी वेळोवेळी मीटरची तपासणी करीत असतात. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीप्रमाणे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे दि.15/05/06 रोजी सामनेवाला यांचे दक्षता पथकाने तक्रारदारांच्या फॅक्टरीला भेट दिली व त्यांचे समक्ष विद्युत पाहणी केली. सामनेवाला यांनी बसविलेल्या विद्युत मीटरमध्ये तक्रारदारांनी कोणताही फेरफार केला नव्हता किंवा मीटरमध्ये कोणताही बिघाड केला नव्हता असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. उलटपक्षी सामनेवाला यांचे म्हणण्याप्रमाणे दक्षता पथकाने तक्रारदारांच्या विद्युत मीटरची पाहणी केली त्यावेळी विद्युत मीटरसंबंधीत खालील बाबी सामनेवालाच्या पथकाला निदर्शनास आल्या -
i) Meter T.B. Cover found missing
ii) Meter body orange plastic seals found tampered
iii) Meter found 70.5 % slow in testing
iv) After opening the meter phase I & II potentials coils wire found cut inside the meter.
सामनेवाला यांनी वरील म्हणण्याच्या पुष्टयर्थ सदर दक्षता पथकातील उप-अभियंता, श्री.सुभाष चव्हाण यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले असून सोबत विद्युत मीटरचे इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केले आहेत. याकामी तक्रारदारांनी त्यांचे समक्ष सामनेवाला यांचे दक्षता पथकाने त्यांचे विद्युत मीटरची पाहणी केली ही बाब मान्य केली आहे. तसेच, त्याच दिवशी सामनेवाला यांना तक्रारदारांनी रक्कम रु.70 हजार व पुढील तारखेचे 4 धनादेश दिले ही बाब देखील मान्य केली आहे. तक्रारदारांचे म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांचे दक्षता पथकाने अडवणूक केल्यामुळे वरील रक्कम सामनेवाला यांचे दक्षता पथकाला दिली त्यामुळे तक्रारदारांनी दि.15/05/06 रोजी माहीम पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. सदर प्रथम खबरीची छायांकित प्रत तक्रारदारांनी याकामी तक्रारअर्जासोबत दाखल केली आहे. वरील घटनेसंबंधी पोलीसांनी सामनेवाला यांचे अधिका-यांविरुध्द काय कारवाई केली ? याबाबत तक्रारदारांनी कोणताही खुलासा या मंचासमोर सादर केला नाही. उलटपक्षी सामनेवाला यांचेविरुध्द सत्र न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केल्याची बाब तक्रारदारांनी मान्य केली आहे.
वरील वस्तुस्थिती निदर्शनास आणून सामनेवाला यांचे वकील श्री.केतकर यांनी याकामी तक्रारदारांनी विजेची चोरी केली असून सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या विरुध्द मा.सत्र न्यायालयात फौजदारी केस दाखल केलेली असल्यामुळे सदरचा अर्ज या मंचासमोर चालविता येणार नाही असे म्हटले आहे. श्री.केतकर यांनी आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मा.राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, नवी दिल्ली यांचेAccount Officer, Jharkahand State Electricity Board & Asstt. Electrical Engineer, Jharkahnd State Electricity Board V/s. Anwar Ali, Proprietor, M/s.Pinki Plastic Industrial Area AND The Executive Engineer, Gujarat Electricity Board and Deputy Engineer, Gujarat Electricity Board V/s. Madresa Abriyah Talimul Muslin Min, Gujarat.या निकालाचा आधार घेतला. वरील निकालामध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने असे स्पष्टपणे नमूद केले आहे की,“Consumer Fora have no jurisdiction to interfere with the initiation of criminal proceedings or the final order passed by any Special Court constituted under Section 153 or the civil liability determined under Seciton 154 of the Electricity Act.”
सामनेवाला यांचे वकीलांनी मा.राज्य आयोगाची रिव्हीजन पिटीशन नं.51 व 52/2009 मधील दि.13/04/2009 च्या आदेशाची छायांकित प्रत दाखल केली असून मा.राज्य आयोगाने वर नमूद केलेल्या मा.राष्ट्रीय आयोगाच्या Account Officer, Jharkahand State Electricity Board... या निकालाचा आधार घेवून वरील रिव्हीजन पिटीशन मंजूर केल्याचे निदर्शनास आणले.
या प्रकरणात सामनेवाला यांनी तक्रारदारांनी विजेची चोरी केली असे दाखविणारा दक्षता पथकाचा अहवाल इत्यादी कागदपत्र दाखल केले असून तक्रारदारांच्या विरुध्द मा.सत्र न्यायालयात फौजदारी केस दाखल केली आहे. वरील वस्तुस्थिती विचारात घेता वर नमूद केलेल्या मा.राष्ट्रीय आयोगाच्याAccount Officer, Jharkahand State Electricity Board... या दि.10/04/2008 च्या आदेशाप्रमाणे या ग्राहक मंचास सदरचा तक्रारअर्ज चालविणेचा अधिकार नाही असे म्हणावे लागते. सबब तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे तसेच, तक्रारदारांनी याकामी दाखल केलेला तूर्तातूर्त ताकीदीचा अर्जही रद्द होणेस पात्र आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देणेत येते.
स्पष्टीकरण मुद्दा क्र.2 - या मंचास सदरचा तक्रारअर्ज चालविणेचा अधिकार नसल्यामुळे तक्रारदारांनी तक्रारअर्जात मागितलेली दाद या मंचास देता येणार नाही सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नाकारार्थी देणेत येते.
या मंचास सदरचा तक्रारअर्ज चालविणेचा अधिकार नसल्यामुळे प्रस्तुतचा तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
अं ति म आ दे श
1.तक्रार क्रमांक 370/2006 खर्चासहित रद्द करणेत येत आहे.
2. सदर आदेशाची प्रमाणित प्रत सर्व पक्षकारांना देणेत यावी.