द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
दि.20/01/2009 रोजी तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज बीईएसटी अंडरटेकिंग विरुध्द तथाकथित अवास्तव वाढीव विज बिलाबद्दल दाखल केला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सामनेवाला यांचेकडून विद्युत पुरवठा त्यांच्या कारनॅक बंदर येथील गोडाऊनमध्ये घेतलेला असून त्यांचा मीटर क्र.D815206 असा आहे. तक्रारदार सदर गोडाऊनमध्ये विजेचा वापर क्वचितच करीत असतात परंतु सामनेवाला यांनी दि.23/06/1999 व दि.31/07/2000 या कालावधीची वाढीव रकमेची विज बिले तक्रारदारांना पाठविली. सामनेवाला यांना वेळोवेळी पत्र पाठवून सुध्दा सामनेवाला यांनी त्याची दाद घेतली नाही म्हणून तक्रारदारांना सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल करावा लागला. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सदरच्या जादा वाढीव विजेच्या बिलाची रक्कम दि.31/07/2000 रोजी तक्रारदारांकडून मागण्यात आली. तक्रारादारांनी विज बिल दुरुस्त करुन द्यावे ही मागणी सामनेवाला यांनी नाकारली. सामनेवाला यांनी वरील जादा विज बिलावर व्याजाची आकारणी करुन व्याजापोटी रक्कम रु.51,308/- ची मागणी करुन तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.60,651/- ची मागणी केली. दि.31/10/2000 चे पत्राने विज बिलामध्ये दुरुस्ती करावी ही तक्रारदारांची विनंती सामनेवाला यांनी अमान्य केली. त्यानंतर वेळोवेळी सामनेवाला यांना पत्र लिहून सुध्दा सामनेवाला यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे सदरचा तक्रारअर्ज प्रस्तुत ग्राहक मंचासमोर दाखल करावा लागला. सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून अवास्तव जादा विजेच्या बिलाची रक्कम रु.60,651/- वसुल करुन नये असा सामनेवाला यांना आदेश करणेत यावा असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
2) तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत सामनेवाला यांना पाठविलेल्या पत्रांच्या छायांकित प्रती, विज बिलांच्या छायांकित प्रती, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
3) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी एकत्रितपणे कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 2(1)(d)(ii)प्रमाणे ग्राहक नाहीत. तक्रारदार हे साखरेचे घावूक व्यापारी असून साखरेची आयात व निर्यातीचा व्यवसाय करतात. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून विद्युत पुरवठा गोडाऊनमध्ये म्हणजेच व्यवसायासाठी घेतला होता. तक्रारदार हे ग्राहक नसल्यामुळे तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करणेत यावा अशी सामनेवाला यांनी विनंती केली आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या तक्रारअर्जास कारण घडले तेंव्हापासून 2 वर्षाच्या कालावधीत दाखल केलेला नाही. ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 24(A) तक्रारअर्ज तक्रारीस कारण घडल्यापासून 2 वर्षाच्या मुदतीत दाखल केलेला नसल्यामुळे तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे.
4) सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या सेवेमध्ये कसलीही कमतरता नाही. त्यांनी तक्रारदारांना जादा रकमेचे विज बिले दिली हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी नाकारलेला आहे. तक्रारदारांना केलेल्या विजेच्या वापराप्रमाणे बिले दिली आहेत. दि.03/11/2000 रोजी तक्रारदारांचा मीटर क्र.D815206 ची काच फुटल्याचे निदर्शनास आल्याने सामनेवाला यांनी नवीन मीटर क्र.C003919 दि.15/11/2000 रोजी बसविला. तक्रारदारांनी वेळोवेळी केलेल्या विजेच्या वापराचा तपशिल सामनेवाला यांनी कैफीयतमध्ये दिला आहे. तक्रारदारांच्या गोडाऊनच्या शेजारील झोपडपट्टीत अनधिकृतपणे विजेच्या जोडण्या आहेत व झोपडयातील रहिवाशांशी संगनमत करुन सामनेवाला यांनी तक्रारदारांना जादा रकमेची विज बिले दिली हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे बिनबुडाचा व खोटा आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांना पत्र पाठवून तक्रार दाखल केल्यानंतर सामनेवाला यांनी त्यावर चौकशी करुन योग्य तो खुलासा तक्रारदारांना केला व तक्रारदारांच्या प्रत्यक्ष विजेच्या वापराप्रमाणे तक्रारदारांना विज बिल दिल्याची बाब तक्रारदारांच्या निदर्शनास आणली. तक्रारदारांनी प्रत्यक्ष विज वापराची बिले वेळेवर दिली नाहीत म्हणून तक्रारदारांचा मिटर दि.14/06/2005 रोजी काढून टाकण्यात आला तरीसुध्दा तक्रारदारांनी कथीत विजेची बिले भरली नाहीत. सबब तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करण्यात यावा व तक्रारदारांना कमीतकमी प्रत्यक्ष वापरलेल्या विजेची आकारणी म्हणून सामनेवाला यांना रक्कम रु.18,335.42 व्याजासहित द्यावेत असा तक्रारदारांना आदेश करावा अशी सामनेवाला यांनी विनंती केली आहे.
5) या कामी तक्रारदारांनी, तसेच सामनेवाला यांनी लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार ग्राहक नाहीत त्यामुळे या मंचासमोर सदरचा तक्रारअर्ज चालू शकत नाही. तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 24(A) प्रमाणे तक्रारअर्ज मुदतीत दाखल न केल्यामुळे तो काढून टाकण्यात यावा अशी सामनेवाला यांनी विनंती केली आहे. तक्रारदारांचे प्रोप्रायटर श्री.राजेंद्रकुमार ओमप्रकाश मुरगई व सामनेवालातर्फे विधी अधिकारी श्री.राऊळ यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला व सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
6) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे ग्राहक सरंक्षण कायदयातील कलम 2(1)(d)(ii) प्रमाणे ग्राहक आहेत काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांनी तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 24(A)प्रमाणे मुदतीत दाखल केला आहे काय ?
उत्तर - नाही.
मुद्दा क्र.3 - तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केल्याप्रमाणे तक्रारदार हे सामनेवाला यांचेविरुध्द दाद मागण्यास पात्र आहेत काय?
उत्तर - नाही.
कारणमिमांसा -
मुद्दा क्र.1 - सदरचा तक्रारअर्ज श्री.राजेंद्रकुमार ओमप्रकाश मुरगई यांनी मे.शुगर सप्लाय आणि कं. यांचे प्रोप्रायटर म्हणून दाखल केलेला आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून विद्युत पुरवठा त्यांच्या कारनॅक बंदर येथील गोडाऊनमध्ये व्यापारी कारणासाठी घेतला आहे असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाला यांची सेवा व्यावसायीक कारणासाठी घेतलेली आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(d)(ii) मध्ये सन् 2002 मध्ये दुरुस्ती करण्यात आली असून या दुरुस्तीनुसार ज्यांनी व्यावसायिक कारणासाठी सेवा घेतली असेल त्यांना ग्राहक मानता येणार नाही. ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(d)(ii) मध्ये झालेल्या दुरुस्तीनुसार ग्राहक या व्याख्येतील ज्या व्यक्तीने व्यावसायिक कारणासाठी सेवा घेतली त्यांना ग्राहक या व्याख्येतून वगळले आहे. वरील दुरुस्ती केलेल्या कायदयाची अंमलबजावणी दि.15/03/2003 पासून सुरु झाली. या तक्रारअर्जात तक्रारदारांनी ज्या तथाकथित वाढीव विद्युत बिलांसंबंधी सामनेवाला यांचेविरुध्द आरोप केले आहेत ती विद्युत बिले ही दि.31/07/2000 व त्यापूर्वीची आहेत. तक्रारदारांनी दि.31/07/2000 व त्यापूर्वीच्या बिलासंबंधी सदरचा तक्रारअर्ज दाखल केलेला असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(d)(ii) च्या दुरुस्त केलेल्या तरतुदी या प्रकरणी लागू होणार नाहीत. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार तक्रारदार ग्राहक आहेत असे म्हणावे लागते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.2 - सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज तक्रारअर्जास कारण निर्माण झाले तेंव्हापासून 2 वर्षाच्या आत दाखल केलेला नाही त्यामुळे तक्रारअर्ज मुदतीत नसल्यामुळे तो फेटाळण्यात यावा. ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 24(A) प्रमाणे तक्रारअर्जास कारण निर्माण झाल्यापासून 2 वर्षाच्या आत तक्रारअर्ज दाखल करणे आवश्यक आहे. वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी या तक्रारअर्जात त्यांनी सामनेवाला यांनी दि.31/07/2000 किंवा त्यापूर्वी दिलेल्या विजेच्या बिलासंबंधी दाद मागितली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी वाढीव रकमेच्या विज बिलांची मागणी केल्यानंतर सामनेवाला यांना वेळोवेळी पत्र पाठवून सामनेवाला यांनी त्यांना दाद दिली नाही म्हणून तक्रारअर्ज मुदतीत आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांना वेळोवेळी पत्रे पाठविली या कारणावरुन कायदयाप्रमाणे ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये वाढ होत नाही. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला नाही. तक्रारअर्जास सन् 2000 मध्ये कारण घडलेले असताना तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दि.20/01/09 रोजी म्हणजेच जवळजवळ 8 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर दाखल केलेला आहे. सदर तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मुदतीत दाखल केलेला नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.3 - तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदयाप्रमाणे ठरवून दिलेल्या मुदतीत दाखल केलेला नसल्यामुळे तो रद्द होणेस पात्र आहे. त्यामुळे तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून कसलीही दाद मागता येणार नाही त्यामुळे मुद्दा क्र.3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब वर नमूद केलेल्या कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे.
अं ति म आ दे श
1.तक्रार क्रमांक 28/2009 खर्चासहित रद्द करणेत येत आहे.
2.सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.