::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 21.09.2015 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दूरभाष करिता दि.19/2/1987 रोजी आगाऊ रक्कम म्हणून रु. 800/- जमा केले होते. त्यानंतर सन 1995-96 मध्ये विरुध्दपक्षाने दुरभाष क्र. 431831 तक्रारकर्त्यास दिले, ज्याचा नंबर बदलून 2414831 असे करण्यात आला. तक्रारकर्त्याने नियमितपणे विरुध्दपक्षाने दिलेल्या बिलांची रक्कम भरलेली आहे. दि. 30/5/2014 रोजी तक्रारकर्त्याने त्याचा दूरभाष दि. 31/5/2014 पासून बंद करण्याकरिता कळविले व जमा रक्कम परत करण्याची विनंती केली. तसेच सदर दूरभाषचे इन्सट्रुमेंट विरुध्दपक्षाकडे जमा केले. परंतु वेळोवेळी तोंडी व लेखी विनंती करुन देखील जमा रक्कम वापस केल्या गेली नाही. तक्रारकर्त्याने दि. 18/12/2014 रोजी पुन्हा जमा रक्कम परत करण्याबाबत कळविले. परंतु विरुध्दपक्षाने सदर जमा रक्कम दिली नाही. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व रु. 800/- डिपॉझीट रक्कम व त्यावर 15 टक्के प्रमाणे दि. 1/7/2014 पासून रक्कम हातात देईपर्यंत व्याज, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. 5000/- तसेच तक्रारीचे खर्चापोटी रु. 3000/- विरुध्दपक्षाकडून मिळावे.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून पुरावा म्हणून तक्रारीसोबत संबंधीत दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखी जवाब
2. विरुध्दपक्ष यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जबाब दाखल करुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल केली आहेत व पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने दि. 30/5/2014 रोजी त्याचे दूरभाष क्र. 2414831 हे बंद करण्याकरिता कळविले व जमा रक्कम परत करण्याची विनंती केली तसेच दूरभाष इन्सट्रुमेंट विरुध्दपक्षाला परत केले, ही बाब मान्य आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास कोणतेही उत्तर दिले नाही किंवा तक्रारकर्त्याची जमा रक्कम परत केली नाही, ही बाब मान्य आहे. तक्रारकर्त्याने त्याचा टेलिफोन बंद करुन टेलिफोन संच दि. 31/5/2014 रोजी विरुध्दपक्षाकडे जमा केलेला आहे, त्यामुळे तो विरुध्दपक्षाचा ग्राहक नाही. सदर तक्रारकर्त्याच्या जमा रकमेसंबंधी विरुध्दपक्षाने संपुर्णत: तक्रारकर्त्याला रक्कम परत करणे विषयी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले असून, सदर रकमेकरिता प्रपोजल, सर्कल ऑफीस मुंबई वरुन पास होवून आल्या शिवाय विरुध्दपक्षाला ते तक्रारकर्त्याला देता येत नाही व त्या कार्यवाहीत एवढा वेळ लागतोच, ही संपुर्ण माहिती विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला वेळोवेळी दिली आहे. विरुध्दपक्षाच्या अकोल्यातील कार्यालयीन अधिका-यांच्या हातात काहीही नसल्यामुळे ते काहीही करु शकत नव्हते. त्यामुळे सदर रक्कम तक्रारकर्त्याला देण्यास वेळ झाला, परंतु विरुध्दपक्षाने सदर रु.761/- रकमेचा धनादेश पोस्टाने तक्रारकर्त्याला पाठविला असून, तो तक्रारकर्त्याला मिळाला आहे, त्यामुळे सदर तक्रारीत कुठलेही तथ्य उरले नाही. त्यामुळे सदर तक्रार खारीज करावी.
विरुध्दपक्ष यांनी सदर जवाब हे प्रतिज्ञालेखावर दाखल करुन त्यासोबत संबंधीत दस्तऐवज जोडले.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार व दस्तऐवज, विरुध्दपक्ष यांनी दाखल केलला लेखी जवाब, तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचा तोंडी युक्तीवाद, यांचा सखोल अभ्यास करुन मंचाने खालील प्रमाणे निष्कर्ष काढला, तो येणे प्रमाणे …
1. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांवरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा “ग्राहक” असल्याचे निदर्शनास येते. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने त्याचा टेलिफोन बंद करुन टेलिफोन संच दि. 31/05/2014 रोजी विरुध्दपक्षाकडे जमा केला असल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक नाही. यावर मंचाचे असे मत आहे की, जरी तक्रारकर्त्याने सदर टेलिफोन संच विरुध्दपक्षाकडे जमा केलेला असला तरी प्रकरण दाखल करे पर्यंत विरुध्दपक्षाने त्यांचेकडे असलेली तक्रारकर्त्याची अनामत रक्कम, तक्रारकर्त्याला परत केलेली नव्हती, त्यामुळे तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्यातील अनुक्रमे ग्राहक व सेवा देणारा, हे नाते संपुष्टात आले नव्हते. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक नाही, हा विरुध्दपक्षाचा आक्षेप फेटाळून, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येत आहे.
2. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, विरुध्दपक्ष यांनी 1995-96 मध्ये दूरभाष क्र. 431831 तक्रारकर्त्यास दिला व काही दिवसांनंतर नंबर बदलून 2414831 हा दिला. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाची नियमित बिले भरत होता. तक्रारकर्त्याने सदर फोन 2414831 हा दि.31/5/2014 पासून बंद करावे, अशी सुचना विरुध्दपक्षाला दिली व तक्रारकर्त्याने जमा केलेली रक्कम रु. 800/- परत करण्याची विनंती केली. तक्रारकर्त्याने वेळोवेळी जमा रक्कम परत करण्याची विनंती विरुध्दपक्षाला केली. दि. 18/12/2014 ला सुध्दा तक्रारकर्त्याने विनंती केली. विरुध्दपक्षाने जमा रक्कम परत करण्यास बराच वेळ लावलेला आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला द.सा.द.शे 15 टक्के प्रमाणे व्याज द्यावे, अशी विनंती तक्रारकर्त्याने केलेली आहे.
3. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने दि. 30/5/2014 रोजी त्याचे दुरभाष क्र. 2414831 हे बंद करण्याकरिता कळविले होते व तक्रारकर्त्याने जमा केलेली रक्कम परत करण्याची विनंती केली होती, हे विरुध्दपक्षाने मान्य केलेले आहे. तक्रारकर्त्याने सदर संच दि. 31/5/2014 ला विरुध्दपक्षाकडे जमा केलेला आहे. विरुध्दपक्षाने सदर जमा रकमेचा चेक रु. 761/- तक्रारकर्त्याला दि. 24/3/2015 ला पाठविला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची जमा रक्कम परत केलेली आहे. चेक देण्यास जो वेळ लागला, त्याचे कारण विरुध्दपक्षाच्या अकोल्यातील कार्यालयीन अधिका-यांच्या हातात कोणताही अधिकार नसल्यामुळे सदर रक्कम तक्रारकर्त्याला देण्यास विलंब झाला आहे.
4. उभय पक्षातील युक्तीवाद ऐकला असता व दाखल दस्तांचे अवलोकन केले असता, विरुध्दपक्षाने रु. 39/- कपात केल्याचा खुलासा, जो तोंडी युक्तीवादाच्या वेळी केला, त्याचा उल्लेख त्यांच्या जबाबात कुठेही आढळून येत नाही. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याने दि. 30/5/2014 रोजी त्याचा दुरभाष क्र. 2414831 हे दि. 31/5/2015 पासून बंद करण्याकरिता कळवले होते व त्या तारखेपर्यंत सर्व देयकांचा भरणा त्याने विरुध्दपक्षाकडे केलेला होता. सदर रु. 39/- ची कपात दुरध्वनी कनेक्शन ख्ंडीत करे पर्यंतच्या कालावधीतील देयकापोटी केली असल्याची बाब विरुध्दपक्षाने केवळ तोंडी युक्तीवादाच्या वेळी केल्याने तक्रारकर्ता सदर देयके प्रकरणात दाखल करु शकला नाही. तक्रारकर्त्याची सदर अनामत रक्कम परत देण्यास विलंब झाल्याचे विरुध्दपक्षालाही मान्य आहे. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याला दिलेल्या धनादेशावरील तारीख जरी 2015 च्या मार्च महिन्यातील असली तरी ज्या लिफाफ्यातून तक्रारकर्त्याला सदर धनादेश पाठवण्यात आला, त्यावरील पोस्टाच्या शिक्क्यावरुन दि. 29/5/2015 ला तक्रारकर्त्याला सदर धनादेश पाठवलेला दिसून येतो, जो माहे जुन 2015 ला तक्रारकर्त्याला मिळाल्याचे तक्रारकर्त्याने म्हटले आहे. त्याच प्रमाणे मंचातर्फे दि. 16/04/2015 रोजी विरुध्दपक्षाला सदर प्रकरणात नोटीस पाठवण्यात येऊन दि. 21/5/2015 रोजी मंचासमोर उपस्थित राहण्याबद्दल कळवण्यात आल्यानंतर, विरुध्दपक्षाने तातडीने कारवाई करुन दि. 29/5/2015 रोजी, सदर धनादेशावर दि. 24/03/2015 अशी तारीख नमुद असतांना प्रत्यक्षात दोन महिन्यानंतर सदर धनादेश तक्रारकर्त्याला पाठवण्यात आल्याचेही मंचाच्या निदर्शनास आले आहे. त्याच प्रमाणे रु. 39/- कपाती बद्दल कुठलाही ठोस कागदोपत्री पुरावा विरुध्दपक्ष मंचासमोर दाखल करु शकला नाही किंवा तक्रारकर्त्याकडे तेवढी देयकाची रक्कम शिल्लक होती, त्यामुळे सदर कपात केली, हे सुध्दा विरुध्दपक्ष पुराव्यासह सिध्द करु शकला नसल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाकडून संपुर्ण अनामत रक्कम रु. 800/- द.सा.द.शे. 8 टक्के दराने व्याजासह मिळण्यास पात्र असल्याचे व प्रकरण खर्चासह नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे……
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला रु. 800/- ही अनामत रक्कम, त्यावरील दि. 1/7/2014 ते देय तारखेपर्यंतच्या कालावधीकरिता द.सा.द.शे 8 टक्के दराने, व्याजासह द्यावी
3) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 3000/- व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
5) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.