सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 120/2015
तक्रार दाखल दि.14-05-2015.
तक्रार निकाली दि.12-08-2015.
श्री. इरण्णा आयण्णा औवजण्णा,
रा. संगीता अपार्टमेंट, विकासनगर,
देहू रोड, मेन रोड, पुणे – 411 101. .... तक्रारदार.
विरुध्द
1. अजमत कन्स्ट्रक्शन
ऑफीस पत्ता- सुयोगलहर,ए-विंग बिल्डींग,
फ्लॅट नं.1001, शितल पेट्रोल पंपामागे,
कोंडवा, पुणे.
2. अजमत कन्स्टक्शन तर्फे भागीदार,
मन्सूर इसाक पटेल,
रा. गणेश कॉम्प्लेक्स, संभाजीनगर,
चिंचवड, पुणे – 411 019. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.ए.आर.कदम.
जाबदार क्र.1 व 2 – एकतर्फा.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे पुणे येथील रहिवासी आहेत. तक्रारदाराने प्रविण ओमप्रकाश आगरवाल, अशोक बैलीराम आगरवाल व श्री. इराण्णा अयण्णा औवजण्णा यांच्यासोबत ‘ओम कन्स्ट्रक्शन’ ही भागीदारी संस्था स्थापन केली होती. ओम कन्ट्रक्शनतर्फे भागीदार म्हणून तक्रारदार व त्यांचे तीन मित्र यांनी मौजे करंजे तर्फ सातारा ता.जि.सातारा येथील नगरपरिषद हद्दीबाहेरील बिगरशेती रि.स.नं.393/2+3/4 अ/4 या बिगरशेती मिळकतीमधील प्लॉट नं.17 यांचे क्षेत्र 154.00 चौ.मी., प्लॉट नं.18 याचे क्षेत्र 171.50 चौ.मी. प्लॉट नं. 19 यांचे क्षेत्र 171.5. चौ.मी. व प्लॉट नं.20 याचे क्षेत्र 154.00 चौ.मी. अशी संपूर्ण 651.00 चौ.मी. ही मिळकत निवासी वापरासाठी खरेदी केली होती. सदर मिळकत खरेदी केलेनंतर विकसन करणेसाठी देवून त्यांचे मोबदल्यात प्रस्तुत इमारतीतून सदनिका घेणेचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रस्तुत मिळकत विकसन करणेसाठी जाबदार यांना देणेचे ठरवले व त्याबदल्यात जाबदाराने तक्रारदाराला निवासी सदनिका देण्याचे मान्य केले होते व आहे. त्या अनुषंगे दि.8/4/2010 रोजी विकसन करारनामा दस्त नं.2258/2010 जाबदार यांचेबरोबर केला आहे. सदर मिळकत विकसीत करुन इमारत बांधणेसाठीचे सर्व हक्क व अधिकार तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेले होते व आहेत. त्या मोबदल्यात जाबदार तक्रारदार यांना नियोजीत बांधत असले इमारतीमधील निवासी सदनिका देणेचे ठरविले होते. तक्रारदार व त्यांचे अन्य भागीदार यांनी सदरील मिळकतीवर बांधकाम करुन विकसीत केले, ओनरशीप तत्वावर बांधकाम केले. इमारतीमधील तक्रारदार यांना दिलेली सदनिका सोडून इतर सर्व निवासी सदनिका व गाळे विक्री करण्याचे सर्व हक्क व अधिकार दि.8/4/2010 च्या नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्राने जाबदार यांना दिलेले होते. त्यानुसार जाबदाराने वर नमूद मिळकतीत प्लॉट नं. 17,18,19 व 20 याचे एकत्रीत क्षेत्र 651 चौ.मी. या मिळकतीवर राज रेसिडेन्सी फेज 2 या ओनरशीप इमारतीचे बांधकाम सुरु केले. सदर इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं. एस.1 यांचे क्षेत्र 615 चौ. फूट 57.15 चौ.मी. बिल्टअप एरिया ही निवासी सदनिका सदर जाबदार यांनी तक्रारदार यांना प्रस्तुत बांधकामाच्या मोबदल्यात देण्याचे मान्य व कबूल केले होते. व प्रस्तुत सदनिका जाबदार यांनी करार झाले तारखेपासून दिड वर्षाचे आत बांधकाम पूर्ण करुन त्याचा ताबा तक्रारदारास देणेचे मान्य व कबूल केले होते. तथापी जाबदार यांचा जानेवारी 2013 मध्ये अपघात झाला व ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर जवळ-जवळ दिडवर्षे जाबदार बेडरेस्टवर होते. परंतू त्यानंतर जाबदार अपघातातून सावरल्यानंतर प्रस्तुत तक्रारदाराने त्याचेकडे अर्धवट राहीले बांधकाम पूर्ण करुन मागीतले. त्यावेळी जाबदाराने 75 टक्के बांधकाम पूर्ण केले होते. उर्वरीत बांधकाम जाबदार यांनी अद्यापपर्यंत पूर्ण केलेले नाही. तसेच प्रस्तुत तक्रारदाराला या इमारतीतील कराराला ठरलेप्रमाणे सदनिकेचा ताबा दिलेला नाही अगर सदर सदनिकेचे खुषखरेदीपत्रही करुन दिलेले नाही. त्यामुळे जाबदाराने करारातील अटी व शर्थींचा भंग केला आहे व तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून ‘राज रेसिडेन्सी फेज-2’ या इमारतीमधील दुस-या मजल्यावरील निवासी सदनिका क्र. एस-3 चे बांधकाम विकसन करारात ठरलेप्रमाणे गुणवत्तापूर्वक कोणताही जादा मोबदला न घेता पूर्ण करुन सदर सदनिकेचा ताबा तक्रारदाराला देण्याचा हुकूम व्हावा, प्रस्तुत जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना बांधकाम पूर्ण झालेचा दाखला देववावा, तसेच प्रस्तुत सदनिकेचे खरेदीपत्र जाबदाराने तक्रारदाराला तात्काळ करुन देणेचे आदेश व्हावेत, आर्थिक नुकसानीपोटी जाबदाराकडून रक्कम रु.5,00,000/- तक्रारदाराला मिळावेत, तक्रारदार यांना मानसिकत्रासाबाबत रक्कम रु.2,00,000/- जाबदाराकडून मिळावेत, रक्कम रु.30,000/- अर्जाचा खर्च जाबदाराकडून मिळावा अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 4 चे कागदयादी सोबत तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान झालेला विकसन करारनामाची प्रत, नि. 8 कडे अंतरीम ताकीदीचा अर्ज व प्रस्तुत अर्जाचे अँफीडेव्हीट नि. 9 कडे, नि. 14 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 15 कडे पुरावा संपलेची पुरसीस तसेच पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे हाच लेखी युक्तीवाद समजणेत यावा म्हणून पुरसीस वगैरे कागदपत्रे मे मंचात दाखल केली आहेत.
4. जाबदार यांना प्रस्तुत तक्रार अर्जाची नोटीस लागू झालेली आहे. त्याची पोहोच पावती नि. 13 कडे दाखल आहे. सदरची नोटीस जाबदाराला लागू होवूनही जाबदार याकामी मे मंचात हजर राहीले नाहीत तसेच तक्रार अर्जातील कथन खोडून काढणेसाठी म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब प्रस्तुत जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे मंचाने पुढील मुदद्यांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-प्रस्तुत कामी तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान तक्रार अर्जात नमूद वादातीत मिळकतीचा विकसन करारनामा झालेला होता व आहे. प्रस्तुत नोंदणीकृत करारनाम्याची सत्यप्रत तक्रारदाराने याकामी नि. 4 चे कागदयादीसोबत दाखल केली आहे. तसेच याकामी जाबदार यांना नोटीस लागू होवूनही ते मे. मंचात गैरहजर राहीले. नोटीसची पोहोचपावती नि. 13 कडे दाखल आहे. प्रस्तुत जाबदार मे. मंचात गैरहजर राहीलेमुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत करणेत आला आहे. जाबदाराने तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब तक्रारदाराने तक्रार अर्जात केलेली कथने खरी आहेत असे गृहीत धरणे योग्य व न्यायोचीत वाटते. सबब तक्रार अर्जात नमूद केले कथनाप्रमाणे जाबदार यांनी तक्रारदार यांना करारनाम्यात ठरलेप्रमाणे मौजे करंजे तर्फ सातारा ता.जि.सातारा येथील नगरपरिषद हद्दीबाहेरील बिगरशेती मिळकत रि.स.नं.393/2+3 /4अ/4 या मिळकतीतील प्लॉट नं.17, प्लॉट नं. 18, प्लॉट नं. 19 व प्लॉट नं. 20 या मिळकतीतील जाबदाराने विकसीत करुन उभारलेल्या इमारतीमधील ‘राज रेसिडेन्सी’ फेज 2 या इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं. एस.-3 यांचे क्षेत्र 615 चौ.फू. 57.15 चौ.मी. बील्टअप एरिया ही निवासी सदनिकाचे बांधकाम पूर्ण करुन न देता तसेच सदर सदनिकेचा ताबा व खरेदीपत्र जाबदाराला करुन न दिलेने जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा दिलेचे सिध्द होते. म्हणजेच तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत व जाबदाराने तक्रारदाराला तक्रार अर्जात कथन केलेप्रमाणे सदोष सेवा पुरविली आहे या बाबही निर्विवाद स्पष्ट होत असलेचे आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
वरील सर्व स्पष्टीकरण कागदपत्रे, तक्रारदाराचा पुरावा व तोंडी युक्तीवाद यांचा विचार करता तकारदार हे जाबदार यांचेकडून तक्रार अर्जात केले विनंतीप्रमाणे जाबदाराकडून पूर्तता करुन घेणेस व नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना ‘राज रेसिडेन्सी फेज-2’ या इमारतीमधील दुस-या
मजल्यावरील निवासी सदनिका क्र. एस.3 यांचे बांधकाम विकसन करारात
ठरलेप्रमाणे गुणवत्तापूर्वक सदनिकेचे खरेदीपत्र तात्काळ करुन द्यावे व
प्रस्तुत सदनिकेचा ताबा जाबदाराने तक्रारदार यांना द्यावा.
3. तक्रारदार यांना जाबदारांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला अदा द्यावा.
4. जाबदाराने तक्रारदाराला ‘राज रेसिडेन्सी फेज-2’ मधील दुस-या मजल्यावरील
निवासी सदनिका क्र. एस.3 या सदनिकेचे खरेदीपत्र तात्काळ करुन द्यावे
5. जाबदाराने तक्रारदार यांना आर्थीक नुकसानीपोटी रक्कम रु.50,000/- (रुपये
पन्नास हजार फक्त) अदा करावेत तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम
रु.25,000/-(रुपये पंचवीस हजार फक्त) तक्रारदारास जाबदाराने अदा करावेत.
6. अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
7. वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांचे आत
करावे.
8. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
9. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
10. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 12-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (सौ.सविता भोसले)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.