न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून त्यांनी विकसीत केलेल्या वसंत प्लाझा या संकुलामधील तिसरे मजलेवरील फ्लॅट क्र.सी-4 ही मिळकत खरेदी करण्यासाठी दि. 30/7/10 रोजी खरेदीपूर्व करार रजिस्टर्ड केलेला होता. तसेच सदर मिळकतीचे खरेदीपत्र वि.प. यांनी दि. 5/9/2011 रोजी तक्रारदार यांना करुन दिलेले होते व आहे. सदरचे करारपत्र व खरेदीपत्रामध्ये तसेच प्रचलित नियमानुसार सदर मिळकतीचा ताबा दिले तारखेपूर्वीची कोणतीही सरकारी येणे-देणी, फाळा इ. देणेची जबाबदारी वि.प.क्र.1 यांचेवर असलेचा स्पष्ट उल्लेख आहे. तक्रारदार यांनी सदर मिळकत खरेदी केल्यानंतर दि. 27/11/11 रोजी तक्रारदार यांना वि.प.क्र.3 यांचेकडून सदर मिळकतीचा सन 2009-10 व सन 2010-11 व सन 2011-12 असा एकत्रित फाळा रु. 21,547/- बाकी असलेचे बिल तक्रारदार यांना मिळाले. तक्रारदार यांनी सदरचा फाळा भरणेसाठी वि.प.क्र.1 यांना कळविले. वि.प.क्र.3 यांचेकडून फाळा भरणेसाठी तगादा येवू लागल्याने तक्रारदार यांनी जाबदार क्र.3 यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली. परंतु त्यांनी पहिली थकबाकी भागविलेशिवाय काहीच करता येणार नाही अशी आडमुठीची भूमिका घेतलेने तक्रारदाराने नाईलाजाने तडजोडीची भूमिका घेवून बिलाची रक्कम रु.11,699/- इतकी रक्कम भरली. तथापि सन 2014-15 मध्ये पुन्हा वि.प.क्र.2 यांनी थकबाकीसह रु.10,850/- चे बिल दिले. तक्रारदारांनी मागील बिल दाखवून थकबाकी नसलेचे व बिल दुरुस्त करुन देणेची मागणी केली. त्यावेळी वि.प.क्र.3 यांनी मागील भरलेल्या फाळयाची नोंद संगणकावर नाही असे सांगितले. त्यावेळी तक्रारदार यांनी पुन्हा दि. 21/7/14 रोजी रु.1,969/- इतकी रक्कम भरली. परंतु वि.प.क्र.3 यांनी पुन्हा सन 2015-16 सालासाठी रु. 37,605/- इतक्या थकीत रकमेची नोटीस तक्रारदार यांना पाठविली. त्यास तक्रारदारांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तदनंतर तक्रारदार यांना सन 2016-17 सालाकरिता रु. 44,481/- चे बिल आले. म्हणून तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांना नोटीस पाठवून सदर थकीत बिल भरणेची मागणी केली. परंतु वि.प.क्र.1 यांनी त्यास खोटया मजकूराचा खुलासा दिला आहे. सबब, जाबदार क्र.1 यांनी, फाळयाची रक्कम जी तक्रारदार यांनी वि.प.क्र.3 यांचेकडे जमा केली आहे, ती रु. 32,541/- तक्रारदार यांना परत करणेचा आदेश व्हावा, वि.प.क्र.1 ते 3 यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत खरेदीपूर्व करारनामा, डीड ऑफ अपार्टमेंट, घरफाळा मागणी बिले, तक्रारदाराने भरलेल्या रकमेची पावती, तक्रारदारांचा अर्ज, तक्रारदारांनी पाठविलेली नोटीस, नोटीसीच्या पावत्या, पोहोच पावत्या, वि.प.क्र.3 यांचे नोटीस उत्तर, तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांना पाठविलेली नोटीस, नोटीसीची पावती, पोहोच पावती, नोटीस उत्तर, प्रॉपर्टी कार्ड, बक्षिसपत्र, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 यांनी याकामी दि.15/4/17 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल करुन तक्रारदाराचे तक्रारीतील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, सदरकामी प्राथमिक मुद्दे काढणेचे गरजेचे आहे. वि.प. यांनी तक्रारदाराचे मिळकतीचे भोगवटा प्रमाणपत्रासाठी सर्व कर, खर्च, घरफाळा इ. चा भरणा त्यावेळी अदा केलेने कोल्हापूर महानगरपालिकेन वि.प.क्र.1 यांना भोगवटा प्रमाणपत्र दिलेले आहे. जर घरफाळा शिल्लक असता तर कोल्हापूर महानगरपालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिलेच नसते. तसेच तो शिल्लक असता तर तशी नोटीस आजअखेर कधीतरी आली असती. तसे घडलेले नाही. यावरुन कोणतीही रक्कम बाकी नाही हे स्पष्ट होते. वि.प.क्र.1 यांनी सदर मिळकत सन 2010 मध्येच भारती हेंद्रे यांचे ताब्यात दिली आहे. तदनंतर सन 2009-10, 2010-11 व 2011-12 या वर्षाचे बाबतीत तक्रारदाराने कोणतीही तक्रार वि.प.कडे उपस्थित केलेली नाही. तदनंतर सदरची मिळकत तक्रारदाराने श्रीमती हेंद्रे यांचेकडून हस्तांतरीत करुन घेतले असलेचे दिसते. तसे करताना तक्रारदाराने मिळकतीचे सर्व कर, देणी यांची माहिती करुन घेणे गरजेचे होते. श्रीमती हेंद्रे यांचेतर्फे त्यांचे जावई श्री चारुदत्त यांनी दि. 9/10/10 रोजी लिहून दिले पत्राप्रमाणे वि.प. यांचे रकमेचे बाबतीत कोणतीही जबाबदारी नव्हती व अशी कोणतीही रक्कम अदा करणेची जबाबदारी श्रीमती हेंद्रे यांनी स्वीकारली होती. सदर मिळकतीतून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न तक्रारदार करीत असलेने महापालिकेकडून जादा घरफाळा आकारला जात असण्याची शक्यता आहे. वि.प. व हेंद्रे यांचेमध्ये ठरलेप्रमाणे लोकल टॅक्स भरणेचा खर्च हेंद्रे/तक्रारदाराने करणेचा होता. सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. वि.प.क्र.2 व 3 यांनी तक्रारदाराचे तक्रारीस दि. 7/4/17 रोजी म्हणणे दाखल केले असून तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असे नाते नाही. मिळकतीचा ताबा दिले तारखेपूर्वीची सर्व सरकारी येणी-देणी, फाळा इ. देणेची जबाबदारी ही वि.प.क्र.12 यांची आहे. घरफाळा सुरु करुन घेतलेपासून घरफाळा न भरलेने थकबाकी व त्यावरील दंड अशी सर्व रक्कम मिळून सध्याचे घरफाळा बिल आले आहे. तक्रारदार यांनी निव्वळ थकीत घरफाळा भरणेस टाळाटाळ करणेच्या उद्देशाने वि.प. यांना नोटीस पाठविली होती. त्यास वि.प. यांनी रितसर उत्तर दिले आहे. तक्रारदार हे मे. मंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तक्रारदार यांनी सन 2010 मध्ये मिळकत खरेदी केली आहे. मिळकत खरेदी करतेवेळी सदर मिळकतीचा घरफाळा भरला आहे का, याबाबत सन 2010 अखेर येणे-देणे बाबतचा दाखला घेणे आवश्यक होते. सबब, तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा व नुकसान भरपाई म्हणून वि.प. यांना तक्रारदाराकडून रु.10,000/- वसूल होवून मिळावी अशी मागणी वि.प.क्र.2 व 3 यांनी केली आहे.
वि.प. क्र. 2 व 3 यांनी याकामी पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय ? | होय. |
3 | वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे घरफाळयाची रक्कम परत मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. प्रस्तुतकामी तक्रारदार यांची आई श्रीमती भारती जगदीश हेंद्रे यांनी सि.स.नं.1039 ख, ई वॉर्ड, कोल्हापूर या मिळकतीवरील वसंत प्लाझा या रहिवासी संकुलातील तिसरे मजलेवरील फ्लॅट युनिट क्र. सी-4, क्षेत्र 117.56 चौ.मी. ही वि.प.क्र.1 यांचेकडून रजि.दस्त क्र. 5058/11 अन्वये ता. 5/9/11 रोजी रक्कम रु.20,00,000/- मोबदल्यापोटी खरेदी केलेली होती. तक्रारदार यांचे आईने वि.प.क्र.1 यांना सदर मिळकत खरेदीपोटी अॅडव्हान्स रक्कम रु.10,00,000/- रजि. दस्त क्र. 4573/10 ने ता. 30/7/2010 रोजी करारपत्र करुन दिले. वि.प.क्र.1 यांनी ता.12/8/10 रोजी तक्रारदारांचे आईला सदर मिळकतीचा ताबा दिला होता. तदनंतर सदरची मिळकत तक्रारदारांची आई श्रीमती भारती हेंद्रे यांनी रजि. दस्त क्र. 151/2004 ता. 31/12/13 रोजी बक्षिसपत्राने मालकी हक्काने तक्रारदार यांना दिले. सदरचे बक्षिसपत्र वि.प. यांनी नाकारलेले नाही. सदरचे बक्षिसपत्र तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेले आहे. सदरचे बक्षिसपत्राने वाद मिळकतींवर तक्रारदार यांचा मालकी हक्क प्रस्थापित झालेने सदर वाद मिळकतीचे तक्रारदार हे मालक आहेत. त्या कारणाने तक्रारदार हे वि.प.क्र.1 यांचे ग्राहक आहेत तसेच सदर वाद मिळकतीचे घरफाळा हा तक्रारदार व तक्रारदार यांची आई वि.प.क्र.2 व 3 यांचेकडे भरत असलेने तक्रारदार हे वि.प.क्र.2 व 3 यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. क्र.1 ते 3 यांचे ग्राहक आहेत. प्रस्तुतची मिळकत खरेदी केलेनंतर ता. 27/12/11 रोजी तक्रारदार यांना वि.प.क्र. 3 यांचेकडून वाद मिळकतीचा सन 2009-10 सन 2010-11 व 2011-12 असा एकत्रित फाळा रु. 21,547/- बाकी असलेचे बिल मिळाले. त्यानंतर तक्रारदार यांनी सदरचे खरेदीपूर्वीचा फाळा भरणेसाठी वि.प.क्र.1 यांना कळविले. वि.प.क्र.3 यांचेकडून वरचेवर फाळा भरणेसाठी तगादा येवू लागल्याने वि.प.क्र.3 यांनी दंडाची रक्कम माफ करुन अंतिम बिलाची रक्कम रु.11,691/- इतकी रक्कम तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे भरली. तदनंतर ता. 21/7/2014 रोजी रु.1,969/- थकबाकीपोटी भरली. तथापि वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार यांनी रक्कम अदा केलेनंतर परत सन 2011 नंतर आता परत 2017 मध्ये त्याच प्रकारची तक्रार उपस्थित करता येणार नाही. त्या कारणाने सदरचा अर्ज मुदतबाहयरित्या दाखल केलेला आहे, सबब सदरची तक्रार मुदतीत आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होता. या मंचाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांना दि. 25/8/16 रोजी वि.प.क्र. 2 व 3 यांचे कर अधिक्षक, कोल्हापूर महानगरपालिका यांनी घरफाळा आकारणी बाबत नोटीस पाठविली. सदर नोटीसीस दि 13/12/2003 पासून घरफाळा लागू करुन घेतलेला असून घरफाळा न भरलेने थकबाकी व दंडाचे रकमेची मागणी केलेली आहे. सदरी नोटीसीनुसार तक्रारदार यांचे वकीलांनी ता. 7/12/16 रोजी वि.प.क्र.1 यांना लिगल नोटीस पाठविलेली असून सदरचे नोटीसीस वि.प.क्र.1 यांनी ता. 20/12/2016 रोजी उत्तर दिलेले आहे. सदरच्या नोटीसीची स्थळप्रत तक्रारदार यांनी मंचात दाखल केलेली आहे. सदर नोटीस वि.प.क्र.1 यांनी नाकारलेली नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांचे तक्रारीस सततचे कारण (Continuous cause of action) घडले असलेने तक्रारदारांची तक्रार मुदतीत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार यांनी वाद मिळकतीचे घरफाळयाची थकीत रक्कम वि.प.क्र.2 व 3 यांचेकडे भरली असताना देखील ता. 25/8/16 रोजी वि.प.क्र.2 व 3 यांनी तक्रारदार यांना थकीत घरफाळयाची नोटीस पाठवून व वि.प.क्र.1 यांनी थकीत घरफाळा न भरुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प.क्र.1 यांनी दाखल केले म्हणणेचे अवलोकन केले असता, संपूर्ण व्यवहार, घरफाळा आकारणे, या बाबी मिळकत धारक व वि.प.क्र.2 व 3 यांचेशी निगडीत असल्याने त्यामध्ये वि.प.क्र.1 यांनी भाष्य करणे चुकीचे आहे. सन 2003 चा फाळा शिल्लक राहिला असता तर कोल्हापूर महानगरपालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिले नसते. सदर मिळकत 2010 मध्ये श्रीमती भारती हेंद्रे यांना ताब्यात दिलेली होती. त्यानंतर श्रीमती हेंद्रे यांनी कोणतीही तक्रार वि.प.क्र.1 यांचेकडे उपस्थित केलेली नव्हती. वि.प. आणि हेंद्रे यांचेमध्ये ठरलेप्रमाणे लोकल टॅक्स वगैरेचा खर्च श्रीमती भारती हेंद्रे यांनी अदा करणेचा होता. सदरचे मुद्दयाचे अनुषंगाने दाखल वि.प.क्र.1 व श्रीमती भारती हेंद्रे यांचेमधील खरेदीपत्राचे अवलोकन केले असता सदर खरेदीचा दस्त 4573/2010 असून सदर खरेदीपत्रामध्ये सदर वाद मिळकतीचे डीड ऑफ डिक्लेरेशन दि. 7/5/2003 रोजी झालेले असून सदरची वाद मिळकत दि. 7/5/2003 पासून 2010 पर्यंत वि.प.क्र.1 यांचे ताब्यात होती. तदनंतर 2010 साली सदरची मिळकत श्रीमती हेंद्रे यांनी खरेदी केलेचे दिसून येते. त्या कारणाने सदर मिळकत ही सन 2003 पासून सन 2010 पर्यंत वि.प.क्र.1 यांचे ताब्यात असलेमुळे सदरचे मिळकतीचा घरफाळा भरणे वि.प.क्र.1 यांचेवर बंधनकारक आहे असे या मंचाचे मत आहे.
9. वि.प.क्र.2 व 3 यांनी ता. 7/4/2017 रोजी म्हणणे दाखल केले असून सदर म्हणणेमध्ये सदर मिळकतीस वि.प.क्र.1 यांनी ता.19/12/2003 रोजीपासून घरफाळा लागू करुन घेतलेला आहे. घरफाळा लागू करुन घेतलेपासून घरफाळा न भरलेने थकबाकी व त्यावरील दंड अशी सर्व रक्कम मिळून सध्याचे घरफाळा बिल आलेले आहे. तक्रारदार यांनी सन 2010 मध्ये सदरची मिळकत खरेदी केली. मिळकत खरेदी करतेवेळी मिळकतीचा घरफाळा आला आहे का, याबाबत सन 2010 अखेर येणे-देणे बाबतचा दाखला घेणे आवश्यक आहे. तक्रारदारास दिले घरफाळा बिल हे बरोबर असलेने ते भरुन वि.प. यांस सहकार्य करावे असे वि.प.क्र.2 व 3 यांनी म्हणणे दाखल केलेले आहे. सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता अ.क्र.3 ला कोल्हापूर महानगरपालिकेचे घरफाळा मागणी बिल दाखल असून सदर बिलावर 2009-10, 2010-11, 2011-12 व त्यापूर्वीची थकबाकी असा एकत्रित फाळा रु.21,546/- असलेची पावती दाखल आहे. त्यामध्ये सन 2009-10 चा फाळा रु.17,839/-, सन 2010-11 चा फाळा रु. 1,666/- व सन 2011-12 चा रु.2,042/- असून नमूद आहे. सदर कागदपत्रांची अनुषंगाने तक्रारदाराने त्यांचे पुराव्याचे शपथपत्राचे सदरचा फ्लॅट खरेदी करणेपूर्वीचे थकीत बिल रु.1,839/- दाखवले आहे. सदर बिल 2003 पासून जनरेट झाले आहे. वि.प.क्र.3 यांनी वि.प.क्र.1 चे 2003 पासूनचे बिलाचे स्टेटमेंट दाखल केले आहे. वि.प.क्र.1 यांचेकडे उपरोक्त फ्लॅट मिळकतीची मालकी असताना फाळा आला नाही. त्यामुळे त्याची रक्कम 2009-10 मध्ये रु.17,839/- झालेचे पुरावा शपथपत्रात कथन केले. सदरची तक्रारदाराची कथने वि.प. यांनी नाकारलेली नाहीत. दाखल कागदपत्रांवरुन सदर मिळकतीचा ताबा सन 2003 सालापासून सन 2010 पर्यंत वि.प.क्र.1 यांचेकडे असल्याचे शाबीत होते. सबब, वि.प.क्र.1 यांनी सदरचा घरफाळा न भरुन थकीत ठेवलेला आहे हे सिध्द होते.
10. अ.क्र.4 ला अ.क्र.5 ला घरफाळा पावत्या दाखल असून सदरचे घरफाळाची रक्कम अनुक्रमे रु.25,990/- व रु.30,803/- दिसून येते. अ.क्र.6 ला ता. 22/10/2013 रोजी तक्रारदार यांनी रक्कम रु.11,691 इतकी रक्कम भरलेली असून तक्रारदाराचे पुरावा शपथपत्राचे अवलोकन करता वि.प.क्र.3 यांनी फाळा वसुलीसाठी तगादा लावल्यामुळे दंडाची रक्कम कमी करुन एकूण होणारी रक्कम रु.11,691/- भरलेली आहे, सदरचे पावतीवर वि.प.क्र.2 व 3 यांनी दंड आकारणी नाही असा शेरा दिलेला दिसून येतो. तथापि अ.क्र.7 ला वि.प.क्र.3 यांनी पुन्हा 2014-15 सालासाठी रक्कम रु.10,850/- इतके रकमेचे थकीत बिल पाठविलेचे दिसून येते. सदरचे बिल तक्रारदार याने वि.प.क्र.3 यांना दाखवले असून सदरचे भरलेल्या फाळयाची नोंद संगणकावर नाही असे सांगितले. तक्रारदार यांनी ता. 31/7/14 रोजी पुन्हा रक्कम रु.1,969/- इतके बिल भरलेचे दिसून येते. दाखल कागदपत्रांमध्ये वि.प.क्र.3 यांनी सन 2015-16 सालचे पुन्हा रक्कम रु. 37,605/-, सन 2016-17 चे रक्कम रु.44,481/- चे घरफाळा बिल तक्रारदार यांना पाठविलेचे दिसून येते. ता. 11/8/16 रोजी लोकशाही दिनात सदरचा चुकीचा घरफाळा मागणीबाबत तक्रारदार यांनी वि.प.क्र.3 यांना दिलेला अर्ज दाखल केलेला आहे. सदरचे अर्जास वि.प. यांनी ता. 25/8/2016 रोजी उत्तर दिलेले असून सदर उत्तरामध्ये सदर मिळकतीत ता.13/12/2003 रोजीपासून घरफाळा लागू करुन घेतलेला आहे. घरफाळा लागू करुन घेतलेपासून घरफाळा न आलेने थकबाकी व त्यावरील दंडाची अशी सर्व रक्कम मिळून सध्याचे घरफाळा बिल दिलेले आहे. असे नमूद असून त्यासोबत सन 2003 पासूनचे बिलाचे स्टेटमेंट दाखल केले आहे. सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत.
11. सबब, दाखल कागदपत्रांवरुन सदर मिळकत ही सन 2003 सालापासून सन 2010 सालापर्यंत वि.प.क्र.1 यांचे ताब्यात होती. सदरचे काळात वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.3 यांचेकडे सदर मिळकतीचा फाळा भरलेची एकही पावती दाखल केलेली नाही. सन 2003 ते 2010 या कालावधीत वि.प.क्र.3 यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून सदरचे मिळकतीचे फाळयाची रक्कम वसूल न केल्यामुळे सन 2010 मध्ये सदर फाळाची थकबाकी शिल्लक राहिली. सबब सदरचा सन 2003 पासून ते सन 2010 पर्यंतचा घरफाळा भागविणेची कायदेशीर जबाबदारी वि.प.क्र.1 यांची असलेने सदरची रक्कम आजतागायत न भरुन व वि.प.क्र.3 यांनी सदरची रक्कम तक्रारदार यांचेकडून वसूल करणेचा प्रयत्न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवत त्रुटी केलेली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
12. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी सदर मिळकतीचा कब्जा घेतलेपासून सन 2009-10 चा फाळा रक्कम रु.1,666/-, सन 2010-11 चा फाळा रु.2,042/- या प्रमाणे आकारला गेला व तशी रक्कम तक्रारदार यांनी भरलेचे दिसून येते. तसेच सदरची तक्रार प्रलंबित असताना वि.प.क्र.2 व 3 यांनी कोल्हापूर शहरातील मिळकत धारकांच्या थकीत फाळयाचे रकमेचे योजना अंमलात आणली. त्यानुसार सन 2016-17 सालाकरिता एकरकमी थकबाकी परतफेड केली असता दंडाच्या रकमेत 50 टक्के सवलत जाहीर केली. त्यानुसार तक्रारदार यांनी त्यांचे कोणतेही हक्क अधिकारात बाधा न येता मा. मंचाचे परवानगीने वि.प.क्र.3 यांचेकडे रक्कम रु. 32,541/- (Under protest) जमा केलेली आहे. वरील सर्व बाबींचे बारकाईने अवलोकन केले असता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्वावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. त्या कारणाने तक्रारदार हे सदरची थकीत घरफाळयाची रक्कम रु. 32,541/- मिळणेस पात्र आहेत. सबब, वि.प.क्र.1 यांनी थकीत घरफाळयाची रक्कम (जी तक्रारदार यांनी वि.प.क्र.3 यांचेकडे जमा केली आहे) रु.32,541/- तक्रारदार यांना परत करणेचे आदेश वि.प.क्र. 1 यांना हे मंच देत आहे. तसेच वि.प.क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला व सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.5,000/- व खर्चापोटी प्रत्येकी रु. 3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 व 4 याचे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 यांनी थकीत घरफाळयाची रक्कम (जी तक्रारदार यांनी वि.प.क्र.3 यांचेकडे जमा केली आहे) रु.32,541/- तक्रारदार यांना परत अदा करावी.
- वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु.5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी प्रत्येकी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|