(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक- 18 फेब्रुवारी, 2022)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं 1) आयकर विभाग, भंडारा आणि इतर यांचे विरुध्द दोषपूर्ण सेवा मिळाली म्हणून जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे. मा.सदस्य व मा.सदस्य हे कोवीड पॉझेटीव्ह होते त्यामुळे आज रोजी निकाल पारीत करण्यात येत आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी, वार्ड-2, भंडारा आहेत तर विरुध्दपक्ष क्रं 2 ही बॅंक ऑफ इंडीया शाखा-वरठी, जिल्हा भंडारा आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 हे खाजगी लेखापाल असून ते भंडारा जिल्हयात व्यवसाय करतात. तक्रारकर्ता हे उपरोक्त नमुद पत्त्यावर भंडारा येथे राहत असून ते वरठी येथील सनफ्लॅग आर्यन अॅन्ड स्टील कंपनी लिमिटेड भंडारा रोड येथे सहाय्यक महाव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. तक्रारकर्ता हे त्यांचे आयकरची कामे विरुध्दपक्ष क्रं 3 लेखापाल यांचे सहाय्याने करतात. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ऑफ इंडीया, शाखा वरठी, भंडारा येथे तक्रारकर्ता यांचे बॅंकेचे बचत खाते असून त्याचा क्रमांक-920710100006761 असा असून ते आयकरची कामे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मार्फत करतात आणि त्यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक आहेत.
तक्रारकर्ता यांनी पुढे असे नमुद केले की, आयकरापोटी जास्त भरलेली रक्कम टी.डी.एस.स्वरुपात परत करणे आयकर कायदया अंतर्गत बंधनकारक आहे. तक्रारकर्ता यांना सन-2012-2013, 2013-2014 आणि 2014-2015 या आर्थिक वर्षात जास्तीची आयकर कपात केलेल्या रकमा अनुक्रमे रुपये-13,230/-, रुपये-32,310/- आणि रुपये-37,330/- असे मिळून एकूण रक्कम रुपये-82,780/- टीडीएस पोटी परत करणे विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी यांना बंधनकारक होते व त्यासाठीचे दस्तऐवज तक्रारकर्ता यांनी वि.प.क्रं 3 अकाऊंटटचे मदतीने वि.प.क्रं 1 आयकर अधिकारी यांचे कडे सादर केले होते. सदर रक्कम तक्रारकर्ता यांचे बॅंक खात्यात जमा व्हावी म्हणून तक्रारकर्ता यांनी त्यांचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत असलेल्या बचत खाते पुस्तीकेची प्रत, ओळखपत्र्, आधार कॉर्ड व पॅन कॉर्डची प्रत आणि इतर दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं 3 अकाऊंटचे माध्यमातून विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी यांना पुरविले होते. परंतु असे असताना देखील तक्रारकर्ता यांनी जास्तीची भरलेली आयकरची एकूण रक्कम रुपये-82,780/- त्यांचे बॅंक खात्यात जमा झाली नाही म्हणून चौकशी केली असता विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी यांनी तक्रारकर्ता यांचे बॅंक खाते क्रमांक-920710110006761 (सदर बॅंक खाते तक्रारकर्ता यांचे नाही) मध्ये अनुक्रमे दिनांक-06.01.2016, दिनांक-16.01.2016 आणि दिनांक-25.01.2016 अशा तारखांना Online Transfer NECS व्दारे जमा केल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी चौकशी केली असता सदर आयकरची परत केलेली रक्कम प्रत्यक्षात तक्रारकर्ता यांचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या खात्यात जमा झाली नसल्याचे आणि ती रक्कम तिस-याच व्यक्तीचे बॅंक खात्यात जमा झाली असल्याचे दिसून आले. त्यावर तक्रारकर्ता यांनी वि.प.क्रं 1 आयकर अधिकारी यांचे निदर्शनास सदर चूक आणून दिली व सांगितले की, आयकराची परत केलेली रक्कम ज्या खात्यात जमा करण्यात आली ते तक्रारकर्ता यांचे बॅंक खाते नाही परंतु वि.प.क्रं 1 आयकर अधिकारी यांनी मदत केली नाही व विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत चौकशी करण्यास सांगितले परंतु वि.प.क्रं 2 बॅंकेनी सुध्दा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशाप्रकारे तक्रारकर्ता यांची आयकराची परत केलेली रक्कम ही तिस-याच व्यक्तीचे बॅंक खाते क्रमांक-920710110006761 मध्ये जमा झाली असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी पोलीस स्टेशन वरठी येथे लेखी तक्रार केली असता पोलीसांनी तक्रारकर्ता यांनी बॅंकेच्या खात्याचा चुकीचा क्रमांक दिला असे ठरविले. वस्तुतः आयकराची कपात केलेली रक्कम तक्रारकर्ता यांचेच बॅंक खात्यात जमा होत आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेची आहे. परंतु तक्रारकर्ता यांची परत केलेली आयकरची रक्कम ही वरठी येथील रहिवासी अमिषा मिलींद बोरकर यांचे खात्यात जमा झाली या संबधी माहिती असताना सुध्दा विरुध्दपक्ष यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तक्रारकर्ता यांचे असेही म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं 3 श्री गजानन थोटे, लेखाधिकारी हे तक्रारकर्ता यांचे आयकरची कामे करतात आणि त्या बाबत त्यांनी शुल्क सुध्दा घेतलेले आहे, अशा परिस्थिती मध्ये आयकर विवरण भरताना योग्य ती माहिती भरणे ही त्यांची जबाबदारी आहे तसेच टी.डी.एस.ची रक्कम तक्रारकर्ता यांचे खात्या मध्येच जमा होत आहे याची खात्री करणे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ऑफ इंडीया शाखा वरठी, जिल्हा भंडारा यांची जबाबदारी आहे. या संपूर्ण प्रकारात विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 हे जबाबदार आहेत. सदर टीडीएसच्या रकमा या तक्रारकर्त्याचे बॅंक खात्यात Online Transfers NECS व्दारे जमा न होता ईतर व्यक्तीच्या नावाने जमा झाल्यात व त्यास विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी मंजूरी दिली. तक्रारकर्ता यांनी वकीलांचे मार्फतीने दिनांक-17.07.2018 रोजीची कायदेशीर नोटीस विरुध्दपक्षांना पाठविली असता विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी यांनी कोणतेही उत्तर दिले नाही तर विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी स्वतःवरची जबाबदारी ही तक्रारकर्ता यांचेवर ढकलण्याचा प्रयत्न केला. म्हणून शेवटी तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्या सोबत र्दुव्यवहार, हेतुपुरस्पर हयगय व र्दुलक्ष केले तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे जाहिर करुन त्यासाठी वि.प.क्रं 1 ते 4 यांना जबाबदार ठरविण्यात यावे.
- विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी यांनी जाणूनबुजून निष्काळजीपणे टी.डी.एस.ची रक्कम Online Transfer NECS ने तक्रारकर्ता यांचे वि.प.क्रं 2 बॅंके मध्ये असलेल्या खात्यात जमा न करता ईतर व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा केली तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी सुध्दा निष्काळजीपणे त्याचा तपास न करता मंजूरी दिली म्हणून टी.डी.एस.ची रक्कम रुपये-82,870/- व्याजासह विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांनी तक्रारकर्ता यांना परत करावी असे आदेशित व्हावे.
- तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,00,000/- विरुध्दपक्षांनी तक्रारकर्ता यांना देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-10,000/- विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद त्यांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर विभाग अधिकारी,वार्ड-II, भंडारा, तालुका-जिल्हा-भंडारा यांचे तर्फे वकील श्री अे.जे.भूत यांना बरीच संधी देऊनही त्यांनी तक्रारीला उत्तर दाखल केले नाही त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे विरुध्द त्यांचे लेखी जबाबा शिवाय तक्रार पुढे चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिनांक-16.12.2019 रोजी पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ऑफ इंउीया शाखा वरठी, जिल्हा भंडारा यांनी लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये तक्रारकर्त यांचे त्यांचे बॅंकेच्या शाखेत खाते असून त्याचा खाते क्रमांक-920710100006761 असा असल्याचे नमुद केले. तक्रारकर्ता यांचे आयकर विवरणाची कामे विरुध्दपक्ष क्रं 3 श्री गजानन नारायण थोटे अकाऊंटंट करीत असल्यामुळे माहितीचा तपशिल अचुकरित्या बरोबर असल्याची खात्री करण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्रं 3 यांची आहे. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 3 अकाऊंटंट यांनी आयकर विवरणपत्रे बरोबर भरल्या गेलीत किंवा नाही याची खात्री केलेली नाही. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 3 अकाऊंटंट यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी यांना त.क. यांचे बॅंक खात्याचा चुकीचा क्रमांक पुरविल्यामुळे आयकर परताव्याची रक्कम चुकीच्या व्यक्तीच्या बॅंक खात्या मध्ये जमा झाली. ऑन लाईन ट्रान्झीक्शनवर विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेचे नियंत्रण नाही. त्यांनी तक्रारकर्त्याचे नोटीसला योग्य उत्तर दिनांक-17.07.2019 रोजी दिलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेला प्रत्येक व्यवहाराच्या नोंदी, ज्या रकमा पाठविणा-याने NFCS/NEFT/ECS/RTGS व्दारे पाठविल्यात त्याचे मॉनीटर करणे शक्य नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर विभाग हे सदर आयकर विवरणाच्या रकमा प्रत्यक्षरित्या संबधित ग्राहकाच्या खात्यात जमा करतात. तक्रारकर्ता यांनी याच कारणासाठी नियमित दिवाणी दावा क्रं-2/2019 दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर भंडारा यांचे कडे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके विरुध्द सुध्दा दाखल केलेला आहे आणि तो प्रलंबित आहे. तक्रारकर्ता हे एकाच कारणासाठी एकाच वेळी दोन ठिकाणी दावा दाखल करु शकत नाही आणि ते कायदेशीर नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
05. विरुध्दपक्ष क्रं 3 श्री गजानन नारायण थोटे यांनी लेखी निवेदन जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी नमुद केले की, ते तक्रारकर्ता श्री सुनिल घनश्याम लांजेवार यांची आयकर विवरण भरण्याची कामे तक्रारकर्ता यांचे पत्नी मार्फतीने करतात आणि त्या संबधात फॉर्म क्रं 16, बॅंक खात्या संबधीची माहिती पाठवित असतात. तक्रारकर्ता यांनी पाठविलेलया दस्तऐवजा नुसार त्यांनी आयकर विवरण भरुन दिले होते. तक्रारकर्ता यांनी आयकर विवरण पत्रातील भरलेली माहिती खरी व सत्या असल्याची खात्री करुन त्यांना देण्यात आलेल्या आयकर विवरण पत्राची पावती (माहिती अपलोड केल्या नंतर मिळणारी) वर सही केलेली आहे. आयकर विवरण पत्रात भरलेल्या माहितीचे सत्यापन तक्रारकर्ता यांनी स्वतः केलेले आहे, यावरुन आयकर विवरणपत्रात चुकीची माहिती दिली असल्याचे म्हणणे चुकीचे व खोटे आहे. वि.प.क्रं 3 यांचे काम फक्त आयकर विवरण भरुन देण्याचे आहे, आयकर परताव्याची रक्कम मिळवून देण्याची त्यांची जबाबदारी नाही. आयकर विवरणपत्र भरुन होताच ग्राहकाने दिलेले दस्तऐवज पावती सोबत ते परत करीत असल्यामुळे त्यांचे जवळ पुराव्या दाखल कोणतेही दस्तऐवज नसल्याचे नमुद केले.
06. विरुध्दपक्ष क्रं 4 कु.अमिशा मिलींद बोरकर हिने आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. तिने तक्रारीतील परिच्छेद क्रं-1, 5, 6, 7, 9व 11 ची माहिती नसल्याने उत्तर देण्याची आवश्यकता नसल्याचे नमुद केले तर परिच्छेद क्रं 2 व क्रं 3 चे मजकूरा बाबत वाद नसल्याचे नमुद केले. परिच्छेद क्रं 4,12,13 चे मजकूरा बाबत काही म्हणणे नसल्याचे नमुद केले.परिच्छेद क्रं 10 व 14 मधील मजकूर संपूर्ण खोटा आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रारी व्यतिरिक्त दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर, भंडारा येथे तक्रार दाखल केलेली आहे.
विरुध्दपक्ष क्रं 4 कु. अमिशा बोरकर हिने पुढे असे नमुद केले की, तिचे खाते हे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या शाखेत होती त्यावेळी ती अज्ञान असल्याने तिचे सर्व व्यवहारा संबधीची माहिती व देखरेख ठेवण्याचे काम शाखा व्यवस्थापकाचे होते. तिला विरुध्दपक्ष क्रं 4 बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकां कडून ज्या दस्तऐवजाची मागणी करण्यात आली होती ते सर्व दस्तऐवज तिने सादर केलेत तसेच शाखा व्यवस्थापकांचे सांगण्या प्रमाणे कागदपत्रांवर सहया देखील करुन दिल्यात. तिचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या खात्यात तक्रारकर्त्याचे आयकरची कोणतीही रक्कम जमा झालेली नाही, जर अशी रक्कम जमा झाली असती तर त्याची माहिती शाखा व्यवस्थापकांना राहिली असती व ती रक्कम त्यांनी योग्य खात्यात वळती केली असती. तिने आज पर्यंत तक्रारकर्त्याची कोणतीही रक्कम बॅंक खात्यातून काढलेली नाही. ती अज्ञान असल्याने तिने तिचे बॅंकेतील खात्या संबधी कोणताही कधीही व्यवहार केलेला नाही. तक्रारकर्त्याचे वादातील रकमेच्या व्रूवहाराची तिला कुठलीही कल्पना नाही कारण सदर व्यवहारावर देखरेख विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेचे शाखा व्यवस्थापक करीत होते. तक्रारकर्त्याने तिचे विरुध्द केलेले सर्व आरोप खोटे व बनवाबनवीचे आहेत. ती कुठलीही सेवा पुरविणारी खाजगी व सहकारी संस्था नाही त्यामुळे तक्रारकर्ता हे तिचे विरुध्द ग्राहक मंचा मध्ये कुठलीही दाद मागू शकत नाही. तसेच ग्राहक मालक या सज्ञेत वि.प.क्रं 4 बसत नाही. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रं 4 विरुध्द केलेल्या मागण्या या पूर्णपणे गैरकायदेशीर आहेत. तक्रारकर्ता यांनी वि.प.क्रं 4 विरुध्द केलेली मागणी खारीज करण्यात यावी आणि वि.प.क्रं 4 ला सदर तक्रारीतून मुक्त करण्यात यावे अशी विनंती वि.प.क्रं 4 हिने केली.
07. प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री मोटवानी तर विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके तर्फे वकील श्री श्याम चव्हाण यांचा तर विरुध्दपक्ष क्रं 3 श्री गजानन नारायण थोटे आणि विरुध्दपक्ष क्रं 4 चे आजोबा यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
08. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांचे लेखी उत्तर, प्रकरणात दाखल शपथे वरील पुरावे व लेखी युक्तीवाद तसेच दाखल दस्तऐवज आणि उपस्थित पक्षांचा मौखीक युक्तीवाद यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्याय निवारणार्थ उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्ता यांचे आयकर परताव्याची रक्कम चुकीच्या बॅंक खात्यात जमा होण्यास कोण जबाबदार आहे ? | वि.प.क्रं 3 अकाऊंटंट |
02 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
-कारणे व मिमांसा-
मुद्दा क्रं व 2
09. तक्रारकर्ता यांचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ऑफ इंडीया शाखा वरठी, जिल्हा भंडारा येथे बॅंके बचत खाते असून त्याचा क्रमांक-920710100006761 असा असून ते आयकरची कामे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मार्फत करतात. तक्रारकर्ता यांना सन-2012-2013, 2013-2014 आणि 2014-2015 या आर्थिक वर्षात जास्तीची आयकर कपात केलेल्या रकमा अनुक्रमे रुपये-13,230/-, रुपये-32,310/- आणि रुपये-37,330/- असे मिळून एकूण रक्कम रुपये-82,780/- आयकर परताव्या/ टीडीएस पोटी विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी, भंडारा यांचे कडून परत मिळणार होते व त्यासाठीचे दस्तऐवज तक्रारकर्ता यांनी वि.प.क्रं 3 अकाऊंटटचे मदतीने वि.प.क्रं 1 आयकर अधिकारी यांचे कडे सादर केले होते. सदर रक्कम तक्रारकर्ता यांचे बॅंक खात्यात जमा व्हावी म्हणून तक्रारकर्ता यांनी त्यांचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत असलेल्या बचत खाते पुस्तीकेची प्रत, ओळखपत्र्, आधार कॉर्ड व पॅन कॉर्डची प्रत आणि इतर दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं 3 अकाऊंटचे माध्यमातून विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी यांना पुरविले होते. परंतु असे असताना तक्रारकर्ता यांनी जास्तीची भरलेली आयकरची एकूण रक्कम रुपये-82,780/- त्यांचे बॅंक खात्यात जमा झाली नाही म्हणून चौकशी केली असता विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी यांनी तक्रारकर्ता यांचे बॅंक खाते क्रमांक-920710110006761 (सदर बॅंक खाते तक्रारकर्ता यांचे नाही) मध्ये आयकर परताव्याच्या रकमा अनुक्रमे दिनांक-06.01.2016, दिनांक-16.01.2016 आणि दिनांक-25.01.2016 अशा तारखांना Online Transfer NECS व्दारे जमा केल्याचे सांगितले परंतु सदर आयकरची परत केलेली रक्कम प्रत्यक्षात तक्रारकर्ता यांचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या खात्यात जमा झाली नसल्याचे आणि ती रक्कम तिस-याच व्यक्तीचे बॅंक खात्यात जमा झाली असल्याचे दिसून आले. अशाप्रकारे तक्रारकर्ता यांची आयकर परताव्याची रक्कम ही तिस-याच व्यक्तीचे बॅंक खाते क्रमांक-920710110006761 मध्ये जमा झाली असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी पोलीस स्टेशन वरठी येथे लेखी तक्रार केली असता तक्रारकर्ता यांची परत केलेली आयकर परताव्याची रक्कम ही वरठी येथील रहिवासी विरुध्दपक्ष क्रं 4 अमिषा मिलींद बोरकर यांचे खात्यात जमा झाली तक्रारकर्ता यांचे असेही म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं 3 श्री गजानन थोटे, लेखाधिकारी हे तक्रारकर्ता यांचे आयकर विवरणाची कामे करतात व सदर बाब विरुध्दपक्ष क्रं 3 श्री गजानन थोटे अकाऊंट यांना मान्य आहे.
10. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ऑफ इंडीया शाखा वरठी, जिल्हा भंडारा यांनी आपले लेखी उत्तरात त्यांचे बॅंकेच्या शाखेत तक्रारकर्ता यांचे खाते क्रमांक-920710100006761 असल्याचे मान्य केले. परंतु तक्रारकर्ता यांचे आयकर विवरणाची कामे (विरुध्दपक्ष क्रं 3 श्री गजानन नारायण थोटे) अकाऊंटंट करीत असल्यामुळे आयकर विवरणातील माहितीचा तपशिल अचुकरित्या बरोबर असल्याची खात्री करण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्रं 3 अकाऊंटंट यांची आहे. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 3 अकाऊंटंट यांनी आयकर विवरणपत्रे बरोबर भरल्या गेलीत किंवा नाही याची खात्री केलेली नाही. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 3 अकाऊंटंट यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी यांना त.क. यांचे बॅंक खात्याचा चुकीचा क्रमांक पुरविल्यामुळे आयकर परताव्याची रक्कम चुकीच्या व्यक्तीच्या बॅंक खात्या मध्ये जमा झाली. ऑन लाईन ट्रान्झीक्शनवर विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेचे नियंत्रण नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेला प्रत्येक व्यवहाराच्या नोंदी, ज्या रकमा पाठविणा-याने NFCS/ NEFT/ ECS/ RTGS व्दारे पाठविल्यात त्याचे मॉनीटर करणे शक्य नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर विभाग हे सदर आयकर विवरणाच्या रकमा प्रत्यक्षरित्या संबधित ग्राहकाच्या खात्यात जमा करतात.
11. उपरोक्त नमुद घटनाक्रमा वरुन ही बाब स्पष्ट दिसून येते की, आयकर विवरण भरताना आयकर परताव्याची रक्कम योग्य करदात्याच्या बॅंक खात्यात परत व्हावी यासाठी आयकर विवरणा मध्ये करदात्याच्या बॅंक खात्याचा क्रमांक अचुकरित्या भरणे आवश्यक आहे आणि हा जर बॅंक खाते क्रमांक चुकीचा भरल्या गेला तर चुकीच्या व्यक्तीच्या बॅंकेचया खात्यात रक्कम जमा होईल ही बाब स्पष्ट आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 श्री गजानन नारायण थोटे यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेल्या लेखी निवदेना मध्ये ते तक्रारकर्ता यांची आयकर विवरणे भरण्याची कामे तक्रारकर्ता यांचे पत्नीचे मार्फतीने करतात आणि त्या संबधात फॉर्म क्रं 16, बॅंक खात्या संबधीची माहिती पाठवित असतात. विरुध्दपक्ष क्रं 3 अकाऊंटंट श्री गजानन नारायण थोटे आयकर विवरण भरण्यासाठी तक्रारकर्ता यांचे कडून शुल्क वसुल करतात त्यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष क्रं 3 यांचे ग्राहक होतात. विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी लेखी निवेदना मध्ये त्यांना जे दस्तऐवज तक्रारकर्ता यांचे कडून मिळालीत त्या आधारावर त्यांनी आयकर विवरणे भरलीत आणि आयकर विवरणे भरल्या नंतर ते दस्तऐवज ते संबधितांना परत करतात त्यामुळे त्यांचे जवळ दस्तऐवजी पुरावा नसल्याचे नमुद केले. आयकर परताव्याची रक्कम जर चुकीच्या व्यक्तीचे खात्यात जमा झाली तर ती परत करण्याची विरुध्दपक्ष क्रं 3 यांची जबाबदारी नसल्याचे नमुद केले. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे येथे स्पष्ट करणे जरुरीचे आहे की, जर विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी तक्रारकर्ता यांची आयकर विवरणे भरताना योग्य बॅंक खात्याचा क्रमांक आयकर विवरणा मध्ये नमुद केला असता तर आयकर परताव्याची रक्कम ही चुकीच्या व्यक्तीच्या म्हणजे विरुध्दपक्ष क्रं 4 कु. अमिशा मिलींद बोरकर हिचे बॅंक खात्यात जमा झाली नसती. विरुध्दपक्ष क्रं 3 श्री गजानन नारायण थोटे यांनी तक्रारकर्ता यांचे सन-2012-2013, 2013-2014 आणि 2014-2015 अशा वर्षाची आयकर विवरणे भरलेली आहेत. विरुध्दपक्ष क्रं 3 श्री गजानन नारायण थोटे, अकाऊंटंट यांचे असेही म्हणणे नाही की, त्यांना तक्रारकर्ता यांनी त्यांचे बॅंकेचया पासबुकाची प्रत पुरविलेली नाही. जर विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी तक्रारकर्ता यांचे बॅंक खात्याचा योग्य क्रमांक आयकर विवरणे भरताना नमुद केला असता तर त्यांनी त्वरीत भरलेल्या आयकर विवरणपत्राचा तपशिल पुराव्या दाखल जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केला असता परंतु असे त्यांनी केलेले नाही. यावरुन तक्रारकर्ता यांची आयकर विवरणे भरताना त्यामध्ये चुकीचा बॅंक खात्याचा क्रमांक नमुद केल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारा मध्ये विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर विभाग, भंडारा आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ऑफ इंडीया शाखा वरठी, भंडारा यांची कोणतीही चुक दिसून येत नाही.
12. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे विरुध्दपक्ष क्रं 4 अमिशा मिलींद बोरकर हिचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत खाते असलेल्या खाते उता-याची पाहणी केली असता विरुध्दपक्ष क्रं 4 अमिशा बोरकर हिचा बॅंक खाते क्रं-920710110006761 असा असून त्यामध्ये तक्रारकर्ता यांचे आयकर
परताव्याच्या रकमा दिनांक-25.01.2016, दिनांक-16.01.2016 आणि दिनांक-06.01.2016 रोजी अनुक्रमे रुपये-37,330/-, 32,310/-, 13,230/- अशा रकमा अनुक्रमे ECS-AAGPL7156C-AY 2015-16, ECS-AAGPL7156C-AY 2014-15, ECS-AAGPL7156C-AY 2013-14 या प्रमाणे जमा झालेल्या आहेत आणि विरुध्दपक्ष क्रं 4 कु. अमिशा मिलींद बोरकर हिने तक्रारकर्ता यांच्या सदर आयकर परताव्याच्या रकमा परत करण्याची जबाबदारी संपूर्णपणे आपले उत्तरा मधून झटकलेली आहे.
13. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ऑफ इंडीया यांनी लेखी उत्तरा मध्ये तक्रारकर्ता यांनी याच कारणासाठी नियमित दिवाणी दावा क्रं-2/2019 दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर भंडारा यांचे कडे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके विरुध्द सुध्दा दाखल केलेला आहे आणि तो प्रलंबित आहे. तक्रारकर्ता हे एकाच कारणासाठी एकाच वेळी दोन ठिकाणी दावा दाखल करु शकत नाही आणि ते कायदेशीर नसल्याचे नमुद केले. तक्रारकर्ता यांनी दिनांक-29.08.2018 रोजी जिल्हा ग्राहक आयोगा समारे प्रस्तुत तक्रार दाखल केल्या नंतर सन 2019 मध्ये दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा दाखल केलेला आहे त्यामुळे जिल्हा ग्राहक आयोगा समारे प्रथम तक्रार दाखल झालेली असल्यामुळे प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगाला चालवून त्यामध्ये निर्णय पारीत करण्याचे अधिकार आहेत.
14. उपरोक्त नमुद वस्तुस्थिती आणि दाखल पुराव्यां वरुन तक्रारकर्ता यांचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ऑफ इंडीया वरठी, भंडारा येथील खाते क्रमांक-920710100006761 मध्ये आयकर परताव्याची रक्कम जमा न होता सदर आयकर परताव्याच्या रकमा या विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या अन्य ग्राहक विरुध्दपक्ष क्रं 4 अमिशा बोरकर हिच्या बॅंक खाते क्रं-920710110006761 मध्ये जमा झालेल्या आहेत असे विरुध्दपक्ष क्रं 4 हिचे बॅंकेच्या खाते उता-या वरुन दिसून येते. वर नमुद केल्या प्रमाणे आयकर विवरण भरताना तक्रारकर्ता यांचे बॅंकेच्या खात्याचा क्रमांक चुकीचा भरल्यामुळे चुकीच्या बॅंक खात्यात रकमा जमा झाल्यात आणि यासाठी तक्रारकर्ता यांचे आयकर विवरणे भरणारे विरुध्दपक्ष क्रं 3 श्री गजानन नारायण थोटे हे जबाबदार असल्याचे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. आयकर विवरण भरुन दिल्या नंतर जी स्लिप देण्यात येते ती त्वरीत पडताळून पाहण्याची जबाबदारी तक्रारकर्ता यांची सुध्दा आहे त्यामुळे तक्रारकर्ता यांची शारिरीक व मानसिक त्रास आणि तक्रारीचा खर्च मिळण्याची मागणी नामंजूर करण्यात येते.
15. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-
: :अंतिम आदेश::
- तक्रारकर्ता यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 3 श्री गजानन नारायण थोटे, अकाऊंटंट यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं-3 श्री गजानन नारायण थोटे, अकाऊंटंट यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी, तक्रारकर्ता यांचे आयकर परताव्याच्या रकमा चुकीच्या म्हणजे विरुध्दपक्ष क्रं 4 अमिशा बोरकर हिचा बॅंक खाते क्रं-920710110006761 मध्ये दिनांक-25.01.2016, दिनांक-16.01.2016 आणि दिनांक-06.01.2016 रोजी अनुक्रमे रुपये-37,330/-, (अक्षरी रुपये सदोतीस हजार तीनशे तीस फक्त) रुपये-32,310/-(अक्षरी रुपये बत्तीस हजार तीनशे दहा फक्त) आणि रुपये-13,230/-(अक्षरी रुपये तेरा हजार दोनशे तीस फक्त) जमा झालेल्या असल्यामुळे सदर तक्रारकर्ता यांचे आयकर परताव्याच्या रकमा आणि त्यावर विरुध्दपक्ष क्रं 4 हिचे बॅंकेच्या खात्यात जमा झाल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-6 टक्के दराने व्याज तक्रारकर्ता यांना दयावे.
- तक्रारकर्ता यांच्या अन्य मागण्या या नामंजूर करण्यात येतात.
- विरुध्दपक्ष क्रं 1 आयकर अधिकारी वार्ड-II आयकर विभाग , भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ऑफ इंडीया, शाखा वरठी, जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्यात.