मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 26/11/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, तो गैरअर्जदार क्र. 2 चा ग्राहक असून त्यांनी तक्रारकर्त्याला ए.टी.एम.कार्डसुध्दा दिलेले आहे. सदर काडने तक्रारकर्ता दि.26.02.2008 रोजी गैरअर्जदार क्र. 1 च्या आक्ट्राय नाका, हिंगणा रोड, पेट्रोल पंपवरील ए.टी.एम.मशीनमधून रु.23,000/- काढण्यास गेला असता मशिन बंद पडले व कार्ड मशिनमध्ये अडकले व तक्रारकर्त्यास सदर रक्कम मिळू शकली नाही. याबाबत तक्रार केली असता गैरअर्जदार क्र. 1 चे अधिकारी येऊन त्यांनी रक्कम, कार्ड व पावती मशिनमधून काढून ते घेण्यास तक्रारकर्त्याला सिव्हिल लाईन्स येथील शाखेत येण्यास सांगितले. तेथे गेल्यावर सदर रक्कम ही त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे सांगितले. गैरअर्जदार क्र. 2 यांना सदर बाब सांगितल्यावर त्यांनी काही फॉर्म तक्रारकर्त्याकडून भरुन त्यावर सही घेतली व ए.टी.एम.कार्ड परत केले व रक्कम 10-15 दिवसात मिळेल असे सांगितले. त्यानुसार सदर रक्कम त्यांच्या खात्यात दि.28.05.2008 रोजी जमा करण्यात आली. परंतू दि.28.05.2008 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता सदर रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यातून कमी करण्यात आली. याबाबत गैरअर्जदार क्र. 2 ला विचारणा केली असता त्यांनी गैरअर्जदार क्र.1 ला याबाबत विचारण्यास सांगितले. गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 2 चा ग्राहक असल्याने त्यांनाच या तक्रारीबाबत विचारावे असे सांगितले. याबाबत गैरअर्जदार क्र. 2 ला याबाबत पत्र व कायदेशीन नोटीस देऊन चौकशी केली असता त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास रक्कम वाटप केल्याने सदर रक्कम त्याच्या खात्यातून कमी करण्यात आल्याचे सांगितले. तक्रारकर्त्याच्या मते गैरअर्जदारांच्या सदर कृतीने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास होत आहे, म्हणून त्याने मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन नुकसान भरपाई, रु.23,000/- ही रक्कम व्याजासह परत मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहे. 2. सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्यावर मंचाने गैरअर्जदारांवर नोटीस बजावला. गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही व मंचासमोर हजर झाले नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.02.09.2010 रोजी पारित केला. 3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्त्याच्या खात्यामध्ये दि.26.04.2008 रोजी रु.23,000/- जमा झालेले आहेत व त्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 ने सदर रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यातून का काढली याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. कारण तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 2 चा ग्राहक असल्याने तेच या वादास कारणीभूत आहेत व तेच याबाबत स्पष्टीकरण देऊ शकतात. गैरअर्जदार क्र. 1 च्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही वाईट वागणूक दिलेली नाही, म्हणून सदर तक्रारीशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. 4. सदर तक्रार मंचासमोर युक्तीवादाकरीता दि.19.11.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 1 यांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. गैरअर्जदार क्र.2 अनुपस्थित. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवज, शपथपत्रे, उभय पक्षांचे कथन, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. तक्रारकर्त्याचे गैरअर्जदार क्र. 2 कडे बचत खाते होते व ए.टी.एम.कार्डसुध्दा होते. तसेच सदर कार्डचा वापर गैरअर्जदार क्र. 1 चे ए.टी.एम.मशिनद्वारे रक्कम काढण्याकरीता केला यामुळे तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 ची सेवा घेतलेली आहे. ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या बँकेच्या विवरणावरुन स्पष्ट होते व तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो. 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 च्या ए.टी.एम.मशिनमधून रु.23,000/- काढण्यास गेला असता मशिन बंद होऊन कार्ड अडकल्याने त्याला सदर रक्कम मिळू शकली नाही व तक्रारीअंती त्याला गैरअर्जदार क्र. 2 ने नविन ए.टी.एम.कार्ड दिले व गैरअर्जदार क्र. 1 ने त्याच्या खात्यात सदर रक्कम जमा केल्याचे व नंतर परत दि.28.05.2008 ला ते खात्यातून परस्पर कपात केल्याचे दस्तऐवज क्र. 3 व 4 वरुन निदर्शनास येते. सदर दस्तऐवज म्हणजेच तक्रारकर्त्याच्या खात्याचे गैरअर्जदार क्र. 2 ने दिलेले विवरण असून त्यामध्ये तक्रारकर्त्याने नमूद केलेले कथनानुसार रकमेची कपात केल्याची बाब दिसून येते. सदर रक्कम का कपात करण्यात आली याबाबत मात्र गैरअर्जदार क्र. 2 ने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच तक्रारकर्त्याने याबाबत गैरअर्जदार क्र. 2 ला पत्राद्वारे विचारणा केली असता त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 ने सदर रक्कम कपात केल्याचे तक्रारकर्त्याला कळविलेले आहे व गैरअर्जदार क्र. 1 हे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 2 चा ग्राहक असल्याने त्यांच्याशी या वादाचा संबंध नाही व ए.टी.एम. मशिनमध्ये दोष निर्माण झाल्याने तक्रारकर्त्याची अडकलेली रक्कम त्याच्या खात्यात जमा केल्याचे नमूद करीत आहे. परंतू युक्तीवादा दरम्यान मंचाने गैरअर्जदार क्र. 1 ला सदर रक्कम जमा केल्याबाबत व ए.टी.एम. मशिन बंद पडल्यानंतर त्यांनी काय कारवाई केली याबाबतचे संपूर्ण दस्तऐवज दाखल करण्याबाबत निर्देश दिलेले होते. परंतू गैरअर्जदार क्र. 1 ने असे कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही की ज्यावरुन तक्रारकर्त्याची वादग्रस्त बाब ही पारदर्शकपणे निदर्शनास आली असती. गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारकर्त्याला कायदेशीर नोटीसला उत्तर देतांना नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्र. 1 च्या ए.टी.एम. मशिनने तक्रारकर्त्याला रक्कम प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. ए.टी.एम. मशिनच्या उपयोगाची कृतीचा जर विचार केला तर असे आहे की, ए.टी.एम.कार्ड जेव्हा मशिनमध्ये टाकले जाते व रक्कम काढण्याचे जेव्हा मशिनला निर्देशित केले जाते तेव्हाच रक्कम बाहेर पडते. परंतू सदर ठिकाणी तक्रारकर्त्याचे कार्ड अडकून पडले असल्याने रक्कम मशिन बाहेर पडण्याची संभावनाच उद्भवत नाही, म्हणून उभय गैरअर्जदारांचे कथन हे मान्य करण्यासारखे नाही. तक्रारकर्त्याला रक्कम प्राप्त झाली असती व कार्डही प्राप्त झाले असते तर गैरअर्जदार क्र. 1 चे अधिका-याने तेथे येऊन मशिन उघडून कार्ड व रक्कम प्राप्त करण्याचा प्रश्नच उरला नसता. गैरअर्जदार क्र. 1 ने लेखी उत्तरामध्ये किंवा युक्तीवादामध्ये याबाबत स्पष्ट असे वक्तव्य न केल्याने व गैरअर्जदार क्र. 2 यांनी हजर होऊन तक्रारीस उत्तर दाखल न केल्याने सदर बाबी स्पष्ट होऊ शकल्या नाहीत. तसेच गैरअर्जदार क्र. 2 ने नोटीसला दिलेल्या उत्तरात गैरअर्जदार क्र. 1 ने सदर रक्कम कपात केल्याचे म्हटले आहे, मात्र त्याबाबत कुठलाही पुरावा उत्तरासोबत लावलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदारांचे कथन हे विश्वासार्ह वाटत नाही. गैरअर्जदारांच्या सदर कृतीमुळे तक्रारकर्त्याची विनाकारण रु.23,000/- ही रक्कम व त्यावरील व्याज दि.26.02.2008 पासून मिळण्यास तो वंचित राहिला आहे. गैरअर्जदारांचा यावरुन ग्राहकास देण्यात येणा-या सेवेत निष्काळजीपणा दिसून येतो व तक्रारकर्त्याची रक्कम न देण्यास उभय गैरअर्जदार जबाबदार असल्याचे मंचाचे मत आहे, म्हणून तक्रारकर्ता सदर प्रकरणी दाद मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला रु.23,000/- दि.26.02.2008 पासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 7. गैरअर्जदारांना वारंवार विचारणा करुनही स्पष्टपणे रक्कम कुणी कपात केली याबाबत खुलासा न केल्याने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास झाला. तसेच मंचासमोर येऊन त्याला आपला वाद मांडावा लागला. म्हणून सदर प्रकरणी तक्रारकर्ता मानसिक व शारिरीक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन व दाखल दस्तऐवजांवरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रु.23,000/- ही रक्कम दि.26.02.2008 पासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |