Final Order / Judgement | मा. सदस्य, श्री. नितिन एम. घरडे यांच्या आदेशान्वये - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे स्वरुप असे की, तक्रारकर्त्याचे चालू खाते विरुध्द पक्ष क्रं. 1 अॅक्सीस बँक वर्धा रोड नागपूर येथे होते. तक्रारकर्त्याने आपल्या भविष्याचा विचार करुन विरुध्द पक्ष क्रं. 2 यांच्याकडून दिनांक 23.04.2013 रोजी विमा पॉलिसी क्रं. 877247221 काढली असून त्याचा वार्षिक हप्ता रुपये 2,46,296.97 पै. एवढा होता.
- तक्रारकर्त्याने पुढे असे नमूद केले की, मार्च 2014 मध्ये तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष 1 यांच्याकडे जाऊन सांगितले की, एवढया मोठया रक्कमेची पॉलिसी ते पुढे चालविण्यास असक्षम आहे. त्यामुळे पॉलिसी रद्द करुन सदरच्या पॉलिसीमध्ये प्रिमियम पोटी जमा केलेली रक्कम तक्रारकर्त्याला परत करावी. याकरिता तक्रारकर्ता यांनी दिनांक 15.04.2014 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांच्याकडे प्रस्ताव ठेवला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दिनांक 21.04.2014 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना ई-मेल पाठविला. त्याचे उत्तर दिनांक 24.04.2014 रोजी व दिनांक 08.05.2014 रोजी विरुध्द पक्ष क्रं.2 यांनी दिले, परंतु त्यातून काहीही स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे पुन्हा तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना रुपये 2,50,000/- विम्याची रक्कम परत करावी असे पत्र दिले. त्यानंतर पुन्हा दिनांक 14.06.2014 रोजी तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठविली. विरुध्द पक्ष यांनी सदरच्या नोटीसला दि.11.07.2014 रोजी उत्तर सादर करुन विरुध्द पक्ष यांनी आपल्या संपूर्ण जबाबदा-या झटकल्या. त्यामुळे सरतेशेवटी तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.
- विरुध्द पक्ष यांना आदेशित करावे की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन व धोकादडी करुन त्यांच्या बचत खात्यातून बेकायदेशीररित्या जीवन विमाकरिता घेतलेली रक्कम रुपये 2,46,296.97 पै. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी व्याजासह परत करावी.
- विरुध्द पक्ष यांना आदेशित करावे की, त्यांनी तक्रारकर्ता यांना झालेल्या शारीरिक मानसिक त्रास, नुकसान भरपाई व खर्चापोटी एकूण रक्कम रुपये3,48,241.52पै. देण्याचा आदेश व्हावा.
- तक्रारकर्त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्षाला नोटीस बजाविण्यात आली. त्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी आपले लेखी उत्तर नि.क्रं. 17 वर दाखल केले असून त्यात असे नमूद केले की, तक्रारकर्ता यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलेले आहे की, त्याने रुपये 2,50,000/- एवढी रक्कम फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतविली होती. परंतु तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष 2 यांच्याकडे दि. 23.04.2013 रोजी विमा काढला असून त्याचा पॉलिसी क्रं. 877247221 असा आहे व त्याचा वार्षिक हप्ता रुपये 2,46,296.97 पै. एवढा होतो. तसेच तक्रारकर्त्याने स्वतः विरुध्द पक्ष 2 यांच्याकडून विमा पॉलिसी काढलेली असून तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष 1 यांच्याकडे पत्र व्यवहार करीत होते, त्यामुळे विरुध्द पक्ष 1 याला जबाबदार नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलेले आरोप प्रत्यारोप त्यांनी आपल्या उत्तरात खोडून काढलेले आहे. तसेच त्यांनी आपल्या प्राथमिक आक्षेपात ही बाब नमूद केली आहे की, तक्रारकर्ता यांनी विमा पॉलिसी काढतांना अटी व शर्ती समजून स्वाक्षरी केलेल्या होत्या. त्यामुळे अटी व शर्तीचा झालेला करार हा दोन्ही पक्षास बाध्य आहे. तसेच तक्रारकर्ता हे चुकिच्या व्यक्तिकडे म्हणजेच विरुध्द पक्ष 1 यांच्याकडे पॉलिसी रद्द करण्याबाबतचा अर्ज केला. जे की, विरुध्द पक्ष 2 यांच्याकडे करणे आवश्यक होते. त्यामुळे विरुध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्याला कोणत्याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- विरुध्द पक्ष 2 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 12 वर दाखल केला असून त्यात असे नमूद केले आहे की, विरुध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याशी कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार किंवा फसवणूक केलेली नाही. दि. 22.04.2013 रोजी तक्रारकर्ता स्वतः विरुध्द पक्ष 2 निर्धारित व्यक्ती अर्चना श्रीवास्तव यांच्याशी मुलाखात करुन संपूर्ण प्लॅन समजून व पॉलिसी बाबत संपूर्ण माहिती ऐकूनच पॉलिसी काढली होती व सदरच्या करारावर सुध्दा वाचून समजून स्वाक्षरी केलेली होती. तसेच पॉलिसीचे दस्ताऐवज दि. 23.04.2013 रोजी तक्रारकर्त्याला मिळाले होते व त्यावर प्रिमियमची रक्कम सुध्दा नमूद केलेली होती. तसेच तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, विरुध्द पक्ष 2 यांच्याकडे मार्च 2014 रोजी पॉलिसीचा मासिक हप्ता भरण्याकरिता मुलाखात केली व त्याने सदरची पॉलिसी रद्द करण्याबाबत लेखी निवेदन दिले. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये नमूद केलेले आरोप प्रत्यारोप त्यांनी आपल्या उत्तरात खोडून काढलेले आहे. तसेच कलम 13 (3) Redressal of Public Grievance Rule, 1998 प्रमाणे तक्रारकर्त्याला किंवा पॉलिसीधारकाला त्याने काढलेली पॉलिसी पुढे चालवावयाची नसल्यास त्याने Insurance ombudsman (विमा लवादा) येथे आपली तक्रार एक वर्षाच्या आत दाखल करावी व आपला वाद सोडवावयास पाहिजे होता परंतु तक्रारकर्त्याने असे केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची सदर तक्रार ही या मंचामध्ये चालविण्यास पात्र नाही व ती खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारी बरोबर अ.क्र. 1 ते 8 दस्ताऐवज दाखल केलेले असून त्यात विमा पॉलिसी, दिनांक 27.03.2014 रोजी विरुध्द पक्ष 2 यांना पाठविलेले पत्र, दिनांक 27.04.2014 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना ई-मेल द्वारे पाठविलेल्या पत्राची प्रत, दि. 08.05.2014 रोजी विमा पॉलिसी रद्द करण्याबाबत पाठविलेले पत्र, विरुध्द पक्ष 2 यांना दि. 14.05.2014 रोजी दिलेले पत्र, दिनांक 20.05.2014 रोजी तक्रारकर्त्याने पुन्हा पाठविलेले विमा पॉलिसी रद्द करण्याबाबतचे पत्र, दिनांक 14.06.2014 रोजी विरुध्द पक्षाला दिलेली नोटीस, दिनांक 11.07.2014 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 1 ने नोटीसला दिलेले उत्तर इत्यादी दस्ताऐवज दाखल केले. तसेच विरुध्द पक्षाने दाखल केलेले उत्तर व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. सदर दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावर कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद करण्यात येते.
- अ.क्र. मुद्दे उत्तर
1 तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक होतो काय? होय 2 विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण सेवा देऊन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला काय? होय 3 आदेश खालीलप्रमाणे कारणे व निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 व 2 – तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारी बरोबर दाखल केलेले दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडे विमा पॉलिसी काढली होती व सदरची पॉलिसी तक्रारकर्त्याने नि. 2 वरील दस्त क्रं. 1 वर दाखल केलेली आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. तसेच तक्रारकर्ता याने दि. 27.03.2014 रोजी विरुध्द पक्ष यांना पत्राद्वारे कळविले की, ते विमा पॉलिसी रद्द करु इच्छितो व त्यानंतर ई-मेल द्वारे व प्रत्यक्षात पत्र देऊन विरुध्द पक्षला पॉलिसी रद्द करण्याबाबत दिनांक 08.05.2014 व दि. 20.05.2014 रोजी विनंती अर्ज केले असल्याचे दिसून येते. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या विनंतीला कोण्ताही प्रतिसाद दिलेला नाही. तक्रारकर्त्याने आपल्या दिनांक 20.05.2014 च्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केले होते की, पॉलिसीच्या रक्कमेत नियमाप्रमाणे निर्धारित रक्कम कपात करुन उर्वरित रक्कम परत करावी. तरी सुध्दा विरुध्द पक्षाने आज पर्यंत तक्रारकर्त्याच्या सदरच्या विनंती अर्जाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे . त्यामुळे मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, तक्रारकर्ता हा पॉलिसीची रद्द करुन येणारी रक्कम मिळण्यास पात्र आहे.
सबब मंचाद्वारे खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येते. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारकर्त्याने काढलेली विमा पॉलिसी क्रं. 877247221 रद्द करुन नियमाप्रमाणे येणारी निर्धारित रक्कम तक्रारकर्त्याला दि. 08.05.2014 पासून 8 टक्के दराने व्याजासह परत करावी.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3000/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीकरित्या करावी.
- उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी
| |