(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 15/09/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 06.08.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील तक्रारकर्तीचे म्हणणे असे आहे की, मुंबई येथे दि.17.03.2008 रोजी तिने गैरअर्जदारांसोबत करार केला होता तो 60 महिन्यांचा होता. गैरअर्जदारांनी रु.49,950/- एवढी रक्कम 10 महिन्यात देण्यांचे कबुल केले, मात्र प्रत्यक्षात रु.29,960/- दिले परंतु उर्वरीत रक्कम रु.19,980/- मिळाले नाही. आणि त्यावर 12% व्याज सुध्दा कराराप्रमाणे मिळणार होते, ते मिळाले नाही. याबाबत तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना नोटीस पाठविली होती, पण त्यांचे उत्तर आले नाही म्हणून तिने सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे आणि ती व्दारे मानसिक त्रासाचे रु.20,000/-, आर्थीक छळाबाबत रु.19,980/-, फायद्यापासुन वंचीत राहील्यामुळे नुकसानी भरपाई दाखल रु.20,000/-, तक्रारीचा खर्च रु.5,000/- व इतर नुकसानी बाबत रु.20,000/- अशी एकूण रु.84,980/- ची मागणी केलेली आहे.
3. यात गैरअर्जदारांना नोटीस देण्यांत आले असता गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे, इतर गैरअर्जदारांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला.
4. यातील गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारीतील सर्व विपरीत विधाने नाकबुल केली, त्यांनी महत्वाचा आक्षेप असा घेतला आहे की, मंचास अधिकार क्षेत्र नाही कारण गैरअर्जदार क्र.1 ते 3 हे मुंबई येथील आहेत आणि तक्रारकर्तीसोबत करार हा दि.15.06.2009 रोजी मुंबई येथे झाला याबाबत Letter of Guarantee ज्याचा Reference No. 2010100000307 आहे ते गैरअर्जदार क्र.3 चे वतीने होते व त्याची मुदत ही दि.15.03.2010 पर्यंत होती. व तक्रारकर्तीची तक्रार चुकीची व गैरकायदेशिर आहे म्हणून ती खारिज व्हावी असा उजर घेतला आहे.
4. तक्रारकर्तीनी प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 7 वर करारनामा, चेकच्या प्रतिलीपी, बँक गॅरंटीचेपत्र, गैरअर्जदारांना दिलेल्या लेखी सुचना, कायदेशिर नोटीस, विमा हप्ता भरल्याचे बँकेचे विवरणपत्र इत्यादी दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.22.08.2011 रोजी आली असता दोन्ही पक्ष गैरहजर, गैरअर्जदारांचा लेखी युक्तिवाद दाखल. प्रकरण दि.03.09.2011 रोजी निकालाकरीता ठेवण्यांत आले होते, परंतु कोरम अभावी सदर प्रकरणातील निकाल दि.15.09.2011 रोजी ठेवण्यांत आला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
6. यातील गैरअर्जदारांचा मुख्यत्वे आक्षेप जो अधिकार क्षेत्रासंबंधी आहे, त्यावर प्रथम निर्णय घेणे गरजेचे आहे. यातील गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे पत्ते हे मुंबईतील आहेत. तसेच तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे करार हा मुंबई येथे झालेला आहे. त्यामुळे अश्या परिस्थितीत केवळ गैरअर्जदार क्र.1 व 2 ची शाखा नागपूर येथे आहे, एवढयाच कारणावरुन अधिकार क्षेत्राबाबत निष्कर्ष काढणे चुकीचे होईल, असे आमचे मत आहे.
7. वरील परिस्थिचा विचार करता सदरची तक्रार या मंचाचे अधिकारक्षेत्राचे बाहेरची आहे, या कारणास्तव खारिज करण्यांत येते. सबब खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार निकाली काढण्यांत येते.
2. तक्रारकर्तीने आपली तक्रार योग्य त्या न्याय मंचासमोर दाखल करावी, याबाबत त्यांचा अधिकार अबाधीत ठेवण्यांत येतो.