श्री प्रदीप पाटील, सदस्य यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 28 जानेवारी, 2016)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता हा वि.प. बँकेचा खातेधारक असून त्याचे बचत खाते क्र. 909010034046828 वि.प.बँकेमध्ये आहे. तक्रारकर्त्याला वि.प.बँकेने क्रेडीट कार्ड दिले असून त्याचा क्र. 4514-5700-0049-4487 आहे. तक्रारकर्त्याला त्याने क्रेडीट कार्डवर केलेल्या व्यवहाराची माहिती त्याच्या मोबाईलवर ई-मेलवर मिळत होती. परंतू मे 2014 पासून त्याच्या मोबाईलवर मेसेज येणे बंद झाले. त्यासंबंधी त्याने वि.प.कडे 07.05.2014 ला तक्रार केली. तक्रारकर्त्याने त्याच्या क्रेडीट कार्डवर झालेल्या व्यवहारासंबंधी माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला लक्षात आले की, त्याच्या क्रेडीट कार्डचा गैरवापर करुन नवि दिल्ली येथून त्याच्या खात्यातून रक्कम काढून घेण्यात आली आहे. तक्रारकर्त्याने वि.प.च्या हेल्पलाईनवरुन 07.05.2014 ला वि.प.बँकेला कळवून क्रेडीट कार्ड बंद केले. तक्रारकर्त्याने त्याच्या खात्याच्या संबंधी माहिती मागविल्यानंतर दि.20.05.2014 ला वि.प.बँकेकडे तक्रार नोंदविली. दि.03.05.2014 ते 07.05.2014 या कालावधीत त्याच्या क्रेडीट कार्डचा वापर करुन रु.17,200/- चा व्यवहार करण्यात आलेला आहे. तक्रारकर्ता या कालावधी दरम्यान दिल्लीला गेलेला नव्हता आणि या कालावधीमध्ये तक्रारकर्त्याने नेट बँकींगद्वारा कोणतेही व्यवहार केलेले नाही. तक्रारकर्त्याने 20.05.2014 ला पोलिस स्टेशन सदर येथे तक्रार नोंदविली. तसेच वि.प.बँकेकडे त्यासंबंधी तक्रार नोंदविली. वि.प.बँकेने 31.05.2014 ला पत्राद्वारे तक्रारकर्त्याला कळविले की, त्याने उल्लेखित केलेल्या कालावधीमध्ये केलेले ई-व्यवहार हे बरोबर असून त्यामध्ये वि.प.बँकेचा काहीही दोष नाही. तक्रारकर्त्याच्या क्रेडीट कार्डचा दुरुपयोग करुन तक्रारकर्त्याच्या खात्यातून रु.17,200/- कोणताही व्यवहार केलेला नसतांना कमी करण्यात आलेला आहे. तरीही वि.प.बँक तक्रारकर्त्याला संबंधित कालावधीचे व्याज व रकमेचा भरणा करण्यास सांगत आहे. तक्रारकर्त्याच्या क्रेडीट कार्डची सुविधा बंद करण्यात आलेली असूनही तक्रारकर्त्याला रकमेची मागणी करण्यात येत आहे. वि.प.बँकेने दि.20.05.2014 ला तक्रारकर्त्याला क्रेडीट कार्डचे विवरण पाठविले. त्यासोबत वि.प.बँकेने रु.52,212.57 इतक्यात रकमेचे बिल पाठविले. एवढेच नव्हे तर, रु.17,200/- चे विवादित बिलही त्यामध्ये समाविष्ट केले आहे. दि.21.05.2014 ला तक्रारकर्त्याने वि.प.ने पाठविलेले बिल व विवरण मंजूर नसल्याचे कळविले. परंतू वि.प.ने तक्रारकर्त्याचे कोणतेही म्हणणे ऐकले नाही आणि त्याला 06.06.2014 ला संपूर्ण रकमेचा भरणा करण्यास लावले. तक्रारकर्त्याचे क्रेडीट कार्ड बंद असूनही विवादित रु.17,200/- रकमेवर व्याजावर व्याज लावून तक्रारकर्त्याच्या क्रेडीट कार्डची रक्कम वाढविण्यात येत आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याने दि.23.09.2014 ला स्वतःच्या खात्यात असलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता तक्रारकर्त्याच्या खात्यातून रक्कम निघाली नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने वि.प.बँकेशी संपर्क केला असता त्यांनी तक्रारकर्त्याचा बचत खात्याचा व्यवहार बंद करण्यात आलेला आहे अशी माहिती दिली. तक्रारकर्त्याने 01.10.2014 रोजी वि.प. बँकेला पत्र देऊन सदर रकमेची मागणी केली. परंतू वि.प. बँकेने तक्रारकर्त्याला कोणतीही माहिती देण्याचे नाकारले. तक्रारकर्त्याच्या बचत खात्यातील रक्कमही वि.प.बँकेने काढून घेतलेली आहे. त्यानंतर 01.10.2014 रोजी तक्रारकर्त्याने त्याबाबत तक्रार नोंदविली व रु.15,087/- ची मागणी केली. परंतू वि.प.ने सदर रक्कम देण्यास नकार दिल्याने तक्रारकर्त्याला सदर तक्रार मंचासमोर दाखल करावी लागली व वि.प.ने बचत खात्यातील रक्कम रु.15,087/- ही रक्कम व्याजासह परत मिळावी, क्रेडीट कार्डचे बिल पाठवू नये, तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासाबाबत भरपाई मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस वि.प.वर बजावण्यात आली असता वि.प.मंचासमोर हजर झाले. परंतू पूरेशी संधी देऊनही तक्रारीस लेखी उत्तर दाखल न केल्याने त्यांचे लेखी उत्तराशिवाय कारवाई चालविण्याचा आदेश मंचाने पारित केला. मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- नि ष्क र्ष -
3. सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत त्याच्या विवादित देयकाबाबत वि.प.बँकेकडे केलेल्या दि.20.05.2014 च्या तक्रार अर्जाची प्रत दाखल केलेली आहे. तसेच नंतर तक्रारकर्त्याने त्याचदिवशी पोलिस स्टेशन, नागपूरलाही सदर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रार अर्जात वि.प.ला तक्रारकर्त्याने विवादित देयकाची रक्कम व त्यांचा संदर्भ क्रमांक पाठविलेला असल्याचे दिसून येते. तसेच पुढे पोलिस स्टेशनला केलेल्या तक्रारीत तक्रारकर्त्याने रु.17,200/- इतक्या रकमेची गडबड झालेली असून सदर रक्कमेची गडबड करणारे इंडिया व्हिजन क्रिएटशी संबंधित असल्याचेही नमूद केले आहे आणि या आधीही त्यांनीच याच नावाने व्यवहार केलेला आहे व ती रक्कम रु.6,974/- होती व तेथूनच रकमेमध्ये गडबड होणे सुरु झाल्याचे म्हटले आहे. तसेच तक्रारकर्त्याने संबंधित गणेश नावाच्या व्यक्तीचा व आणखीन दुस-याचा फोन क्रमांक नमूद केला आहे ज्यांच्याकडून त्यांना फोन आला होता व पुढे इंडिया व्हिजन क्रिएटशी संपर्क केला असता त्यांनी रु.5,974/- चा धनादेशही तक्रारकर्त्याला पाठविला आहे. तक्रारीत खरेदी केलेले पार्सल देण्याविषयी पडताळणीकरीता तक्रारकर्त्याला त्यांचा फोनही आला होता. त्यामुळे सदर गडबड ही इंडिया व्हिजन क्रिएटशी संबंधित आहे असे तक्रारकर्त्याने स्पष्टपणे तक्रारीत नमूद केले असतांनाही व वि.प.ला सदर तक्रारीची प्रत पाठवूनही वि.प.ने त्याबाबत तक्रारकर्त्याने नमूद केलेल्या क्रमांकावर व व्यक्तीवर काहीच कारवाई केल्याचे दिसून येत नाही. यावरुन वि.प. सदर वादाबाबत फारच उदासीन असल्याचे दिसून येते. वि.प.ने तक्रारकर्त्याची सदर रक्कम वळती करुन सेवेत न्यूनता ठेवलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या खात्यातून सदर रक्कम ही वि.प.ने वळती केल्याने पुढे त्याला त्याची जमा रक्कम रु.15,087/- काढता आली नाही. वि.प.चा सदर निष्काळजीपणामुळे तक्रारकर्त्याची सदर रक्कम ही वि.प.कडे कुंठीत आहे. तक्रारकर्त्याला वि.प.च्या सेवेतील न्यूनतेमुळे रकमेचा उपयोग करता आला नाही, म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार ही दाद मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
मंचाचे मते तक्रारकर्ता हा त्याच्या खात्यात जमा असलेली रक्कम रु.15,087/- ही रक्कम द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्ता मानसिक त्रासाबाबत व तक्रारीच्या खर्चाबाबत भरपाई म्हणून रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे.
उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रु.15,087/- ही रक्कम द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह परत करावी.
3) वि.प.ने तक्रारकर्त्याला मानसिक त्रासाबाबत व तक्रारीच्या खर्चाबाबत भरपाई म्हणून रु.5,000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत करावे.