निकालपत्र :- (दि.12/01/2012)(द्वारा–सौ.वर्षा एन.शिंदे, सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, उभय पक्षांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार हे दिवाणी न्यायालय कोल्हापूर येथे वरिष्ठ लिपीक पदावर काम करीत आहेत. त्यांचा पगार सामनेवाला बँकेकडे जमा होतो. तक्रारदाराने सामनेवाला बॅंकेकडून रु.2,75,000/- इतके घरतारण कर्ज घेतले आहे. त्याचे पूर्ण हप्ते आजअखेर बँकेकडे जमा केले आहेत. तक्रारदार सामनेवाला बॅकेचे नियमीत खातेदार आहेत. सामनेवालांनी त्यांचेकडे तक्रारदाराचे जमा होणारे पगारातून ऑगस्ट व सप्टेंबर-2009 मध्येअनुक्रमे रक्कम रु;9,359/- व रु.11,032/-परस्पर कोणत्याही सुचनेशिवाय व तक्रारदाराची कोणतीही लेखी अगर तोंडी मागणी न करता जमा पगारातून रक्कमा कपात केलेल्या आहेत. सदर कपातीबाबत विचारणा केली असता त्याबाबतचे कारण देण्यास तसेच पगाराची रक्कम देणेस नकार दिला. सदर वेळी दसरा व दिवाळी असलेने सदर रक्कमेची तक्रारदारास अत्यंत आवश्यकता असलेचे सांगूनही विनानोटीस व कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय रक्कम कपात करुन घेतली. ऐन सणाच्या वेळी संपूर्ण पगार कपात केलेने तक्रारदारास त्यांचे दैनंदिन गरजा भागवणे अडचणीचे व मुश्कीलीचे झाले आहे. सबब सदर कपात रक्कमेची मागणी करुनही रक्कम देणेस सामनेवालांनी नकार दिलेने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन कपात केलेली रक्कम रु.20,391/-, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु.35,391/- इतकी रक्कम द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह वसुल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तक्रारदारांचा सामनेवाला बँकेतील खातेउतारा, रिसीट ऑॅफ अॅक्सीस बँक, तक्रारदार नियमीत खातेदार असलेचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केले आहेत. (4) सामनेवाला बँकेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार मान्य केली कथनाखेरीज परिच्छेदनिहाय नाकारली आहे. नमुद कायदयातील कलम 2 (o) व2 (d) चा विचार करता चालणेस पात्र नाही. तक्रार अर्जातील कलम 1 व 2 मधील मजकूर सर्वसाधारणपणे खरा व बरोबर आहे. मात्र तक्रारदार हा नियमित खातेदार असलेचे नाकारले आहे. तक्रारदाराचे सत्य वस्तुस्थिती सदर मंचापासून लपवून ठेवली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदार यांची पत्नी सौ. अनिता अशोक कुंभार यांनी क्रेडीट कार्ड सुविधा तसेच अॅड-ऑन क्रेडीट कार्ड सुविधेबाबत सामनेवालांकडे विनंती अर्ज केला होता. सदर विनंतीवरुन सामनेवालांनी तक्रारदार व त्यांचे पत्नीस क्रेडीट कार्ड सुविधा तसेच अॅड-ऑन क्रेडीट कार्ड सुविधा दिली. सदर कार्डचा वापर करुन त्यांनी ज्वेलरी तसेच अन्य वस्तुची खरेदी केली. मात्र त्याची कायदेशीर देय रक्कम वेळेत सामनेवालांना परतफेड केली नाही. त्यांनी दिलेले वचनाचा भंग केला आहे. त्याबाबत सामनेवालांनी त्यांचेकडे रक्कम परतफेडीबाबत वेळोवेळी संपक साधला त्यास त्यांनी दाद दिली नाही. त्याबाबत त्यांना रक्क्मेची डिमांड नोटीस पाठवली ती त्यांनी स्विकारली आहे. सदर नोटीसी व्यतिरिक्त सामनेवालांचे कर्मचा-यांनी त्यांचे घरी जाऊन वेळोवेळी भेटून रक्कम भागवणेबाबत सांगूनही सदर रक्कम भागवली नाही. सबब त्यांना पूर्व सुचना देऊन BANKERS LIENतक्रारदाराचे पगार खातेस नमुद केले. तरीही त्यांनी देय रक्कम देणेबाबत दूर्लक्ष केले. त्यांनी रक्कम भरणेची जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे सदर रक्कम तक्रारदाराचे पगार खातेवर नांवे टाकणेखेरीज कोणताही पर्याय सामनेवालांकडे राहीला नाही. सदर वस्तुस्थिती लपवून ठेवून तक्रारदार मंचाची दिशाभूल करत आहेत. तक्रारीस कारण घडलेले नाही. सामनेवालांनी तक्रारदाराचे खातेवर बॅंकेचा चार्ज ठेवून कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदार हा सातत्याने थकबाकीदार आहे. सामनेवालांची देय रक्कम व्याजासह अदा केलेली नाही. सामनेवाला बँकेकडे असलेला पैसा हा जनतेचा/बँकेचे ठेवीदारांचा आहे. तसेच सभासद, ग्राहक ठेवीदार यांचे हिताचे रक्षण करणेची जबाबदारी सामनेवालांची आहे. त्यांचा सामनेवालांच्या प्रती असणारा विश्वास राखणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सामनेवालांनी तक्रारदाराचे खातेतून रक्कमेची वसूली केली ही व्यापकहिताचा विचार करुन व कायदयाचा अवलंब करुन केली असलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी. तसेच तक्रारदारास सामनेवालांना रक्कम रु.10,000/- कॉम्पेसेंटरी कॉस्ट देणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला बँकेने त्यांच्या म्हणण्यासोबत तक्रारदार यांचा क्रेडीट कार्ड मागणी अर्ज, क्रेडीट कार्ड वापरले खाते उतारा, तक्रारदार यांचे खातेवरुन लिन केलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (7) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रस्तुत तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे काय? --- होय. 2. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. अंशत: 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:-सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(ओ) सेवा तसेच कलम2(1)(डी) ग्राहक या संज्ञेत येत नसलेने प्रस्तुतची तक्रार चालविणेचे अधिकारक्षेत्र मे. मंचास नसलेचे प्रतिपादन केले आहे. याचा विचार करता सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार हा त्यांचा कर्जदार असलेचे मान्य केले आहे. तसेच दाखल खाते उता-यावरुन नियमितपणे कर्जफेड केलेचे दिसून येते. त्याबाबत वाद नाही. सामनेवालांनी तक्रारदार व त्यांची पत्नी अनिता यांना क्रेडीट कार्ड व अॅड-ऑन क्रेडीट कार्ड सुविधा दिलेचे मान्य केले आहे. त्यामुळे ते सामनेवाला यांचे क्रेडीट कार्डधारक ग्राहक आहेत. सदर सुविधा देणेचे काम सामनेवालांकडे असलेने ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(ओ) व 2(1)(डी) नुसार तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेस पात्र आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्ड सुविधा दिलेने सदर सेवेबाबत त्रुटी ठरवणेचे अधिकार या मंचास आहेत. सबब सामनेवाला यांनी दिलेली सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(ओ) नुसार सेवा संज्ञेस पात्र असलेने सदरची तक्रार चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. क्रेडीट कार्ड सुविधेबाबतची सेवात्रुटी निश्चित करणेचे अधिकार या मंचास आहेत. सबब विस्तृत विवेचनाचा विचार करता सदरची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 व 3:-सामनेवाला यांनी दाखल केले कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि.04/04/2007 रोजी तक्रारदाराची पत्नी अनिता यांनी क्रेडीट कार्डसाठी लेखी अर्ज देऊन मागणी केली आहे. सदर क्रेडीट कार्ड अर्जाचे अवलोकन केले असता तक्रारदाराची पत्नी ही सेल्फ एम्लॉई असून गणेश सप्लायर्सची प्रोप्रायटर असलेचे नमुद केले आहे. तसेच व्यवसायाचे स्वरुप पेंट सेल(रंग विक्री) नमुद आहे. तसेच राहते घर व व्यवसायाचे ठिकाणाचा पत्ता दिलेला आहे. तसेच अॅड-ऑन कार्ड होल्डर म्हणून तक्रारदाराचे नांव नमुद आहे. सदर अर्जावर तक्रारदार व त्याचे पत्नीचेही नांव आहे. यावरुन तक्रारदार हा अॅड-ऑन कार्ड होल्डर असून त्याची पत्नीही क्रेडीटकार्ड होल्डर आहे. सामनेवालांनी दाखल केले क्रेडीट खातेउतारानुसार सदर क्रेडीट कार्ड तक्रारदाराचे पत्नी अनिता हिचे नावाचे असून कार्ड क्र.4718630000649862 आहे. दि.26/11/09 चे स्टेटमेंट असून क्रेडीट लिमिट रु.12,000/- आहे. मागील देय शिल्लक रु.28,386.01 असून दि.09/8/09, 10/06/09, 10/12/09 म्हणजेच दि.08/09/09, 06/10/09, 12/10/09 रोजी अनुक्रमे रु.9,359/-, 7,982/-, व रु.2,500/- इतकी रक्कम क्रेडीट केलेली आहे. सदर रक्कमा सामनेवाला यांना मिळालेल्या आहेत. सदर स्टेटमेंटवर पे अमाऊंट डयू म्हणून शुन्यची नोंद आहे. तसेच डयू डेटची नोंद नाही. मात्र दि.15/05/007 ते 15/12/08 या कालावधीच्या दाखल स्टेटमेंटमध्ये पेमेंट अमाऊंट डयू तसेच डयू डेट नमूद केली आहे. त्यानुसार दि.15/12/2008 चे स्टेटमेंटनुसार रु.28,386.01 इतकी मागील शिल्लक आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास पाठविले दि.05/08/09चे पत्र क्र.2013 चे अवलोकन केले असता क्रेडीट कार्ड नं.4718xxxxxxxx9870 सामनेवालांचे क्रेडीट कार्ड देय रक्कमेपोटी रु.28,386.01 चे लिन तक्रारदाराचे सेव्हींग खाते क्र.13401010100143592 नमुद केलेले आहे. 60 दिवसांमध्ये नमुद रक्कम अदा केली नाही तर प्रमाणपत्र (नोटीस) मिळालेपासून 7 दिवसांचे आत रक्कम भरणा करणेबाबत कळवले. सदर रक्कम भरणा न केलेस सेव्हींग खातेवर नांवे टाकले जाईल असेही नमुद केले आहे. कार्ड मेंबर अॅग्रीमेंट कलम 31 नुसार सामनेवालांना लिन करणेचा अधिकार असलेचे नमुद केले आहे. मात्र प्रस्तुत करारपत्र दाखल केलेले नाही. सबब केवळ त्यांचे कथनावर विश्वास ठेवता येणार नाही.तक्रारदाराने दाखल केलेले त्याचे सेव्हींग खाते उता-याचे अवलोकन केले असता दि.08/09/09 रोजी रु.9,359/- इतकी रक्कम नांवे टाकलेली आहे. ती सामनेवालांचे वकीलांनी युक्तीवादाच्या वेळेस मान्य केलेली आहे. तसेच रु.11,032/- ही रक्कम नांवे (डेबीट) टाकलेली नसून ती जमेची (क्रेडीट) नोंद आहे या मुद्दयाकडे मंचाचे लक्षा वेधलेले आहे. सबब दाखल कागदपत्रे व पुराव्यावरुन रक्कम रु.9,359/- इतकी रक्कम सामनेवालांनी नांवे टाकलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराचे पत्नीने क्रेडीट कार्ड व्यवहारापोटी वैभव ज्वेलर्स येथून खरेदी केलेची स्टेटमेंटवर नोंद आहे. मात्र त्याबाबतचा पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. दि.26/11/09 चे स्टेटमेंटनुसार प्रिव्हीयस बॅलन्स म्हणून रु.28,386.01 अशी नोंद आहे. तर दि.09/08/09, 10/06/09 व 10/12/09 रोजी अनुक्रमे रु.9,359/-, 7,982/-, 2,500/- इतक्या रक्कमांची क्रेडीटची नोंद केलेली आहे. यावरुन प्रस्तुत रक्कमा सामनेवालांनी कपात करुन घेतलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो अशा प्रकारे रक्कम कपात करुन घेता येईल का? तक्रारदाराने प्रस्तुत क्रेडीट कार्डवर खरेदी केलेचे नाकारले आहे. तसेच पूर्वसुचनेचे पत्र मिळाले नसलेचे तक्रारदाराने नमुद केले आहे. वादाकरिता अशाप्रकारे क्रेडीट कार्डवर खरेदी केली असेल तर संपूर्ण पगाराची रक्कम कपात करुन घेता येईल का? याचा विचार करता सामनेवाला यांचे वकीलांनी तक्रारदाराचा सॅलरी अकौन्ट अॅक्सेस बँकेत असलेचे तसेच रक्कम रु.9,359/- इतकी रक्कम नांवे टाकलेचे नमुद केले आहे. तसेच त्याप्रमाणचे त्याचे सेव्हींग खातेउता-यावरुन सदर बाब निदर्शनास येते. इंडियन कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट 1872 कलम 171 नुसार जनरल लीन करणेबाबत बॅकेचा राईट असलेचे प्रतिपादन केले आहे व त्यास अनुसरुन क्रेडीट कार्डचे सामनेवालांचे थकीत रक्कम तक्रारदाराचे सेव्हींग खातेवरुन कपात करुन घेतलेली आहे असे प्रतिपादन केले आहे. प्रस्तुत कलम 171 पुढीलप्रमाणे आहे. 171- General lien of bankers, factors, wharfingers, attorneys and policy-brokers-Bankers, factors wharfingers, attorneys of a High Court and policy-brokers may, in the absence of a contract to the contrary, retain, as a security for a general balance of account any good bailed to them; but no other persons have a right to retain, as a security for such balance, goods bailed to them, unless there is an express contract to that effect. त्यास तक्रारदाराचे वकीलांनी जोरदार हरकत घेतली आहे. तक्रारदाराचे वकीलांनी जनरल लीनखाली सेव्हींग वरील रक्कम परस्पर कपात करता येणार नाही तसेच त्यासाठी स्पेसिफिक लीनचा विचार करता येणार नाही. वादाकरिता कोणतेही लीन अमंलात आणावयाचे झाले तर सदर रक्कम कपात न करता जास्तीत जास्त ती सिझ करता येईल असे प्रतिपादन केलेले आहे. वरील प्रतिपादनांचा विचार करता Lien म्हणजे – Lien is the form of security interest granted over and item of property the secure the payment of date or performance of some other obligation. The owner of the property, who grants the lien, is refer to as the lienor and person who has the benefit of lien is refered to as the lienee the etymological root is Anglo-French lien, loyen “bond” “restraint”, from Latin ligament from ligara “to bind”. In other common law countries, the term lien refers to a very specific type of security interest, being a passive right to retain (but not sell) property until the death or other obligation is discharged. Slightly anomalous form of security interest form of security interest called an “equitable lien” which arises in certain rare instances. Liens can be consensual or non-consensual. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवालांना प्रस्तुत रक्कम कपात करुन घेणेचा कोणताही अधिकार नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार अथवा त्याचे पत्नीने केलेल्या क्रेडीट कार्ड खरेदीपोटीच्या देय रक्कमेच्या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रियेच अवलंब करावयास हवा होता. सामनेवाला यांनी दि.14/12/2009 चे यादीने दाखल केलेले लीन केलेले पत्र दाखल केलेले आहे. मात्र प्रस्तुत पत्र तक्रारदारास पाठवलेचा व ते तक्रारदारास मिळालेचा पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदाराने अशाप्रकारे पत्र त्यांना मिळाले नसलेचे प्रतिपादन केले आहे. यामध्ये तक्रारदाराने खरोखरच क्रेडीट कार्डवर खरेदी केली आहे का त्याचा पुरावा असेल तर सदर रक्कमा भरणेसाठीची डिमांड नोटीस, डिमांड नोटीसनंतरही रक्कमा भरल्या नसतील तर तक्रारदाराचे खाते तेथेच असलेने प्रस्तुत रक्कम कपात करणेपूर्वीची नोटीस, रक्कम भरणा करणेची संधी व सदर संधी देऊनही रक्क्मा न दिलेचे तदनंतर रक्कम गोठवणेची (सिझ किंवा रिस्ट्रेन, रिटेन) प्रक्रिया राबवावयास हवी होती. यामध्ये तक्रारदाराची रक्कम सेव्हींगवरुन परस्पर कपात न करता सदर रक्कम काढणेस प्रतिबंध करणे सामनेवालांचे दृष्टीने कायदेशीर होते. मात्र तसे न करता दसरासारख्या महत्वाच्या सणाला तक्रारदाराची पगाराची संपूर्ण रक्कम सामनेवाला यांनी कापून घेतलेली आहे. प्रचलित कायदयाचे तरतुदीनुसार कोणत्याही कायदेशीर देण्याचे वसुलीपोटी कोणताही कायदा संपूर्ण पगार कपात करुन घेणेची मुभा देत नाही याचा विसर सामनेवाला बँकेस पडलेला आहे. तक्रारदारास सामनेवालांचे बेकायदेशीर कृत्यामुळे त्याचे कुटूंबाचा चरितार्थ चालवणे व दैनंदिन गरजा भागवणे दुरापास्त झाले या वस्तुस्थितीकडे या मंचास दुर्लक्ष करता येणार नाही. वादाकरिता बॅकेचा वसुलीचा अधिकार सुरक्षित राखणेसाठी लीन करणेच्या कायदेशीर अधिकाराचा अवलंब केला तरी लीनमध्ये वस्तु विक्री करणेची मुभा नाही तसेच लीननुसार मिळकत (रियल प्रॉपर्टी), रिस्ट्रेन रिटेन, सिझ करुन ठेवता येईल. त्यापेक्षा वेगळी कृती करता येणार नाही. सबब वरील विसतृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदाराचे सेव्हींग खातेवरील रक्कम कपात न करता प्रतिबंधीत करावयास हवी होती. तसेच सदर रक्कम प्रतिबंधीत करताना संपूर्ण पगाराची रक्कम त्यांना प्रतिबंधीत करता येणार नाही तर त्याचे कुटूंबाचे दैनंदिन व अपश्यक गरजा भागवणेची कायदयाने गृहीत धरलेली रक्कम वजा करुनच उर्वरित रक्कम सामनेवाला यांना प्रतिबंधीत करता आली असती व तदनंतर कायदेशीर वसुलीची प्रक्रिया राबवून वसुली करता आली असती मात्र तसे न करता सामनेवाला यांनी अनाधिकाराने तक्रारदाराचे पगाराची संपूर्ण रक्कम कपात करुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेच निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराने त्याचे दाखल केलेले रिजॉइन्डरमध्ये महाराष्ट्र शासन यांचेतर्फे दिवाळी सणासाठी देणेत आलेले अग्रीम रक्कम रु.2,500/-सामनेवाला यांनी दि.12/10/2009 रोजी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेनंतर बेकायदेशीरपणे कपात करुन घेतलेली आहे असे नमुद केले आहे. मात्र त्या संदर्भात मूळ तक्रार अर्जात सदर रक्कमेची मागणी केलेली नाही तसेच तक्रारीत दुरुस्तीही केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार फक्त रक्कम रु.9,359/-इतकी रक्कम व्याजासह मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले. त्यामुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला यांनी तक्रारदारास कपात केलेली रक्कम रु.9,359/-(रु.नऊ हजार तीनशे एकोणसाठ फक्त) तक्रारदाराचे खातेवर जमा करावेत. सदर रक्कमेवर दि.09/08/09 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज अदा करावे. 3. सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/-(रु.तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |