(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 28 ऑक्टोबर, 2015)
तक्रारकर्ता रंजितकुमार नंदरधने याला Axis Bank यांच्या एटीएम कार्डद्वारे युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा साकोली, जिल्हा गोंदीया येथील एटीएम मधून रू.15,000/- न मिळाल्याने आणि तक्रारकर्त्याच्या बचत खात्यातून विरूध्द पक्ष 2 यांनी (debit) वजा केलेली रक्कम नुकसानभरपाईसह मिळण्याकरिता तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार न्याय मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याजवळ Axis Bank चे 4505020002467967 या क्रमांकाचे एटीएम कार्ड असून त्याचा बचत खाते क्रमांक 048010100508117 असा आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 12/11/2014 रोजी Axis Bank शाखा गोंदीया येथून एटीएम कार्डद्वारे रेकॉर्ड क्रमांक 5417 नुसार रू.10,000/- व रेकॉर्ड क्रमांक 5422 नुसार रू.5,000/- काढले असता एटीएम मधून सदरहू दोन्ही रकमा तक्रारकर्त्यास मिळाल्या नाहीत परंतु तक्रारकर्त्याच्या खात्यातून मात्र त्याची कपात करण्यात आली. तक्रारकर्त्याने लगेचच विरूध्द पक्ष 2 यांचेसोबत संपर्क साधला असता त्यांनी तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष 1 यांचेसोबत संपर्क साधून तक्रार नोंदविण्यास सांगितले.
3. तक्रारकर्त्याने दिनांक 12/12/2014 रोजी विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे ‘रक्कम निघाली नाही’ म्हणून तक्रार नोंदविली. त्यानंतर दिनांक 29/12/2014 रोजी खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने पुन्हा दुसरी तक्रार विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे नोंदविली. तकारकर्त्याने दिनांक 09/01/2015 रोजी विरूध्द पक्ष 1 यांना नोटीस पाठविली. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्या धोरणानुसार विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे 7 दिवसांच्या आंत निराकरण करणे आवश्यक असतांनाही विरूध्द पक्ष यांनी तसे केले नाही. उलट तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांना तक्रार दिली असता त्यांनी तक्रारकर्त्याचे प्रकरण Arbitrator कडे पाठविण्यात येईल व त्यानंतर तक्रारकर्त्याची रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा करण्यात येईल असे सांगितले. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या वारंवार केलेल्या तक्रारीची कुठलीही दखल न घेतल्यामुळे व तक्रारकर्त्याला त्याच्या एटीएम मधून पैसे न मिळाल्यामुळे तसेच त्याच्या खात्यातून रकमेची कपात करण्यात आल्यामुळे त्याला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्त्याला त्याच्या एटीएम मधून न मिळालेली रक्कम रू.15,000/- परत मिळण्याकरिता व मानसिक त्रासापोटी रू.20,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू.5,000/- मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
4. तक्रारकर्त्याची तक्रार दिनांक 30/01/2015 रोजी मंचात दाखल करून घेण्यात आल्यानंतर विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत दिनांक 04/02/2015 रोजी नोटीसेस बजावण्यात आल्या.
5. विरूध्द पक्ष 1 Axis Bank यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दिनांक 26/03/2015 रोजी दाखल केला असून विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये तक्रारकर्त्याने दिनांक 12/11/2014 रोजी विरूध्द पक्ष 2 यांच्या साकोली शाखेतून Axis Bank च्या Debit Card द्वारे रू.10,000/- 13.48 वाजता व रू.5,000/- 13.56 वाजता काढल्याचे नमूद केले आहे. तसेच तक्रारकर्त्याची तक्रार विरूध्द पक्ष 1 यांना दिनांक 29/12/2014 रोजी प्राप्त झाल्यावर त्यांनी तक्रारकर्त्याची तक्रार पुढील कार्यवाहीकरिता विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे पाठविल्याचे म्हटले आहे. विरूध्द पक्ष 1 यांनी दिनांक 02/01/2015 रोजी तक्रारकर्त्याचे पैसे त्याच्या खात्यात जमा करण्याबाबतचा दावा विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे दाखल केला. परंतु विरूध्द पक्ष 2 यांनी दावा नामंजूर करून रू.10,000/- व रू.5,000/- चे Transaction successful झाल्याबद्दल दिनांक 02/01/2015 रोजी E-mail द्वारे तक्रारकर्त्याला कळविले. विरूध्द पक्ष 2 यांनी पैसे काढल्याबद्दलचा पुरावा म्हणून J. P. Log ची प्रत सुध्दा विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे सादर केली. विरूध्द पक्ष 1 यांनी जबाबात असेही म्हटले आहे की, J. P. Log म्हणजेच Journal Printer हे final & deciding factor for ATM withdrawals तसेच physical cash balance करिता ठोस पुरावा आहे. तक्रारकर्त्याची तक्रार प्राप्त झाल्यावर लगेचच विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा पाठपुरावा केला असल्यामुळे विरूध्द पक्ष 1 यांची कुठल्याही प्रकारे सेवेतील त्रुटी नाही. त्यामुळे त्यांच्याविरूध्दची तक्रार खारीज करण्यात यावी असे विरूध्द पक्ष 1 यांनी लेखी जबाबात म्हटले आहे.
6. विरूध्द पक्ष 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 30/04/2015 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्त्याने एटीएम द्वारे रू.10,000/- व रू.5,000/- काढल्यामुळे आणि Transaction successful झाल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. विरूध्द पक्ष 2 यांच्या bank statement account ledger report नुसार एटीएम मध्ये जास्तीची रक्कम शिल्लक नव्हती तसेच विरूध्द पक्ष यांच्या J. P. Log मधील रेकॉर्ड नंबर 5417 व 5422 नुसार Transaction successful झाल्यामुळे तक्रारकर्त्याच्या खात्यातून रक्कम वळती करणे म्हणजे सेवेतील त्रुटी ठरत नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार ही खोट्या स्वरूपाची असून ती पैसे उकळण्याच्या उद्देशाने दाखल केलेली आहे. एटीएम कॅमे-याचे C.C.T.V. Footage हे lapse झाल्यामुळे ते सदरहू प्रकरणात दाखल केलेले नाहीत. तक्रारकर्त्याने खोटी तक्रार दाखल केल्यामुळे त्याच्याविरूध्द Indian Penal Code च्या कलम 193 नुसार Criminal Case दाखल करण्याचा आदेश देण्यात यावा व तक्रारकर्त्यावर compensatory cost रू.50,000/- बसविण्यात यावी. तसेच तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरण खोट्या पुराव्यावर दाखल केल्यामुळे Indian Penal Code च्या कलम 191 नुसार कार्यवाही करण्यात यावी असे लेखी जबाबात म्हटले आहे.
7. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत विरूध्द पक्ष 2 युनियन बँकेच्या ATM द्वारे पैसे काढल्याबाबतच्या पावत्या पृष्ठ क्र. 10 वर, Axis बँकेचे सविस्तर विवरणपत्र पृष्ठ क्र. 11 वर, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 Axis बँक यांच्याकडे दिलेली लेखी तक्रार पृष्ठ क्र. 12 वर, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 Axis बँक यांना दिलेले पत्र पृष्ठ क्र. 13 वर, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र. 1 यांना दिलेली नोटीस पृष्ठ क्र. 14 वर व भारतीय रिजर्व बँक यांचे Reconciliation of failed transaction at ATMs बाबतचे पत्र पृष्ठ क्र. 17 वर दाखल केले आहे.
8. तक्रारकर्त्याने स्वतः युक्तिवाद केला की, विरूध्द पक्ष 1 यांनी दाखल केलेल्या J. P. Log मधील रेकॉर्ड नंबर 5417 नुसार Cash presented व त्यानंतर Cash present time expired transaction end असे दर्शविले आहे. तसेच तक्रारकर्त्याचे रू.5,000/- चे Unsuccessful transaction बद्दल दिनांक 12/11/2014 रोजी 13.54 वाजता रेकॉर्ड नंबर 5422 – withdrawal रू. 5,000/- ledger balance 29.288.33 व available balance 29,288.53 असेच दर्शविले असून cash presented 13.53.58 वाजता cash present timer expired 13.54.13 असे दाखविले असल्यामुळे तक्रारकर्त्याच्या खात्यामधून J. P. Log नुसार रू.10,000/- व रू.5,000/- चे withdrawal झाले नसल्याचे निष्पन्न होते. त्यामुळे एटीएम द्वारे रू.10,000/- व रू.5,000/- चे withdrawal तक्रारकर्त्याला न मिळाल्यामुळे आणि विरूध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याच्या खात्यातून सदर रकमांची कपात केल्यामुळे तक्रारकर्त्याची आर्थिक अवहेलना होत आहे.
एटीएम मधून पैसे न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याने लगेचच विरूध्द पक्ष यांच्याकडे तोंडी तक्रार नोंदविली होती. परंतु विरूध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याला काही दिवस वाट पहा व पैसे पुन्हा खात्यामध्ये आपोआप reverse entry द्वारे जमा होतील असे सांगितले. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 12/12/2014 रोजी विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे नाईलाजास्तव लेखी तक्रार नोंदविली. तक्रारकर्ता हा नोकरीपेशा जबाबदार व्यक्ती असून तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार ही संपूर्णतः खरी व पुराव्यासह दाखल केलेली असल्यामुळे तसेच J. P. Log नुसार एटीएम मधून काढण्यात आलेली रक्कम रू.10,000/- व रू.5,000/- तक्रारकर्त्याला न मिळाल्याचे निष्पन्न होत असल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार नुकसानभरपाईसह मंजूर करण्यात यावी असा तक्रारकर्त्याने युक्तिवाद केला.
9. विरूध्द पक्ष 1 यांच्यातर्फे त्यांचे वकील ऍड. ए. एन. मिश्रा यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याची लेखी तक्रार प्राप्त होताच तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा पाठपुरावा विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे करण्यात आला. विरूध्द पक्ष 2 यांना तक्रारकर्त्याचे पैसे तक्रारकर्त्याच्या खात्यात पुन्हा जमा करण्याची विनंती केली असता विरूध्द पक्ष 2 यांनी Transaction successful झाल्याचे कळविले. विरूध्द पक्ष 1 यांचा सदरहू प्रकरणात कुठलाही सहभाग नसल्यामुळे व विरूध्द पक्ष 2 यांच्या युक्तिवादास विरूध्द पक्ष 1 सहमती दर्शवित असल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
10. विरूध्द पक्ष 2 यांच्यातर्फे त्यांचे वकील ऍड. जे. एल. परमार यांनी युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने तक्रार दाखल करण्यात 18 दिवसांचा विलंब केला आहे. विरूध्द पक्ष 2 यांचे शाखा व्यवस्थापक यांनी Evidence Act च्या Sec. 65 नुसार एटीएम मध्ये No excess amount of cash दिसून न आल्याबद्दल Excess cash confirmation दिनांक 09 जानेवारी 2015 आणि दिनांक 11/12/2014 रोजीचे Transaction 5417 चे पृष्ठ क्र. 52 वर व 5422 चे पृष्ठ क्र. 53 वर दाखल केले आहे. सदरहू J. P. Log नुसार तक्रारकर्त्याचे दोन्ही Transaction successful झाल्याचे दिसत असून तक्रारकर्त्याला निश्चितच रू.10,000/- व रू.5,000/- रक्कम मिळालेली आहे. विरूध्द पक्ष 2 यांनी दाखल केलेल्या Ledger balance नुसार Transaction 5417 अन्वये रू.10,000/- व त्यानंतर Transaction 5422 नुसार रू.5,000/- चे withdrawal केल्यानंतर विरूध्द पक्ष यांच्या एटीएम मधील Ledger balance हा रू.10,000/- व रू.5,000/- ने कमी झालेला आहे. तक्रारकर्ता हा संगणक तज्ञ असल्यामुळे त्याने मशीनमध्ये बिघाड उत्पन्न करून व पैसे घेऊन Transaction unsuccessful दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तक्रारकर्त्याने खोट्या पुराव्याच्या आधारावर सदरहू प्रकरण दाखल केल्यामुळे त्याच्याविरूध्द भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी कार्यवाही करण्यात यावी. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांचे मशीन हे defective असल्याबद्दलचा कुठलाही Expert Evidence दाखल न केल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी असा युक्तिवाद केला.
11. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष 1 व 2 यांचे लेखी जबाब व दोन्ही बाजूचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
12. विरूध्द पक्ष युनियन बँक ह्यांनी तक्रारकर्त्याच्या विवादित ATM withdrawal संबंधी दिनांक 12/11/2014 चे 5417 व 5422 चे J. P. Log पृष्ठ क्र. 52 व 53 वर विरूध्द पक्ष 2 चे प्राधिकृत उप व्यवस्थापक श्री. अनिल बंसोड ह्यांचे प्रतिज्ञापत्राच्या पुराव्याद्वारे व Indian Evidence Act, 1872 चे कलम 65-A नुसार दाखल केलेले आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 12/11/2014 रोजी 13.48 वाजता J. P. Log Record No. 5417 नुसार तक्रारकर्त्याचे ATM कार्डचे PIN match झाल्यामुळे तक्रारकर्त्याचे प्रथमदर्शनी Transaction successful झाले असे दर्शविले आहे. परंतु 13.48.29 वाजता cash presented झाली व 13.48.44 वाजता cash present timer expired असा शेरा J. P. Log मध्ये आल्याचे दिसून येते. तसेच 13.48.49 वाजता Transaction end असे दर्शविले आहे. परंतु Cash taken असा शेरा J. P. log वर उपलब्ध नाही.
13. तसेच तक्रारकर्त्याचे दुसरे विवादित ATM withdrawal रू.5,000/- जे J. P. Log मध्ये 5422 Record number वर दाखविले आहे व ते पृष्ठ क्र. 53 वर दाखल केलेले आहे. त्यानुसार तक्रारकर्त्याने दिनांक 12/11/2014 रोजी विरूध्द पक्ष 2 युनियन बँक, साकोली, जिल्हा गोंदीया येथून दिनांक 12/11/2014 ला रू.5,000/- withdrawal करण्यासाठी ATM कार्ड टाकून PIN Enter करून प्रथमदर्शनी Transaction PIN बरोबर मिळाल्यामुळे Transaction successful दाखविले आहे. परंतु cash withdrawal साठी आदेश दिल्यानंतर 13.53.58 वाजता cash रू.5,000/- present केल्या गेली व cash न उचलल्या गेल्यामुळे cash present timer expired ही बाब 13.54.13 ला दर्शविली आहे. त्यामुळे वरील दोन्ही ATM withdrawal ची cash अनुक्रमे रू.10,000/- व रू.5,000/- तक्रारकर्त्याने ATM मशीन मधून वेळेत न उचलल्यामुळे ती cash पुन्हा ATM मशीनमध्ये गेलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे Transaction successful न झाल्यामुळे तक्रारकर्त्याला रू.10,000/- व रू.5,000/- ATM मशीनद्वारे मिळाले नाही ही बाब सिध्द होते.
14. विरूध्द पक्ष 2 यांनी दाखल केलेल्या इतर Transaction संबंधी J. P. Log नुसार Record number 5421 12/11/2014 ला रू.500/- चे ATM withdrawal नुसार 13.52.53 ला Cash presented व 13.52.53 ला Cash taken असा Remark आल्यामुळे सदरहू ATM withdrawal द्वारे Cash ATM Operator ला मिळाल्याचे सिध्द होते. परंतु तक्रारकर्त्याच्या Record number 5417 रू.10,000/- व Record number 5422 रू.5,000/- Cash taken असा Remark J. P. Log मध्ये न दर्शविल्यामुळे तक्रारकर्त्याला रू.10,000/- व रू.5,000/- मिळाले नाही व सदरहू रक्कम विरूध्द पक्ष क्र. 2 ह्यांनी तक्रारकर्त्याच्या खात्यातून कमी केली. विरूध्द पक्ष 2 ह्यांनी Debit केलेली रकमेची तक्रारकर्त्याने वारंवार मागणी करून सुध्दा तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे account statement किंवा J. P. log न देऊन निवारण न करणे म्हणजेच विरूध्द पक्ष 2 ह्यांची सेवेतील त्रुटी आहे.
15. विरूध्द पक्ष 1 यांनी पृष्ठ क्र. 28 चे परिच्छेद (V) नुसार दाखल केलेल्या जबाबात असे म्हटले आहे की, “It is specifically submitted that J. P. (Journal Printer) is the final and deciding factor as far as ATM withdrawals are concerned and also it tallies with physical cash balance”. त्यामुळे J. P. log हे correct and reliable and specific transaction बद्दल clinching व sufficient evidence आहे. त्यामुळे J. P. log च्या एकमेव पुराव्यावरून तक्रारकर्त्याची तक्रार सिध्द होते. तसेच तक्रारकर्त्याने घटनेची लेखी तक्रार विरूध्द पक्षाकडे 18 दिवस उशीराने केल्यामुळे तक्रारीचे कारण संयुक्तिक आहे. कारण प्रथम तक्रारकर्त्याने तोंडी तक्रार केली व विरूध्द पक्ष यांनी 7 ते 8 दिवस Entry reverse घेण्याच्या अवधीनंतरच लेखी तक्रार स्विकारतात. त्यामुळे तक्रारकर्त्याने केलेली तक्रार योग्य आहे. तसेच विरूध्द पक्षाने CCTV Footage सदरहू प्रकरणात दाखल केलेले नाहीत व CCTV Footage लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर preserve केल्या जाते. त्याचप्रमाणे CCTV Footage विरूध्द पक्ष 2 कडे उपलब्ध नव्हते याबद्दल reliable पुरावा दाखल न केल्यामुळे विरूध्द पक्षाकडे CCTV Footage उपलब्ध नव्हते ही बाब मान्य केल्या जाऊ शकत नाही. करिता विरूध्द पक्ष 2 ह्यांची सेवेमध्ये त्रुटी दर्शविते.
16. करिता विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास ATM द्वारे न मिळालेले withdrawal रू.10,000/- व रू.5,000/- खालील आदेशाप्रमाणे तक्रारकर्त्याला देण्यास विरूध्द पक्ष 2 हे जबाबदार आहेत व विरूध्द पक्ष 1 ह्याची सदरहू प्रकरणात कुठलीही त्रुटी नसल्यामुळे त्यांचेविरूध्द कुठलाही आदेश पारित नाही.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 2 युनियन बँक यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याची ATM मशीन मधून न मिळालेली रक्कम रू.10,000/- व रू.5,000/- असे एकूण रू.15,000/- तक्रारकर्त्यास द. सा. द. शे. 9% व्याज दराने तक्रार दाखल करून घेतल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 30/01/2015 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यत द्यावी.
3. विरूध्द पक्ष 2 युनियन बँक यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू.5,000/- द्यावे.
4. विरूध्द पक्ष 2 युनियन बँक यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चापोटी रू.5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1- Axis Bank यांचेविरूध्द कुठलाही आदेश नाही.
6. विरूध्द पक्ष 2 युनियन बँक यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.