जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 121/2011 तक्रार दाखल तारीख –02/08/2011
चंद्रकांत पि.शंकरराव बांगर
वय 60 वर्षे धंदा पेन्शनर .तक्रारदार
रा.शिक्षक कॉलनी,मांजरसुंबा रोड,पाटोदा
ता.पाटोदा जि.बीड
विरुध्द
1. अँक्सीस बँक लि. मार्फत
शाखा व्यवस्थापक, हॉटेल संकेत कॉम्प्लेक्स,
अहमदनगर सामनेवाला
2. अँक्सीस बँक लि. मार्फत
व्यवस्थापक, हेड कार्डस डिव्हीजन 2 आणि 3 मजला,
साकी विहार रोड, मुंबई
3. अँक्सीस बँक लि. मार्फत
मॅनेजर, शिवाजी चौक, बार्शी रोड, बीड
4. बजाज अलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
मार्फत मॅनेजर, जी.ई.प्लाझा,एअरपोर्ट रोड,
येरवडा, हेड ऑफिस, पुणे
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.पी.पळसोकर
सामनेवाला क्र.1ते 3 तर्फे :- अँड.एस.टी.जोशी
सामनेवाला क्र.4 तर्फे ः- अँड.ए.पी.कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचा मयत मुलगा राहूल अविवाहीत होता. तो राजदिप बिल्डर्स प्रा.लि.अहमदनगर येथे इंजिनिअर म्हणून नौकरीत होता.
मयत राहूल यांचे खाते सामनेवाला क्र.1 यांचे शाखेत होते. त्यांचे सॅलेरी सेव्हींग अकाऊट नंबर 215010100142588 (आयडी नंबर 215017283) होता. सदरच्या खात्याचा वापर त्यांने त्यांचे हयातीत केलेला आहे. तसेच त्यांला इंटरनॅशनल डेबीट कार्ड म्हणून कार्ड नंबर5267012150074070 दि.30.1.2009 रोजीचे दिलेले होते. सदरचे कार्ड हे वरील बचत खात्याशी संलग्न होते. सामनेवाला यांनी मयत राहूलला सामनेवाला यांचे डेबीट कार्डचे संदर्भात विमा संरक्षण होते. राहूल दि.19.6.2009 रोजी त्यांचे मोटार सायकलवरुन कार्यालयातून परत येत असताना रस्ता अपघातात मृत्यू पावला.
त्यांचा मृत्यूनंतर तक्रारदारांनी विमा रककम रु.2,00,000/- मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह सामनेवाला यांना दिलेल्या सुचनेप्रमाणे दावा दाखल केला.
कागदपत्र दाखल केल्यानंतर दि.6.10.2009 रोजी प्रत्यक्ष भेट दिली. त्या बाबत सामनेवाला यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांना सामनेवालाकडे 4-5 वेळेला प्रत्यक्ष भेट दयावी लागली.तरी उपयोग झाला नाही. सामनेवाला यांनी दावा प्रक्रिया चालू आहे एवढेच सांगितले.
सामनेवाला क्र.4 यांनी दि.4.3.2011 रोजी तक्रारदारांना दावा नाकारल्याचे पत्र पाठविले. त्यातील दावा नाकारल्याचे कारण पीओएस (Point of sale) transanction and No AQB done on card no.5627015150074070. या दोन कारणामूळे दावा नाकारण्यात आला. मयताच्या खात्यात त्यांचे मृत्यू समयी रक्कम रु.27,000/- शिल्लक होते. दावा नाकारुन सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केला त्यामुळे विमा रक्कम रु.,2,00,000/- 18 टक्के व्याजासह अपघाताचे दिनांकापासून रक्कम मिळेर्यत व्याज मिळण्यास , तसेच दावा रक्कम रु.25,000/- व मानसिकत्रासापोटी रु.75,000/- मिळणे तक्रारदारांना आवश्यक आहे.
विनंती की, वरीलप्रमाणे रक्कम तक्रारदारांना सामनेवालाकडून मिळण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे एकत्रित खुलासा दि.25.10 रोजी दाखल करण्यात आला. खुलाशात सामनेवाला यांनी तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. क्रेडीट कार्डच्या व विमा कंपनीच्या शर्ती व अटीनुसार विमा दावा देण्यात येते. सदर अटीचा भंग झाल्यास विमा रक्कम देय होत नाही. तसेच तक्रारदारांनी सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारीत का पार्टी केले या बाबत कूठलाही उल्लेख नाही. घटनेचे वेळी सामनेवाला क्र.3 शाखा बीड मध्ये कार्यरत नव्हती व सदर शाखेत कूठलेही कारण घडलेले नाही. विमा कंपनीने योग्य रितीने दावा नाकारला आहे त्यात सामनेवाला यांचे सेवेत कसूर नाही. तसेच डेबीट कार्डाच्या वापराचे संदर्भातील सर्व माहीती पत्रके तक्रारदारांनी दाखल केलेले आहेत. म्हणजे त्यांना सदर कार्डाचे संदर्भात नियम व अटी माहीती आहेत. त्यामुळे सदरची तक्रार या सामनेवाले विरुध्द रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचा खुलासा दि.11.11 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदाराच्या दाव्याची तपासणी करीत असताना दाखल कागदपत्र व सुचना यांची पाहणी केली असता क्रेडीट कार्डातील नियमानुसार वर्षातून किमान एक पॉईट ऑफ सेल होणे आवश्यक आहे तसेच एव्हरेज क्वार्टरली बॅलेन्स हा शहरी विभागा करिता रु.5,000/- व ग्रामीण विभागाकरिता रु.2500/- किमान आहे. त्यानुसार बँलन्स सदर खात्याचा नव्हता म्हणून सदरचा दावा योग्य रितीने नाकारण्यात आलेला आहे. त्यात सेवेत कसूर नाही.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पळसोकर व सामनेवाले क्र.1 ते 3 यांचे विद्वान वकील श्री.जोशी व सामनेवाला क्र.4 चे विद्वान वकील श्री.ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता राहूल हा तक्रारदाराचा मूलगा राजदिप बिल्डर्स प्रा.लि. अहमदनगर येथे इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. त्यांचा अपघात दि.19.06.2009 रोजी झालेला आहे.
राहूलचे सामनेवाला क्र.1 बँकेत तक्रारीत नमूद केलेले सॅलेरी सेव्हींग खाते होते. सदर खात्यावरील क्रेडीट कार्डची सुविधा राहूलने घेतली होती परंतु सदर क्रेडीट कार्डाचे सुविधा नियमाप्रमाणे राहूलने वर्ष भरात एक पॉईट ऑफ सेल क्रेडीट कार्डवर केलेले दिसत नाही. तसेच राहूलच्या खात्यातील तिमाही शिल्लक नियमाप्रमाणे शहरी विभागासाठी रु.5,000/- पाहिजे होती ती खाते उता-यावरुन दिसत नाही.त्यामुळे सामनेवाला यांनी सदरचा दावा करारातील अटी व शर्तीनुसार नाकारला आहे.
या संदर्भात सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे विद्वान वकील श्री. जोशी यांनी सदरची तक्रार या जिल्हा मंचाचे अधिकारकक्षेत येत नाही. जरी तक्रारदारांनी सामनेवाला क्र.3 म्हणून बीड शाखेस पार्टी केलेले असले तरी वास्तवात घटनेचे वेळी सदरची शाखा अस्तित्वात नव्हती व सदर शाखेत तक्रारीस कूठलेही कारण घडलेले नाही, पत्रव्यवहार झालेला नाही.
या मुददयावर तक्रारदाराचे म्हणणे असे की, तो कार्ड हे भारतात कूठेही उपयोगात आणू शकतो. त्यामुळे शाखा असलीच पाहिजे असे बंधन नाही. त्यामुळे सदरची तक्रार जिल्हा मंचात चालविण्याचा अधिकार आहे.
वरील तक्रारीतील सर्व घटना पाहता राहूल हा नगर येथे नौकरीत होता. येथेच त्यांचा अपघात झालेला आहे. तेथेच त्यांचा अपघातात मृत्यू झालेला आहे. राहूलने क्रेडीट कार्डाचा वापर बिडमध्ये केला व त्यानुसार त्या व्यवहारावरुन जर काही तक्रार असती तर निश्चितच बीड जिल्हा मंचाचे अंतर्गत सदरची तक्रार येऊ शकते परंतु व्यवहार भारतात कूठेही करता येतो या कारणास्तव बीड जिल्हा मंचाचे अधिकार क्षेत्रात येतो असे तक्रारदाराचे म्हणणे ग्राहय धरणे उचित होणार नाही. कारण तक्रारदाराचे बचत खाते हे नगर शाखेतच आहे व सदर शाखेकडून इंटरनॅशनल क्रेडीट कार्डाची सुविधा देण्यात आलेली आहे.त्यामुळे करार हा नगर शाखेशी झालेला असल्याने व सदर सुविधा नगर शाखेकडून पुरविण्यात आलेली आहे. तसेच बँकेचा आणि विम्याचा करार हा नगर येथेच झालेला आहे. त्यामुळे या जिल्हा मंचाचे अंतर्गत कूठलेही कारण घडलेले नसल्याचे सामनेवाला यांची सदरची हरकत याठिकाणी ग्राहय धरणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीचे संदर्भात खात्याच्या दिलेल्या नियमानुसार व झालेल्या करारानुसार कार्यवाही होणे अपेक्षीत आहे. जर नियमाचा भंग झालेला असेल तर सदरची बाब सेवेत कसूर यामध्ये येत नाही असे न्यायमंचाचे मत आहे. राहूल हा इंजिनिअर असल्याकारणाने त्यांला खातेवरील व्यवहाराची माहीती होती व म्हणूनच त्यांने सदरची सुविधा घेतलेली होती. सुविधे बाबतच्या नियमाची माहीतीची कागदपत्रे राहूलकडे असल्याने तक्रारीत दाखल आहेत. परंतु नियमाप्रमाणे व्यवहार न होऊ शकल्याने सामनेवाला क्र.4 यांनी सदरचा दावा नाकारला आहे. त्यात सामनेवाला क्र.1 ते 4 यांचे सेवेत कसूर असल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड