न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पती हे वि.प.क्र.1 बँकेचे खातेदार असून त्यांचा बचत खाते क्र. 912010042254336 असा आहे. तक्रारदार यांचे पती यांनी वि.प.क्र.1 बँकेचे गांधीनगर शाखेकडून कर्जखाते क्र.921060054542945 या द्वारे रक्कम रु. 8,79,000/- आणि कर्ज खाते क्र. 92106005454416 अन्वये रक्कम रु.11,16,500/- इतके सोने तारण कर्ज दि. 15/6/2021 रोजी अदा करणेत आले. तसेच तक्रारदार यांचे पतीचे वि.प.क्र.1 बँकेचे वडगाव शाखेमध्ये बचत खाते क्र. 920010060620734 असे होते. तसेच तक्रारदार यांचे पती यांनी वि.प. बँकेचे वडगाव शाखेकडून रक्कम रु. 55,00,000/- चे गृह कर्ज घेतले आहे. सदर कर्ज घेतेवेळी वि.प.क्र.1 यांचे आग्रहास्तव तक्रारदार यांनी कर्जाचा विमा वि.प.क्र.2 यांचेकडे उतरविला आहे. त्यानुसार वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांचे पतीच्या कर्ज कागदपत्रांचे बरोबर विमा पॉलिसीचे कागदपत्रांवर देखील सहया घेतलेल्या होत्या. तक्रारदार यांचे पती यांचे मंजूर कर्ज रकमेपैकी रक्कम रु.3,54,203/- इतकी रक्कम वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 यांचेकडे परस्पर इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरद्वारे वर्ग केली आहे. सदर रक्कम वि.प.क्र.1 यांना त्याचदिवशी पोहोच देखील झाली आहे. तसेच त्याच दिवशी तक्रारदार यांचे बचत खात्यावर मंजूर कर्ज रकमेपैकी रु. 27,50,000/- वर्ग झालेली आहे. दुर्दैवाने तक्रारदार यांचे पतीचे दि. 26/6/2021 रोजी उपचारादरम्यान निधन झाले. म्हणून तक्रारदारांनी विम्याचे लाभार्थी या नात्याने वि.प. क्र.1 यांचेशी संपर्क साधला असता असे समजून आले की, वि.प. क्र.2 यांनी तक्रारदाराचे पतींची विमा पॉलिसी जनरेट केली नव्हती. दि. 25/6/2021 रोजी विमा हप्ता वि.प.क्र.2 यांचेकडे जमा होवून वि.प. क्र.2 यांचे गलथान कारभारामुळे विमा पॉलिसी जनरेट झाली नाही. तदनंतर वि.प.क्र.2 यांनी अचानकपणे तक्रारदार यांचे मेलवर विमा पॉलिसी जनरेट झालेचे कळविले व सदर पॉलिसीवर दिनांक हा 17/08/2021 रोजी नमूद केलेचे दिसून आले. तक्रारदार यांना सदरचे कर्जप्रकरण पुढे चालवायचे नसलेने त्यांनी सदरचे कर्जप्रकरण अंडर प्रोटेस्ट पूर्ण रक्कम भरुन भागवून टाकले. त्यानंतर अचानकपणे वर नमूद विमा हप्त्याची रक्कम रु. 3,54,203/- इतकी रक्कम तक्रारदाराचे पतीचे कर्जखात्यावर जमा करण्यात आली. अशा प्रकारे वि.प.क्र.1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास सेवात्रुटी दिली आहे. सबब, वि.प. यांचेकडून तक्रारदारास रक्कम रु.56,29,363/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.35,00,000/-, तक्रारअर्जाचा खर्च रु.50,000/- व नोटीस खर्च रु. 15,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत तक्रारदार यांचे पतीचे नावे कर्ज मंजूरीपत्र, वि.प.क्र.1 यांनी दिलेली होम लोन समरी, वि.प. क्र.1 बँकेचा वडगाव शाखेतील खातेउतारा, कर्जाचे प्रि-ईएमआय शेडयुल, तक्रारदारांनी वि.प.क्र.1 बँकेस दिलेले पत्र, विमा पॉलिसी, तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 व 2 यांना पाठविलेल्या नोटीसा व त्याच्या पोहोच पावत्या इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. क्र.1 व 2 यांना नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झालेले नाहीत. सबब, त्यांचेविरुध्द दि. 24/02/2022 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला आहे.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे नुकसान भरपाईपोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. तक्रारदार यांचे पती हे वि.प. क्र.1 बँकेचे खातेदार असून त्यांचे 912010042254336 या क्रमांकाचे बचत खाते वि.प. क्र.1 या बँकेत आहे. तसेच तक्रारदार यांचे पती यांनी वि.प.क्र.1 बँकेचे गांधीनगर शाखेकडून कर्जखाते क्र.921060054542945 या द्वारे रक्कम रु. 8,79,000/- आणि कर्ज खाते क्र. 92106005454416 अन्वये रक्कम रु.11,16,500/- इतके सोने तारण कर्ज दि. 15/6/2021 रोजी अदा करणेत आले. तसेच तक्रारदार यांचे पतीचे वि.प.क्र.1 बँकेचे वडगाव शाखेमध्ये बचत खाते क्र. 920010060620734 असे होते. तक्रारदार यांचे सदर वि.प.क्र.1 बँकेमधील खाते वि.प.क्र.1 यांनी आयोगात हजर होवून नाकारलेले नाही. सबब, तक्रारदार हे वि.प.क्र.1 यांचे ग्राहक असलेने मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांच्या पतीचे स्वतःच्या मालकीची प्लॉट मिळकत वडगाव ता. हातकणंगले येथे असून सदर मिळकतीवर तक्रारदार यांचे पती यांनी घर बांधण्यासाठी वि.प. क्र.1 बँक, वडगाव शाखा यांचेकडे फेब्रुवारी 2021 मध्ये कर्ज मागणी केली. वि.प. क्र.1 बँकेकडील संदर्भ क्र.13875516 ता.12/3/2021 रोजीचे मंजूरीपत्रान्वये तक्रारदार यांना रक्कम रु.55,00,000/- इतके कर्ज मंजूर केले. तसेच तक्रारदार यांच्या पतीकडून कर्जाची प्रोसेसिंग फी पोटी रक्कम रु.5,900/- इतके घेवून तक्रारदार यांना सदरचे कर्ज वि.प. यांनी अदा केले. कर्ज मंजूरीवेळी वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांना व त्यांचे पतीस सदर कर्जाचा विमा उतरविणेबाबत गळ घातली व सदर कर्जाचा विमा उतरविलेस भविष्यातील संभाव्य धोक्यापासून संरक्षण होईल याची हमी व खात्री दिली व त्यानुसार वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या मंजूर कर्ज रकमेपैकी रक्कम रु.3,54,203/- इतकी भरीव रक्कम ता.25/6/2021 रोजी मंजूर कर्ज रकमेतून वि.प.क्र.2 यांचेकडे विम्यापोटी इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर द्वारे वर्ग केली व मंजूर रकमेपैकी रक्कम रु.27,50,000/- इतकी रक्कम तक्रारदार यांचे पतीचे बचत गृहकर्जापैकी अंशतः हिस्सा रक्कम जमा केली. अशी वस्तुस्थिती असताना तक्रारदार यांचे पतीचे ता.26/6/2021 रोजी उपचारादरम्यान निधन झाले. तक्रारदार यांचे पतीचे मृत्यूपश्चात वि.प.क्र.1 यांचेकडे सदर खात्याचे सहकर्जदार व बचत खात्याचे नॉमिनी यांनी विम्याचा लाभार्थी या नात्याने कागदपत्रांची पूर्तता करणेसाठी वि.प.क्र.1 यांचेशी संपर्क साधला असता वि.प.क्र.1 यांनी परस्पर विमा पॉलिसी व तिची विमा रक्कम कर्जखातेतून वर्ग केलेचे तक्रारदार यांना आढळून आले. वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या खातेवरुन विमा रक्कम वर्ग करुन देखील तक्रारदार यांचे पतीचा वि.प. क्र.2 यांचेकडे विमा पॉलिसी जनरेट झाली नव्हती. वास्तविक तक्रारदार यांच्या पतीकडून विम्यापोटी ता.25/6/2021 रोजी रक्कम रु.3,54,203/- इतकी भरीव रक्कम वि.प. क्र.2 यांचेकडे वर्ग झालेली असताना देखील वि.प. क्र.2 यांनी त्वरित सदरची पॉलिसी जनरेट न करता जोखमीचा दिनांक 17/8/2021 रोजी नमूद करुन सदरची पॉलिसी विलंबाने जनरेट केली तसेच तक्रारदार यांचे पतीचे निधन झाले असलेमुळे विम्याची जबाबदारी झटकण्याच्या गैरहेतूने विमा प्रिमिअमचीही रक्कम तक्रारदार यांच्या पतीचे कर्ज खातेवर वर्ग करुन वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवे त्रुटी केली आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
7. तसेच वि.प. यांना तक्रारदार यांचे पतीचे निधन झालेले माहित असताना देखील वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांचे खाते स्वतःच डेबीट फ्रीज करु घेतलेले असताना देखील तक्रारदार यांच्या पतीचे तथाकथित दोन चेक वि.प.क्र.1 यांनी कर्ज खातेवर व्याजापोटी भरलेचे दाखवून व सदरचे चेक अनादरीत करुन त्याचे चार्जेस तक्रारदार यांच्या खात्यावर जमा करुन व खातेवर दंडव्याज आकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
8. सदर मुद्यांच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्याचे शपथपत्र तसेच कागदपत्रांचे अवलोकन करता अ.क्र.1 ला वि.प.क्र.1 यांनी ता. 12/3/2021 रोजी तक्रारदार यांचे पतीचे नावे दिलेले कर्ज मंजूरी पत्र दाखल केलेले आहे. सदर कर्ज मंजूरी पत्राचे अवलोकन करता सदर पत्रावर वि.प. क्र.1 बँकेच्या अधिका-यांची सही असून Accepted म्हणून Applicant/Co-applicant/guarantor म्हणून तक्रारदार यांच्या पतीची अथवा तक्रारदारांची सही दिसून येत नाही. अ.क्र.2 ला वि.प. बँक यांनी दिलेली होम लोन समरी दाखल केलेली असून त्याचे अवलोकन करता,
Disbursed loan amount Rs.31,20,603/-
Life Insurance Premium Rs. 3,54,203/-
नमूद आहे.
9. तक्रारदार यांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता,
सदर इन्शुरन्स उतरविताना त्याची सर्वस्वी जबाबदारी वि.प. क्र.1 यांनी घेतलेली होती व त्याचकरिता वि.प. क्र.1 यांनी माझे मंजूर कर्जरकमेपैकी रक्कम रु.3,54,203/- इतकी भरीव रक्कम परस्पर दि. 25/6/21 रोजी माझे पतीचे मंजूर रकमेतून वि.प.क्र.2 यांचेकडे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फरद्वारे वर्ग केली आहे व सदरची रक्कम वि.प.क्र.2 यांना त्याचदिवशी पोच झाली आहे तसेच त्याचदिवशी मंजूर कर्ज रकमेपैकी रु.27,50,000/- माझ्या पतीच्या वडगांव येथील बचत गृहकर्जापैकी अंशतः हिस्सा जमा केली आहे.
असे नमूद आहे. सदर कथनाच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या वि.प. क्र.1 वडगांव शाखा येथील तक्रारदार यांच्या खातेउता-याचे अवलोकन करता तक्रारदार यांच्या खातेवर ता. 25/6/21 रोजी रु.27,50,000/- जमा झालेचे दिसून येते. तसेच अ.क्र.6 ला वि.प. क्र.1 बँकेने तक्रारदार यांच्या मयत पती विनोद खोंद्रे यांच्या कर्जाचा खातेउतारा दाखल केला असून सदर खाते उता-यामध्ये ता. 25/6/2021 रोजी Amount paid by cheque No. 99999999 रक्कम रु. 3,54,203/- नमूद असलेचे दिसून येते. सबब, तक्रारदार यांच्या खातेउता-यावरुन ता. 25 जून 2021 रोजी चेकने रक्कम रु.27,50,000/- व रक्कम रु.3,54,203/- इतकी रक्कम गृहकर्जापोटी जमा झालेचे दिसून येते. तथापि सदरची रक्कम वि.प.क्र.1 बँकेकडून वि.प. क्र.2 विमा कंपनी यांना त्याचदिवशी इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरद्वारे वर्ग केलेचे दिसून येत नाही. वि.प. क्र.1 यांनी वि.प.क्र.2 यांना सदरकामी कर्ज मंजूर रकमेपैकी विमा रक्कम रु.3,54,203/- इतका विमा अदा केलेचा अथवा ता. 5/6/2021 रोजी वि.प. क्र.2 यांचेकडे जमा झालेचा कोणताही कागदोपत्री पुरावा दिसून येत नाही. सबब, वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार व त्यांचे पतीस सदर कर्जाचा विमा उतरविणेबाबत गळ घातली होती व सदर कर्जाचा विमा उतरविल्यास भविष्यात संभाव्य धोक्यापासून संरक्षण होईल याची हमी व खात्री दिलेली होती. सदर वि.प.क्र.1 यांनी दिले हमी व खात्रीवर तक्रारदार यांचे पती यांनी सदरचा विमा उतरविण्यास संमती दिली होती व त्यानुसार वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांचे सदरचा कर्जाचा विमा वि.प. क्र.2 यांचेकडे उतरविणे हे वि.प. क्र.1 यांचेवर बंधनकारक असताना देखील वि.प. क्र.1 यांनी गृहकर्जाच्या रकमेतून सदरच्या विम्याची रक्कम ता. 25/6/2021 रोजी वि.प.क्र.2 यांचेकडे त्वरित वर्ग न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
10. तक्रारदार यांचे पुरावा शपथपत्राचे अवलोकन करता,
वि.प.क्र.2 यांनी ता. 25/6/2021 रोजी सदरची रक्कम पोचल्याचा पुरावा माझेकडे आहे. त्यावेळी वि.प. यांनी पॉलिसी जनरेट करुन त्यामध्ये जोखमीचा दि.17/8/2021 रोजी नमूद केला. त्यानंतरही जेव्हा वि.प. क्र.2 यांचे लक्षात आले की, पॉलिसी जनरेट केलेचा मेल ज्यावेळी पाठविला, त्यावेळी माझे पतीचे निधन झाले होते, त्यावेळी पुन्हा विम्याची जबाबदारी झटकण्याच्या गैरहेतूने विमा प्रिमियमची रक्कम माझे कर्जखात्यावर वर्ग केली.
सदर कथनाचे अनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. क्र.2 यांनी तक्रारदार यांना दिलेल्या इन्शुरन्सची प्रत दाखल केलेली आहे. सदरच्या इन्शुरन्स मध्ये Date of commencement of risk 17 August 2021 नमूद असून बेनिफिशिअरीचे नाव नमूद नाही. सबब, सदरच्या इन्शुरन्स पॉलिसीवरुन तक्रारदार यांच्या कर्जखात्यावरुन विमा हप्त्याची रक्कम वि.प. क्र.1 यांनी वि.प.क्र.2 यांना विलंबाने अदा केलेली असल्यामुळे सदरची पॉलिसी ही विलंबाने जारी (Generate) केली आहे ही बाब प्रथमदर्शनी दिसून येते. सबब, दाखल कागदपत्रांवरुन ता. 25/6/2021 रोजी तक्रारदारांच्या पतीचे कर्ज मंजूर झालेले असून लगेचच ता. 26/6/2021 रोजी उपचारा दरम्यान सनराईज हॉस्पीटलमध्ये निधन झालेले आहे. त्याकारणाने सदरच्या पॉलिसीचे जोखमीमध्ये (Commencement risk) तक्रारदारांचे मयत पती समाविष्ट होत नाहीत ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांच्याच कथनावरुन तक्रारदार यांचे पतीचे निधन झाले असलेमुळे वि.प. क्र.2 यांनी विमा प्रिमियमची रक्कम तक्रारदार यांच्या खात्यावरुन वर्ग केलेली आहे ही बाब दिसून येते. सदरची विमा प्रिमियमची रक्कम तक्रारदाराने स्वीकारलेली आहे. तक्रारदार यांच्या पुराव्याचे शपथपत्रावरुन वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांचे पतीच्या मृत्यूनंतर लगेचच तक्रारदार यांचे पतीचे बचत खाते व कर्जखाते फ्रिज केले. सदर वि.प.क्र.1 बँकेने तक्रारदार यांचे खाते फ्रिज केलेबाबतचा ईमेल प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेला आहे. असे असताना देखील वि.प.क्र.1 यांनी ता.12/7/2021 रोजी रक्कम रु.8,697/- तसेच 10/8/2021 रोजी रक्कम रु.17,159/- चे दोन चेक वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांचे कर्जखात्यावर व्याजापोटी भरलेचे दिसून येते. सदरचे चेक अनादरीत करुन चेक बाऊंन्सींगचे चार्जेस तसेच तक्रारदार यांच्या कर्जखात्यावर दंडव्याज देखील लावलेचे दिसून येते. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 यांचेकडील बँकेच्या कर्जाचा खातेउतारा दाखल केलेला आहे. सबब, वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांचे खाते डेबीट फ्रिज केले असताना देखील सदर खात्यावर दंडव्याज, चेक बाऊंन्सींग चार्जेस आकारुन गैरव्यापारी प्रथेचा अवलंब केलेचे दिसून येते.
11. प्रस्तुकामी तक्रारदार यांना सदरचे कर्ज प्रकरण पुढे चालविण्याचे नसलेने कर्ज खाते भरुन घेवून कर्ज खाते बंद करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी त्यांचे पतीचे कर्ज खाते पूर्णतः फेड करुन बंद केले. वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या मुलाचे नावे वारस म्हणून त्याच्या खातेवर रक्कम जमा केली. त्याअनुषंगाने त्यांनी वि.प.क्र.1 बँकेने कर्ज खातेची परतफेडीची रक्कम कळविणा-या ईमेलची प्रत दाखल केलेली आहे. तसेच सदरचे कर्ज पूर्णफेड केलेबाबतची पावती तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. सदरची बाब वि.प.क्र.1 यांनी आयेागात हजर होवून नाकारलेली नाही.
12. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुरावा शपथपत्राचे अवलोकन करता तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 बँकेकडील कर्जखाते पूर्णफेड केलेले आहे. वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांचे सदरचा गृहकर्जाचा विमा हप्ता रक्कम रु. 3,54,203/- वि.प.क्र.2 यांचेकडे उतरविणे हे वि.प. क्र.1 यांचेवर बंधनकारक असताना देखील वि.प.क्र.1 यांनी गृहकर्जाच्या रकमेतून सदरच्या विम्याची रक्कम ता 25/6/2021 रोजी वि.प.क्र.2 यांचेकडे त्वरित वर्ग न केलेने तक्रारदारांच्या मयत पतींची पॉलिसी ही विलंबाने म्हणजेच तक्रारदारांचे पती मयत झालेनंतर जारी झालेने तक्रारदार हे वि.प. क्र.1 यांचेमुळे सदर पॉलिसीचा लाभ घेवू शकले नाहीत ही बाब सदर कागदपत्रांवरुन शाबीत होते तसेच वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांचे पती मयत झालेनंतर त्वरितच त्यांचे खाते फ्रिज केले व सदरचे खाते फ्रिज असताना देखील सदर खात्यावर बेकायदेशीर रकमा, व्याज, दंडव्याज, चेक बाऊंन्सींग चार्जेस आकारुन गैरव्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, वरील दोन्ही मुद्यांचा विचार करता वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
13. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 यांचेकडून वि.प. क्र.2 यांना सदर कर्जखातेचा विमा हप्ता त्वरित अदा केलेचे अनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदार यांनी आयोगात दाखल केलेला नाही. वि.प. क्र.2 यांना तक्रारदार यांचे पती हे दि. 26 जून 2021 रोजी मयत झाले असलेमुळे वि.प. क्र.2 यांनी सदरच्या पॉलिसीचे प्रिमियम रक्कम रु. 3,54,203/- ही तक्रारदार यांना अदा केलेली असून सदरची रक्कम तक्रारदार यांनी स्वीकारली असलेने तसेच Commencement risk जोखीम ही विलंबाने चालू होत असलेने वि.प. क्र.2 हे सदरच्या पॉलिसी अंतर्गत विमा रक्कम देणेस जबाबदार नाहीत या निष्कर्षास हे आयोग येत आहे.
मुद्दा क्र.3
14. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून रक्कम रु.55,94,307/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.35,00,000/-, तक्रारअर्जाचा खर्च रु.50,000/- व नोटीस खर्च रु. 15,000/- इत्यादी रकमांची मागणी केली आहे. तथापि उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विवेचनानुसार वि.प.क्र.2 हे सदरचे पॉलिसी अंतर्गत सदर विमा रक्कम देणेस जबाबदार नसलेने तक्रारदार हे विमा रक्कम रु. 55,94,307/- मिळणेस अपात्र आहेत. तथापि वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांचेकडून बेकायदेशीरपणे रक्कम रु.35,056/- वसूल केलेली आहे. सदरचे रकमेच्या अनुषंगाने तक्रारदारांनी खातेउतारा दाखल केलेला असून सदरचा खातेउतारा वि.प.यांनी नाकारलेला नाही. त्या कारणाने तक्रारदार हे वि.प.क्र.1 यांचेकडून एकूण रक्कम रु.35,056/- इतकी रक्कम तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
15. वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प.क्र.1 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 35,056/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 20/12/2021. पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प.क्र.1 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|