जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २३४/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०२/१२/२०११
तक्रार निकाली दिनांक – २४/०९/२०१४
अशोक विनाय पाटील
उ.व. ४९, धंदा. शेती
रा.भरवस ता.अमळनेर जि.जळगाव . तक्रारदार
विरुध्द
- . अवसायक, शिंदाखेडा तालुका सह.
साखर कारखाना विखुर्ले,
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे.
2. जिल्हाधिकारी सो. धुळे
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे
ता.जि. धुळे . सामनेवाले
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड. श्री.व्ही.ए. पवार)
(सामनेवालेतर्फे – अॅड.श्री.डी.एस. महाजन)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडील डिपॉझिट खात्यातील रक्कम परत मिळावी या मागणीसाठी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, शिंदखेडा तालुका सहकारी साखर कारखाना या नावाने सहकारी तत्वावर तत्कालीन सुरु असलेल्या कारखान्यास निर्मितीसाठी निधी आवश्यक असल्याने, तक्रारदार यांनी डिपॉझिट म्हणून दि.२१-०३-१९९५ रोजी रक्कम रु.३०,०००/- पावती क्र.८५२१ अन्वये सामनेवालेंकडे ठेवले होते. त्यावर द.सा.द.शे.१७ टक्के दराने व्याज देण्याचे सामनेवालेंनी कबूल केले होते. दरम्यानचे काळात सदर कारखान्यात तक्रारदार हे लिपिक म्हणून कामास लागले. परंतु कालांतराने कारखाना पुर्ण क्षमतेने सुरु झाला नसल्याने व नुकसानीची रक्कम वाढत गेल्याने शासनाने संचालक मंडळ बरखास्त करुन त्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकारी धुळे यांची नेमणुक केली. पुढे सदर कारखान्याची लिलावाने विक्री झाली.
तक्रारदार याचे पगाराचे रकमेपैकी काही रक्कम सामनेवाले यांनी दि.०२-०६-२००८ रोजी धनादेशाद्वारे दिली आहे. परंतु तक्रारदार यांच्या डिपॉझिट खात्यातील रक्कम व त्यावरील व्याज तक्रारदारांना दिले नाही व ते नंतर देण्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी वेळोवेळी मागणी करुनही व्याजासह रक्कम मिळालेली नाही.
सबब सामनेवाले यांचेकडून डिपॉझिट रक्कम रु.३०,०००/- व त्यावरील व्याज रक्कम रु.८३,७२४/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.२५,०००/- आणि अर्जाचा खर्च रू.५,०००/- मिळावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे.
(३) तक्रारदार यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.नं.२ वर शपथपत्र दाखल केले असून, नि.न.१० सोबत रक्कम रु.३०,०००/- ची जमा पावती छायांकीत स्वरुपात दाखल केली आहे.
(४) सामनेवाले क्र.१ हे अंडरटेकिंग देवून हजर झाले. त्यानंतर त्यांनी मुदतीत खुलासा दाखल केला नाही, म्हणून सामनेवाले क्र.१ विरूध्द ‘खुलासा नाही’ चा आदेश पारीत करण्यात आला. तसेच सामनेवाले क्र.२ हे नोटीस मिळूनही मुदतीत हजर न झालेने त्यांच्याविरूध्द ‘एकतर्फा’ आदेश पारीत करण्यात आला.
(५) तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र, आणि दाखल कागदपत्र पाहता तसेच तक्रारदार यांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत
काय ? | : होय |
(ब) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | : होय |
(क) तक्रारदार हे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय |
(ड) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले साखर कारखान्यामध्ये काही रक्कम ही कारखान्याचे निर्मीतीसाठी निधी म्हणून डिपॉझिट खाते स्वरुपात ठेवलेली आहे. त्याची पावती नि.नं.१० वर दाखल आहे. सदर पावती तक्रारदार यांचे नांवे असून, ती शिंदखेडा सहकारी साखर कारखाना लि.विखुर्ले, ता.शिंदखेडा, जि,धुळे. यांनी डिपॉझिट खाते म्हणून रक्कम रु.३०,०००/- दि.२१-०३-१९९५ रोजी स्वीकारुन त्याची पावती क्र.८५२१ तक्रारदारांना दिल्याचे दिसून येते. सदर पावतीचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – सदर डिपॉझिट पावतीचा विचार करता तक्रारदार यांनी, सामनेवाले यांच्या कारखान्यामध्ये रक्कम रु.३०,०००/- हे डिपॉझिट खाते म्हणून ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. सदर रक्कम ही सामनेवाले यांना मिळालेली आहे. त्यामुळे तक्रारदारांनी मागणी केल्यानंतर या रकमेची परतफेड करण्याची जबाबदारी सामनेवालेंची आहे. सदर डिपॉझिट पावती पाहता, त्यावर सदर रक्कम ही किती कालावधीसाठी व किती व्याजदराने ठेवली आहे याचा सविस्तर तपशील नमूद केलेला नाही. तसेच सामनेवाले हे मंचाच्या नोटीसीचे ज्ञान होऊनही गैरहजर असून, त्यांनी अवसायक म्हणून केलेल्या कार्यवाहीबाबत व प्रस्तुत वाद विषयाबाबत पुराव्याकामी कोणतीही कागदपत्रे अथवा सत्य वस्तुस्थिती कथन करणारा खुलासा प्रकरणात दाखल केलेला नाही.
सदर रकमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे केलेली आहे. परंतु सामनेवाले यांनी सदर रक्कम तक्रारदार यांना परत दिलेली नाही. त्यामुळे दाखल डिपॉझिट पावती व तक्रारदाराचे कथन याचा विचार करता सामनेवाले अवसायक यांनी, शिंदखेडा तालुका सहकारी साखर कारखान्याचे वतीने तक्रारदारांची झिपॉझिट खात्यातील रक्कम मागणीनंतर परत न करुन सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘क’’ – सदर डिपॉझिट रक्कम ही तक्रारदार यांचे नांवे ठेवलेली असुन ते सामनेवालेंचे ग्राहक आहेत. त्यामुळे त्यावरील रक्कम मिळण्यास केवळ तक्रारदार हेच पात्र आहेत. उपरोक्त सर्व कारणांचा विचार करता, सामनेवाले यांनी सदर डिपॉझिट खातेवरील रक्कम रु.३०,०००/- ठेव दिनांक दि.२१-०३-१९९५ पासून द.सा.द.शे. ६ टक्के दराने व्याजासह तक्रारदारांना परत करणे योग्य होईल. तसेच सदर रक्कम वेळेत न मिळाल्याने साहजीकच तक्रारदारांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे आणि या मंचात सदरचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे. त्यामुळे शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.२,०००/- आणि तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.१,०००/- नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील ३० दिवसांचे आत.
(१) तक्रारदार यांना डिपॉझिट खाते क्र.८५२१ मधील रक्कम ३०,०००/- (अक्षरी रक्कम रुपये तीस हजार मात्र) दि.२१-०३-१९९५ पासून ते संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे. ६ टक्के दराने व्याजासह द्यावेत.
(२) तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम २,०००/- (अक्षरी रक्कम रुपये दोन हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार मात्र) द्यावेत.
(क) उपरोक्त आदेश कलम (ब) १ मध्ये उल्लेखिलेल्या रकमेमधून, सामनेवाले यांनी तक्रारदारांना काही रक्कम किंवा व्याज रक्कम दिली असल्यास, अशी रक्कम नियमानुसार वजावट करुन उर्वरीत रक्कम व्याजासह तक्रारदारांना अदा करावी.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.