(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 20/11/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 28.07.2009 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, तिला गैरअर्जदारांच्या अधिकृत प्रतिनिधीने विमा पॉलिसी घेण्याकरता प्रवृत्त केले होते व त्यानुसार तिने मॅरेज वूमेन्स प्रॉपर्टी ऍक्ट च्या अंतर्गत विमा पॉलिसी घेण्याकरता गैरअर्जदारांकडे 10 लक्ष रुपयांची गुंतवणूक केली. सदर विमा पॉलिसी अंतर्गत तक्रारकर्ती, तिचे पती आणि दोन मुले यांच्या प्रपोजल फॉर्मवर सह्या घेतल्या. तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.2 चे अधिकारी श्री. अविचल सिसोदिया यांचेवर विश्वास ठेऊन तक्रारकर्तीने व तिच्या कुटूंबाने सदर फॉर्मवर सह्या केल्या. तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी मॅरेज वुमेन्स प्रॉपर्टी ऍक्ट च्या अंतर्गत पॉलिसी न पाठवता पेंशन प्लॅनच्या अंतर्गत पॉलिसी पाठविलेली आहे. तसेच त्याचा हप्ता वार्षीक ठरविला असतांना अर्धवार्षीक हप्ता भरण्याच्या अटीवर सदर पॉलिसी पाठविली, त्यामुळे तक्रारकर्तीने गैरअर्जदारासोबत, त्यांचे वरिष्ठांसोबत व तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधला. परंतु तकारकर्तीस कोणीही दाद न दिल्यामुळे तिने 10 लक्ष रुपये परत मिळावे असे पत्र गैरअर्जदारांचे नागपूर शाखेला दिले. तक्रारकर्तीने नमुद केले की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस पैसे परत होऊ शकत नाही परंतु गुंतविलेल्या रकमेत बदल करुन पैसे देण्यांस तयार आहे आणि त्यासाठी तक्रारकर्तीची परवानगीची आवश्यकता आहे, असे कळविले. त्यानंतर तक्रारकर्तीने तक्रार निवारण केंद्राला स्पष्टपणे सहमत नसल्याचे सांगितले व गुंतविलेली रक्कम परत करण्याची विनंती केली. तक्रारकर्तीने IRDA यांचेशी सुध्दा पत्रव्यवहार केला व Ombudsman यांचेकडे सुध्दा तक्रार केली. दोन्ही कार्यालयांनी प्रकरण आपसात सोडवुन घ्यावे किंवा योग्य न्यायालयात दाद मागावी, असे कळविले. तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदार कंपनीचे उच्चाधिका-यांनी तक्रारकर्तीने भरलेले पैसे दुस-या पॉलिसीत परावर्तीत केले व त्याच्या चार पॉलिसी तक्रारकर्तीस दिल्या. तक्रारकर्तीची आणि तिच्या पतीची पॉलिसी वैद्यकीय कारणामुळे नाकारली. दि.02.03.2009 रोजी तक्रारकर्तीचे पतीचे नावाने कंपनीने पत्र पाठविले व त्यात 10 दिवसांचे आंत ते गुंतविलेल्या रकमेचे धनादेश तक्रारकर्ती व तिचे पतीचे नावाने पाठवतील असे नमुद केले होते. परंतु 10 दिवस उलटून गेल्यावर सुध्दा धनादेश न मिळाल्यामुळे तक्रारकर्तीने गैरअर्जदारांशी पत्रव्यवहार केला व त्यानंतर ट्प्याट्प्याने मे-2009 पर्यंत गैरअर्जदारांनी पूर्ण पैसे परत दिले. 3. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदारांनी तिला एकमुस्त रक्कम द्यावयास पाहिजे होती, तसेच मार्च-2007 पासुन ते मे-2009 पर्यंत तक्रारकर्तीचे 10 लक्ष रुपये स्वतः जवळ ठेवले होते व सदर रकमेवर कुठलेही व्याज दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली असुन सदर रकमेवर 18% दराने व्याज मिळावे तसेच शारीरिक, मानसिक, आर्थीक त्रासापोटी रु.50,000/- व औषधोपचाराचा खर्च म्हणून रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाची रु.25,000/- ची मागणी केलेली आहे. 4. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावंर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे. 5. गैरअर्जदारांनी आपल्या प्राथमिक आक्षेपात तक्रारकर्तीची तक्रार ही खोटी असल्याचे नमुद केले असुन तक्रारकर्तीने तिच्या कुटूंबाशिवाय पाच पॉलिसींमध्ये अर्ज दाखल केला होता. त्या पॉलिसी क्र. RPG 1492930, RPG 1492929,RPG 1482176, RPG 1507184 , RPG 1509675 एकत्रीत देण्यांत आल्या होत्या. गैरअर्जदारांनी पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने फक्त विमा हप्त्याची अर्धवार्षीक ऐवजी वार्षीक बदल करण्याची विनंती केली होती. त्यानुसार दुरध्वनीव्दारे उत्तर देण्यांत आले होते, त्यानुसार तक्रारकर्तीने वारंवार प्रिमीयमच्या हप्त्यामध्ये बदल करण्याची विनंती केली, त्यामुळे तक्रारकर्तीस नवीन पॉलिसी निर्गमीत केल्या गेल्या त्याचा क्रमांक ALB 2344542 व ALB 2344030 निर्गमीत केल्यानंतर त्या रद्द करण्याकरता 15 दिवसांच्या आंत त्या संबंधाने तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना विनंती केली त्यानुसार त्या रद्द करुन त्याची देय रक्कम तक्रारकर्तीस/ विमाधारकांस धनादेशाव्दारे देण्यांत आले व ते धनादेश सुध्दा वटविल्या गेले. गैरअर्जदारांनी आपल्या परिच्छेद निहाय उत्तरात तक्रारकर्तीचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन प्रस्तुत तक्रार खारिज करण्याची विनंती केलेली आहे. 6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.01.11.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. उभय पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकूण घेतला. तसेच दोन्ही पक्षांचे कथन व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडे विमा पॉलिसी घेण्याकरता 10 लक्ष रुपये गुंतविलेले होते ही बाब उभय पक्षांच्या कथनावरुन व दस्तावेजांवरुन स्पष्ट होते, त्यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ग्राहक ठरते असे मंचाचे मत आहे. 8. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीत नमुद केले आहे की, तिने मॅरेज वुमेन प्रॉपर्टी ऍक्ट अंतर्गत विमा पॉलिसी घेण्याकरता रक्कम गुंतविलेली होती. परंतु गैरअर्जदारांनी पेंशन प्लॅन अंतर्गत विमा पॉलिसी दिली असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारकर्तीने तक्रारीत नमुद केले आहे की, तिने गैरअर्जदारांचे अधिकृत प्रतिनिधींवर विश्वास ठेऊन प्रपोजल फॉर्मवर सह्या केल्या. तक्रारकर्ती ही प्राध्यापक असल्याचे तक्रारीत नमुद केले असुन ती सुशिक्षीत व समजदार आहे. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरासोबत निशाणी क्र.21 सोबत लावलेला दस्तावेज (प्रपोजल फॉर्म) दाखल केला आहे व त्यावर तक्रारकर्तीची स्वाक्षरी असुन सदर स्वाक्षरी तक्रारकर्तीने नाकारलेली नाही. तसेच सदर प्रस्ताव प्रपत्रावर पेंशन प्लस प्लॉन म्हणून स्पष्ट उल्लेख आहे. असे असतांना गैरअर्जदारांनीच चुकीची पॉलिसी निर्गमीत केली असे म्हणणे योग्य होणार नाही. तक्रारकर्ती सारख्या प्राध्यापक असलेल्या ग्राहकांनी विमा प्रपोजल फॉर्मवर सही करीत असतांना कोणत्या विमा पॉलिसी संबंधाने ते प्रपत्र आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. 9. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्तीने सुरवातीला विमा हप्ता अर्धवार्षीक करण्याबाबत गैरअर्जदारांशी पत्रव्यवहार केल्याचे दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेला दस्तावेज क्र.1 हे दि.30.08.2007 चे पत्र आहे, त्यामध्ये विमा हप्त्या बद्दलच तक्रारकर्तीने आक्षेप घेतलेला आहे. तक्रारकर्तीने आपल्याला चुकीची विमा पॉलिसी दिल्याबद्दलचा आक्षेप सर्व प्रथम दि.20.05.2008 ला घेतल्याचे तक्रारीत दाखल दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. यावरुन तक्रारकर्तीने सर्वप्रथम गैरअर्जदारांकडे केलेला आक्षेप हा विमा हप्त्याचा होता व त्यानंतर एक वर्षानंतर चुकीची विमा पॉलिसी दिल्याबद्दलचा आक्षेप गैरअर्जदारांकडे केल्याचे स्पष्ट होते. 10. तक्रारकर्ती व गैरअर्जदारांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारानंतर तक्रारकर्तीची विमा पॉलिसी परावर्तीत करण्यांत आली व त्यानुसार तक्रारकर्तीने नवीन प्रस्ताव भरुन दिला ही बाब गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात नमुद केली आहे. त्यानुसारच तक्रारकर्तीच्या नावाने विमा पॉलिसी निर्गमीत करण्यांत आली व वैद्यकीय कारणास्तव तक्रारकर्तीच्या व तिचे पतीच्या नावाने विमा पॉलिसी देण्यांत आली नाही व त्यासंबंधीची रक्कम धनादेशाव्दारे परत देण्यांत आली. तक्रारकर्तीने सदर प्रकरणात प्रतिउत्तर दाखल केलेले नाही. याउलट गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीने नवीन विमा प्रस्ताव दिला होता ही बाब आपल्या उत्तरात नमुद केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने नवीन विमा पॉलिसी करता प्रस्ताव नव्याने सादर केला होता ही बाब गृहीत धरता येते. तसेच तक्रारकर्ती व तिच्या पतीची विमा पॉलिसी वैद्यकीय कारणास्तव नाकारल्या गेला ही बाब सुध्दा तक्रारकर्तीचे तक्रारीतील कथन व गैरअर्जदारांचे उत्तर यावरुन स्पष्ट होते. यासंबंधीची रक्कम सुध्दा गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस परत केली व सदर धनादेश वटवण्यांत आले या बाबीही दोन्ही पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होतात. 11. नवीन प्रस्तावानुसार तक्रारकर्तीच्या दोन मुलांना पॉलिसी क्र.ALB 2344542 व ALB 2344030निर्गमीत केल्या होत्या. सदर पॉलिसी रद्द करण्याकरता विमा धारकास/तक्रारकर्तीस गैरअर्जदारांनी विनंती केली होती की, पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार 15 दिवसांचे आंत जर पॉलिसी रद्द करण्याबाबत निवेदन केले तर त्या रद्द करण्यांत येतात, असे गैरअर्जदारांनी नमुद केले आहे. त्या दोन्ही पॉलिसीच्या प्रिमीयमच्या रकमा तक्रारकर्तीस परत दिल्या व सदर धनादेश वटविल्या गेले ही बाब सुध्दा उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते. 12. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार मुख्यत्वे तिचे 10 लक्ष रुपये गैरअर्जदारांकडे मार्च-2007 ते मे-2009 पर्यंत होते व त्यावर व्याज मिळावे याकरीता दाखल केलेली आहे. मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्तीला मार्च-2007 पासुन सदर रकमेवर व्याज मागण्याचा कोणताही अधिकार नाही, कारण तक्रारकर्तीने दि.08.12.2008 रोजी सिंगल प्रिमीयम पॉलिसी करता विनंती केली होती व सदर अर्ज फेब्रुवारी-2009 मध्ये वैद्यकीय कारणास्त नाकारल्या गेला. त्यामुळे त्या दोन्ही पॉलिसींच्या प्रस्तावासंबंधी गुंतविलेली रक्कम तक्रारकर्तीस दि.04.03.2009, 13.05.2009 व 11.05.2009 रोजींच्या धनादेशाव्दारे परत करण्यांत आलेली आहे व सदर धनादेश अनुक्रमे दि.25.05.2009, 20.05.2009 व 14.05.2009 रोजी वटविल्या गेले. म्हणजेच तक्रारकर्तीने दिलेला नवीन प्रस्ताव अमान्य झाल्यामुळे त्या रकमा परत करण्यांत आल्या, यामध्ये गैरअर्जदारांची कोणतीही सेवेतील त्रुटी दिसुन येत नाही किंवा तक्रारकर्तीने तिचा प्रस्ताव गैरअर्जदारांना गैरकायदेशिररित्या नाकारल्याचे तिची तक्रार नाही. त्यामुळे तक्रारकर्ती सदर रकमेवर व्याज मिळण्यांस पात्र ठरत नाही, असे मंचाचे मत आहे. 13. नवीन प्रस्तावानुसार तक्रारकर्तीचा मुलगा अभिनव दिलीप वांकर व अभिषेक दिलीप वांकर यांच्या नावे पॉलिसी क्र.ALB 2344030व ALB 2344542 निर्गमीत करण्यांत आली होती व सदर पॉलिसी रद्द करण्याकरता 15 दिवसांचे आंत विमा धारकाने विनंती केल्यामुळे ती रद्द करण्यांत आली व त्या संबंधातील गुंतविलेली रक्कम सुध्दा परत करण्यांत आलेली आहे, ही बाब उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते. तसेच सदर प्रकारामध्ये गैरअर्जदारांच्या सेवेत कुठलीही त्रुटी असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे तक्रारकर्ती सदर रकमेवर व्याज मिळण्यांस पात्र नसल्याचे मंचाचे मत आहे. 14. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येते. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार खारिज करण्यांत येते. 2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |