तक्रार दाखल ता.02/03/2017
तक्रार निकाल ता.29/01/2018
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केलेला आहे.
2. तक्रारदाराचे तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे जाखले, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत तर वि.प.ही विमा कंपनी आहे. यातील तक्रारदार यांनी वि.प.कंपनीकडून सिंगल प्रिमीयम पॉलीसी नं.एल.बी.पी.1228144 ही दि.11.05.2006 रोजी उतरविलेली होती. सदर पॉलीसीचा विमा हप्ता श्री.वारणा सहकारी बँक लि.वारणानगर, शाखा बागल चौक, कोल्हापूर यांचेमार्फत जमा केला होता. पॉलीसीचा प्लॅन लाईफ बॉंन्ड प्लस युनिक लिंक या नावाने दिला होता. पॉलीसीची विम्याची रक्कम रु.50,000/- वि.प.कडे जमा केली होती. त्याप्रमामणे पॉलीसीवर नोंद केली आहे. सदर पॉलीसीमध्ये पॉलीसीच्या मुदतीनंतर रक्कम रु.2,50,000/- इतकी रक्कम तक्रारदाराला देणेचे वि.प.कंपनीने मान्य केले होते. पॉलीसीची मुदत 10 वर्षे होती. सदरची मुदत दि;11.05.2016 रोजी संपणार होती. सदर पॉलीसीची मुदत संपलेनंतर यातील तक्रारदाराने माहे जुन 2016 मध्ये वि.प.कडे लेखी अर्ज देऊन तसेच लेखी अर्जासोबत पॉलीसी व आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केली व विमा रकमेची मागणी केली असता, वि.प.ने मुदत पुर्ण झाली असताना सुध्दा तक्रारदाराला विम्याची रक्कम अदा केलेली नाही. तर तक्रारदाराने मागणी करुनही वि.प.यांस टाळाटाळ करत आहे. सबब, तक्रारदाराला वि.प.ने सदोष सेवा दिली असून सदर विमा रक्कम व नुकसानभरपाई वि.प.यांचेकडून वसुल होऊन मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज या मंचात तक्रारदाराने दाखल केला आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी वि.प.कंपनीकडून पॉलीसीची मुदतीनंतर तक्रारदाराला मिळणारी रक्कम रु.2,50,000/- वसुल होऊन मिळावी. प्रस्तुत रक्कमेवर दि.12.05.2016 पासून द.सा.द.शे.18टक्के प्रमाणे व्याज मिळावे, मानसिक-शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- वि.प.कडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
4. तक्रारदाराने या कामी अॅफीडेव्हीट, निशाणी क्र.5 चे कागद यादीसोबत अ.क्र.1 ते 5 कडे अनुक्रमे पॉलीसी शेडयुल, फर्स्ट प्रिमीयम रिसीट, वि.प.यांना तक्रारदारांना पाठविलेले पत्र, तक्रारदाराचे पॅनकार्ड, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरशिस, वगैरे कागदपत्रे या कामी दाखल केली आहेत.
5. वि.प.क्र.1 व 2 यांनी प्रस्तुत कामी म्हणणे/कैफियत, पुराव्याचे शपथपत्र, वगैरे कागदपत्रे या कामी दाखल केली आहेत.
6. वि.प.यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप तक्रारदाराचे अर्जावर नोंदविलेले आहेत.
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथने मान्य व कबूल नाहीत.
- तक्रारदाराने कधीही वि.प.कंपनीकडे रक्कम रु.50,000/- जमा केलेले नाहीत. तसेच पॉलीसी उतरवलेली नाही किंवा पॉलीसी उतरविणेसाठी कोणताही अर्ज वि.प.कडे तक्रारदाराने केलेला नव्हता व नाही.
- तक्रारदाराने वि.प.कडे कोणतीही पॉलीसी उतरवलेली नाही. त्यामुळे पॉलीसी रक्कम वि.प.ने तक्रारदाराला देणेचा प्रश्नच उदभवत नाही.
- तक्रारदाराने वि.प.कडे कोणतीही पॉलीसी उतरविलेली नसलेने तक्रारदार हे वि.प.चे ग्राहक होत नाहीत व वि.प.हे तक्रारदाराला कोणतेही देणे लागत नाहीत.
- तक्रार अर्जास कारण हे मे.कोर्टाच्या स्थळसीमेत घडलेले नाही. त्यामुळे प्रस्तुत काम चालविणेचा अधिकार कोर्टास प्राप्त होत नाही.
- प्रस्तुत तक्रार अर्ज मुदतीत दाखल केलेला नाही.
- तक्रारदाराने तक्रार अर्जात केलेली मागणी ही चुकीची असलेने तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा.
अशा प्रकारचे आक्षेप वि.प.कंपनीने तक्रारदाराचे तक्रार अर्जावर नोंदविलेले आहेत.
7. वर नमुद तक्रारदार व वि.प.यांनी दाखल केले कागदपत्रांचे अवलोकन केले. तसेच तक्रारदार व विप यांचे विधीज्ञांचा युक्तीवाद ऐकला. सदर कामी मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.ने तक्रारदाराला सेवात्रुटी दिली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प.कंपनीकडून विमा रक्कम व नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन
8. मुद्दा क्र.1 ते 4:- वर नमुद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने वि.प.कंपनीकडून सिंगल प्रिमीयम पॉलीसी नं.एल.बी.सी.1228144 ही दि.11.05.2006 रोजी उतरविलेली होती. प्रस्तुत पॉलीसीचा हप्ता श्री. वारणा सहकारी बँक लि.वारणानगर, शाखा बागल चौक, कोल्हापूर यांचेमार्फत वि.प.कडे जमा केला होता. तसेच पॉलीसीचा प्लॅन लाईफ बॉन्ड प्लस युनिट लिंक या नावाने दिला होता. सदरच्या बाबीं तक्रारदार यांनी निशाणी क्र.5 चे कागदयादीसोबत दाखल केले पॉलीसी शेडयुल, फर्स्ट प्रिमीयम रिसीट, या कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. प्रस्तुत बाबतीत वि.प.यांनी तक्रारदाराने वि.प.कडे पॉलीसी उतरवलेली नव्हती व नाही तसेच तक्रारदाराने वि.प.कडे पॉलीसी उतरविणेसाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज केलेला नव्हता असे केवळ आक्षेप घेतले आहेत. परंतु वि.प.ने सदरच्या बचावात्मक बाबीं सिध्द केलेल्या नाहीत. याउलट तक्रारदाराने वि.प.कडे विमा पॉलीसी उतरवलेचे व विमा हप्ता जमा केलेच्या बाबीं सबळ पुराव्यांसह सिध्द केलेल्या आहेत. सबब, तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत ही बाब निर्वीवादपणे स्पष्ट व सिध्द झाली आहे.
9. वर नमुद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने वि.प.यांचेकडे उतरविले वादातील विमा पॉलीसीची मुदत ही दि.11.05.2016 रोजी संपणार होती. सदर मुदत संपलेनंतर तक्रारदार यांनी जुन-2016 मध्ये वि.प.कडे लेखी अर्ज देऊन तसेच सदर अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून विमा रक्कम परत मिळावी अशी विनंती केली असता, वि.प.विमा कंपनीने विमा पॉलीसीची मुदत संपून ही तक्रारदाराला विमा रक्कम पॉलीसीतील अटी व शर्तीप्रमाणे अदा केलेली नाही. वि.प.ने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील या सर्व बाबीं केवळ नाकारल्या आहेत. मात्र त्याबाबत कोणताही सबळ पुरावा या कामी वि.प.ने दाखल केलेला नाही. याउलट तक्रारदाराने प्रस्तुत बाबीं कागदोपत्री पुराव्यासह सिध्द केलेल्या आहेत. सबब, वि.प.यांनी तक्रारदाराचे नमुद विमा पॉलीसीची मुदत संपलेनंतरही वारंवार तक्रारदाराने विमा रक्कमेची मागणी करुनही वि.प.कंपनीने विमा रक्कम तक्रारदाराला परत देणेस टाळाटाळ केलेली आहे व तक्रारदार यांना सेवात्रुटी दिलेली आहे ही बाब निर्वीवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिले आहे.
10. वर नमुद मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिले आहे कारण वर विस्तृत विवेचनात नमुद केलेप्रमाणे, तक्रारदाराने वि.प.कडे उतरविले वादातील विमा पॉलीसीची मुदत संपलेनंतर वि.प.कडून तक्रारदाराला रक्कम रु.2,50,000/- [Sum Assured] मिळणार होते. परंतु मुदत संपूनही वि.प.विमा कंपनीने तक्रारदाराला सदर रक्कम अदा केली नाह़ी. ही अनुचित व्यापारी प्रथा असून सेवेतील त्रुटी आहे व तक्रारदार हे वि.प.विमा कंपनीकडून प्रस्तुत विम्याची रक्कम रु.2,50,000/- वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर विमा रक्कमेवर विमा पॉलीसीची मुदत संपले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9टक्के व्याजाची रक्कम वि.प.कंपनीकडून वसुल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- वि.प.विमा कंपीनकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
11. सबब, प्रस्तुत कामी हे मंच पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहे.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.2,50,000/- (रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) अदा करावी.
3) प्रस्तुत विमा रकमेवर विमा पॉलिसीची मुदत संपलेल्या तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज वि.प. कंपनीने तक्रारदाराला अदा करावे.
4) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रक्कम रुपये दहा हजार फक्त) वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराला अदा करावेत.
5) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.