मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 30/03/2011) 1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता क्र. 1 व 2 हे मृतक सोमेश्वर बारसु धांडे यांचे आई व वडील असून तक्रारकर्ता क्र. 3 या मृतकांचा मुलगा आहे. मृतकाची पत्नी ही त्यांचे आधीच दि.05.07.2009 रोजी मृत्यू पावल्याने तक्रारकर्ता क्र. 3 चे नैसर्गिक पालक आहेत. मृतक श्री सोमेश्वर बारसु धांडे ह्यांनी दि.14.11.2006 रोजी रु.60,000/- विमा मुल्याची पॉलिसी क्र. RBG 1380341 इझी लाईफ प्लस युनीट लिंक, रु.6,000/- वार्षिक विमा हफ्ता भरुन काढली. दि.06.12.2009 रोजी सोमेश्वर बारसु धांडे यांचे श्वासोच्छवास थांबल्यामुळे निधन झाले. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे संपूर्ण दस्तऐवजासह विमा दावा सादर केला. गैरअर्जदारांनी दि.29.03.2010 रोजी पत्र पाठवून कुठलेही कारण न दर्शविता विमा दावा नाकारला. मृतक सोमेश्वर बारसु धांडे यांनी भारतीय जिवन बिमा निगम कडे धनवापसी लाभ पॉलिसी काढलेली होती व त्यांच्या मृत्यु पश्चात भारतीय जिवन बिमा निगमने विमा दावा मंजूर करुन रक्कमही अदा केलेली आहे. यावरुन गैरअर्जदारांनी काही कारण नसतांना विमा दावा नाकारल्याने तक्रारकर्त्यांनी मंचासमोर तक्रार दाखल केलेली आहे व विमा दाव्याची रक्कम व्याजासह मागणी करुन, मानसिक, शारिरीक आणि आर्थिक त्रासाबाबत भरपाई आणि तक्रारीच्या खर्चाची मागणी केलेली आहे. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता त्यांना नोटीस मिळूनही त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही किंवा मंचासमोर हजर झाले नाही, म्हणून दि.22.11.2010 गैरअर्जदार क्र. 1 विरुध्द व गैरअर्जदार क्र. 2 विरुध्द 27.01.2011 एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. 3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता दि.17.03.2011 रोजी आले असता मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार विमा दावा मिळण्याकरीता दाखल केलेली आहे. मृतक सोमेश्वर बारसु धांडे यांनी गैरअर्जदारांकडून विमा पॉलिसी घेतली होती ही बाब तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 1 वरुन स्पष्ट होते व तक्रारकर्ते हे पॉलिसीधारक/मृतक सोमेश्वर बारसु धांडे यांचे वारस असल्यामुळे ते गैरअर्जदाराचे ग्राहक ठरतात. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केलेली आहे. तसेच सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना मिळूनसुध्दा त्यांनी मंचासमोर उपस्थित होऊन तक्रारीतील कोणतेही कथन नाकारलेले नाही. त्यामुळे तक्रारीतील तक्रारकर्त्यांचे म्हणणे ग्राह्य धरण्यात येते. तक्रारकर्त्यांनी मंचासमक्ष दाखल केलेले दस्तऐवज क्र. 15 चे अवलोकन केले असता सदर तक्रार विमा दावा नाकारल्याबाबत केलेली आहे. त्यामध्ये विमा दावा नाकारण्याचे कोणतेही सबळ कारण स्पष्टपणे दिलेले नाही. कोणतेही विशेष कारणांचा त्यामध्ये उल्लेख नसतांना विमा दावा नाकारणे ही गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी असल्यामुळे विमा दाव्याची रक्कम मिळण्यास तक्रारकर्ते पात्र ठरतात असे मंचाचे मत आहे. तसेच विनाकारण विमा दावा नाकारल्याने तक्रारकर्त्यांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला, म्हणून तक्रारकर्ते शारिरीक व मानसिक त्रासाबाबत भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास पात्र ठरतात. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना रु.60,000/- विमा दाव्याची रक्कम, तक्रार दाखल दि.27.09.2010 पासून प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजाने द्यावी. 3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रासाबाबत भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत एकलपणे किंवा संयुक्तपणे करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |