तक्रार दाखल तारीख – दि.17/08/2013
तक्रार निकाली तारीख – दि.29/11/2017
न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने, जाबदार पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवींच्या रकमा मुदतीनंतरही जाबदार यांनी परत न केल्याने, दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे मौजे गोकुळ शिरगांव येथील रहिवासी असून त्यांनी स्वतःचे नावे व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या संस्थेमध्ये मुदतबंद ठेव पावती योजनेमध्ये सन 2002 मध्ये खालील नमूद रकमा गुंतवल्या होत्या.
अ.क्र. | खाते नंबर | रक्कम ठेवलेची तारीख | मुदत संपणेची तारीख | रक्कम | व्याजदर |
1 | 309 | 15/01/2002 | 16/07/2006 | 20,000/- | 16 टक्के |
2 | सी 149 | 20/09/2005 | 02/09/2012 | 20,000/- | 10 टक्के |
ठेवींची मुदत संपल्यानंतर तक्रारदाराने व्याजासह होणा-या रकमेची जाबदार यांचेकडे लेखी व तोंडी मागणी केली. परंतु जाबदार यांनी रक्कम परत करणेस टाळाटाळ केली. म्हणून तक्रारदारांनी दि.17/04/2013 रोजी वकीलामार्फत जाबदारांना नोटीस पाठविली परंतु तरीही जाबदार यांनी रक्कम परत करणेस टाळाटाळ केली आहे. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कसूर केलेली आहे. सबब, तक्रारअर्जात नमूद केलेप्रमाणे ठेवीची एकूण रक्कम रु. 40,000/-, सदर रकमेवर दि.17/4/2013 अखेरचे व्याज रक्कम रु.54,681/-, सदरच्या रकमा वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज, कॉम्पेन्सेटरी कॉस्ट रु.5,000/- जाबदार यांचेकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने मे. मंचास केलेली आहे.
3. तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने शपथपत्र दाखल केले आहे. तसेच नि.3 चे फेरिस्तसोबत ठेव पावत्यांच्या प्रती, तक्रारदारांनी जाबदार संस्थेचे अवसायक व उपनिबंधक, सहकारी संस्था, करवीर यांना पाठविलेल्या नोटीसा व त्याच्या पोस्टाच्या पावत्या व पोहोच पावत्या इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने तक्रारअर्जात दुरुस्ती केली असून दुरुस्ती प्रत दाखल केली आहे. तसेच पुराव्याचे शपथपत्रही दाखल केले आहे. तसेच तक्रारदाराने जाबदार संस्थेचे अवसायक यांना पक्षकार करणेसाठी मिळालेला परवानगी आदेशही दाखल केला आहे.
4. प्रस्तुतकामी जाबदार क्र.1 अवसायक यांनी म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे कथनानुसार जाबदार संस्थेच्या कर्जदारांकडून सक्तीच्या मार्गाने कर्ज वसुल करुन ठेवीदारांच्या ठेवी परत देणेसाठी कर्ज वसुली प्रक्रिया चालू केलेली आहे. ज्याप्रमाणे वसुली होत जाईल त्याप्रमाणे ठेव रकमा परत देणेची कार्यवाही करणेत येईल असे कथन जाबदार क्र.1 यांनी केले आहे.
5. जाबदार क्र.2 व 3 यांना याकामी नोटीस लागू होवूनही ते हजर झालेले नाहीत तसेच त्यांनी लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. सबब, प्रस्तुतचे प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फा चालविणेचा आदेश नि.1 वर करण्यात आला.
6. तक्रारदार यांची तक्रार, दाखल पुरावे, जाबदार क्र.1 यांचे लेखी म्हणणे व युक्तिवाद यावरुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय |
2 | जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय, जाबदार क्र.1 व 3 यांनी. |
3 | तक्रारदार याने मागितलेल्या मागण्या मिळणेस तो पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
वि वे च न –
मुद्दा क्र. 1 –
7. तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत खाते क्र.309 व सी-149 अन्वये प्रत्येकी रक्कम रु.20,000/- प्रमाणे एकूण रक्कम रु.40,000/- ठेवलेली होती व आहे व त्याच्या प्रतीही तक्रारदाराने आपल्या तक्रारअर्जासोबत जोडल्या आहेत. तसेच उभय पक्षांमध्ये या संदर्भात वादाचा मुद्दाही नाही. सबब, तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) खाली ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2, 3 व 4 -
8. तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत वर नमूद ठेवी ठेवल्याचे कथन जाबदार क्र.1 अवसायक यांनी नाकारलेले नाही. मात्र सदरचे ठेव पावत्यांची मुदत संपून व पैशाची मागणी करुनही जाबदार यांनी सदरच्या व्याजासहित होणा-या ठेव रकमा परत केलेल्या नाहीत असे तक्रारदाराचे कथन आहे. सदरचे कथन जाबदार क्र.2 व 3 यांनी मंचासमोर हजर राहून नाकारलेले नाही. जाबदार क्र.1 यांनी जाबदार संस्थेच्या कर्जदारांकडून सक्तीच्या मार्गाने कर्ज वसुल करुन ठेवीदारांच्या ठेवी परत देणेसाठी कर्ज वसुली प्रक्रिया चालू केलेली आहे. ज्याप्रमाणे वसुली होत जाईल त्याप्रमाणे ठेव रकमा परत देणेची कार्यवाही करणेत येईल असे कथन केले आहे. जाबदार क्र.1 यांचे सदरचे कथन पाहता त्यांनी तक्रारदाराच्या ठेवी अद्याप जाबदार संस्थेने परत केल्या नाहीत ही बाब मान्य केली आहे व त्या परत करण्याची तयारी दर्शविली आहे. सदरचे कथन पाहता ठेवींची मुदत संपूनही तक्रारदारांना ठेवीची रक्कम न देवून जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये निश्चितच त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
9. प्रस्तुत कामी जाबदार क्र.1 हे जाबदार पतसंस्थेवर नेमण्यात आलेले अवसायक आहेत तर जाबदार क्र.2 हे संस्थेचे मॅनेजर व जाबदार क्र.3 हे संस्थेचे चेअरमन आहेत. जाबदार क्र.2 हे मॅनेजर असलेने ते संस्थेचे कर्मचारी आहेत. सबब, त्यांचेवर तक्रारदाराच्या ठेवपावतीची जबाबदारी टाकता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. जाबदार क्र.1 हे संस्थेवर नेमण्यात आलेले अवसायक असल्याने त्यांचेवर तक्रारदाराच्या ठेवपरतीची जबाबदारी वैयक्तिक स्वरुपात टाकता येणार नाही. परंतु तक्रारदाराच्या ठेवपरतीसाठी संस्थेतर्फे ते संयुक्तरित्या जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे. जाबदार क्र.3 हे संस्थेचे चेअरमन असल्याने ते संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी जबाबदार ठरतात. सबब, जाबदार क्र.3 हे तक्रारदाराच्या ठेवपरतीसाठी वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे.
10. सबब, तक्रारदार ठेवींची मूळ रक्कम रु.40,000/- मिळणेस पात्र आहेत व सदर रकमेवर ठेव ठेवले तारखेपासून ते तक्रार दाखल तारखेपर्यंत ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने व तदनंतर ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत मूळ ठेव रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी तक्रारदार रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
- आ दे श -
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) जाबदार क्र.1 यांनी संयुक्तरित्या व जाबदार क्र.3 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदार यांना वर परिशिष्ठात नमूद ठेवींची मूळ रक्कम रु.40,000/- अदा करावी व सदर रकमेवर ठेव ठेवले तारखेपासून ते तक्रार दाखल तारखेपर्यंत ठेवपावत्यांमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने व तदनंतर ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत मूळ ठेव रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) जाबदार क्र.1 यांनी संयुक्तरित्या व जाबदार क्र.3 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार फक्त) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार फक्त) अदा करणेचे आदेश करणेत येतात.
4) जर वरील ठेवींपोटी काही रक्कम जाबदार यांनी यापूर्वी तक्रारदारास अदा केली असेल तर ती वळती करुन घेण्याचा जाबदार यांचा हक्क सुरक्षित ठेवण्यात येतो.
5) वर नमूद आदेशाची पूर्तता जाबदार क्र. 1 व 3 यांनी 45 दिवसांत करणेची आहे.
6) विहीत मुदतीत जाबदार यांनी मे. मचांचे आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे जाबदार विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदारांना राहील.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.