(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने दि.20.07.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 अव्हलॉन अव्हिएशन अकॅडमी, पुणे यांचे औरंगाबाद येथील फ्रँचायजी (2) त.क्र.681/09 गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे “डिप्लोमा इन प्रोफेशनल ग्राऊंड स्टाफ सर्व्हिसेस” या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. सदर कोर्ससाठी एकूण फीस रु.63,203/- निश्चित केली होती, त्यापैकी रक्कम रु.48,105/- एवढी फीस भरली. तक्रारदाराने गेरअर्जदार यांनी दिलेली जाहिरात वाचून सदर कोर्ससाठी प्रवेश घेण्याचे ठरविले. प्रवेश घेतेवेळेस गैरअर्जदाराने 38 एअरलाईन्स कंपन्यांशी करार केलेला असून डिप्लोमा कोर्स पूर्ण झाल्यावर 100% नोकरीची हमी आणि नोकरी मिळाली नाही तर 50% फीसची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. गैरअर्जदाराने सदर कोर्सचा कालावधी सहा महिन्याचा असून त्यामधे एअरपोर्ट सर्व्हिसेस, कार्गो डेन्जरस गुडस, पॅसेंजर हँडलिंग, लोड अड ट्रीम, एअरलाईन सिक्युरिटी व इतर शिकवण्यात येईल असे सांगितले. तक्रारदार गैरअर्जदाराकडे दि.20.07.2008 पासून नियमितपणे शिकवणी वर्गात उपस्थित राहत होते. प्रवेश घेतल्यानंतर गैरअर्जदाराने आश्वासन दिल्याप्रमाणे कोर्स व्यवस्थित शिकविला नाही म्हणून त्याने उर्वरीत फीसची रक्कम भरली नाही. तक्रारदाराने मार्च 2009 मधे कोर्स पूर्ण केला परंतू गैरअर्जदाराने कोर्स पूर्ण झाल्याचे डिप्लोमा सर्टिफिकेट दिले नाही. गैरअर्जदाराने अचानक कोणतीही माहिती तक्रारदारास न देता दि.26.02.2009 रोजी किंगफिशर एअरलाईन्सच्या ओझर एअरपोर्ट नाशिक येथे नोकरीसाठी रुजू होण्यास सांगितले म्हणून तक्रारदार नोकरीवर रुजू झाले. किंगफिशर एअरलाईन्सने नोकरीवर रुजू झाल्याचे पत्र अथवा नोकरीबाबतचा कोणताही करार केला नाही आणि तक्रारदारास कुलीचे काम करण्यास सांगितले. किंगफिशर एअरलाईन्सने असमाधानकारक काम दिले म्हणून तक्रारदाराने नोकरी सोडली. त्यावेळेस किंगफिशर एअरलाईन्सने ग्राऊंड स्टाफ सर्व्हिसचे डिप्लोमा सर्टिफिकेट नसल्यामुळे तुम्हाला कुलीची काम दिले असे सांगितले. गैरअर्जदाराच्या चुकीमुळे तक्रारदारास एव्हिएशन सेक्टरमधे नोकरी मिळण्याच्या संधी गमवाव्या लागल्या आणि तक्रारदाराचा मार्च 2009 पासूनचा कालावधी नोकरी विना वाया गेला. गैरअर्जदारांनी तक्रारदारास कोर्स पूर्ण करुनही डिप्लोमा सर्टिफिकेट दिले नाही अशा प्रकारे गैरअर्जदारांनी तक्रारदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे. म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून डिप्लोमा सर्टिफिकेट, 50% फीसची भरणा केलेली रक्कम, मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई तक्रारीच्या खर्चासह मिळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एकत्रित लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी तक्रारदारास दोघामधे झालेल्या करारातील अटी पूर्ण झाल्यावर आणि तक्रारदाराने कोर्स पूर्ण केल्यावर 100% नोकरीची हमी आणि नोकरी न (3) त.क्र.681/09 मिळाल्यास 50% फीस परत देण्यात येईल, आणि गैरअर्जदारांनी काही अटीवर 38 एअरलाईन्स कंपन्यांशी करार केलेला असल्याचे सांगितले होते. गैरअर्जदाराने तक्रारदारास अकॅडमीने ठरविलेला अभ्यासक्रम शिकविलेला असून, प्रशिक्षकांकडून ट्रेनिंग देखील दिलेले आहे. तक्रारदाराने प्रशिक्षण पूर्ण केले, परंतू इंटरनशिप ट्रेनिंग पूर्ण केले नाही तरी देखील गैरअर्जदारांनी किंगफिशर एअरलाईन्सकडे तक्रारदाराचे नाव नोकरीकरीता पाठविले आणि तक्रारदार ओझर एअरपोर्टवर रुजू झाले. तक्रारदार आणि किंगफिशर एअरलाईन्स यांचे नाते employer व employee असे आहे. नोकरीवर असताना तक्रारदाराची वर्तणूक उर्मट असल्यामुळे त्याला नोकरीवरुन काढून टाकले असे किंगफिशर एअरलाईन्सच्या ऑफीसरने सांगितले. तक्रारदारास नोकरीवरुन काढून टाकले यासाठी गैरअर्जदारांना जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदाराचे डिप्लोमा सर्टिफिकेट तयार असून तक्रारदाराने जाणूनबुजून नेलेले नाही. तक्रारदाराने ट्रेनिंग पूर्ण केलेले असून गैरअर्जदारांचे सांगण्यावरुन त्यास नोकरी लागलेली आहे. गेरअर्जदारांनी तक्रारदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या वतीने अड पी.आर.अडकिने आणि गेरअर्जदारांच्या वतीने अड एस.पी.जोशी यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने “डिप्लोमा इन प्रोफेशनल ग्राऊंड स्टाफ सर्व्हिसेस” या कोर्ससाठी गैरअर्जदार क्र.1 अव्हलॉन अव्हिएशन अकॅडमी, पुणे यांचे औरंगाबाद येथील फ्रँचायजी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे प्रवेश घेतला व निश्चित केलेली फीस रक्कम रु.62,203/- पैकी रक्कम रु.48,105/- जमा केले या विषयी वाद नाही. गैरअर्जदारांचे म्हणण्यानुसार तक्रारदाराने सदर कोर्स पूर्ण केला परंतू इंटरनशिप ट्रेनिंग पूर्ण केले नाही, तरी देखील तक्रारदारास किंगफिशर एअरलाईन्सया ओझर एअरपोर्टवर नोकरी लावून दिलेली आहे. तक्रारदार ओझर एअरपोर्टवर नोकरीसाठी रुजू झाल्याचे दि.26.02.2009 चे तक्रारदाराने गैरअर्जदारास दिलेल्या पत्रावरुन दिसून येते. परंतू याबाबत तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तो गैरअर्जदारांचे सांगण्यावरुन ओझर एअरपोर्टवर नोकरीसाठी रुजू झाला परंतू किंगफिशर एअरलाईन्सने नोकरीवर रुजू झाल्याचे पत्र दिले नाही अथवा नोकरीबाबत करार केला नाही आणि डिप्लोमा सर्टिफिकेट नसल्याचे कारणावरुन नोकरीवरुन कमी केले आहे. गैरअर्जदारांनी युक्तिवादाचेवेळेस तक्रारदाराचे डिप्लोमा सर्टिफिकेट आज त्यांना प्राप्त झाले असून ते तक्रारदारास देण्यास तयार आहेत असे सांगितले. यावरुन तक्रारदारास ओझर एअरपोर्टवर नोकरी लागलेली असली तरी त्यांनी डिप्लोमा सर्टिफिकेट नसल्याचे (4) त.क्र.681/09 कारणावरुन तक्रारदारास नोकरीवरुन कमी केले असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. तक्रारदाराने डिप्लोमा कोर्स मार्च 2009 मधेच पूर्ण केलेला असून त्याचे डिप्लोमा सर्टिफिकेट हे 7 जानेवारी 2010 रोजी तयार केल्याचे गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या सर्टिफिकेटच्या छायांकित प्रतीवरुन दिसून येते. तक्रारदाराने सदर कोर्स पूर्ण केला परंतू इंटरनशिप ट्रेनिंग पूर्ण केले नाही या म्हणण्यापुष्टयर्थ गैरअर्जदारांनी कोणताही पुरावा दाखल केला नाही. तक्रारदाराने मार्च 2009 मधे कोर्स पूर्ण करुनही अद्यापपर्यंत त्याला डिप्लोमा सर्टिफिकेट दिलेले नाही म्हणून त्यास 26 फेब्रुवारी 2009 रोजी ओझर एअरपोर्टवर लागलेली नोकरी गमवावी लागली. ही एक प्रकारे गैरअर्जदारांनी तक्रारदाराची केलेली घोर फसवणूक आहे. गैरअर्जदारांनी जाहिरात देऊन विद्यार्थ्यांना कोर्स करण्यासाठी आणि कोर्स पूर्ण झाल्यावर चांगली नोकरी देण्याची हमी देऊन विद्यार्थ्यांना आकर्षित केले जाते व प्रवेश घेण्यासाठी भरीस घातले जाते. आणि अशा जाहिराती बघून विद्यार्थी सदर कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतात. अशा प्रकारच्या फसव्या जाहिराती देऊन गैरअर्जदारांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराने सदर कोर्ससाठी एकूण निश्चित केलेली फीस रु.63,203/- पैकी रु.48,105/- गैरअर्जदाराकडे भरलेले आहेत. परंतू तक्रारदाराने कोर्स पूर्ण करुनही गैरअर्जदारांनी त्यास डिप्लोमा सर्टिफिकेट दिलेले नसल्यामुळे तक्रारदाराने उर्वरीत फीसची रक्कम देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. गैरअर्जदारांनी तक्रारदाराकडून फीसची अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम घेऊन आणि तक्रारदाराने कोर्स पूर्ण करुनही डिप्लोमा सर्टिफिकेट दिले नाही ही गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी आहे. सदर कोर्स पूर्ण केल्यावर 100% नोकरीची हमी गैरअर्जदारांनी दिलेली असल्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी पडून तक्रारदाराने कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतला परंतू कोर्स पूर्ण करुनही गैरअर्जदारांनी डिप्लोमा सर्टिफिकेट न दिल्यामुळे तक्रारदारास नोकरीच्या संधी गमवाव्या लागल्या आणि त्याचा मार्च 2009 पासूनचा दोन वर्षाचा कालावधी वाया गेला आणि त्यास गैरअर्जदारच जबाबदार आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारास डिप्लोमा सर्टिफिकेट आणि कोर्स पूर्ण करुनही नोकरी न मिळाल्यामुळे भरलेली फीस रक्कम रु.48,105/- पैकी 50% फीसची रक्कम रु.24,052/- मिळण्यास पात्र आहे. तसेच कोर्स पूर्ण करुनही डिप्लोमा सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे तक्रारदारास निश्चितपणे त्रास झालेला आहे म्हणून तक्रारदार मानसिक शारिरिक व (5) त.क्र.681/09 आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो. आदेश 1) तक्रार मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास डिप्लोमा सर्टिफिकेट आणि भरलेली फीस रक्कम रु.48,105/- पैकी 50% फीस रक्कम रुपये 24,052/- निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावेत. 3) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 1,000/- असे एकूण रु.6,000/- निकाल कळाल्यापासून एक महिन्यात द्यावेत. 4) संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |