घोषित द्वारा - श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी मारुती वॅगनर ही गाडी 5 जानेवारी 2007 मध्ये खरेदी केली या गाडीच्या मॅन्युफॅक्चरींग मॉडेल 2006 वर्षाचे होते. ही गाडी घेण्यासाठी तक्रारदारानी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांच्याकडून अर्थसहाय्य घेतले होते. दिनांक 25 ऑगस्ट 2008 रोजी तक्रारदारानी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे त्यांच्या गाडीचे इंजिन मिसफायरींग, आवाज येणे, गाडीचे जरकींग, आणि बॅक फायरींग होत असल्यामुळे त्यांच्याकडे तक्रार केली. गैरअजर्दारानी तक्रारदाराच्या गाडीची तपासणी केली. त्यांच्या रिपोर्टप्रमाणे गाडीमधील दोषामुळेच या तक्रारी उदभवल्या . तक्रारदार दिनांक 11 मे 2009 पर्यंत त्यांच्या गाडीची दुरुस्ती गैरअर्जदाराकडून करुन घेत होते. त्यानंतर गैरअर्जदारानी त्यांच्या गाडीची वॉरंटी दिनांक 31/12/2009 पर्यंत वाढवून दिली. तक्रारदाराने मारुती या गाडीचे नाव बघून गाडी घेतली होती, वॉरंटीच्या कालावधीमध्येच अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे ते नाराज झाले म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून दुसरी गाडी बदलून किंवा गाडीची किंमत परत मागतात तसेच नुकसान भरपाई म्हणून 50,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी तक्रारीसोबत शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 आणि 2 यांनी त्यांचा लेखी जवाब मंचात दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारानी त्यांच्याकडे गाडी सन 2007 मध्ये खरेदी केली आणि प्रथमताच तक्रारदार 25 ऑगस्ट 2008 मध्ये इंजिनमध्ये आवाज होत आहे म्हणून तक्रार घेऊन आले. म्हणजेच जवळ जवळ 19 महिन्यानंतर इंजिनमधील आवाजाविषयीची तक्रार त्यांनी दिली. त्यामुळे तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे गाडीमध्ये उत्पादकीय दोष नव्हता. 19 महिन्याच्या गाडीच्या वापरामुळे सुध्दा कांही समस्या उदभवू शकतात. त्यासाठी वेळेवर सर्व्हिसींग करणे गरजेचे असते. तसेच ड्रायव्हरची गाडी चालविण्याची सवय, इंधनाचा प्रकार, नियमितपणे ऑईलची बदली करणे, न थांबता लांब पल्ल्याचा प्रवास करणे, या सर्व बाबीमुळे समस्या उदभवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळेच कदाचित तक्रारदाराच्या गाडीमध्ये सुध्दा समस्या उद्रभवल्या असतील. तक्रारदारानी गैरअर्जदारांच्या वर्कशॉपमध्ये दिनांक 25 ऑगस्ट 2008 रोजी म्हणजे 19 महिन्यानंतर 26763 किलोमीटर गाडी चालल्यानंतर त्यामध्ये फक्त स्पार्कींग होत होती म्हणून गाडी वॅर्कशॉपमध्ये आणली होती. गैरअर्जदारानी ताबडतोब त्याची दुरुस्ती करुन दिली आणि त्याच दिवशी तक्रारदारास गाडी दिली. दिनांक 27/8/2008 रोजी तक्रारदारानी त्यांच्याकडे गाडीच्या स्टार्टींग विषयीची तक्रार आणली होती. तेंव्हा सुध्दा कुठलेही चार्जेस न लावता गाडी लगेचच दुरुस्त करुन देण्यात आली. गैरअर्जदारांचे असे म्हणणे आहे की, दिनांक 11/5/2009 पर्यंत इंजिनच्या तक्रारीविषयी गाडी त्यांच्याकडे आणली नव्हती. यामुळेच गाडीमध्ये कुठलाही उत्पादकीय दोष नव्हता हे दिसून येते. तक्रारदारानी जानेवारी 2007 मध्ये गाडी खरेदी केली आणि ऑगस्ट 2009 मध्ये गाडीमध्ये उत्पादकीय दोष आहे म्हणून तक्रार दाखल केली. जवळपास 24 महिन्यानंतर ही तक्रार दाखल केली आहे त्यामुळे तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय आहे. त्यामुळे ती नामंजूर करावी. स्थानिक विक्रेत्यांनी तक्रारदारास मोफत सर्व्हिसींग करुन दिली आहे. त्यावेळेस तक्रारदारानी गाडीबाबत कांहीही तक्रार नाही असे लिहून देऊन गाडी घेऊन गेलेले आहेत. तक्रारदारानी त्यांच्या तक्रारीमध्ये ते लांब पल्ल्याचा प्रवास करीत असताना किंवा कुठलाही प्रवास करीत असताना गाडी कुठल्या स्टेशनला खराब झाली, कोणत्या तारखेस खराब झाली तसेच कोणत्या सर्व्हिसींग सेंटरकडून ती दुरुस्त करुन घेतली याबाबत कुठलाही तपशिल दिलेला नाही. तसेच जॉबकार्डसुध्दा दाखल केलेले नाही. त्यामुळे गाडी कुठेही खराब झाली नाही असे दिसून येते. तक्रारदाराच्या गाडीमध्ये कुठलाही उत्पादकीय दोष नसल्यामुळे गाडी बदलून देण्याचा किंवा रक्कम परत करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार रु 5000/- दंडासहीत नामंजूर करावी अशी विनंती ते करतात. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी त्यांचा लेखी जवाबाद्वारे तक्रारदाराच्या तक्रारीस विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारानी पुराव्यासहीत गाडीत उत्पादकीय दोष असल्याचे सिध्द केले नाही. तसेच गैरअर्जदारानी सेवेत त्रुटी केल्याचे पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. दिनांक 1/4/2010 रोजी तक्रारदाराची गाडी 54830 किलोमीटर चाललेली होती हे दिसून येते. त्यामुळे गाडीमध्ये कुठलाही दोष नव्हता हे यावरुन स्पष्ट दिसून येते. या मायलेजवरुन असे दिसून येते की, तक्रारदाराने त्यांच्या गाडीचा वापर भरपूर प्रमाणात केलेला आहे व गाडीचा वापर हा व्यावसायीक कारणासाठी केलेला आहे. तक्रारदाराने गाडीच्या वॉरंटीचा कालावधी संपल्यानंतर ही तक्रार केलेली आहे . गैरअर्जदारानी तक्रारदारास गाडीच्या वॉरंटीच्या कालावधीमध्ये सर्व सेवा दिलेली आहे. वॉरंटीचा कालावधी संपल्यानतर तक्रारदार अंतस्थ हेतूने मंचात आले. गैरअर्जदार क्रमांक 3 पुढे असे म्हणतात की, मारुती गाडी ही बाजारामध्ये आणताना अनेक चाचण्या करण्यात येतात व त्यानंतरच विक्रीसाठी परवानगी मिळते. त्यासाठी ARAI यांची परवानगी आवश्यक असते. गैरअर्जदारांची कंपनी ही आयएसओ प्रमाणित आहे. गाडी बनविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे मारुती कंपनीचे वाहन हे 100 टक्के समस्यारहीत आहेत. वरील सर्व कारणावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारानी त्यांची गाडी दिनांक 5/1/2007 रोजी खरेदी केली आणि प्रथमताच म्हणजे दिनांक 25 ऑगस्ट 2008 मध्ये इंजिनमध्ये आवाज होत आहे, जर्कींग या कारणासाठी म्हणून गैरअर्जदाराकडे दूरुस्तीसाठी नेली. गैरअर्जदार असे म्हणतात की, या समस्या त्यांनी वॉरंटीच्या कालावधीमध्ये दुरुस्त करुन दिल्या व हे कस्टमर कंप्लेंट रिपोर्टवरुन दिसून येते. दिनांक 11/5/2009 रोजी 86170 गाडीचे मायलेज झाले होते यावरुन तक्रारदाराची गाडी ही व्यवस्थितीत रित्या चालत होती हे दिसून येते. तक्रारदाराने त्यांच्या गाडीमध्ये उत्पादकीय दोष होता, गाडी खराब होती याबाबत कुठल्याही तज्ञाचा अहवाल दाखल केला नाही. वॉरंटीच्या कालावधीमध्ये गैरअर्जदारानी गाडीतील समस्या वेळेवर दुरुस्त करुन दिलेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या सेवेत कुठलीही त्रुटी आहे हे दिसून येत नाही. गैरअर्जदारानी तक्रारदारास मारुती वॅगनार ही सदोष गाडी दिली हे तक्रारदारानी सिध्द केलेले नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. आदेश तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |