(मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून डिफेक्टीव्ह टायर बदलून त्याऐवजी नवीन चांगल्या योग्य स्थितीतील टायर द्यावे. डिफेक्टीव्ह टायरमुळे अर्जदाराला दररोज रु.2000/- प्रमाणे नुकसान होवून सदरची दररोजप्रमाणे होणारी एकूण रक्कम रु.1,80,000/- देण्याचा आदेश व्हावा. मानसिक, शारिरीक, आर्थीक त्रासाबाबत रु.2,00,000/- मिळावेत, अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला क्र.1 यांनी याकामी पान क्र.16 लगत लेखी म्हणणे व पान क्र.17 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.2 हे नोटीस लागूनही गैरहजर असल्याचे त्यांचेविरुध्द दि.27/2/2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
मुद्देः 1) अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय?-होय. 2) सामनेवाले यांनी अर्जदार यांना दोषयुक्त टायरची विक्री करुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे काय?-नाही. 3) अंतिम आदेश?-- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे. विवेचन याकामी अर्जदार व त्यांचे वकील, सामनेवाला व त्यांचे वकील हे युक्तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत. सामनेवाला क्र.1 यांनी त्याचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये, अर्जदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून मारुती कार खरेदी केल्याची बाब लेखी म्हणण्यामध्ये नाकारलेली असली तरी तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे म्हणणे दाखल करुन तक्रारदार यांची तक्रार नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.5 लगत टॅक्स इन्व्हाईस, पान क्र.6 लगत डिलीव्हरी चलन ची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र व पान क्र.5 लगत टॅक्स इन्व्हाईस, पान क्र.6 लगत डिलीव्हरी चलन यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला क्र.1 हे वाहनाचे अधिकृत विक्रेते/एजंट आहेत. मात्र उत्पादक नाहीत. संपुर्ण वाहन हे मारुती सुझुकी इंडिया लि.यांचेतर्फे तयार केले जाते त्यामुळे सामनेवाला क्र.1 हे वाहन निर्मीतीच्या क्षेत्रास जबाबदार नाहीत. वाहनाच्या अटी व शर्तीबाबत सर्व्हीस बुकमध्ये अटी शर्ती नमूद केलेल्या आहेत. त्यातील कलम 4(2) मध्ये वाहनाचे टायर टयुब यांना वारंटी लागु होत नाही असे स्पष्ट नमूद केलेले आहे. अर्जदार यांची वाहनात दोष असल्याबाबतची कोणतीही तक्रार नाही.” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “वाहनाची वर्कशॉपमध्ये तपासणी केली असता वाहनाच्या टायरला खोल असा काप/छेद गेलेला होता. सदरचा छेद/काप हा केवळ निष्काळजीपणे खरबडीत रस्त्यावर किंवा धारदार दगड/खडीवर चालविल्यामुळे वाहनाच्या टायरला अशाप्रकारचा काप/छेद गेलेला आहे असे निदर्शनास आलेले आहे. तसेच सदरचे टायर निर्मात्याकडे इन्स्पेक्शनला पाठवले होते. त्याचा अहवाल सामनेवाला नं.1 यांना मिळालेला आहे त्यात वाहनाच्या टायरला अपघातामुळेच नुकसान झालेले आहे असे नमूद आहे. तसेच सदरचा काप/छेद हा मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट नाही. वाहनाच्या टायरचे नुकसान हे वाहनाच्या निष्काळजी वापरामुळे अपघाती घटनेमुळे झालेले आहे. वाहनाचे टायर हे वाहनाच्या वारंटीत येत नाही.” असे म्हटलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “वादातील टायर निर्मात्याकडे इन्स्पेक्शनसाठी पाठवले होते त्या इन्स्पेक्शनचा अहवाल प्राप्त झालेला आहे व या इन्स्पेक्शननुसार वाहनाच्या टायरला अपघातामुळेच नुकसान झालेले आहे.” असे स्पष्टपणे कथन केलेले आहे. सामनेवाला यांनी या कामी पान क्र.19 लगत वादातील टायरचा फोटोग्राफ व पान क्र.20 लगत जे के टायर अॅण्ड इडस्ट्रीज लि. यांचा वादातील टायरबाबतचा दि.3/5/2011 रोजीचा तपासणीचा अहवाल दाखल केलेला आहे. या अहवालामध्ये “External injury/accidentaL Damages/Cuts.” असा उल्लेख आहे. पान क्र.19 चा फोटोग्राफ, पान क्र.20 चा अहवाल व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार होता वादातील टायर हा अपघातामुळे कट झालेला असून खराब झालेला आहे हे स्पष्ट होत आहे. पान क्र.20 चा अहवाल हा चुकीचा आहे किंवा योग्य व बरोबर नाही हे दर्शवण्याकरीता अर्जदार यांनी कोणताही योग्य तो जादा लेखी पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच वादातील टायर मंचासमोर दाखल होवून त्याची तपासणी टायरचे क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचे मार्फत होवून त्याबाबतचा अहवाल (Expert report)मंचासमोर दाखल होण्याबाबत अर्जदार यांनी मंचाकडे कोणतीही मागणी केलेली नाही किंवा त्याबाबत कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. वादातील टायरबाबतची योग्य ती गॅरंटी किंवा वारंटी अर्जदार यांनी मंचासमोर दाखल केलेली नाही. वरीलप्रमाणे सर्व कारणांचा विचार करता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना दोषयुक्त व खराब टायरची विक्री करुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही असे या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.
1)1(2012) सी पी जे राष्ट्रीय आयोग पान 14 ओमप्रभा मालविय विरुध्द गोदरेज फोटो लि.
2) 3(2011) सी पी जे राष्ट्रीय आयोग पान 42 सिमा गांधी विरुध्द मारुती सुझुकी अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, तसेच सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वर उल्लेख केलेली व आधार घेतलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
|