मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई ग्राहक तक्रार क्रमांक – 89/2010 तक्रार दाखल दिनांक –28/07/2010 आदेश दिनांक – 25/02/2011 कुमारी नयना डी. बूच, 221, वर्धमान चेंबर्स, 17 जी, कावसजी पटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई 400 001. ........ तक्रारदार विरुध्द
1) ऑटोबान एंटरप्रायझेस प्रा. लि., मराठे उद्योग भवन, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 0025.
2) स्कोडाऑटो इंडिया प्रा. लि., ए-1/1 एमआयडीसी, फाईव्ह स्टार इंडस्ट्रीयल एरिया, शेंद्रा, औरंगाबाद 431 201. ......... सामनेवाले क्रमांक 1 व 2 समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती - उभयपक्ष हजर
- निकालपत्र - - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्ती यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ही उत्पादीत स्कोडा ऑक्टीव्हा 1.9 टिडीआय ऑटोमॅटिक कार ही गैरअर्जदार क्रमांक 1 मार्फत दिनांक 4/4/2007 रोजी रुपये 13,41,000/- या किंमतीला विकत घेतली होती, व ती 23400 किलो मीटर इतकी चालविली होती, त्या दरम्यान वाहनात अनेक त्रृटी आढळून आल्या. सदर वाहनात उत्पादीत दोष आढळून आले. एअर कंडिशन ब्रेक, एसी फेल्ड, फ्रंट ब्रेक स्पॅड, रॅडिएटर बिग फॅन फेल्ड, तसेच वाहनाच्या दरवाज्यामध्ये दोष उत्पादन झाले त्याकरीता त्यांनी गैरअर्जदाराकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारकर्तीने नमूद केले आहे की, गाडीच्या खर्चाकरीता त्यांनी गैरअर्जदार यांना रुपये 21,962/- दिलेले आहेत, तसेच वाहनाला गैरअर्जदार यांनी रुपये 11,998/- इतका दुरुस्तीचा खर्च आकारलेला होता. तक्रारकर्तीने नमूद केले आहे की, वाहन हे वॉंरंटी दरम्यान असल्यामुळे त्यावरील वाहनाचे सुट्टे भाग व सेवा देण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांची आहे. तक्रारकर्ती यांनी गैरअर्जदाराविरुध्द वाहन दुरुस्तीकरीता त्यांनी घेतलेल्या रकमेची मागणी केलेली आहे.
मंचाने गैरअर्जदारांना नोटीस काढली. गैरअर्जदार हे हजर झाले व त्यांनी तसा लेखी अहवाल दाखल केला. गैरअर्जदार यांनी दाखल केले आहे की, सदर तक्रार ही मुदतबाहय दाखल केल्यामुळे ती खारीज करण्यात यावी, तसेच सदर तक्रार ही मंचाला चालविण्याचा अधिकार नाही. मंचाला त्यांनी नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी खोटी व गैरकायदेशीर मागणी केलेली आहे. गैरअर्जदार यांनी नमूद केले आहे की, तक्रारदार यांना सेवेत कोणतीच त्रृटी दिलेली नाही. वाहनात उत्पादीत दोष नव्हते. गैरअर्जदारांनी मागणी केली आहे की, तक्रारदार यांना ही गाडी सन 2007 च्या दरम्यान विक्री केलेली आहे, व गैरअर्जदारांनी नमूद केलेले आहे की, वाहनाची दोन वर्षापर्यंत वॉरंटी होती व तक्रारदाराचे वाहन हे वॉरंटी कालावधीनंतर दुरुस्तीकरीता आले होते, व त्याकरीता लागणा-या खर्चाची आकारणी करण्यात आली होती. गैरअर्जदार यांनी नमूद केले आहे की, तक्रारदाराच्या वाहनाला वेळोवेळी आवश्यक ती सर्व्हीसींग करुन सेवा दिलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांची केलेली मागणी ही खारीज होण्यास पात्र आहे. 3) प्रस्तुत प्रकरण मंचासमक्ष दिनांक 15/02/2011 रोजी सुनावणीकरीता आले असता तक्रारकर्तीतर्फे वकील हजर होते, तसेच विरुध्दपक्षातर्फे वकील हजर होते. उभयपक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. उभयपक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज म्हणजेच तक्रार, लेखी जबाब, प्रतिज्ञापत्र, पुरावा इत्यादींचे अवलोकन केले असता मंच खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेत आहेत - मुद्दा क्रमांक 1) – तक्रारकर्तीने ही बाब सिध्द केली आहे की, ती गैरअर्जदार यांची ग्राहक आहे काय? व सदर तक्रार ही मंचाला चालविण्याचा अधिकार आहे काय? उत्तर होय. मुद्दा क्रमांक 2) – तक्रारकर्तीने ही बाब सिध्द केली आहे की, गैरअर्जदार यांनी तिला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? उत्तर होय. स्पष्टीकरण मुद्दा क्रमांक 1) - तक्रारकर्तीने नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 हे स्कोडा ऑक्टीव्हा या चारचाकी वाहनाचे उत्पादक आहेत. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 हे त्यांचे डिलर आहेत. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून वाहन विकत घेतले होते त्यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदार यांची “ग्राहक” आहे, तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी वाहन विकत घेतल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्यामार्फत सेवा देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रार चालविण्याचा अधिकार मंचाच्या अधिकार क्षेत्रात आहे. स्पष्टीकरण मुद्दा क्रमांक 2) - तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून स्कोडा ऑक्टीव्हा 1.9 टिडीआय ऑटोमॅटिक कार दिनांक 4/4/2007 रोजी रक्कम रुपये 13,41,000/- या किंमतीला विकत घेतली होती. त्यानंतर सदर वाहनाची नियमाप्रमाणे त्यांनी सर्व्हिसींग करुन घेतलेली आहे. वाहनाच्या वॉरंटी दरम्यान हॉर्न दुरुस्त करुन बदलून दिलेला आहे. तसेच वाहन हे दिनांक 15/10/2008 रोजी बंद पडले होते, त्याकरिता दुरुस्ती करुन दिलेली आहे. वाहनाचे एअर कंडिशन नादुरुस्त असल्यामुळे त्याची दुरुस्ती करुन दिलेली आहे, तसेच सदर वाहनाच्या वॉरंटी दरम्यान उत्पादीत दोष आढळून आले. एअर कंडिशन ब्रेक, एसी फेल्ड, फ्रंट ब्रेक स्पॅड, रॅडिएटर बिग फॅन फेल्ड, तसेच वाहनाच्या दरवाज्यामध्ये दोष उत्पन्न झाले त्याकरीता त्यांनी गैरअर्जदाराकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारकर्तीने नमूद केले आहे की, गाडीकरीता त्यांनी गैरअर्जदार यांना रुपये 5,414/- दिलेले होते. गैरअर्जदार यांनी ही बाब मान्य केलेली आहे. गैरअर्जदार यांनी जेव्हा जेव्हा वाहनाची दुरुस्ती केली, व वाहन सर्व्हिसींगला आले त्या दरम्यान जॉबकार्ड दाखल केलेले नाही. परंतु तक्रारदार यांनी वाहनाला आलेल्या खर्चाबद्दल एस्टीमेट दाखल केलेले आहे. मंचाच्या मते वाहन घेतल्यानंतर त्यात अनेक प्रकारच्या त्रृटी आढळल्या. मंचाच्या मते तक्रारकर्तीने रुपये 13,41,000/- एवढया मोठया किंमतीला वाहन विकत घेऊन त्याची अनेकवेळा दुरुस्ती करावी लागली यावरुन ही बाब सिध्द होते की, वाहनात दोष होते व त्याकरिता गैरअर्जदार यांना अनेक वेळा वाहन दुरुस्त करुन दिले व स्पेअर पार्टस् बदलून दिले त्याकरिता तक्रारकर्तीला रुपये 11,998/- गैरअर्जदारांना द्यावे लागल्यामुळे मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीकडून स्पेअरपार्टसची आकारलेली रक्कम ही परत करावी.
सदर प्रकरण मंचासमक्ष प्रलंबित असतांना वाहन हे चालू स्थितीत नव्हते, व बंद होते, तसेच वाहन चालू होण्याकरीता त्याची दुरुस्ती होण्याची आवश्यकता होती. तक्रारकर्तीने मंचासमक्ष प्रकरण प्रलंबित असतांना वाहन दुरुस्त करण्याकरीता अर्ज सादर केला होता, तो अंतिम आदेशाच्या अधीन राहून मंजूर करण्यात आला होता. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे वाहन दुरुस्तीसाठी दिले होते. व त्याकरिता रुपये 21,019/- खर्च आला होता. सदर खर्च हा तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांना दिला होता, व त्याबद्दल तक्रारकर्तीने दस्तऐवज दाखल केले होते. त्याकामी सदर दुरुस्तीबद्दल जे एस्टीमेट दिले होते त्याचे अवलोकन केले असता त्यात हॉर्न, ए.सी.ची दुरुस्ती, फ्रंट ब्रेक इत्यादीबद्दल आकारणी केलेली आहे. सदर दुरुस्ती ही वाहन गॅरंटी कालावधीमध्ये असतांना करण्यात आली होती. यावरुन ही बाब सिध्द होते की, वाहनाच्या वॉरंटी कालावधीमध्ये जे दोष होते ते दोष पुनश्च वाहनात निर्माण होतात त्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस सदर रक्कम परत करावी असे मंचास संयुक्तीक वाटते. तसेच गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीकडून घेतलेली रक्कम रुपये 11,998/- आकारली होती ती परत करावी.
तक्रारकर्तीने वाहनाच्या नुकसानभरपाईपोटी रक्कम रुपये 2,50,000/ ची मागणी केलेली आहे, तसेच शारिरीक मानसिक त्रासाबद्दल रुपये 1,00,000/- ची मागणी केलेली आहे. तक्रारकर्तीने केलेली मागणी ही मंचाला संयुक्तीक वाटत नाही. तथापी सदर वाहन अनेक वेळा गैरअर्जदार यांच्याकडे दुरुस्तीसाठी न्यावे लागले, वॉरंटी दरम्यान वाहनात दोष निर्माण झाल्यामुळे तक्रारदार हिला वाहनाचा उपभोग घेता आला नाही, व त्याकरीता तिला शारिरीक मानसिक त्रास झाला त्याकरीता तक्रारकर्ती गैरअर्जदार यांच्याकडून रुपये 10,000/- मिळणेस पात्र आहे. तसेच तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- द्यावा असे मंचाचे मत आहे. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो - अंतिम आदेश - 1) तक्रार क्रमांक 89/2010 अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीकडून वाहन दुरुस्तीच्या खर्चासाठी घेतलेली रक्कम रुपये 11,998/ (रुपये अकरा हजार नवशे अठयाण्णव फक्त) व रुपये 21,019/- (रुपये एकवीस हजार एकोणीस फक्त) सदर आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत तक्रारकर्तीला परत करावी. जर सदर रक्कम 30 दिवसाच्या आत परत केली नाही तर सदर संपूर्ण रकमेवर दर साल दर शेकडा 9 टक्के दराने आदेश पारित तारखेपासून ते प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत व्याजासह रक्कम द्यावी. 3) तक्रारकर्तीला शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) गैरअर्जदारांनी द्यावेत. 4) तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- (रुपये तिन हजार फक्त) तक्रारकर्तीला द्यावा. 5) जर सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या केली नाही तर तक्रारकर्तीस उपरोक्त संपूर्ण रक्कम वसूल करण्याचा अधिकार राहील. 6) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 25/02/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./- |