(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याची औरंगाबाद-बीड रोडवर चितेपिंपळगाव येथे जमीन असून सदर जमीन त्याने मे.श्री.पेट्रोलियम यांना किरायाने दिली आहे. त्याने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा घेतलेला असून तो वीज वितरण कंपनीचा ग्राहक आहे. त्याच्या जमिनीसमोरुन 11 के.व्ही.ची इलेक्ट्रीसिटी लाईन जात असल्यामुळे सदर पेट्रोल पंपास अडथळा होत होता, म्हणून त्याने सदर लाईन दुसरीकडे शिफ्ट करावी असा अर्ज गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडे दिला. वीज वितरण कंपनीने त्यास लाईन एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी बदलून शिफ्ट करण्यासाठी (2) त.क्र.513/10 लागणा-या साहित्याची रक्कम रु.54,860/- ची मागणी केली व तसे दि.17.03.2006 रोजीचे पत्र तक्रारदारास पाठविले. त्यानुसार तक्रारदाराने रक्कम रु.54,860/- वीज वितरण कंपनीकडे जमा केले. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने त्याच्या जमिनीसमोरील लाईन काढून घेतली परंतू त्यांनी अद्याप सदर लाईन दुसरीकडे शिफ्ट केली नाही. तक्रारदाराने त्याच्या जमिनीसमोरील लाईन गेरअर्जदार वीज वितरण कंपनीने काढून दुसरीकडे शिफ्ट करावी म्हणून तक्रारदाराने ग्राहक मंचामधे तक्रार क्र.198/08 दाखल केली. सदर तक्रार दि.15.03.2008 रोजी निकाली काढण्यात आलेली आहे. तक्रार क्र.198/2008 मधे गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने दाखल केलेल्या लेखी जबाबामधे 11 के. व्ही. ची लाईन ही डेड लाईन असून तिचा वापर करत नाही म्हणून सदर लाईन शिफ्ट करण्याची आवश्यकता नाही. त्याने सदर लाईन शिफ्ट करण्यासाठी आणलेल्या साहित्याची रक्कम भरलेली असून वीज वितरण कंपनीने लाईन शिफ्ट करण्यासाठी आणलेले सामान सदर लाईनचा वापर करत नाही या कारणावरुन वापरले नाही. तक्रारदाराने सदर रक्कम वीज वितरण कंपनीने परत करावी यासाठी वारंवार मागणी केली परंतू वीज वितरण कंपनीने सदर रक्कम परत केली नाही. म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने त्याचेकडून लाईन शिफ्ट करण्यास लागणा-या साहित्यासाठी घेतलेली रक्कम रु.54,860/- व्याजासह परत करावी आणि मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल करुन तक्रारदाराने दि.14.10.2005 रोजी त्याच्या जमिनीसमोरील 11 के.व्ही. उच्च दाबाचा पुरवठा करणारी वायर शिफ्ट करण्यासाठी रक्कम भरली होती हे मान्य केले आहे. त्यांनी तक्रारदारास दि.17.03.2006 रोजी लाईन शिफ्ट करण्यास लागणा-या साहित्यासाठी रक्कम भरण्याचे पत्र दिले. त्यांना लाईन शिफ्ट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध झाला नाही, त्यामुळे त्यांना काम सुरु करता आले नाही. दरम्यानच्या कालावधीत तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल केली त्यावेळेस मंचाने दि.15.03.2008 रोजी दिलेल्या निकालात काम सुरु करावे आणि रु.5,000/- नुकसान भरपाई तक्रारदारास द्यावी असा आदेश केला होता. ऑगस्ट 2008 मधे कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध झाल्यावर तक्रारदाराचे जमिनीसमोरील लाईन काढून टाकण्यात आली. सदर लाईन तक्रारदाराच्या जमिनीचे मागच्या बाजूस टाकण्यात येत असताना तक्रारदाराने कामामधे अडथळा आणला त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला लाईन शिफ्ट करण्याचे काम थांबवावे लागले. तक्रारदारास हे माहित आहे की, त्याचे पेट्रोल पंपासमोरुन जाणारी लाईन हे बरेच वर्षापासून डेड आहे व त्यापासून पेट्रोल पंपाला काही धोका नाही (3) त.क्र.513/10 परंतू पेट्रोल पंप चांगला दिसावा म्हणून त्याने लाईन काढून टाकण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केला. हया सदर लाईनचा सध्या वापर होत नसला तरी भविष्यात तिचा उपयोग होऊ शकतो. तक्रारदार लाईन शिफ्ट करण्याचे कामास अडथळा करीत आहेत तक्रारदाराने लाईन शिफ्ट करण्यास लागणा-या साहित्यासाठी जमा केलेल्या रकमेपैकी बरीच रक्कम वापरण्यात आलेली आहे. तक्रारदाराने त्रास देण्याच्या हेतुने ही खोटी तक्रार दाखल केली आहे, म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही पक्षाने दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली असता मंचासमोर तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय असा मुद्या उपस्थित झाला. तक्रारदाराने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडे त्याच्या जमिनीसमोरुन जाणारी 11 के.व्ही. ची इलेक्ट्रीसिटी लाईन दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी लागणा-या खर्चाची रक्कम रु.54,860/- दि.14.10.2005 रोजी जमा केल्याचे पावतीवरुन दिसून येते. परंतू तक्रारदाराने सदर रक्कम परत मिळावी यासाठी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्याचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराच्या जमिनीसमोरील इलेक्ट्रीसिटी लाईन काढून टाकली परंतू सदर लाईन दुसरीकडे बसविताना दि.20.08.2006 रोजी काम बंद केल्याचे वीज वितरण कंपनीच्या ज्युनिअर इंजिनिअरचे पत्रावरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कारण दि.20.08.2006 रोजीच उदभवले म्हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 24 (अ) प्रमाणे तक्रारदाराने ही तक्रार दाखल करण्याचे कारण घडल्याचे दिनांकापासून दोन वर्षाचे आत म्हणजे दि.20.08.2008 पूर्वी दाखल करणे आवश्यक होते परंतू त्याने ही तक्रार दि.09.09.2010 रोजी म्हणजे अत्यंत विलंबाने दाखल केली आहे. तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबाबाबत कोणताही खुलासा केलेला नाही आणि त्याने तक्रारीसोबत विलंब माफीचा अर्ज देखील दिलेला नाही. यावरुन तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय असल्याचे स्पष्ट दिसून येते. तक्रारदाराने ही तक्रार मुदतीत दाखल केली आहे हे दर्शविण्यासाठी दि.17.08.2010 रोजी वकिलामार्फत गैरअर्जदार वीज वितरण कंपनीस नोटीस पाठवून रक्कम रु.54,860/- मागणी केल्याची नोटीस सादर केली आहे. तक्रारदाराला त्याची तक्रार मुदतबाहय असल्याचे माहित असल्यामुळेच त्याने वीज वितरण कंपनीस वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसच्या आधारे (4) त.क्र.513/10 ही तक्रार मुदतीत असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे परंतू आमच्या मतानुसार तक्रारदाराची तक्रार मुदतबाहयच आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारीचा खर्च उभयपक्षांनी आपापला सोसावा.. 3) उभयपक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |