Exh.No.42
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 01/2014
तक्रार दाखल झाल्याचा दि.01/01/2014
तक्रार निकाल झाल्याचा दि.18/06/2015
श्री पांडूरंग बाबाजी लोणे
वय 59 वर्षे, धंदा – मच्छिमारी,
रा.दाभोसवाडा, ता.वेंगर्ला,
जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) Authorized Signatory,
Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd.,
4E Plaza, Air Port Road,
Yerwade, Pune – 411 006
2 ) श्री गजानन विश्वनाथ साळगावकर
वय – सज्ञान, धंदा – इंश्युरंस एजंट
रा.व्दारा – व्दारकानाथ विश्वनाथ साळगावकर
वय- सज्ञान, धंदा- इंश्युरंस एजंट,
रा. दाभोसवाडा, ता.वेंगुर्ला,
जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष,
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्य.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री एच. एस. तारी
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री ए.पी. हर्डीकर
निकालपत्र
(दि.18/06/2015)
व्दारा : मा. सदस्य, श्रीमती वफा जमशीद खान
1) विरुध्द पक्षाच्या विमा कंपनीने क्लेमची रक्कम देणेस उशीर केला व उशीराने मागणीपेक्षा कमी रक्कम दिल्याने विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटीसंबंधाने तक्रार दाखल करणेत आली आहे.
2) विरुध्द पक्ष क्र.1 या विमा कंपनीकडून आणि विरुध्द पक्ष क्र.2 या कंपनीच्या एजंटमार्फत तक्रारदार यांची बहिण पुष्पा बाबाजी लोणे यांनी दि.28/10/2008 रोजी विमा पॉलिसी उतरविली होती. दि.4/10/2009 रोजी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाले. तिच्या झालेल्या निधनाने तक्रारदार यांचे कुटूंबियांवर मोठा आघात झाला. तिचे उपचाराकरीता सुमारे रु.50,000/- इतका खर्च आला तो खर्च तक्रारदार यांनीच केला. तक्रारदार यांची बहिण पुष्पा लोणे ही अविवाहित असल्याने तक्रारदार हे त्यांचे सख्खे भाऊ असून तिचे कायदेशीर वारस आहेत.
3) मयत पुष्पा लोणे हिने विरुध्द पक्ष क्र.1 कडे उतरविलेल्या विमा पॉलिसीचा क्रमांक 112389432 आहे. तक्रारदार यांनी तिचे निधनानंतर विरुध्द पक्षाकडे क्लेमची रक्कम मिळणेसाठी अर्ज दाखल केला. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी चुकीचा अहवाल तयार करुन क्लेम मंजूर करता येणार नाही असे दि.22/1/2010 चे पत्राने कळविले. त्या निर्णयावर फेरविचार करण्याकरीता तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांचे क्लेम रेव्हयू कमिटीकडे कळविले, परंतू त्यांनीही दि.25/6/2010 रोजी फेरविचार अर्ज फेटाळला. विरुध्द पक्ष यांची ही कृती ग्राहक हितास धरुन नाही.
4) त्यानंतर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचे पणजी येथील कार्यालयास प्रत्यक्ष भेट दिली व पुन्हा क्लेमबाबत नव्याने चौकशी करणेस कळविले. त्यांनी मुख्य कार्यालयास पत्रव्यवहार करुन आपणास कळवू असे सांगितले. परंतु आजतगायत कोणतीही रक्कम तक्रारदार यांस अदा केली नाही. तक्रारदार यांनी सप्टेंबर 2013 मध्ये पणजी कार्यालयात क्लेमबाबत चौकशी केली असता क्लेमची रक्कम मिळणार नाही असे उत्तर दिल्याने विरुध्द पक्ष यास दि.6/11/2013 रोजी नोटीस पाठवून देय क्लेमची मागणी केली. नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्षाने कोणतेही उत्तर दिले नाही अथवा नोटीसीतील मजकूरही नाकारला नाही. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दि.8/12/2013 रोजी रक्कम रु.7417/- चा धनादेश क्लेमच्या परताव्याची रक्कम म्हणून पाठविला.
5) तक्रारदार यांची बहिण विरुध्द पक्ष यांची पॉलिसीधारक पुष्पा लोणे हिचे निधनानंतर तिचे वारस या नात्याने तक्रारदार यांना विमा पॉलिसीचा लाभ देणे विरुध्द पक्ष क्र.1 या विमा कंपनीचे कर्तव्य होते. असे असता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना दिलेली सेवा व उत्तरे ही त्यांचे सेवेतील त्रुटी दाखवितात. त्यामुळे तक्रारदार यांनी क्लेमची रक्कम रु.1,84,583/-, अर्जाचा खर्च रु.5,000/- आणि तक्रारदार यांना झालेला मानसिक त्रास व प्रवास खर्चापोटी रु.10,000/- वसुल होऊन मिळणेसाठी विरुध्द पक्ष यांचेविरुध्द तक्रार दाखल करणेत आली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत कागदपत्रे दाखल केली आहेत ती नि.5/1 ते 5/9 वर आहेत. त्यामध्ये क्लेम नोटीस, मृत्यू प्रमाणपत्र, दि.22/1/2010 चे विरुध्द पक्षाने पाठविलेले उत्तर, क्लेम रेव्हयू कमिटी यांनी दिलेले उत्तर, दि.6/11/2013 ची नोटीस, पावती पोहोचपावती- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना नोटीस प्राप्त झालेची, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना पाठविलेले पत्र व धनादेशाचा समावेश आहे.
6) तक्रारीची नोटीस प्राप्त होताच विरुध्द पक्ष क्र.1 त्यांचे वकील प्रतिनिधीमार्फत हजर होऊन त्यांनी उशीराने दि.31/7/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केले ते नि.20 येथे दाखल आहे. तसेच तक्रार मुदतबाहय असल्याने प्राथमिक मुद्दा काढून निकाली काढावी अशी विनंती केली. नि.19 वर चौकशी होऊन मंचाने दि.27/10/2014 रोजी आदेश पारीत करुन तक्रार दाखल करणेस कोणतीही मुदतीची बाधा येत नसल्याचे स्पष्टीकरण देऊन नि.19 चा अर्ज नामंजूर केला. विरुध्द पक्ष क्र.2 नोटीस बजावणी होऊन देखील गैरहजर राहिल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला.
7) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी म्हणण्यामध्ये तक्रारीतील मजकूर नाकारला असून विरुध्द पक्ष कंपनीने कै. पुष्पा यांस विमा पॉलिसी वितरीत केल्याचे मान्य केले आहे.
8) विरुध्द पक्ष 1 च्या म्हणण्यानुसार जीवन विमा हा कंपनी व विमेदार यांचेतील परस्पर विश्वासाने केलेला करार असल्याने कै. पुष्पा यांनी प्रपोझल फॉर्म भरतांना त्यांचे आजारासंबंधाने खरी माहिती देणे आवश्यक होते. कै. पुष्पा यांस 2003 पासून उच्च रक्तदाब व हायपर टेन्शनचा त्रास असून त्या डॉ.संजीव आकेरकर यांचेकडे हृदयरोगावर उपचार घेत असल्याचे सन 2003, 2005 व 2009 मधील वैदयकीय रिपोर्टस व प्रिस्क्रिप्शनवरुन दिसून आले. सदर आजाराची माहिती पॉलिसी घेतांना भरलेल्या प्रपोझल फार्ममध्ये जाणीवपूर्वक लपविली. सदर लपविलेल्या आजाराच्या कारणानेच कै. पुष्पा यांचा मृत्यू झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. विमा कायदा 1938 चे कलम 45 चे तरतुदीनुसार विरुध्द पक्ष कंपनीने तक्रारदाराचा क्लेम आपल्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक लपविल्याचे कारणास्तव (due to suppression of material facts) फेटाळणेचा निर्णय योग्य व कायदेशीर आहे. विरुध्द पक्ष कंपनीने पॉलिसीचे अटी-शर्ती नुसार देय होणारी रक्कम रु.7417/- धनादेशाद्वारे तक्रारदारास पोच केली आहे. यावरुन विरुध्द पक्ष कंपनी ग्राहकास पॉलिसी अटी-शर्तीनुसार सेवा देण्यास कटीबध्द असल्याचे व कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी केली नसल्याचे स्पष्ट होणारे आहे असे म्हणणे मांडून तक्रार फेटाळणेची विनंती केली.
9) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नि.21 वर कागदाची यादीसोबत सात कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये पॉलिसीचा प्रपोझल फॉर्म, डॉ.संजीव आकेरकर यांनी कै. पुष्पा यांचे मृत्यूबाबत दिलेला दाखला, हॉस्पीटलमधून कुडाळ ग्रामपंचायतीस मृत्यू नोंद करण्याकरीता दिलेला दाखला, दि.24/12/2009 रोजी तक्रारदार पांडूरंग यांनी दिलेला जबाब, कै. पुष्पा यांचे मृत्यूबाबत SISA एजन्सीमार्फत करणेत आलेला दि.29/12/2009 रोजीचा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट, दि.22/01/2010 रोजी क्लेम नाकारलेबाबत तक्रारदारास पाठविलेले पत्र, विरुध्द पक्ष कंपनीचे रेव्हयु कमिटीने रेव्हयु फेटाळलेबाबत तकारदारास पाठविलेले दि.25/6/2010 चे पत्र या कागदपत्रांचा समावेश आहे.
10) तक्रारदार यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.25 येथे दाखल आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.29 येथे दाखल आहे. नि.30 वर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी सहा कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच नि.31 वर डॉ.मनोज भिसे यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार आणि विरुध्द पक्ष क्र.1 यांनी परस्परांना उलटतपास घेणेकरीता मंचाकडे परवानगी मागितली होती. परंतु सदर प्रकरणात कागदोपत्री पुरावा दाखल करण्याची संधी उभयपक्षांना देणेत आली होती आणि उलटतपासाची आवश्यकता वाटत नसल्याने उलटतपासाची परवानगी उभयपक्षकारांना नाकारणेत आली.
11) तक्रारदार यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला तो नि.36 वर आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दाखल केलेला लेखी युक्तीवाद नि.39 वर आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नि.40 सोबत 2 सायटेशन दाखल केली आहेत ती 1) 2007 Law Suit (SC) 1251 2) 2006 Law Suit (Ori) 131 अशी आहेत. तक्रारदारतर्फे वकील श्री. तारी आणि विरुध्द पक्ष क्र.1 तर्फे वकील श्री.हर्डीकर यांनी केलेला तोंडी युक्तीवाद मंचाने ऐकला. या सर्व बाबी विचारात घेता मंचासमोर पुढील मुददे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार या ग्राहकास सेवा देण्यात विरुध्दपक्षाने त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
2 | तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ? | होय |
3 | आदेश काय ? | खाली नमूद केलेप्रमाणे |
-कारणमिमांसा -
12) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदार यांची मयत बहिण पुष्पा हिने विरुध्द पक्ष क्र.1 कंपनीकडे क्र.112389432 ने रक्कम रु.1,92,000/- ची जीवन विमा पॉलीसी घेतली होती. ही बाब उभयपक्षांना मान्य आहे. तिने दि.28/10/2008 रोजी सदर पॉलीसी घेतली होती आणि तिचे निधन दि.04/10/2009 रोजी झाले. सदर पॉलीसीचा कालावधी दि.28/10/2008 पासून पुढे चालू होता. मयत पुष्पा हिने पहिल्या वर्षाचा विमा हप्ता रु.12,000/- विरुध्द पक्ष कंपनीकडे जमा केलेला होता. मयत पुष्पा हिचे निधन दि.04/10/2009 रोजी Sudden Cordiac Respiratory Arrest in Intracerebral Bleed मुळे झाल्याचे विरुध्द पक्ष यांना मान्य आहे. तक्रारदार यांनी मयत पुष्पाचा वारस या नात्याने विरुध्द पक्ष कंपनीकडे पॉलीसीला अनुलक्षून विमा क्लेमची मागणी केली. परंतु विरुध्द पक्ष कंपनीने तक्रारदाराचा क्लेम “मयत पुष्पा हिने तब्येतीबाबत महत्वाची माहिती जाणीवपूर्वक लपविल्याचे कारणास्तव ” दि.22/01/2010 रोजी फेटाळला आणि तक्रारदार यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर उशिराने दि.08/12/2013 रोजी फंड व्हॅल्यूची रक्कम रु.7,417/- तक्रारदार यांस अदा केली परंतु क्लेमची रक्कम अदा केली नाही ही बाब विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या सेवेतील त्रुटी स्पष्ट करते असे मंचाचे मत आहे. सबब मंच मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
13) मुद्दा क्रमांक 2- विरुध्द पक्ष यांनी त्यांचे लेखी म्हणणे तसेच स्वतंत्र अर्ज नि.19 वर दाखल करुन तक्रारदारने तक्रार मुदतीत म्हणजे क्लेम रीव्हीव्यू कमिटीने फेटाळलेची दि.23/06/2010 पासून दोन वर्षाच्या आत दाखल केली नसल्याने तक्रार मुदतबाहय असल्याने ती फेटाळणेची विनंती केली. तक्रारदारने तक्रार अर्जासोबत जर विलंब आहे असे मंचाला वाटल्यास क्षमापीत करावा असा स्वतंत्र अर्ज दिला होता. तक्रार अर्ज आणि सोबतची कागदपत्रे पाहून मंचाने तक्रार दाखल करुन घेतली व सदर अर्जकामी तक्रारीच्या अंतिम निकालाच्यावेळी विलंब आहे की नाही ही बाब ठरविणेत येईल असा आदेश करणेत आला. परंतु दरम्यान विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नि.19 वर मागणी केल्याप्रमाणे विलंबासंबंधाने प्राथमिक मुददा काढून त्यांचा निकाल दि.27/10/2014 रोजी होवून तक्रार मुदतीत दाखल केली असल्याचे स्पष्ट करणेत आले. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष कंपनीने दि.08/12/2013 रोजी क्लेमच्या मागणीपेक्षा कमी रक्कमेचा रु.7,417/- चा धनादेश दिला तेव्हापासून दोन वर्षाच्या आत तक्रार दाखल करणेत आली असल्याने विरुध्द पक्ष क्र.1 चा तक्रार मुदतबाहय असल्याचा आक्षेप नाकारणेत आला.
14) विरुध्द पक्ष क्र.1 च्या म्हणण्यानुसार विमा पॉलीसी हा एक परस्पर विश्वासाने केलेला करार आहे. मयत पुष्पा ही सन 2003 पासून डॉ.संजीव आकेरकर यांचेकडे उपचार घेत होती परंतु प्रपोझल फॉर्म भरताना स्वत:चे आजाराची माहिती लपवून खोटी माहिती भरली. मयत पुष्पा हिचा मृत्यु सदर लपविलेल्या आजारामुळेच झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने तक्रारदाराचा क्लेम नाकारणेत आला. त्याकरीता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी उच्च न्यायालयांच्या दोन न्यायनिवाडयांचा तसेच विमा कायदा 1938 चे कलम 45 चा आधार घेतला आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तकारदाराचे क्लेमचे कारणे जे इन्व्हेस्टीगेशन केले त्यासंबंधाने कागदपत्रे नि.21/1 ते 21/7 आणि नि.30/1 ते नि.30/6 कडे दाखल केली आहेत.
15) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नि.21 आणि 30 सोबत जी कागदपत्रे दाखल केली आहेत ती झेरॉक्स प्रतीमध्ये असल्याने त्यांना पुराव्यामध्ये कोणतेही मुल्य प्राप्त होणारे नाही असे तक्रारदार यांचे वकीलांनी स्पष्ट केले. तर विरुध्द पक्ष यांचे वकील श्री.हर्डीकर यांनी सदर कागदपत्रांवर तक्रारदार यांच्या सहया असल्यामुळे व ती कागदपत्रे त्यांनी क्लेम सादर करतांना सोबत दिली असल्यामुळे मूळ कागदपत्रांची आवश्यकता नाही असे सांगितले. तसेच त्या कागदपत्रावरील औषधांचा विचार करता मयत पुष्पा यांना देण्यात आलेली औषधे ही हृदयविकार आणि उच्च रक्तदाब याकरीता देण्यात आली असल्याचे दर्शविण्यासाठी विरुध्द पक्ष तर्फे डॉ.मनोज भिसे यांच्या शपथपत्राचा आधार घेणेत आला. त्यावर तक्रारदार तर्फे वकील श्री.तारी यांनी झेरॉक्स कागदपत्रांवरील सहया तक्रारदार यांच्या असल्याचे अमान्य केले. तसेच डॉ.आकेरकर यांना तपासणेची संधी विरुध्द पक्ष यांना असतांना व डॉ.भिसे यांनी तक्रारदार यांची मयत बहिण पुष्पा हिला कधीही तपासलेले नसतांना झेरॉक्स कागदपत्रांवरुन व्यक्त केलेला अंदाज व त्याव्दारे केलेले शपथपत्र पुराव्याकामी स्विकारता येणार नसल्याचे सांगितले. तसेच मयत पुष्पा ही मासे विक्रेती असून तिला असणा-या सामान्य ज्ञानातून सांगितलेली माहिती इंग्रजी फॉर्ममध्ये भरणेत आलेली असून विमा कंपनीने पडताळणी करुनच विमा पॉलीसी दिलेली असल्याने तक्रारदार यांचा क्लेम विमा कंपनीला नाकारता येणार नाही. त्यामुळे तक्रार मंजूर करावी अशी विनंती केली.
16) विमा पॉलीसी घेत असतांना विमाधारकांने प्रपोझल फॉर्म भरतांना सत्य माहिती भरली पाहिजे ही आवश्यक बाब आहे. परंतु विमा पॉलीसी देत असतांना विमा कंपनीने प्रपोझल फॉर्ममधील माहितीची सत्यता पडताळून त्याची खात्री करणे हे तितकेच महत्वाचे आहे. सध्याच्या स्पर्धेच्या काळात बहुतांश विमा कंपन्यांमध्ये विमा पॉलीसी उतरविण्याची चुरस लागलेली असते. कंपनीचा व्यवसाय मोठा करण्यासाठी एजंट– सब एजंट यांना टार्गेट देवून विमा पॉलीसी कोणतीही खात्री न करता दिल्या जातात. यामध्ये विमा कंपन्या आणि एजंट यांचा फायदा होतो परंतु सामान्य ग्राहक जो स्वत: च्या आणि कुंटुंबाच्या भविष्याच्या दृष्टीने स्वत:च्या कष्टांचा-श्रमाचा पैसा या विमा कंपन्यांच्या स्वाधीन करतो त्यांच्यावर जेव्हा वाईट प्रसंग येतो तेव्हा या विमा कंपन्या काही ना काही कारणे दाखवून विमा दावे फेटाळतांना दिसतात.
17) तक्रारदार यांच्या विमा क्लेम संबंधाने विचार करता मयत पुष्पा ही एक मासे विक्रेती सर्वसामान्य महिला होती. ती उच्चशिक्षीत नव्हती. हायपर टेंशन, हार्ट डिसीज या वैदयकीय शब्दांच्या अर्थाची अपेक्षा एका मासे विक्रेत्या महिलेकडून करता येणारी नाही. ज्या दिवशी पॉलीसी उतरविणेत आली त्यादिवशी ती उपचार घेत होती असा कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल नाही. मयत पुष्पा हिच्या ज्ञानाप्रमाणे तिने दिलेली उत्तरे ही तिच्या दृष्टीने खरी असू शकतात. ती उत्तरे फसविण्यासाठी खेाटेपणाने दिली असे म्हणता येणार नाही. मयत पुष्पा यांना विरुध्द पक्ष यांचेकडून देणेत आलेला प्रपोझल फॉर्म हा इंग्रजी भाषेमध्ये आहे. तो प्रपोझल फॉर्म मयत पुष्पा हिने स्वत: भरलेला नाही. अशा परिस्थितीत पॉलीसी देताना प्रपोझल फॉर्ममध्ये लिहिलेली माहिती सत्य आहे अगर कसे याची खात्री विरुध्द पक्ष कंपनीने करणे आवश्यक होते. सदर प्रपोझल फॉर्मच्या कॉलम 10 मध्ये डॉ.सुदेश सावंत यांचे नाव रेग्युलर डॉक्टर म्हणून नोंद आहे. पॉलीसी देत असतांना विरुध्द पक्ष यांनी त्यावेळी चौकशी का केली नाही. तसेच त्या कॉलमची सर्व उत्तरे लिहिली गेली आहेत किंवा नाही याची खात्री करणे गरजेचे होते. त्यामुळे मयत पुष्पा हिने प्रपोझल फॉर्म मध्ये भरलेली माहिती ही तिच्या सामान्य ज्ञानावर आधारीत असल्याने व तो प्रपोझल फॉर्म कोणतीही पडताळणी न करता स्विकृत करुन विमा पॉलीसी देण्यात आली असल्याने “Suppression of material facts महत्वाच्या गोष्टी जाणीवपूर्वक लपविणे ” हा विरुध्द पक्ष क्र.1 चा आक्षेप मान्य करता येणार नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा दावा फेटाळणे आणि उशिराने फंड व्हल्यू देणे ही विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या सेवेतील त्रुटी असल्याने तक्रारदार हे विमा क्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांचेविरुध्द कोणताही पुरवा दाखल नसल्याने त्यांचेविरुध्दची तक्रार रदद करणेत येते.
18) मुद्दा क्रमांक 3- वरील विस्तृत विवेचनानुसार विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याचे तक्रारदार यांनी पुराव्यानिशी शाबीत केलेने तक्रारदार हे विमा कंपनीकडून विमा पॉलीसीची रक्कम रु.1,92,000/- मधून तक्रारदार यांस प्राप्त रक्कम रु.7,417/- वगळता रक्कम रु.1,84,583/-मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम मिळविणेसाठी सन 2009 पासून 2013 पर्यंत विमा कंपनीकडे व त्यानंतर मंचामधे ग्राहक तक्रार दाखल करुन जो शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास झाला त्यापोटी आणि प्रकरण खर्च मिळून रक्कम रु.15,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. त्यादृष्टीकोनातून आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रार मंजूर करणेत येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा क्लेम पोटी रक्कम रु.
1,84,583/- (रु.एक लाख चौ-याऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी मात्र) दयावेत.
3) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने ग्राहकाला देणेत येणारे सेवेत त्रुटी ठेवल्याबददल
झालेला आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासापोटी आणि प्रकरण खर्च मिळून रक्कम
रु.15,000/- (रु.पंधरा हजार मात्र) तक्रारदार यांना दयावेत.
4) सदर आदेशाची पूर्तता आदेशाचे दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेची आहे.
अन्यथा तक्रारदार वरील आदेशीत रक्कमांवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज
मिळणेस पात्र राहतील.
5) विरुध्द पक्ष क्र.2 विरुध्दची तक्रार रदद करणेत येते.
6) मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/
परिपत्रक/2014/3752 दि..05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर
म्हणजेच दि.01/08/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे
कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 18/06/2015
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.